शनिवार, २० जानेवारी, २०१८

'दिलखुलास' व्यक्तिमत्वं आणि संवाद ..

  साऱ्यांनाच प्रेमात पाडतं. आपलंसं करून घेतं ते.. लगेचच.
हॉस्पिटल मधल्या साफसफाई करण्याऱया त्या मावशी..
लगबगीने पुढे होत बोलू लागल्या.
" ती कालची  माणसं होती ना, तुमच्या बाबांच्या शेजारी, त्या पलीकडं , खूप चांगली होती हा...
त्यांचा तो मुलगा,
(त्यांच्याकडे  पाहत...मी  ) ...हं, ते बहीण भाऊ असलेलं दोघे ना, त्यांच्या वडिलांच्या शेजारी  बसलेले ते ....मी  त्यांना ईचारल.
व्हय..तेच,
हॉस्पिटलात आल्या आल्या ईचारायचे,
''काय मावशी, आलात का ?''
 ''या, या ...''
''गुड मोर्निंग, गुड मोर्निंग...''
''आज लवकर...आलात. ? ''
 ''चहा नाशता घेतलात ना  ? ''
माझी सुरवात ह्यांच्या ह्या अश्या गोडं  बोलण्याने व्हायची.

सकाळी सातला हॉस्पिटला रुजू झाले कि ह्यांचा आवाज..

 मावाशीsssss.. मावशीssssss ..
मावाशीssssss.. मावशीssssss...

कशी अगदी मोकळ्या मनाची होती.
रोज काय ना काय विषय निघायचा. बोलती असायची.
कालच डिसचार्ज मिळालं त्यांना, निघून गेली. पण मनात जागा करून...


मावशीच ते बोलणं ऐकत होतो.
जनरल वॉर्ड मधला आमचा एक पलंग आणि आमचं पेशंट (बाबा)  सोडल्यास,  इतर सगळी आता  .
आपल्या घरी योग्य तो ईलाज घेऊन परतली होती.
रिकाम्या, आठ 'रुग्ण' राहतील , इतक्या ह्या प्रशस्त खोलीत मात्र,
आता .. गत आठवणींचा एकांत तेवढा कुजबुज करून राहिला  होता.
आणि ह्या अश्या  एकांतातही...
आपणहून नि आपलेपणाने साधला गेलेला तो  स्वर' , ती वाक्य , ते हसू ते मोकळपण..  मावशी चौफेर नजरेनं  शोधत राही.

अवघ्या काही दिवसाची  ती ओळख , त्यांच्यासोबत असलेली.  ती दोघं बहीण भाऊ..
हॉस्पिटल मध्ये वडलांना उपचारासाठी म्हणून आणले असताना त्यांना सोबत म्हणून केवळ  इथं  राहिलेले .  ते हि जास्तीत जास्त किती ..तर आठवडा भर ...बस्स.
पण तरीही ... ह्या मावशीवर...
केवळ सफाई कामगार म्हणून,  रुजू असलेल्या ह्या इथल्या बाईवर...
काय जादू करून गेले कुणास ठाऊक , जीव अडकून राहिलाय  त्या दोघात.
नजर म्हणुनच भिरभिरतेयं...
नाहीतर इथं  कोण कुणाला इचारतंय.  कुणीबी नाही .
मावशीच्या चेहर्यावरून आणि बोलण्यावरून  त्यांचा मनातले भाव कळून येत होते.
कुणीतरी आपलं , आपल्यापासून  दूर निघून जावं . मनाला हुरहूर लावून , एकटं टाकून , असं  काहीसं त्यांना जाणवत असावं.
म्हणूनच आज त्यांचं मन कश्यात लागत न्हवतं.  
ओढवलं जातं होतं ते , केवळ त्याच त्याच आठवणींमध्ये..पुन्हा पुन्हा...
स्वतःला ( म्हणजे त्याना ) माझ्यापुढं असं बोलतं करून देत.

'संवादाची' हीच तर खरी ताकद आहे.
कुणाला हि..अगदी  कुणालाही ...मग तो कुणी, अनोळखा  हि का असेना , क्षणात पुढे असा उभा राहिलेला हि , त्याला आपलंस करून घेण्याची  आणि सामावून घेण्याची हि  ताकद ..  ह्या 'संवादाचीच', ह्या 'शब्दसख्यांची'..
मनाची ‘सात्त्विकता’ नि ‘आपलेपणाचा’ कोवळा हसरा अर्क ...तेवढा त्यात असला म्हणजे झालं.
मग कुठल्या हि नात्याला 'नाव - गाव' ची गरज भासत नाही. पूर्व ओळखीची गरज लागत नाही .
ते आपलेपणानं , स्नेहगोडीनं मनाशी जोडलं जातं. फुलपाखरावाणी क्षणभर आपल्याशी विसावलं जातं, मुग्ध आनंद देऊन..  
अजून काय लिहू..
नात्यातला   'दुवा' म्हणजेच हा  ‘संवाद  आपण तो योग्य पद्धीतीने  कसा साधतो , त्यावरच  नात्याची वीण हि जुळली जाते.
सांगायचंय काय ...
संवाद असू द्यावा...पण आत्मप्रेमळ .. :) सहज असा ...
 - संकेत पाटेकर

२०/०१/२०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .