Valentine's day Special .. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Valentine's day Special .. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

हल्ली ती फार जवळ असते माझ्या …

हल्ली ती फार जवळ असते माझ्या …
विना काही संवाद , मुकेपणाने , हळुवार दौडत , चाहूल हि न कळू देता ,नजरेच्या कड्याशी, धुंद बेहोषीने , हळूच झेपावते ती अन बिलगते मला... सर्वांग बहाल करत , मी हि तिला मिठीत अलगद सामावून घेतो. श्वासाच्या परिघात , कितीतरी वेळ , कितीतरी स्वप्नांच्या आखीव रूपरेखा उठावपणे मांडत. दाखवत अन मिरवत.
तसा इतका लाडीगोडीपणा हि बरा नाही. म्हणून मी हि मुद्दाम तिला कधी कधी , जवळ येऊच देत नाही. दटावतो . थांब म्हणतो , अजून थोडा वेळ , बस्स थोडा वेळ..
ती बिचारी कंटाळत , नाकी रुसवा फुगवत , हुंदके देत , ताडताड निघून जाते.
मी तितकं लक्ष देत नाही. 
कारण माहिती असतं ती स्वतःहून पुन्हा माघारी येणारं, अन ती त्याप्रमाणे येतेच. तिला हि काळजी असतेच ना हो, अन असायलाच हवी. 
 कारण तिचं माझ्याशिवाय अन माझं तिच्याशिवाय , आम्हा एकमेकांचं एकमेकांशिवाय , असं अस्तित्वच नाही. म्हणून ती तत्पर असते. 
सदैव , सदैव सादेला प्रतिसाद द्याला . स्वतःहून , न काही सांगता , बोलविता, मुकेपणाने , हळुवार दौडत ...
पण हल्ली ती जरा जास्तच जवळ येऊ लागलेयं. उतावीळ झालेयं , नको त्या वेळेत , नको तेंव्हा , उठसूट कधीही येते. कधी हि बिलगते. 
मलाच संकोचल्यासारखं होतं , लोक काय म्हणतील ? घरी एक वेळ ठीक आहे. पण बाहेर, इतर ठिकाणी ? छे ..
तिला ह्या सर्वाची काही पर्वा नाही . पण मला हे पटत नाही. 
मी सावरतो स्वतःला, कसाबसा , नाहीतर एक एक कट कारस्थान तरी रचतो. 
ती माझ्यापासून दूर होण्यासाठी.
मग कधी, चहाचा गरम घोट मुखी घेत तर कधी चेहऱयावर थंडगार पाण्याचा शिडकावा करत मी तिला मुद्दाम छेडतो. तिला ते रुचत नाही .
ती नाक मुरडत पुन्हा ताडताड निघून जाते. 
ती म्हणजे ‘झोप’. 
- संकेत
Valentine's day Special ..