रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

आठवणींचा झुला ...

भांडुप ला आलो कि मी भांडुपचाच होऊन जातो.
खूप साऱ्या आठवणी इथे दडल्यात, जगल्यात..
..त्या जाग्या होऊन पुन्हा नव्याने खेळू लागतात, जगू लागतात.
ती शाळा..., दिसतेय, हा तीच,।
एकमजली, भांडुप व्हिलेज शाळा नं 2. पूर्व,
जिथे पहिली ते सातवी शिक्षण झालं.
तोच शाळेजवळचा गोपाळ वडापाव, अद्यापहि सुरू आहे.
त्यावेळी दीड एक रुपया वडा पाव आणि एक रुपया चटनी पाव मिळायचा, तो शाळेच्या मधल्या सुट्टीत घेत असे.
तो दिना बामा पाटील मैदान , हा तोच ,
रेल्वे जवळचा..
जिथे लहानाचे मोठे झालो, मैदानी खेळ खेळून, सराव करून,
त्याच्या खुणा अद्यापही तश्याच आहेत जागत्या, जित्या,
नशीब त्यावेळेस मोबाईल वगैरे हा प्रकार अस्तित्वात न्हवता.
मात्र सुरवात झाली होती ,पेजर ह्या प्रकाराने..
असो,
खेळासोबत , मनोरंजनाचे हि विविध कार्यक्रम पाह्यला मिळत. दिना बामा पाटील हॉल च्या आवारात,मैदानात..
मग वस्त्रहरण सारखं नाटक असेल,, दिवाळीतले विविध कार्यक्रम असतील, नाचगाणी (नृत्य स्पर्धा ) वगैरे, पहाटे चार चार वाजेपर्यंत खेळला गेलेला गरबा असेल , शीमग्यात घेतलेले सोंग..आणि मैदानी जत्रा, जी आजही सुरु आहे.
ते पिंपळाचं झाड दिसतंय,
येस तेच, तिथे आसपास आम्ही राहत असू,
रेल्वे ट्रॅक च्या अगदी बाजूलाच खेटून,
छोट्याश्या अगदी , चार पाच माणसं झोपू शकतील इतक्या पत्राच्या भिंती असलेल्या आणि कोबा असलेल्या जमीनी जागेत,
तेंव्हा ते घर हि स्वर्गाहून मोठं वाटत. आपण ह्या श्या फाटक्या तुटक्या घरात राहतोय असं कधी जाणवलं हि नाही.
कारण त्यात आईच वात्सल्य रुपी प्रेम होतं.
आणि तिच्या कुशीतली जागा...
ते दिसतंय मंदिर, गावातलं, हनुमान आणि गणेश मंदिर, आज जिथे जत्रा भरली होती.
हा तेच ते,
तिथे आम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत वा सुट्टी असल्यावर खांब खांब खेळत असू..
मंदिरा भोवती घिरट्या घालत असू,
आज त्याच मंदिरा ला भेट देण्याचा योग पुन्हा आला. यथार्थ दर्शन झालं. त्या आठवणींना उजाळा देत.
ते बघ आता, ते
चिंचेचं झाडं, माझ्या जन्माच्या आधी पासून आहे ते, पूर्व पाश्चिम रेषा जोडणाऱ्या ब्रिज वर सावली घेऊन, कित्येक वर्ष उभं.
सातवी नंतर मी कस्तुरीत (कस्तुरी विद्यालयात) दाखल झालो. त्यावेळेस शाळेत जाता जाता वा येता येता त्याची पानं चघळायचो.
आता हि तेच वाटत होतं, त्याखालून जाता जाता, तोडावी काही पाने आणि पुन्हा चघळून बघावी, तीच चव आहे का ? त्यावेळी असलेली कि बदलली, माणसं बदलतात त्याप्रमाणे ..वा जगाच्या नियमाप्रमाणे,
असो,
तो ब्रिज उतरलो कि पहिलंच लागतं ते गावदेवी मंदिर,
परीक्षा असली कि न चुकता देवीच्या समोर उभं राहायचो, गार्हाणं घालत..
'' हे देवी माते, आजचा पेपर सोपा जाऊ दे..हं '' अभ्यास होवो अथवा ना होवो , परीक्षा असल्यावरच हे असं सुचायचं अन्यथा बाहेरूनच मनातून नमस्कार करत पुढे सरायचो..
असं असायचं एकूणचं सगळं..
तो रेशनिंगच दुकानं..
रॉकेल आणि अन्य गोष्टीं साठी, तासनतास रांगेत घालवलेले ते क्षण...
ती बेकरी
जिथे दिवाळीत आई नानकटाई बनवून घेत...
जिथून आम्ही पेलाभर दूत आणत असू, चहासाठी..
ती बेकरी अजून हि सुरु आहे.
तो ब्रिज खालचा वडापाव, ते दुकान,
बाबांसोबत बाहेर आलो कि हमखास तिथे वडापाव खायला मिळत, डाळ वडे मिळत, आणि सोबत मिर्ची भजी हि..न काही सांगता..
आज तिथेच आपण पेटीस ण समोसा खाल्ला न्हाई,
असो अश्या कित्येक आठवणी आहेत..
गल्ली बोलीतल्या..
तू जुरासिक पार्क पहिला असशीलचं ना,
पहिला वाहिला, अचंबित करणारा..तो चित्रपट.
मी तो सगळा चित्रपट एका घराच्या बाहेर उभं राहून, एकाग्र नजरेनं पहिला होता..
तीच ती गल्ली..
जिथून आज आपण चालत आलो..
भांडुप ला आलो कि हे असं होतं.
भटकतं मन...आठवणीच्या झुल्यात..
शेवटी जन्मस्थळ ते माझं.
बालपण गेलेलं.
- संकेत पाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .