मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

आत्ताच हाती आलेल्या सुचनेनुसार ..,

कधी कधी ह्या आपल्या नित्य नेहमी जीवन वाहिनीतून , रेल्वेतून प्रवास करतेवेळी, काळीज पिळवनारे प्रसंग जसे नजरेसमोर येतात तसेच हास्य कल्लोळलाने भरगच्च असे कित्येक क्षण देखील आपल्या चेहऱ्यावरील स्मित हास्य रेषा एखाद कळी सारखे हळूच उमलू देतात.
आजचीच घटना ,
सकाळी ८ वाजून ५० मिनिटाची ठाण्याकडून सीएसटी करिता, फलाट क्रमांक एक उभी असलेली लोकल ९ वाजून गेले तरी जागीची हलेना , वेळेत पोहोचण्यासाठी नेहमीच घाईत असलेले मुबई ठाण्याचे लोक अश्यावेळी वैतागतात ह्यात काही नवल नाही .सांगायची गरज नाही . काही जण मग मुकाट्याने दुसरी एक ट्रेन पकडतात. अन पुढे निघून जातात . तर काही जण तिथेच बसून आपल्या ट्रेन सुटण्याची वाट पाहत राहतात.
मी हि अश्यातलाच ...ट्रेन सुटण्याची वाट पाहत उभाच होतो . तेवढ्यात
दाराशी उभ्या असलेल्या एकाने हळूच म्हटले, ' बाबा हि ट्रेन आता रद्द होणार आहे बहुतेक .
मोटार मनच गाडी खाली गेला आहे ?
गाडी खाली म्हणजे ?
मला क्षणभर कळेनाच ? तेंव्हा त्याने त्याबद्दल खुलासा केला , ट्रेन सुरु होत नाही आहे, काही तरी बिघाड आहे ते पाहण्यासाठी , ट्रेन खाली काय तर करतोय तो ...
तेंव्हा मी हि डोकावून पाहिलं तर खरच काहीतरी काम चालू होत. सकाळची वेळ अन अशातच इतका वेळ गाडी उभी , कामावर जाईची लोकांची घाई , लोक ताटकळत ट्रेन सुटण्याची वाट पाहतायेत . तेवढ्यात भोंग्यातून Announcement ऐकू येते . Paltform no. एक वर उभी असलेली लोकल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे.
हे ऐकू येताच भरगच्च खचून भरलेली ती ट्रेन क्षणात रिकामी झाली .....
पाउलं पटा पटा एक एक करून बाहेर पडू लागली. पुढच्या फलाटा दिशेने ....पुढच्या ट्रेन साठी . मनातल्या मनात शिव्या हासडत ... इतका वेळ वाया गेला उगाच, अस गुणगुणत .
ते गुणगुणत असताच वाऱ्या वेगात पुन्हा एक Announcement ऐकू येते . Paltform No. एक वर उभी असलेली ट्रेन सीएसटी करता आता रवाना होत आहे. हे ऐकताच पुढे जाणार्या लोकाची पाउलं जागीच थांबली , पुन्हा रिवर्स घेत मागे वळली . पुन्हा पळापळ...धावपळ ..सीट मिळविण्यासाठी.
कुणाच्या तोंडी हसू तर कुणाच्या तोंडी शिव्या .. काय नुसतं इकडून तिकडून पळापळ ....
जीवन वाहिनीतिले असे विविध रंग आपल्या प्रवासा दरम्यान अनुभवता येतात.
नाही का ?
संकेत य पाटेकर
३०.१२.२०१४

सोमवार, १५ डिसेंबर, २०१४

आयुष्यं हे असंच असतं ...

एका ठराविक अंतरापर्यंत, एका क्षणापर्यंत , एका ठराविक मर्यादे पर्यंत आपण न बोलता...
न भेटता एखादयापासून दूर राहू शकतो . पण ती ठराविक रूपरेखा ओलांडली कि मनाचा विस्फोट झालाच समजा.
मन मग मागे पुढे पाहत नाही .आपण स्वतहून पुढे सरसावतो अन बोलू लागतो.
समोरील व्यक्तीशी...
काही वेळा प्रश्न सुटतो , पण काही वेळा प्रश्न इथूनच पुढे सुरु होतो.
आपलं 'मन' पुन्हा शोध घेऊ पाहतो हव्या त्या प्रश्नाच्या त्या उत्तराचं ...
उत्तर तर मिळत नाही . पण स्वतःशीच पाठ थोपावतं,   स्वतःलाच दोष देत मन शांत राहतं .
शांत राहण्याचा तसा पुन्हा प्रयत्न करतं .
कारण ..आयुष्यं हे असंच असत .
जगायचं असतं , जगू द्यायचं असतं
संयमानं 'क्षणाशी' झुंजायचं असतं
संकेत १५.०४.२०१४

गुरुवार, ११ डिसेंबर, २०१४

'जाणीवतेचा स्पर्श'

काही महिन्यापूर्वी चा एक प्रसंग ...ज्याने हृदयास छेद दिला होता , हृदयाची स्पंदनच जणू काही सेकंदासाठी आपलं 'धडधडण' बाजूला सारून बंद झाली होती. तो प्रसंग काल पुन्हा अनुभवास आला .म्हणून थोडं लिहावसं वाटलं.
स्पर्श- मग तो परकेपणाचा असो व आपलेपणाचा ..मनातल्या भावनांना तो अलगद उचंबळून घेतो. प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही. हे वपुंच वाक्य तसं फ़ेमसच आहे.
पण पण हर एक नात्यातला स्पर्श , त्या भावना वेगवेगळ्या असतात.
काही महिन्या पूर्वीची गोष्ट ,ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने ऐन गर्दीतून मार्ग काढत मी अन माझी मानस बहिण(मानस म्हटलं तरी सक्खीच बहिण म्हणा ) चालत बोलत रस्त्याने कडेकडे ने जात होतो. ठाणे हे तसं गजबजलेलं शहर असल्याने,नेहमी प्रमाणे रस्त्याला रहदारी हि होतीच. त्यामुळे तिला कुणाचा धक्का लागू नये (कारण वासनेने आचरटलेले लोक समाजात हर एक ठिकाणी वावरत असतात ) ह्याची काळजी मी घेत होतो . अर्थात आपली बहिण असो वा इतर कुणी स्त्री , काळजी घेण्याची जबाबदरी हि सर्वस्वा आपलीच असते त्यांसोबत असता . त्यामुळे काळजीघेण्या हेतूने , कुणाचा धक्का लागू नये म्हणून हाताला धरून मी तिला बाजूला सारत होतो तितकंच..
पण कुणास ठाऊक , त्या दिवशी स्वप्नात हि कधी विचार करावा लागला नसेल तो विचार करण्यास भाग पडलं .
ठाणे स्थानकातून आम्ही आपआपल्या मार्गी लागलो. तेंव्हा ती तिच्या घरा दिशेने निघू लागली ..अन मी माझ्या वाटेने ... काही वेळ निघून गेला. रस्ताने चालत होतो. तेवढ्यात मोबाईल बीप झाला. पाहिलं तर whatsapp वर मेसेज ची हि रीघ लागलेली . एका पाठोपाठ एक..
संकेत, अस रस्त्याने मला हात लावत जावू नकोस , माहित आहे तू काळजी घेतोयस , . बहिण ह्या नात्याने आहे...पण Sorry माझं लग्न ठरलंय आता , कुणी पाहिलं तर .. ?
मी क्षणभर भांबावलो . त्या मेसेज ने , रागाचा पार तर क्षणात वर चढला . काय बोलावं ते कळेना . मनात हि कधी असा विचार शिवला न्हवता . त्यामुळे भावनांचा एकदाच कल्लोळ माजला . अन शेवटी रागाने लालबुंद झालेले शब्द सर्कन पुढे निघून गेले.
जिला बहिण मानतो . तिच्याकडून असं ऐकायला मिळन. ह्यावर खरं तर विश्वासच बसत न्हवता . वासनेने अन स्पर्शाला हासूसलेला मी आहे का ? मी तिला तर बहिण मानतो. माझ्या मनात असा कधी विचार हि शिवला नाही. पण आज का हे असं ? मनातल्या मनात विचारांच्या भाव गर्दीत मी स्वतहाला लोटत होतो. घरी जाता जाता भेटलेला मित्र , माझ्या चेहऱ्यावरच्या ह्या अचानक बदललेल्या रूप रेखा पाहून तो हि विचारात पडला. आता तर हसत खेळत बोलण वगैरे चाललं होतं नि अचानक अस काय घडलं . ? त्याला हि काही सांगू शकलो नाही ..पण
जे घडलं होतं ते मात्र माझ्या मनावर विपरीत परिणाम करणार, त्यामुळे पुढे कित्येक दिवस तो परिणाम तसाच कायम होता. आजही आहे. त्यांनतर मात्र मी तिच्याशी संवाद साधून माफी मागितली होती.
तिचं हि कुठे चुकलं होतं म्हणा , नातं आमच्या दोघातच बहिण भावाचं.. तिच्या घरच्यांशी नि माझी नाही काही ओळख ना पाळख ? बर त्यात आता तिचं तर लग्न हि ठरलं होतं. त्यामुळे साहजिकच जे घडणार होत ते घडल होतं.
पण मी हि कुठे चुकलो होतो. माझी हि काय चूक होती. जे काय होत ते काळजी पोटी . बहिणीच्या रक्षणार्थ म्हणा /// पण कुणास ठाऊक तिथपासून जरा भीतीच वाटते. कुणाच्या अगदीच जवळ जायचं म्हणजे मग ती बहिण का असू दे. जरा दूर असलेलंच बर ...असं वाटतं .
तसं आईचा घरी दंडकच असायचा , मुलाने मुलातच राहावे , अन मुलींनी मुलींमध्ये , मग बहिण भाऊ असले तरी चालेल , बाजूला बसायचं हि नाही. ह्यावर मात्र मी चिडायचो. बहिणीच्या बाजूला बसायचं नाही. हे काय , काहीतरीच असं म्हणायचो ? आई नि माझं त्यावेळेसचा हा संवाद अचानक डोळ्यासमोर आला. अन डोळे पाणावले.
आज कित्येक दिवसा नंतर पुन्हा त्याच क्षणाची पुनरुत्ति झाली. ह्या वेळेसच बहिण न्हवती , होती ती ऑफिस मधलीच एक , सोबत एकत्र काम करणारे आम्ही दर वेळेस एकत्रच ऑफिस बाहेर पडतो. तस ह्यावेळेसही बाहेर पडलो . रस्त्यावरनं गप्पा मारत...
पुढे लाल बावट्याने वाहनांना रोखून धरलं होतं . म्हणून घाई गडबडीत रस्ता क्रॉस करायचा म्हणून आम्ही धावत पळत सुटलो. अर्धवट आलो नि तोच पुढे सिग्नल सुटला . अन नकळत पुन्हा तेच घडलं. काही अघटीत घडू नये म्हणून ...काळजी पोटी हात धरला गेला माझ्या नकळत ... अन तिच्या तोंडून पुढे शब्द बाहेर आले.
संकेत . मी Married आहे. लग्न झालंय माझं , रस्त्यावर असं हाथ पकडनं ................
शरमेने मान खाली गेली. Sorry म्हटलं . अन पुन्हा दीर्घ विचारात गढून गेलो.
हे क्षण देखील अजब असतात. पुन्हा घडतात . त्या त्या क्षणाची 'जाणीवतेची ' पुन्हा जान करून देत. पण जे घडतं ते नकळतच ...त्यात चुकी कुणाची नसते. चुकतात ते त्यावेळेसचे क्षण ...
टीप;- इथे कुणाच्याही भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नाही. मुख्यत्वेकरून ह्या संबंधित व्यक्तीचा..
मन कुणाचे दुखावलेच गेलं तर क्षमस्व :)
लिहिता लिहिता ...
मनातले काही ..
संकेत य पाटेकर
११.१२.२०१४

मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

रस्त्यावरला तो बाळ - फुगेवाला ..

घरातल्या बंदिस्त चौकटीतून एकदा का आपण बाहेर पडलो कि विस्तारलेल्या त्या नभाशी आपली थेट नजर भेट घडते. अन मग मनातले छुपे विचार हि त्या विस्ताराने प्रभावित होवून हळूहळू गतिमान होऊन फोफावू लागतात.
संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला डोंगर कड्याच्या कुशीत एव्हाना सार्यांच्या निरोप घेत निद्रिस्थ होऊ पाहत होता. पक्षांची हि 'काळोखी साम्राज्य' पसरण्याआत आपआपल्या घरट्याच्या दिशेने ये जा सुरु होती.
तसं सकाळपासून घरातल्या चार बंदिस्त भिंतीत बसून आलेला मनाचा क्षीण घालवायचा म्हणून मी हि सहजच घराबाहेर पडलो. अन रस्त्यावरल्या बिन मुखवट्या अन मुखवट्या परिधान केल्याल्या गर्दीशी एकरूप झालो.
कधी निखळ हास्य कधी तर कधी खोल विचारात डूबलेले भावगुंतीचे असंख्य चेहरे पाहत , मनाची अन पाउलांची गाडी तीनहाथ नाक्यापासून ते तलावपाळी अस करत पुन्हा घराच्या दिशेने पडू लागली. तेंव्हा येत येता सहज नजर रस्त्यावरल्या फुटपाथ्यावर गेली.
तत्क्षणी 'साहेब' हा आर्त भावनेने म्हटलेला खरा कि खोटा शब्द हि त्याच दिशेने चाल करून कानाशी येउन धडकला. रस्त्याच्या कडेला फुटपाथावर , दूरून कुठून खेडा पाड्यातून मुंबईत दाखल झालेलं , आई बाप अन छोटी मुलगी असा त्रिकुट असलेलं ते कुटंब , त्यातले ते दोघे आई -बाप , आपला बोजा बिस्तर सांभाळत येणा जाणऱ्या हर एकेकाकडे केविलवाण्या भावनेने दयेची भिख मागत तिथेचं पहुडलेलं , काही मिळेल का ह्या आशेने ..., मी हि तिथून जात असता त्यांनी एक कटाक्ष माझ्याकडे टाकला. अन 'साहेब' अशी आर्त हाक दिली.
मी मुद्धाम त्याकडे नजरआड केले अन तसाच पुढे निघून आलो. म्हटलं रोज अशी कित्येक मंडळी दिसतात. शरीराने धड धाकट असलेली... . कां बर्र हे भिख मागतात ?
त्यांना त्याच काहीच कसं वाटत नाही. ?
अन आपण का बर? त्याना भिख द्यावी?
मुळात भिख अन भिखारी हे शब्दच लाजिरवाणे आहेत.
असो , परिस्थिती हि कुणावर सांगून येत नाही , पण हल्ली हे जरा जास्तच झालंय म्हणायचं , घाम न गाळता , पैसे मिळविण्याची धडपड ...,,मन अश्याच विचार चक्रात गुंतले होते,चालत होते.
नि तोच पुढे , रस्त्यावरल्या एका दुकाना शेजारी, हास्य हरवलेला एक छोटा निरागस मुलगा , साधारण ९-१० वर्षाचा , हाती काठी घेऊन त्यावर टांगलेल्या , विविधरंगी फुग्याकडे एकवार पाहत रस्त्यावरल्या येणाऱ्या जाणार्या कडे अगदी आशेने ते घ्यावे म्हणून विनवणी करे, पण कुणीच घेईना म्हणून व्याकुळतेने तसंच पुढे चालत राहे .
त्याच ते अनवाणी चालत राहण अन चेहऱ्यावरचे निपचित व्याकुळतेने कळकळलेले भाव हृदयास भिडले खरे ... एवढ्याश्या वयात पोटा पाण्यासाठी सुरु असलेली त्याची वणवण , खटपट ते एकंदरीत दृश्य माझ्या अंतर करणाला 'काहीतरी कर रे' फुकट नाही पण त्याच्या कष्टासाठी' तरी ह्यासाठी विनवणी करू लागलं. भुकेने कासावीस झालेलं त्याच कोवळ मनं , अंतकरणाला जावून भिडत होतं. पण माझे हाथ थिटे पडत होते.
अजूनही हाथ थिटे पडतात
काही देण्याच्या हेतूने...
हि काही दिवसापूर्वीच लिहिलेल्या चारोळीतील दोन ओळी मनात वेगाने घुमू लागल्या . पाय त्यातच पुढे चाल करू लागले. एक विनाकाही कष्ट करता पोटा पाण्यासाठी हाताची झोळी करत आशेने बघणारे लोकं , अन कष्ट करून वणवण भटकून स्वकष्टाने आपली भूख भागवणारे लोकं अशी तुलनात्मक विचारांची घडी मनाच्या खोलीत फिरकी घेऊ लागली.
आपण त्या मुलाला काही तरी मदत करायलाच हवी ह्या निर्धानाने चालते पाय जागीच थांबले, शोधार्थ नजर इकडे तिकडे वळू लागली.
No one has ever become poor by giving ...हे कधीतरी कुठेतरी वाचलेलं वाक्य तितक्याच मनावर आरूढ हि झालं. अन त्या मुलाच्या दिशेने मन धावू लागल.
तो बाळ फुगेवाला एव्हाना बराच पुढे गेला होता . त्याच मागोवा घेत पाउलं एका ठिकाणी थांबली माणुसकीचा अनमोल साठा अजूनही आपल्या समाजात शिल्लक आहे तर , ह्याचा पुरावा आज पुन्हा मिळाला.
एक सुशिक्षित बाई आपुलकीने त्या बाळ फुगेवालाची चौकशी करत, काही हवाय का ? अशी विचारणा करत होती. ? त्याने हळूच मान डोलावली .
एक बिना बर्फाचा उसाच्या रसाने भरलेला एक ग्लास त्याच्या कोरड्या ओठावरती फेसाळ होवून गटा गटा गायब हि झाला. तहान भुकेने व्याकूळ झालेलं त्याच मन काहीस तृप्त झालं .
पण हाती काठी असलेल्या त्यावर विराजमान होवून डुलणार्या विविध रंगी फुग्यांचा प्रश्न अजून हि सुटलेला न्हवता. त्याच्या पोटा पाण्याचा खरा प्रश्न तो ........
म्हणून त्याकडील विविधरंगी फुगे , त्याची विचारपूस करत करतच ' एक एक विकत घेतली. अन त्यास अधिकचे काही पैसे देऊ केले. पण त्याच कोवळ पण सशक्त अन प्रामाणिक मन हि अस कि अधिकचे पैसे पुन्हा करावे म्हणून त्याने माझ्याकडे एक वेळ पाहिलं अन हात पुढे केले. तेंव्हा मन काहीसं गहीवरलं . हळूच पाठीवरती हात थोपवून मी राहू दे रे अस म्हटलं ..., अन आम्ही दोघे आप आपल्या वाटेने निघून गेलो.
पण विचारांची हि घंटा पुन्हा घन घन करू लागली. पोटा पाण्यासाठी फुगे विकून वणवण फिरणारा तो एवढासा मुलगा, अन काहीच न करता काही मिळेल ह्या आशेने पाहणार ते त्रिकटू कुटुंब , त्यातले ते दोघे आई बाप ...ह्यातील फरक करत ...
खरं तर अस कुणी दिसलं कि मन कासावीस होतं. त्यात कुणी लहानगा असेल तर काय बोलावं? एकीकडे अन्नासाठी म्हणून वणवण फिरणारे , अन एकीकडे अन्नाची नासाडी करणारे ...हे चित्र कधी पालटणार ?
असंच लिहता लिहिता ..
संकेत य पाटेकर
०२.१२.२०१४