बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

ताहुलीच्या वाटेवर...


अजस्त्र रूप धारण केलेला हा आपुला  'सह्याद्री' त्याचं हे 'रौद्र' पण तितकंच 'वडीलधारी रूप'  मनाशी  एकदा का पांघुरलं गेलं की,  त्याची 'सांगता' हि आपल्या शेवटच्या श्वासाशीच,  हे  ठरलेलंच.
जिव्हाळ्याचं हे नातंच असं सह्याद्रीचं  अन आपलं,
म्हणूनच
पाऊलं वळततात ती,
आपणास पुजणीय अश्या ह्या 'सह्यदेहाकडे' ..
शिवप्रेरीत ह्या अफाट कातळ कोरीव 'सह्यसख्याकडे' बेलाग- बुलंद ह्या 'सह्यरुद्राकडे ' सृष्टीच्या ह्या कलात्मक रंगसाधनेतुन...तिच्याच उबदार घन सावलीत,
अनवट कुठल्याश्या वाटेतनं.. सुखाची एक एक पाऊलं टाकत..
प्रति 1 

तर , बरेच दिवस होऊन  गेले..कुठे काही जाणं न्हवतं.  भटकणं न्हवतं.
मित्राचे फोन खणखणू लागायचे,
''अरे चल ..मी...अमुक तमुक ह्या ठिकाणी उद्या निघतोय , येतोस... ? ''
इच्छा असूनही , काही कारणास्तव मग मुद्दाम टाळाटाळ करायचो ,
म्हणावं तर भटकंती ही तात्पुरती खंडित केली होती. काही एक कारणास्तव ,
पण म्हणतात ना..एकदा का ह्या 'सह्य रुद्राचं  शिवरूप'  मनात साठलं कि पाऊलं हि आपसूक पुढे होतात..धावू लागतात ..
उंच कड्या ह्या  कपाऱ्यातून , राकट सह्या वेढ्यातून .. पानपाचोळ्या रानवनातून... सृष्टीच्या ह्या हास्य तरंग गीतासोबत ...घुंगवत्या गंधित वाऱ्यवानी.. मनाच्या उनाड अवस्थेतून ..समाधिस्त अवस्थेकडे ..
प्रति 2 


ताहुलीची वाट सुद्धा अशीच धरली . निळाईला गवसणी घालणाऱ्या सुळक्यांवर , सराईतपणे चढाई मोहीम करणाऱ्या मित्राचा 'दुर्ग' भूषणचा  कॉल आला. संवाद साधला गेला.
आणि तेंव्हाच वेळ काळ ठरवून ...रविवारच्या मुहूर्ताला शिक्कामोर्तब करत आम्ही ठरल्या दिवशी ताहुलीच्या दिशेने वाटचाल करू  लागलो.
जवळ जवळ ..तीन चार वर्षाने हा गडी पदरगड सारख्या मोहिमेनंतर पुन्हा भेटणार होता .
आणि त्याचबरोबर इतर जुने सवंगडी , ज्यांच्या समवेत मी सह्याद्रीच्या खुल्या मोकळ्या आसमंतात मुक्तपणे विहार करू लागलो त्ये....लक्ष्या उर्फ  बाळू दा ..आमचा पहिला इंजिन,  किशोर ..आणि मिलिंद उर्फ मिळू ....
हि सारी मंडळी ..सह्य सोबती... ह्या त्या नात्यांनी बांधलेली जोडलेली  , आता फारशी मोहिमेला येत नाहीत. पण त्यांच्या येण्याने आज नवा हुरुप आला होता . आनंद  देहबोलीतून ...मनातून आणि संवादातून  अविरत असा तणतणत होता.
त्या  आनंदातच ...गप्पांचा हास्य पट मांडत  आम्ही कल्याणहून ..खाजगी वाहनाने (काळी पिवळी - चारशे जाण्याचे ) ताहुलीच्या पायथ्याची पोहचते झालो.
प्रति 3 



ताहुली :
कल्याण -  मलंगगड  मार्गावर ...अर्धा तासाच्या  धीम्या  वेगवान प्रवासानंतर ..कुशवाली गावाच्या  भोवताली पसरलेला मुळात हिरवाईने साज शृंगार केलेला आणि कड्या बेचक्यातून फेसाळ शुभ्र रंगाचा वाहता , निथळता आनंद  देऊन  मनोमन सुखावणारा मखमली असा डोंगर. गड नाही.
माथेरान हि त्याची भाऊबंदकी
तिथपासून सुटावलेली कातळ धार .... अजस्त्र कड्या कपारीचा देखणा नजारा.. आपल्यापुढं ठेवत  इथवर विसावलेली आहे.
पेब उर्फ विकतगड ,  नाखिंड - चंदेरी म्हैसमाळ  ...मलंगगड ..हि ती सोनसाखळी...


साधारण साडे आठ वाजता ..शहरीवलयापासून दूर ..कल्याणहून तेरा पंधरा  किमीच्या अंतरावर  निसर्गाने उधळलेल्या रंगसाधनेतून .. आम्ही कुशवालीत प्रवेश केला.
साधारण दोनशे अडीचशे वस्तीच हे नंदनवंन...(तिथल्याच  एका काकांच्या  सांगण्यावरून ) निसर्ग सौन्दर्यान नटलेलं खेडं , भात शेती करून  तसेच शहरी नोकरी पत्करून , आपलं जीवनरथ चालविणारे  इथले गावकरी.

त्यांच्याच नेहमीच्या पायवाटेवून ....ताहुलीचा  मागोवा घेत ..आम्ही पुढे मार्गीस्थ झालो.
निसर्गाने फुलविलेल्या ,  सजवलेल्या तसेच गंधाळलेल्या अवीट क्षणांचा आनंद घेत...

 - संकेत पाटेकर


प्रति 4

प्रति 5

प्रति 6
प्रति 7
प्रति 8
प्रति 9
 प्रति 10
प्रति 11
ताहुलीच्या उंचीवरून दिसणारं  बदलापूर शहर ...

 - संकेत पाटेकर


सहभागी सदस्यांची  नावे :
१. भूषण
२. लक्ष्या उर्फ बाळू द
३. किशोर
४. मिलिंद
५. विकास
६ . मी आणि इतर दोघे 


जाण्यास लागलेला वेळ : कुशवली गावापासून  ...साडे चार तास ..(माथा -  मठ )


महत्वाची टिपणी : निसर्गात जात आहातच तर त्याचं कौतूक करायला हि नक्कीच शिका. त्याला समजून घ्या. त्याकडून बोध  घ्या  शिका. आयुष्यभर उपयोगी पडेल.

उगाच आपल्याजवळच कचरा तिथेच सोडून आणि निव्वळ मौज मस्ती साधून ..ह्या सृष्टीचा आणि मानवजातीचा अपमान करू नका..इतकंच.