मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

तिच्या मनातून ...

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ह्या हृदयाला

बाळकवींच्या ह्या ओळीने तिचं मन आज कुठल्याश्या गर्दीत हरखून गेलं होतं.
बराच वेळ म्हणा ,  त्या ओळी  ती स्वतः शीच अशी  गुणगुणत होती. 
आणि विचारमग्न होतं होती.

काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतहृदयाला ....

रात्रीच्या शांत प्रहरी,  ह्या ओळींचा तिच्या  मनावर हळुवार  असर  होऊ लागला होता. कुठल्याश्या अनामिक ओढीने  मन गहिवरलं  जातं होतं .
त्याने ती बैचेन झाली  होती . 

आज हे असं का होतंय  आपल्या बाबत   ?
आभाळ दाटून यावं , अशी एकाकी अवस्था झाली आहे ह्या मनाची  .  

कुणी तरी जवळ असावं  , आपल्याशी बसावं , आणि आपलं म्हणून  मी  त्याच्याशी मोकळेपणाने बोलावं  हलकं व्हावं  , असं मनोमन  वाटतंय ? 

हि हुरहूर हि रुखरुख ..........त्याबाबतीत तर नाही ना?

अगदी काही दिवस तर झालेत ...त्याच्याशी  ओळख हॊऊन ..आणि काय तो संवाद साधून , अजून भेटलो  हि कुठे आम्ही..,
नुसता काय तो  संवाद आहे ..आपलेपणाने भरलेला. मोकळा असा  आणि
त्याने एवढ्यात ..! 

खरंच,  माणसं इतक्या लवकर आपलीशी होतात. ?
जादूची काडी एकाकी फिरवावी आणि चुटकीशी सगळं बदलावं अशी हि किमया साधता येते?
असेल हि…………
माणसाचा चांगुलपणा आणि मोकळेपणा कुठेशी भावतोच ना मनाला ..... त्याबाबतीत हि तेच असेल.
पण हि ओढ…..
हि ओढ .......आज मला काही स्वस्थ बसू देत नाही आहे आणि देणार  हि नाहीये.
 बोलायला हवं मला त्याच्याशी .
पण इतक्या रात्री ..?
जागा असेल  ना तो ? 
रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. 
करू का कॉल ? ...
काही कळत नाहीये...,   छे ?
पण नाही बोलले तर मन  तग धरणार नाही. 
झोप तर दूरची गोष्ट . तळमळायला होईल रात्रभर.

पण इतक्या रात्री फोन  करून त्यालाही त्रासच ना ?
काय करू…? (क्षणभर विचारमग्न होंऊन ..)
 कॉल केल्याविना मला काही चैन पडणार नाही.  
असेल तो जागा ..

(मनाच्या निश्चयाने ती फोन करते… )
(रात्रीच्या शांत प्रहरी ... अर्धनिद्रा अवस्थेत असता , त्याचा फोन खणाणतो .
तिंचा तो कॉल पाहिल्यावर .. क्षणभर विचारमग्न होऊन ..... )

बारा वाजून गेले आहेत . इतक्या उशिरा हिचा कॉल ? 
बाल्कनीच्या  चौकटीत येऊन ...त्याने बोलायला सुरवात केली .
रात्रीच्या शांत प्रहरात तिचा हळुवार  आवाज हि मनास गोडवा देत होता.  
हॅलो ..!
हाय .....!
जागा आहेस ?
नाही ...म्हणजे जागाच होतो मी.
अच्छा ...
हम्म ....
' बोल काय झालं . ? सगळं ठीक ?
इतक्या रात्री कॉल केला आहेस म्हणून विचारतोय ?
काही नाही रे , जरा  अस्वस्थ वाटत होतं. एकटं...... म्हटलं बोलू तुझ्याशी ..
अच्छा...
बोल मग ....
काय म्हणतेस आणि का असं  वाटतंय ?
माहित नाही.
ठीकाय….
(काही क्षणाच्या शांततेनंतर …)

चल फार उशीर  झालाय ...शांत पणे झोप ... जास्त विचार करू नकोस !
आपण सकाळी बोलू .. 
हम्म ... 
गुड नाईट ,
काळजी घे….!

गुड नाईट….!

आपलेपणाच्या त्या स्वराने ...तिच्या  काळजाची हुरहूर क्षणात मंदावली. उद्याच्या स्वप्नाची हातमिळवणी करत ..गाढ निद्रेत विसावतं ....
क्रमश :
तिच्या मनातून ...  
हृदया- एक स्वप्नं सखी 
- संकेत पाटेकर -  08-08-2016