Tuesday, February 11, 2020

अस वाटतं हे चौकटीतले आठ नऊ तासाचे ऑफिसचे काम धंदे सोडून ....
सरळ... मुक्तवाटे ..ह्या माझ्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातुनी वणवण भटकत राहावे , मैलो मैलांचा वेड्या वळणाचा खडतर प्रवास साधत .. इथल्या लोक संस्कृतीचा लोकजीवनाचा ,, मानवतेचा तसेच दुखीव अश्रूंचा आणि निसर्गाच्या अलौकिक, अद्भुत सौंदर्यतेचा आणि तिथल्या हर एक घटकांचा नजरेशी आढावा घेत, ...जगाच्या कानाकोपऱ्या पर्यंत झेप घ्यावी .सामाजिक बांधिलकी जपत हवं त्या समयी स्वतःला मानवतेशी जोडून घ्यावे.(.निर्मळतेने) ...तसेच लेखणीने एक एक अनुभव शब्दबद्ध करत रहावे . अन त्याबरोबर कलेशी हि संधान बांधत कलागुणाशी (मग ते छायाचित्रण , अभिनय , साहित्य , वा इतर कुठल्याही कला क्षेत्र असो ..त्यांशी ) जुळवून घेत त्यात बेधुंद व्हावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम अन शांतीचा अनमोल संदेश देत , आपलेपणाने एक एक नाती हृदयाशी कवटाळत , लोकांच्या हृदय मंदिरात स्थान मिळवत हा देह अलगद ह्या मातीशी ठेवून ह्या जगाचा अखेरचा निरोप घ्यावा . बस्स....
जीवन प्रवास हा असाच हवा.
- संकेत पाटेकर
१६.०४.२०१६
प्रेम हे मोजता येत नाही रे , त्याला आकार माप अस काही नाही .म्हणून ते मिट्विता ही येत नाही .
ते फ़क्त अनुभवता येतं. जाणता येतं …
 हृदयातल्या भाव गीतेतून .. नजरेतल्या अथांगतेतून, सप्त सुरांच्या अमोघ वाणीतून, स्नेह पूर्ण स्पर्शातून , अबोल्यातून, दुराव्यातून..आणि आपलेपणाच्या जिव्हाळीक नात्यातून..
आणि प्रेम हे एकच शाश्वत आणि सत्य , मी मानतो ..जे अक्षय आहे. ज्याला मरण नाही. 
आणि हेच एकमेव 'प्रेमरत्न' मी तुला देऊ शकतो . 
. 
बोल...आयुष्य भरासाठी तुझि साथ मला देशील ? 
माझ्या सारख्या वेडगळ , साधसचं जीवन जगणाऱ्या ...अन साधसचं राहणीमान असलेल्या ..
मुलाशी लग्न करशील ? तयार आहेस ? 
तू चंद्र तारे म्हणशील तर , ते तुला मी कदापि आणून देणारं नाही हा ...अश्या वायफळ बाता मी करणार नाही. पण कले कलेतून वाढत जाणाऱ्या त्या चंद्राची शीतलता अन मिणमिणत्या ताऱ्यांची लखलख आणि ते अथांग विश्व तुला जवळून अनुभवायला नक्कीच मिळेल. ह्याची खात्री देतो .
कसं ते माझ्यावर सोपवं ...त्यातला आनंद तुला नक्कीच मिळेल. 
आजवर तुझ्यावर ओघाने प्रेम करत आलोयं .. तो ओघ ह्या पुढे हि कायम राहील . पण मनातून उमटलेली प्रत्येक भावना तू त्या त्या वेळेस समजून घेशील हि आशा व्यक्त करतो. 

प्रेम ही तशी एक आतंरिक भावना आहे ...सहजतेतून , सहजतेत ओघळलेली ..मिसळलेली. 
ती सहजता ती ओघळता तुझ्या माझ्यात यायला हवी. .....तरच हे नातं उमलेलं आणि बहरेल ....
शेवटच्या श्वासा अखेरपर्यंत …..

बोल , लग्न करशील माझ्याशी ? 
पुन्हा विचार कर ...आणि काय तो निर्णय दे ...आता मात्र उशीर नको करू..
आधीच खूप उशीर झालायं... 
तुझाच ....
असंच..काही सुचलेलं . 
- संकेत - १९.०५.२०१६
 ____________________________________________________________________


मी काही कृष्ण नाही आहे रे ... तो सावळारुपी ईश्वरी रूप , प्रत्येक हृदय मंदिरात आपलं हक्काचं स्थान मिळवून , नुसत्या एका सादेला हि हवं तेंव्हा , एकाच वेळी प्रतिसाद देणारा ...
प्रत्येकाच्या हृदयी गाभाऱ्यात आपलं सावळारुपी अस्तित्व कायम खिळवून मन ज्योती उजळवून देणारा , समोरील मनातल अचूक हेरणारा ..आणि अपेक्षापूर्ती करणारा ...... नैराश्याचा , अविचारीपणाचा सखोल नायनाट करणारा ...
मी ...मी आहे, साधासाच अन सामान्य , कृष्णाई रूपासारखं सर्वत्र नाही. पण काही हृदयी घरात नक्कीच आपलेपणाचं स्थान मिळविलेला...
पण त्यासारखं मला कुठेय रे , सर्वत्र नांदता येतंय ..
मनात दडलेल्या अनेकानेक प्रश्नांना ,चिंतांना अन आसवांना कुठे रे शमविता येतंय ..
अपेक्षांचे निरपेक्ष भार हि उचलण्याची तितकी क्षमता नाहीये रे माझ्यात ...
पण कुठेशी मनमोकळा प्रयत्न असतोच ना सातत्याने , कुणा हिरमुसल्या कळीला , हास्य चैतन्याचा सुगंध लेवून आपलेपणाने फुलवून देण्याचा .., कुणा एखाद्याशी आपलेपणाच्या मृदू शब्दानं आधारवड होण्याचा ..
मान अपमान सार सोडून नाती गुंफण्याचा अन जपण्याचा ..

पण तरीही मला ह्या सर्वाना एकत्रित बांधता येत नाही आहे. नात्यातली कुठलीशी घडी हळूच कधी मोकळी होते ..ते कळून येत नाही. आणि जेंव्हा कळत ..तेंव्हा अंतर वाढलेलं असतं. 
आयुष्य जगताना , अन ह्या वेळे सोबत पुढे सरताना प्रत्येकाला सोबत घेऊन जायचं असतं. 

बस्स ह्या प्रवासात आपलेपणाने जोडलेले हात अन त्यांची साथ , नकळत कधी सुटू नये..इतकंच.. 
असंच काहीस... 
- संकेतआयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी 
त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो...नवी ओळख असते नवं नातं गुंफलेलं असतं..... 
अन अश्यात  काही शब्द काही ओळी नकळतओठाशी येतात ...

              सोनसळी आठवणी
              लागे बोलाया चालाया 
              दिन गुलाब गुलाब 
              प्रीत लागली फुलाया !   
              - संकेत
कधी चारोळी रुपात तर कधी ...कवितेच्या स्वर सागरातून ....
तिच्या हसऱ्या नजरेशी ...अन भावगंध चेहऱ्याशी अन मनाशी गोड संवाद साधत .....
अश्याच काही चारोळ्या .......प्रेमातल्या अन वियोगातल्या ....

प्रेम म्हणजे दोन श्वासातलं अंतर एक होणं. समरस होतं जाणं. दुधात साखर मिसळून
जावी तशी...पूर्णतः समर्पण ...
  
                 काही नाती हि नकळत                            

                 जुळली जातात... 
                 प्रेमाच्या बंधनात अलगद 
                 जखडली जातात ...
                 - संकेत                   ~ ~ ~ ~ ~             सहज एखादी मैत्री जुळते 
                                                                            मैत्रीतून नवी ओळख घडते .......
                                                                                             -संकेत  
                   प्रेमात माझ्या, हृदयी स्नेह बंध
                  डोळ्यात तरळते, तुझेच प्रतिबिंब
                    - संकेत                 
~ ~ ~ ~ ~ 
                                                                            प्रेम म्हणजे काय ?
                                                                            मी अन तू
                                                                            माझ्या  मनातली तू
                                                                            तुझ्या  मनातला मी  , हे ना ?                                                                                                           -संकेत
                 

                 एकटक तुझ्या नजरेशी
                  छेडत असतो वारंवार
                  अन त्या नजरेतुनीच मिळवत
                  जातो , प्रेमाचे हे शब्दसार ...
                   - संकेत                
                                                 ~ ~ ~ ~ ~ 
 संवाद हा नात्यातला एक महत्वाचा दुवा ... तो असतो म्हणून तर नात्यात  गोडवा असतो.  आणि अश्या संवादातूनच असे नट खट प्रश्न पडतात . ...
               ती म्हणते अगदी लाडीने,
               का नाही तू राग व्यक्त करतं
               मी म्हणतो तितक्याच प्रेमओढीने
              का नाही तू प्रेम व्यक्त करतं...
                - संकेत                    ~ ~ ~ ~ ~ 

               तुझं माझ्यावर प्रेम किती ?
               हे शब्दात कसे मांडावे
               अमर्याद ह्या शब्दाला , सांग
               प्रेमाने कसे भागावे ? 
                - संकेत                    
                                                   ~ ~ ~ ~ ~ 
               आज तिनेही तिच्या देवाकडे 
               एक 'मागणे' मागितले असेल
                कर जोडूनी मनोभावे 'मला' च वरिले असेल.  
                हरतालका विशेष .. – संकेत                      
                                                   
                                                               ~ ~ ~ ~ ~ 
               तिचं एक स्वप्नं आहे
               तिला 'तो' मिळावा , आयुष्यभरासाठी...
               त्याची हि एक इच्छा आहे
               तिनं एकदा 'भेटावं' ते स्वप्नं साकारन्यासाठी...
              - संकु                                                                                     

         
 माणूस प्रेमात पडला कि त्याला  स्वतःचे आत्मभान हि  उरत नाही.   भास आभास ..ह्यांनी त्याच मन त्या व्यक्तीच्या मनाभोवती सतत घिरट्या घेतं राहतं. 
 मग अश्या काही ओळी आपुसकच ओठी  येतात........     
                  
                   तुझाच चेहरा 
                   तुझाच भास 
                   का रे हि सारखी आस?
                   तुझेच शब्द
                   तुझाच आवाज
                   का रे सारखी तुझी ही साद?
                   तुझेच प्रश्न
                   तुझेच उत्तर
                    का रे प्रश्नौत्तराचा हा तास?
                    सांग....?   - संकेत                                                                                                                                                           ~ ~ ~ ~ ~    
                   तुझ्या सारखी तूच सखे 
                   तुझ्यविना ना कुणी दिसे
                   तुझ्यावाचून काही सुचे
                   तूच असे रे ध्यानी - मनी 
                   तूच रे सखी साजनी... 
                  -  संकेत             
                                                   ~ ~ ~ ~ ~                                                 
                    मी आधीच वेडा होतो                                                                                                                तिने आणिक वेडे केले                                                                                                            प्रेमाच्या सुखद सरितं                                                                                                              माझे 'मी' पण सारे गेले 
                   - संकेत 
                                                 
                                                                                              तिचा Whatsaap वरील डीपी
मी रोज वेडावून पाहतो 
अन नजरेतल्या 'स्वराला'
तिच्या, हृदय संगीत माझं देतो 
- संकेत
                                                   ~ ~ ~ ~ ~                                                 
झालेला संवाद पुन्हा वाचताना 
मन पुन्हा त्या आठवणीत रमतं 
हळूच गहिऱ्या हास्यखळी सोबत 
ते पुन्हा त्या क्षणात मिसळतं 
- संकेत 
                                    ~ ~ ~ ~ ~
मी आत्मभान विसरे 
तुला पाहताना , 
तू बोले मनातले 
मला जाणताना

                                                

Tuesday, January 14, 2020

Let's Enjoy

जगताना कधी कधी नित्य नेहमीतलं काहीतरी हरवल्यासारखं जाणवत राहतं.
मनाची स्थिर घडी कुठेतरी अस्थिर झाल्यासारखी होत राहते.
कळत असतं नेमकं काय खुपतय, काय असह्य होतंय..आपल्याला,
पण उघडपणे बोलता येत नाही. आणि टाळू म्हटलं तरी टाळता येत नाही.
कारण प्रश्न नात्याचा असतो.
नात्यातल्या त्या हळव्या हसऱ्या आणि आनंदी मनाचा असतो.
बांधलेल्या कित्येक स्वप्नांचा असतो. अगणित पुढच्या क्षणांचा असतो.
त्यामुळे नात्याला कुठेही तडा जाऊ नये , ते दुखावलं जाऊ नये.
ह्याची मन काळजी घेत राहतं. तसं प्रयत्न करतं ..
स्वतःलाच बजावत ...
' संयम ठेव रे बाबा, उगाच अस्थिर होऊ नकोस.
प्रश्नाच्या जाळ्यात अजिबात फसू नकोस ?
हे अविचारांचं जाळं आधी क्षणात मिटवून टाक.
निश्चिंत राहा. मन आभाळी ठेव.
येणारी योग्य वेळच तुला सारं काही मिळवून देईल.
Let's Enjoy this Moment...
क्षणांचा महोत्सव करता आला पाहिजे.
कळतंय ना ?
- संकेत पाटेकर
१३.०१.२०२०

Hanging Pendant Ceiling Lamp
Kharedibazar

Tuesday, September 3, 2019

कुणी तरी हवं असतं...


कुणी तरी हवं असतं...! मला नाही मांडता येत रे , तुझ्या सारखं असं काही, पण सांगू... कुणी तरी हवं असतं आपल्याला , आपल्या जवळ बसून ,आपलेपणाच्या संवादात हरवून देणारं असं कुणी... आपल्या नजर कवाड्यातून मनातलं अचूक भाव ओळखणारं कुणी.. आपल्या मनाला जाणंणारं, हवं तेंव्हा, हवं त्या क्षणी , हवं त्या वेळी, कुठूनही , कसंही हळूच येऊन ,आपल्याला थोपवणारं, घट्ट मिठीत घेणारं,आपल्यात मिसळणारं,हसवणारं , छेडणारं, वेडं म्हणणारं आणि म्हणवंणार कुणी... कुणी तरी हवं असतं....रे . कधी रागावणारं, कधी लाड पुरवणारं, प्रसंगी समजून घेणारं, समजून देणारं, आपली काळजी वाहणारं , काळजी घेणारं, आणि भरभरून प्रेम करणारं कुणी.. कुणी तरी हवं असतं ..... । आपल्या मनाची हि बाजू घेणारं.., मनातून मनाशी नातं जोडणारं, आपलं वर्तमान आणि भविष्य घडवणारं...आपलं स्वप्नं होणारं, आपल्यात विसावणारं, कुणी तरी.. कुणी तरी हवं असतं रे..... एकटेपणात साथ देणारं, आणि एकांतात हि आपल्या मनाला सुगंधित करणारं.. कुणी तरी हवं असतं...बस्स..! ~ संकेत पाटेकर


Saturday, July 13, 2019

जगणं


शालेय जीवनात , वडीलधारी मंडळींना पाहून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं ,हाती बॅग वगैरे घेऊन, टापटीप होत ऑफिसला निघायचं. आणि आपल्या मर्जीनं वाट्टेल तेंव्हा घरी यायचं.
ना कुठल्या पुस्तकीय अभ्यासाच टेंशन, ना कुठला गृहपाठ , ना कुठली परीक्षा आणि रिझल्टच टेंशन..
मुक्त आणि मनासारखं जीवन..है ना ?
कसलंच कुठे बंधन नाही. कुणाचा ओरडा नाही, अभ्यास नाही केला म्हणून मार नाही. शिक्षा नाही. दटावणी नाही. कसलं आणि कसलंचं टेन्शन नाही.
आपली लाईफ आणि आपण, मोकाट अगदी..भारी ना ?
किती हे अप्रूप ?
वेड्यावाणी ही, अशी स्वप्नं डोळ्यात साठवून घ्यायचो .
कोवळं वय , त्यामुळे तितकीशी जाणीव कुठे ? आणि कुठे होती ?
मित्रांच्या घोळक्यात आणि मोकळ्या मैदानात उरलेला वेळ असाच सरत जायचा.
बरं, तेंव्हा मोबाईल ही न्हवता , हे नशीब, पण तरीही सगळा मित्रावळ जमा व्हायचा. धुडगूस घालायचा.
किती ते मैदानी खेळ बरं? आठवतंय का ?
सोनसाखळी पासून, पकडा पकडी, चोर शिपाई, खांब खांब, अबादुबी, सोमवार मंगळवार, राजा राणी (गोट्या) , लपंडाव, आंधळी कोशिंबीर..,पंतग, क्रिकेट, भोवरा.., ना ना तर्हा आणि खेळ,
वेळ पुरायचा नाही.
मात्र तो एक प्रश्न मनाच्या काठावर सतत तरंगत राहायचा.
" कधी एकदाचे मोठे होऊ आणि कधी एकदाचे आपण ह्या शालेय जीवनातून मुक्त होऊ ?
हळूहळू हे दिवस ही सरत गेले. शाळा घर, मित्र अभ्यास आणि सोबत मस्ती..ही सुरूच होती.
वय मात्र वाढत होतं , शरीर मनाची ही वाढ होत होती.
बाळंसं धरून मिसरूड फुटताना, थोडी समज ही आता येऊ लागलेली.
त्यातच तरुणपणाचा उंबरठा हा हा म्हणता नशिबी आला
आणि खेळता बागडता डोळ्यात साठवलेलं ते स्वप्नं सत्यात उतरू लागलं.
एक अध्याय संपला. शालेय शिक्षणातून मोकळीक मिळाली. दुसरा नव्या अध्यायाला प्रारंभ झाला.
" कश्यासाठी पोटासाठी " म्हणत चौकटीतली नोकरी जाळं पसरू लागली.
बदलाचे असंख्य वारे सोबत घेऊनच..
एखाद्या चित्रपट फिती प्रमाणे जीवनपट त्यानं बदलू लागलं. वर्ष नि वर्ष सरू लागली.
जबाबदारी आल्या, वाढल्या ..त्याही सोबत टांगत्या जाणिवा आणि उणिवा घेऊनच आणि त्या सोबतच अपेक्षा निराशा आदि इत्यादी भाव भावकीचा खेळ..
"वयाने वाढलो वा मोठ्ठ झालं" की ह्या अश्या जबाबदाऱ्या ..गळाभेट घेतात हे तेंव्हा कुठं माहीत होतं.
डोळ्यात साठवलेलं आत्तापर्यंत ते अप्रूप आणि त्यातली ही आजची सत्यता पाहिली तेंव्हा कडवट पणने हसलो.
कधी मोठे होऊ आपण ? हे स्वप्नं उराशी बाळगून असायचो तेंव्हा आणि आता
लहान असण्यातच खरं सुख होतं रे, ही जाणीव हळवं स्मित चेहऱ्याशी उमटवत नेते.
सुखी होतो रे तेंव्हा.
खरंच..!
लहानपण देगा देवा...
डोळे क्षणभर त्या आठवांत मिटले की
गुलजार ह्यांच्या ओळी नेमक्या ओठी येतात.
" ज्यादा कुछ नही बदला उम्र के साथ..
बस्स , बचपन की जिद् समझोते मै बदल जाती है.."

खरंय,
जे चित्र डोळ्यासमोर उभं केलं होतं. मोठ्यांना पाहून,
त्या चित्राचा डोलाराच क्षणार्धात गळून पडला.
किती ती आव्हानं, किती तो संघर्ष, किती तडजोड, किती कष्ट, त्या वेदना, दुःख आणि टोचण्या..आणि बंधनं,
स्वतः करिता हि वेळ नाही , मग स्वतःच्या अपेक्षापूर्तीच काय ? जाऊ दे,
कसलं आणि हे कुठलं आलंय मुक्त जीवन..
ही देखील एक बंदी शाळाच...
स्वतःचा आनंद जेंव्हा असा मोडीत निघतो. वा दडपून राहतो आतल्या आत मनात, तेंव्हा वपु हळूच थोपवुन धरतात..जगण्याला नवा आयाम देत.
" आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं. आयुष्याचा महोत्सव करायचा असतो "
शेवटी प्रत्येक अवस्था ह्या जगण्यासाठी असतात.
बालपण असो, तरुणपण असो..
इथे कणकण जगणं महत्वाचं.
आत्ताचा आनंद महत्वाचा, आत्ता चा क्षण महत्वाचा,
उद्याच्या स्वप्नांसाठी ..
कळतंय ना रे ?

उठ .. कणकण जगून घे एकेक क्षण , थांबायचं नाही कुठे. चालत राहायचं. आनंदाची वहिवाट शोधत..
- संकेत पाटेकर 

http://www.sanketpatekar.com/


Monday, June 24, 2019

प्रवाह..

पहिल्या भेटीत किंव्हा त्या आधी सुरु असलेला ‘दोघातला ‘ तो ‘मुक्त नि हसरा संवाद’  पुन्हा तसाच अगदी पहिल्यासारखा उत्साहित आणि  प्रभावित  राहील का  ? राहू शकतो का ?
 हे निश्चित कधीच सांगता येत नाही . 

कारण व्यक्ती स्वभावानुसार  किंव्हा क्षणा प्रसांगानुसार ,  होणारा भावनांचा चढ उतार, मनाच्या पुढच्या वळणाला सर्वस्वी कारणीभूत ठरतो. आणि जे घडणार  आहे ते घडतं.
जे  खरं तर आपल्याला नको असतं.  पण ते घडतं आणि त्याला कारणीभूत आपणच  असतो.

कळतंय , काय म्हणायचंय ?
मनाचा कल नक्की कुठे ? हेच कधी कळून येत नाही. आणि त्यामुळेच हे सगळं निर्माण होतं.

हि अस्वस्थता ..हि चलबिचलता ..हि अस्थिरता …
कठीण असतं बुवा  हे ..मनाचं प्रकरण   ?

नव्याची आस धरतं. भेट घडवतं. ओढ निर्माण करतं.  बोलतं  करतं  आणि एकाकी  निवळतं सगळं  ..साऱ्यासह…
कळतं हि नाही   …कधी ? काय? कसं ? आणि  कुठे ?
फक्त प्रश्न निर्माण होतात  ? ज्याचं उत्तरं आपल्याकडे तेंव्हा नसतं.  आणि कदाचित मिळणारं हि नसतं .
पण हे कदाचितच हा .. पुढे सकारात्मक पाऊलं उचलायला हरकत नसावी.
पण तसं होत नाही.  आपण हताश होतो.  असलेला संवाद हि मिटवतो आणि  कुठल्याश्या गर्दीत स्वतःला गुरफटून घेतो.  न काही सांगता न काही बोलता …

प्रवास इथूनच सुरु होतो मग,  जुळवलेल्या नात्याचा ..
पूर्वेकडून पश्चिमेकडे …
कळतंय ?
सहवासात घडतात म्हणतात मन ..
पण तरीही का बिथरतात हि मन ?
कठीण आहे बुवा.. हे मनाचं सारं प्रकरण ..!
कळतं असतं पण जुळवून घेत नाही.
हृदयातले भाव ओठावर येऊ देतं नाही..?

मन कि बात समजेलच कशी  मग ?
मनात जागा निर्माण व्हायला  ‘सहवास’  आणि त्याचबरोबर ‘संवाद’  लागतो.
आणि संवादाचं हे हसरं अंकुर हृदयाशी रुजलं कि प्रेमाचं बीज फळफळायला  वेळ लागतं नाही.

तू संवाद ठेव . मुक्त मोकळा ..
मी  होतो परीघ आभाळाएवढा …
लव्ह यु …
उगाच – सहज सुचलेलं

– संकेत पाटेकर
http://www.sanketpatekar.com/


Sunday, March 31, 2019

'एक एप्रिल आणि ती'

तर उद्या १ एप्रिल ..हाय, उगाचच कुणाला फसवत बसू नका..   
कारण काय तर उगाच्च हंस होतं ओ,  
मला चांगलाच आठवतंय , म्हणजे मी विसरू शकणारच  नाही...
काही वर्षांपूर्वी , 
बरोरबर ह्या तारखेला ...म्हणजे १ एप्रिलला , सहज फोनवरून बोलता बोलता, माझ्या एका मैत्रिणीनें   मला  ''आय लव्ह यु '' म्हणून  चक्क  लग्नाची मागणी घातली होती. ..
WILL YOU MARRY ME ?
मैत्री होती इथपर्यंत ठीक  होतं ओ , त्यामुळे बोलणं हे  असायचंच.,, पण असं अचानक भयानक काही ऐकायला  मिळेल ह्याची मला हि ग्वाही न्हवती. 

तिच्या ह्या अश्या मागणीने काय बोलावं तेंव्हा कळेना  सुचेना ,जणू विचारांनी पळवाट शोधली होती . 
मी म्हटलं मला थोडा वेळ दे ,  सांगतो तुला आणि तो दिवस झोपच नाही हो ...
नुसती आलटा पालट मनाची ...

हो म्हणावं कि नाही  ? हा मोठ्ठा प्रश्न  'आ 'वासून उभा होता ?
कारण माझ्या मनात असे काही भावच उमटले न्हवते  , हा असा विचारच कधी शिवला नव्हता. 

ह्या अश्या गोंगाटातच 
दुसरा दिवस उजाडला आणि  पुन्हा मनभर कल्लोळ माजला.  म्हटलं जाऊ दे , जे होईल ते होईल , बघू तिचा कॉल आला कि , 
ऑफिसला निघालो आणि प्रवासातच तिच्या नावाने फोन खणाणला, .
ते पाहून क्षणभर कपाळावरच्या आठ्या विस्तारल्या गेल्या ...हृदयाचे ठोके हि श्वास रोकुन दडून राहिले.  
कॉल उचालला गेला. 
हॅल्लो SANKY ,  (प्रेमाने म्हणायची ओ .. )
फसलास ना ? 
खरं वाटलं ना तुला ? अरे येडपट काल एक एप्रिल होतं ..
‘’एप्रिल फुल ‘’
लहान मुलीने तिच्या आनंदात जश्या टाळ्या पिटाव्यात , उडया घेऊन ...तसं क्षणभर मला तीच बोलणं ऐकून वाटलं , तिच्याच बाबतीत ..
तरतर  तिने एकदाच काय ते  बोलून टाकलं आणि तेंव्हा मला हि कुठे  हायसं वाटलं. 
आता तिचं लग्न झालं म्हणा ,पण  हे क्षण मी कदापि विसरू शकणार नाही . 

कुणीतरी आपल्यालाही 'प्रपोज' केलं होतं. लग्नाची मागणी घातली होती .
हि  माझ्या आयुष्यातली सामान्यातली  'असामान्य गोष्ट' मी  सध्या मिरवत असतो. 
उगाच - 
संकेत पाटेकर 
३१.०३.२०१९ 

Friday, March 29, 2019

'व्हाय नॉट आय'


किती सुंदर होती ती...! 
अगदी रोजच्या जगण्यातला साधेपणा तिच्या त्या सौन्दर्यातून ही खुलून येत होता..
क्षणभर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. एकामागोमाग पडणाऱ्या तिच्या पाऊला कडे आणि कुठलीही न्यूनगंडता न बाळगणाऱ्या तिच्या स्मित चेहऱ्याकडे... 
रेल्वेचा तो जिना त्याच आणि तितक्याच सहजतेणे ती उतरत असताना..

मी ही तेंव्हा त्याच बाजूने..जिना उतरत होतो.
क्षणभर तेंव्हा वाटलं तिचा हात धरावा..आणि तिला सोबत करत हळुवार उतरावं..
पण नाही...
कुठेतरी हे विचार मी सरसकट फेकून दिले..
आणि पाठमोऱ्या जाणाऱ्या त्या आकृतीकडे मी सॅल्युट करून..उभा राहिलो..

नजर मिट्ट काळोख्याने मिटली असली तरी मनभर पसरलेल्या प्रकाशाची प्रेरित किरणं, तिला दिशा देत होती..
तिच्या आयुष्याच्या वाटेवर..

खरंच, काहीतरी करण्याची जिद्द आणि त्यासासाठी चाललेली धडपड , न तुटलेला बिथरलेला..आत्मविश्वास , आपल्याला आयुष्यात खूप काही मिळवून देतो.. 

'व्हाय नॉट आय' ..
ह्या पुस्तकातून भेटलेल्या त्या 'सिद्धी देसाईच्या' संघर्षमय पण प्रेरित जीवनाची तेंव्हा प्रकर्षाने आठवण झाली.
- संकेत पाटेकर
29.03.2019