शुक्रवार, ३० मे, २०१४

" मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. "

" मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. "
मुंबई -पुणे -मुंबई चित्रपटातील स्वप्नील जोशी ने म्हटलेला हा डायलॉग अगदीच फ़ेमस झाला सर्वत्र . मित्रांच्या टोळक्यात म्हणा किंव्हा कट्ट्यावर वा कुठे हि चारचौघात किंव्हा आपल्याच घरी घ्या ना , घरातले कुणी वडील धारी मंडळी किंव्हा बहिण - भाऊ रागा रागाने कधी म्हणतोच ...
" चिटकून रहा त्या मोबाईल ला ..दिवसभर कामधंदे सोडून "
" मोबाईल मधून पाहेर पडूच नकोस. अक्खा दिवस तो मोबाईल नि मोबाईल ...."
" फेकून दे तो मोबाईल आधी "

" काय वेड लागलंय ह्या मुलाला ह्या मोबाईलच "
" आग लाव त्याला " ...अशी भन्नाट वाक्य कानी पडतात . :) ;) 
सकाळी उठल्यापासून ते थेट झोपेपर्यंत (आणि झोपेतही रात्री अपरात्री )मोबाईल आपली साथ काही सोडत नाही . इतक त्यान झपाटलंय .. एक दिवस काय एक क्षण देखील मोबाईल शिवाय राहणं हि कल्पना देखील मनास शिवत नाही .
एक वेळ आपल्या लाडूल्या प्रेयशिचि आठवण होणार नाही .
पण एक क्षण मोबईल नजरेआड झाला कि हृदयाचा ठोका चुकू लागतो. :) :)
सकाळी जाग येताच भिंतीवरल्या तटस्थ घड्याळाकडे न पाहता आपली नजर थेट मोबाईल मधल्या डिजीटल आकड्याकडे सर्वप्रथम वळते . अन मग हळूच बोटं Whatsapp वरून फेसबुक वर फिरकू लागतात .

नाही म्हटलं तरी एकवार Whatsapp ओपेन करून पाहिला जातो .
कुणाचे मेसेज असो वा नसो . मग पुढचा कार्यक्रमास सुरवात होते . पुढे नाश्ता करता करता पुन्हा एकदा बोटं मोबाईल वर फिरकू लागतात . अन घरातून ऑफिसला जाईपर्यंत तो काही आपली साथ सोडत नाही .
ऑफिस मध्ये हि कामच्या वेळेस .... मधेच टीव टीव करत , ओरडत तो आपला लक्ष वेधून घेतो .   संध्याकाळच्या वेळेस ..हि तेच ..बस मधून अथवा ट्रेन मधून जाता जाता कधी गाणी कधी Whatsapp कधी फेसबुक कधी फोटो शूट तर कधी गेम्स अश्या विविध बिन कामाच्या कार्यक्रमामध्ये तो आपल्याला अगदी गुंतवून ठेवतो .
हल्ली आपण Whatsapp वर असू तर थेट संवाद न साधता बरीच लोक Whatsapp वर द्वारे आपल्याशी संवाद साधतात . खर तर तो संवाद न्हवेच .
एखादा मित्रांचा घोळका बरेच दिवसाने एकत्रित जमला असेल .
अथवा एखादा नातेवाईक बरेच दिवसाने भेटला असेल तर त्याच्याशी बोलताना , त्याचं बोलण ऐकताना आपलं अधिकतर लक्ष आपल्या मोबाईलकडे झुकलेल असतं.
हाताची बोटं देखील त्यावेळेस मोबाईल वर हळूच फिरकत असतात . ते सार बघून अर्थातच मित्र चवताळून उठतो , अबे , ठेवून दे फोन ..
घर असो अथवा बाहेर मोबाईल काही साथ सोडत नाही . रात्री उशिरापर्यंत मग घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत का असो आपण मात्र जागे असतो नजर मोबईल वर स्थिर ठेवत . कारण Whatsapp अन फेसबुक सुरु असते . मग कधी Whatsapp वर स्टेट्स अपडेट करत असतो. तर कधी फोटो .
तर कधी नुसतंच आपली आपली लाडकी व्यक्ती online आहे का ते पाहण्यात आपण गर्क असतो अन नसेल तर लास्ट सीन पाहून फेसबुक आहेच लाईक अन comments साठी.... त्यानंतरच जर आठवण झालीच , फार उशीर झालंय, आता झोपायला हवं , तेंव्हा कुठे आपण त्याला आपल्या उशापाशी किंव्हा हाताला लागेल इतक्या जवळ ठेवून घेतो.
असा हा मोबाईल दिवस रात्र आपल्या जवळ असतो . म्हणूनच " मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. " आणि ते व्यसन मला हि जडलंय. तुम्हालाही जडलंय का ? :)
असंच लिहिता लिहिता ...:)
संकेत य पाटेकर
२९.०५.२०१४

शनिवार, १७ मे, २०१४

'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."


मन हि मन में...
'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."
बरंच काही लिहायचं आहे आज ...पण कसं लिहू ?
कुठून सुरवात करू? काही कळत नाही .
"मन" नावाचा हा प्रकारच खूप अजब आहे . विचार विचार आणि फक्त विचार ..अगदी भेडसावून सोडतात . एखाद्या भुताटकीसारखं ...पिच्छा सोडत नाही
जगात सर्वात गतीवान काय असेल तर मी म्हणेन हे आपले विचार ....सतत धावत असतात सतत .
ह्यांच्या वेगाचा मोजमापाच नाही . करताच येणार नाही . करणार तरी कसं ते ...शक्य आहे का ?
दर सेकांद्ला मिनिटाला कित्येक विचार बाहेर पडतात . ते कुठून कसे येतात? कुठे जातात काही माहित नाही . त्या त्या परिस्थितीनुसार , वेळेनुसार सार घडतं . अशावेळी विचारांची संख्या हि अगणिक असते.
कधी हेच विचार मनाला पार खचून टाकतात . आपल्या दुबळेपनाच कारण ठरतात .
तर कधी तेच मनाला बळकटी प्राप्त करून देतात काल अशीच एक घटना घडली.
सकाळपासून विचारांनी अगदी हैराण करून सोडलं होतं. मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते.
असलेल्या प्रश्नाची उकल होत न्हवती .
शेवटी मनाचा निर्णय घेऊन ती उकल करण्यास काहीसा (पूर्णपणे नाही ) सफल झालो. मनाचा थोडा भार कमी झाला . प्रश्नाचं उत्तर मिळालं . मात्र ह्याचा त्रास समोरच्याला झाला . नाईलाज होता. अन तो होणारच होता. त्यासाठी माफी मागतो .
माफ कर, ...करशील का ? प्लीज
तसं दर वेळेसच आहे हे माझं . चुका करायच्या अन नंतर माफी मागायची.
 पण त्या मागे हि कारण होत. एका उत्तरासाठी धडपडत होतो . ते मिळत न्हवतं .कित्येक दिवस..
ते आज मिळालं . मनात अस काही नाही . तुला त्रास वगैरे देणं , त्रास द्यावा हा मुळीच हेतू नाही .
 आपल्या आवडत्या जिवलग अश्या व्यक्तीला त्रास देण कुणाला आवडेल का ? नाही , अजिबात नाही .
उलट कितीही काही झालं तरी त्या भगवंताजवळ एकच प्रार्थना असते नेहमी .
हे देवा ,भगवंता ' माझ्या त्या लाडक्या व्यक्तीला सदा आंनदी अन सुखी ठेव . तिच्या चेहऱ्यावरचे हास्यतरंग नेहमीच बहरू दे प्रसन्नतेच्या वाटेवर सदा ..न सदा ..
दु:खाची जर देवाण घेवाण करता आली असती तर , नक्कीच तीच दु:ख, तिच्या मनाला पिडणार्या वेदना मी हसत हसत माझ्याकडे घेतल्या असत्या . पण त्या कर्त्याने असा काही नियम लागू केला नाही .
अशी सूट दिली नाही . ज्याचं त्याचं दु:ख ज्याने त्यानेच भोगावं . हा नियम त्याने लागू केला . अन त्या नियामा प्रमाणेच आपण आता सारं सहन करतोय . त्यातून घडतोय .
आयुष्यात मला एक ' चांगला माणूस' म्हणून नाव कमवायचं आहे .
एक चांगला माणूस व्हायचं आहे आहे .
 माझ्या भाऊ- बहिणींचा एक ' चांगला भाऊ' . माझ्या वाहिनीचा चांगला दीर , माझ्या आई वडलांचा चांगला मुलगा , माझ्या पुतण्या - भाच्यान्चां एक चांगला काका - मामा , माझ्या मित्रांचा एक चांगला मित्र .
अन पुढे भविष्यात माझ्या पत्नीचा एक चांगला पती . बस्स प्रयत्नाची कसर चालू आहे .
त्यात अजून तरी सफल झालो नाही. पण शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहतील .
जुळलेल नातं कधी तोडणार नाही . ह्या मताचा मी आहे.
नात्यांच्या ह्या असंख्य धाग्यातूनच हे जीवन गुंफल आहे . वेगवेगळ्या रंगाचे स्वभावाचे हे धागे आपलं जीवन खरया अर्थाने समृद्ध करतात . जीवनाची व्याख्या अश्या विविध धाग्यातूनच तर मिळते .
कुठेतरी कधी एक धागा सैल होतो शब्दांच्या धारेने , कधी मूकपणाने ...तेंव्हा मनाची फरफराट उडते .
बस्स हे शब्द बोचू लागतात . मग सार निरर्थक वाटू लागतं.
कितीही चांगलं वागलं ..तरी कुठेतरी काहीतरी खटकत समोरच्याला .
ते आपणास कळत नाही . मग हेटाळणी सूर होते. कुणी मूकपणाने दूर जावू लागतं....
कुणी त्वेषाने बघू लागतं . कुणी दुर्लक्ष करू लागतं .
हे जाणून हि आपल्याशिवाय ती व्यक्ती जगू शकत नाही . तर कुणी मुकपनाचं शाब्दिक घाव देतं.
चुकी कुणाची हि असेना ते महत्वाच नसतं .
अश्यावेळी आपण एकमेकांना समजून कसं घेतो हे महत्वाच ..पण ...घडतं वेगळंच . तेंव्हा वाटू लागतं .....
आयुष्यात एकच असा दिवस आहे . जिथे आपले शत्रू पक्ष हि , जीवापाड प्रेम असूनही आपल्या पासून दुरावलेले...आपली हेटालनी करणारे एक चांगली गोष्ट बोलून जातात.
अगदी मनापासून, ते म्हणजे ' तो खरचं खूप चांगला होता '
असा दिवस एकदाच येतो .पण तो कधी येईल तो सांगता येत नाही .त्याचा नेम नाही .
पण आलच तर सर्वांना एकत्रित आणतो हे खरे,  तो दिवस म्हणजे आपला ' मृत्यू' शेवटची घटका. 
 हा मृत्यू हि कधी फार जवळून बघता येतो .
स्वतःच्या डोळ्यांनी ..स्वतःचाच मृत्यू . विश्वास बसत नाही आहे ना? पण येतो पाहता..
स्वतःच्या डोळ्यांनी .....जिवंतपणी .
मी तरी पाहतो ...
कोण कोण आणि कितीजण बरं अश्रू वाहतील आपल्यासाठी .
कोण येईल सर्वप्रथम ?
 त्यांच्या मनातल्या भावना काय असतील अश्यावेळी?
 आपली आवडती जिवलग व्यक्ती येईल का ?
तिच्या भावना काय असतील अश्यावेळी ? गणिताची अशी आकडेमोड सुरु होते .

पण हे सारं निरर्थक . जागेपणीच हे दृश्य मनाला ..मात्र पुन्हा चांगल्या मार्गाकडे वळवत.
तुला अजून खूप काही कमवायचं आहे . माणसं जुळवायची आहेत . हे नातं फुलवायचं आहे,  टिकवायचं आहे .
हे जीवन जगतानाच अस जगायचं आहे कि त्याचं जिवंतपणीचं सार्थक झाल पाहिजे .
मृत्यूनंतर हि प्रत्येकाच्या ओठी आपलं नाव उमटलं पाहिजे .
बस्स..जीवन असाच जगायचं आहे .
काही प्रश्नाची उत्तर हि आपल्याकडेच असतात . जुळलेल्या नात्याची , समोरच्याशी संबंधित अशी ...
पण ती उत्तर देताना मनाची तारांबळ उडते . जेंव्हा समोरील व्यक्ती अशा प्रश्नाचं सतत पाठपुरावा करत राहते . तेंव्हा खूप अवघड जातं . मनातले भाव बोलून दाखवणे . ते व्यक्त करणे . तेंव्हा शब्द बोलतात ते मूकपणाचे ....
कुठून तरी आलेले ..पण अंतरीचे ... मी हि असाच पाठपुरावा करत राहिलो तेंव्हा हे एक इंग्रजी वाक्य नजरेस पडलं.
'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."
काही प्रश्नांची उत्तर तयार असतात आपल्या मनात. हे असच का , ते तसच का ? तर्क वितर्कावर आपण बरेच निष्कर्ष काढतो हि . पण साऱ्यांच गोष्टी तर्क वितर्कावर सोडवल्या जात नाहीत.
त्यास खरेपणाची पृष्टी मिळावी लागते. त्यासाठी इतर मनाचा त्या व्यक्तीच्या अंतरीचा वेध घ्यावा लागतो. पण कळूनही काही गोष्टी स्वीकारण्याची आपल्या मनाची तयारी होत नसते .
एक तर आपलं खूप जीव असतो अश्या गोष्टींवर अशा व्यक्तींवर ... अन अशापासून स्वतःला दूर करण , बाजूला सारण फारच अवघड जातं . वाटते तितकी सोपी गोष्टी नसते ती .
एक घट्ट धागा विणलेला असतो नात्याचा . तो सहजा सहजी सोडता सोडवता येत नाही.
मन हि मन में...
असंच लिहिता लिहिता ...
नातं तुझं माझं..
संकेत य पाटेकर
१९.०३.२०१४

" अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही...


" अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही .
 "आपल्याच व्यक्तीकडून ....आपल्याच स्वकियांकडून "
हे लहाणपण एक बरं असतं.. एखादी गोष्ट नाही मिळाली तर निदान हट्ट तरी करता येतो.
आपल्या स्वकीयांसमोर...

त्यासाठी अश्रुंचा बांध फोडता येतो .रागाने हात पाय झटकता येतात.
घरभर गोंधळ घालता येतो . हवा तसा आक्रोश हि करता येतो .
पण हवी असलेली ती गोष्ट मिळविता येते. कसे हि काहीही करून.
त्यात आपला आंनद जो सामावला असतो. आपल्याला जे हवं असत ते हवंच असतं ...
बस्स आणि ते मिळवतो हि ...
त्यावेळेस फारस कळत नसतं समजत नसतं उमगत नसतं . इतर मनाचा अंदाज घेता येत नसतो.
 कुणा मनाला आपल्यामूळे किती कष्ट सोसावे लागत आहे .
किती त्रास सहन करावा लागत आहे ह्याचा हि विचार आपल्या मनाला शिवत नसतो .
आपल्याला जे हवं असतं ते बिन्धिक्तपणे आपण बोलून टाकतो .
इतर मनाचा विचार न करता . आणि ते आपलं हट्ट पुरवलं हि जातं. आपल्या मनाचा विचार करून ..
ते करावंच लागतं त्यांना...
इथे मोठ्यापणी मात्र तसं नसत. कारण अकलेचे अन समजुददारपणाचे नवे अंकुर आपल्या मनात फुललेले असतात. त्यामुळे इथे हट्ट करता येत नाही.
अश्रुंचा बांध फोडता येत नाही . रागाने हात पाय झटकता येत नाही.
हवा तसा आक्रोश हि करता येत नाही .मनातल्या मनातच कित्येक गोष्टी तश्याच दडून राहतात .
मनातल्या मनातच अश्रुंचा बांध आटुन जातो. शब्द निशब्द होवून जातात . विचारांच्या भाउक गर्दीत मन हरवून जातं.
कारण काळजी असते , थोडी भीती असते .. 
समोरील व्यक्तीची , तिच्या संवेदनशील मनाची . तिला होणारया त्रासाची.
त्यामुळे जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपल्या मनातच राहते.
त्याची पूर्तता होत नाही . काही वेळा ..., काही वेळा मात्र होऊन जाते .

मोठेपण जे लाभलेलं असतं आपल्याला,  अन म्हणूनच हवा तसा हट्ट करता येत नाही .
आपल्याच व्यक्तीकडून ....आपल्याच स्वकियांकडून .. म्हणून लहाणपण एक बरं असतं.. नाही का ?
असाच लिहिता लिहिता..
मनातलं काही...
नातं तुझं माझं...
संकेत य पाटेकर
२४.०२.२०१४

बुधवार, १४ मे, २०१४

आक्रोश मृत्यूचा ..

आक्रोश मृत्यूचा ........नि तो अखेरचा निरोप ...!!
नेहमीप्रमाणे नि त्याच ठरल्या वेळेप्रमाणे मी ऑफिस ला पोहचलो.
आज मन जरा रंगातच होते ,अन उत्साही हि , त्याच उत्साहात ऑफिस मध्ये पाउल टाकले.
अन ऑफिस मधल्या माझ्या सहाकारयांशी गंमती जमतीत दम दाटी करत माझ्या जागेवर जाऊन बसलो . काही वेळेत कामाला हि सुरवात केली . नि बघता बघता घड्याळाचा तास काटा ११ वर स्थिरावला .
 नि तेवढ्यात मोबाईल ची रिंग वाजू लागली . तो call मी रिसीव्ह केला .
पण बोलणारे त्या शब्दांनी मनावर एकच आघात केला .  डोळ्यासमोर एक एक चित्र उमटू लागलं.
वर्तमानातून माझं मन भूतकाळात केंव्हाच गढून गेलं.
 आठवणी एक एक करून बाहेर पडू लागल्या.
ती व्यक्ती अन त्या व्यक्तीचा लाभलेला सहवास ........ मन खोल विचारात हरवून गेलं.
अनपेक्षितपणे काही घटना मनावर आघात करतात ..त्यात मृत्यू हा सर्वात मोठा आघात .
एखाद्या मनाला फार मोठा धक्का देऊन जातो तो ...
तो धक्का बसला ..त्या कॉल ने, त्या कॉल नन्तर लगेच ऑफिस मधून बाहेर पडलो एक ई-मेल करून...
 आज माझ्या सख्या आत्याच अकस्मात निधन झालं.
गत आठवणीच चित्र डोळ्यसमोर घेत मी भांडूप ला पोहचलो खरा .. पण मनात एक प्रकारे भीतीच सावट पसरल होत. भीती कसली तर .......
तो आक्रोश ते दु:खद हुंदके .......मला पाहवत नाही , ऐकवत नाही ........
एखाद्याचे दु:ख तो आक्रोश ते अश्रू ..पाहवणार तरी कसे .........कुणाला
मृत्यू येतो नि जीव घेऊन जातो .
पण जाता जाता आजुबाजूच वातावरणात अश्रूमय दुखद हुंदक्यांनी अगदी ढवळून देतो .
सरणावरचे ते शांत देह निपचित पडलेलं असत काही वेळ , ' त्याला कसल्या आल्या संवेदना?
 पण तरी हि हे मन हे माहित असता म्हणत स्वतःशीच...
'' अरे , नका अग्नी देऊ रे त्या देहाला'' ..
किती त्रास होईल , चटके लागतील , भाजेल अंग ..कुणीतरी थांबवा हे ...थांबवा हे ..............पाहवत नाही रे ..
पण देह तो शेवटी अग्नी मध्ये विलीन होतो .......नि अखेरचा निरोप घेतो .
काही दिवसा पूर्वीच घडलेली ती भेट ..शेवटी अखेरची ठरते .
संकेत य पाटेकर
मनातले काही
२४.०५.२०१३

नातं तुझं माझं ..

ज्या व्यक्तीवर मनापासुन प्रेम अन जिव्हाळा असतो.
त्या व्यक्तीच्या सहवासासाठी आपल 'मन' प्रत्येक क्षणी धडपडत राहत.

कधी फोन वर , तर कधी SMS ने,  तर कधी प्रत्यक्ष भेटून वगैरे , आपण त्या व्यक्ती पर्यंत पोहचण्याचा तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्नात असतो .
काही कारणास्तव जर त्या नात्यात दुरावा वाढला असता , संपर्क तुटला असता
 'भेटीची ती ओढ'' अधिकच प्रमाणात वाढते , अन ज्यावेळेस अप्रत्यक्षरीत्या जेव्हा तिची जेव्हा भेट घडते.
तेंव्हाचा तो आनंद काही औरच असतो , जो शब्दात वर्णन करता येणार नाही .
त्या भेटीत तो इतक्या दिवसाचा मनात असलेला राग ..क्षणात कुठे पळून जातो.
कुणास ठाऊक , शब्द हि ओठावरच अडले जातात.
मुके होतात जणू,.
कान टवरले जातात ते फक्त तिच्या एक एक प्रेमळ शब्दांची गुंफण ऐकण्यास....
नजर हि गुंतली जाते ते तिच्या आपल्याबद्दल असणार्या प्रेमळ भावना टिपण्यास ..............
पण वेळ मात्र नेहमीच्याच तिच्या स्वभावाप्रमाणे पुढे निघून जाते , ते क्षण मागे टाकून...
असलेल्या गैरसमजुतीचे निरासन करून ...नात्यातले रुसवे तोडून ...
मनातले काही ..
नातं तुझं माझं
संकेत य पाटेकर

















Hiiiii.... मला आज भेटायचं , भेटशील??
तिच्याकडून ऊतर मिळेल ह्याची शाश्वती न्हवतीच , तरी सुद्धा whatsapp वर आज तिला मेसेज केला.

प्रत्येक वेळेस काही विचारला असता तिच्या कडून कसलाही प्रतिसाद मिळत नसे.
असे कित्येक दिवस ओलांडले ,महिनो महिने उलटले , एक वर्ष उलटल हे असंच चालू आहे .
 ना फोन , ना मेजेस , ना भेट , ना बोलनं. नात्याची ती रेशीम गाठ जणू ढिली होत चालले .
संवाद हा नात्यातला महत्वाचा दुवा , तोच इथे नाही , मग हे असच होणार. ..
मन विचारांच्या असंख्य गर्दीत हरवणारच ..
माणूस हा स्वतहा पेक्षा दुसर्यांच्याच विचारांमध्येच अधिक गुंतलेला असतो, रममान असतो.
आणि म्हणून नात्यात जिथे प्रेम अधिक दृढ ..खोलवर रुजलेल असतं. तिथे त्या व्यक्तीशिवाय इतर विचार मनात शिवत हि नाहीत.
' प्रेमासारखी अजब गोष्ट ह्या दुनियेत नाहीच ' .
प्रेम अन नातं , नातं अन प्रेम , ह्या शिवाय दुसरा विषयच माझ्या मनात तसा फिरकत नाही.
का ? का कुणास ठाऊक ..नातं अन अन प्रेम ह्या विषयक इतकी आपुलकी कशी निर्माण झाली.
असो छानच आहे , देवाने दिलेली ती देणगी आहे आणि ती सांभाळायला हवीच.
 पण ते सांभाळता वेळ अन परिस्थितीशी सांगड घालावी लागते आणि त्यात आपलं अनमोल नातं अन त्यातल निरागस निर्मल प्रेम जपाव लागतं.
माणसं बदलतात अस म्हणतात , 'तू फारच बदललाय स रे ? तू फार बदललीस गं ?
असे प्रश्न एखाद्य्ला आपण विचारतोच ..कधी ना कधी..
कारण सुरवातीचे त्याच्या सोबत तिच्या सोबत घालावालेले ते क्षण आणि आताचे हे क्षण ह्या मध्ये बराच फरक , बदल आपल्याला जाणवायला लागतो , दिसतो प्रत्यक्ष , आणि म्हणून आपण त्याना बोलून जातो.
तसे काही बदल आपल्या अपेक्षानुसार असतात, घडायला हवे असे आपण मानत असतो.
 पण काही अपेक्षा नसताना घडतात , तेंव्हा मात्र मनाला चटके बसतात.
माणूस परिस्थितीशी झुंजता झुंजता स्व:तहा झिजून निघतो...आणि ते आपल्यला बघवत नाही.
आणि त्यात आपली जिवाभावाची व्यक्ती असेल तर मग मन बैचेन झाल्यावाचून राहतच नाही.
 ती तिथे दुखाने पोळली असता, आपण अस आनंदाच्या लहरींमध्ये तरंगायचं ?
अस कस हा विचार मनाला शिवून जातो. नि आपण काय करू शकतो जे केल्याने ती व्यक्ती ह्यातून बाहेर पडेल ? ह्याच्या विचारात गुंततो.
काही वेळा मार्ग दिसतो , काही वेळा नाही . सर्वच गोष्टी तश्या आपल्या हाती नसतात.
जे समोर आहे ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नसतो.
काहीवेळा आपल्याला बघ्याची भूमिकाच स्वीकारावी लागते. पण अशावेळी मन मात्र आपल धडपडत , तळमळत .......केवीळवान होत .
मनातले काही
नातं .....तुझं माझं
संकेत य पाटेकर
२२.०१.२०१३
 ______________________________________________________________________ ______________________________________________________________________
सहज रस्त्याने चालत होतो. रात्रीचे ९ वाजले होते. रस्त्यावर फार तशी रहदारी हि न्हवती.
पाउस हि आताशी कुठे निवांत झाला होता . दोघे हि तसे शांत मनाने एक एक पाउलं हळूच पुढ टाकत होतो ,पण तिच्या मनात मात्र विचारांच्या गतीने अधिक वेग घेतला होता. चेहर्या वरून तिच्या ते स्पष्ट दिसून येत होत.
जवळचीच , पण विश्वासातील कुणी व्यक्ती सोबत असल्यास ,मनात सळनारया मनातल्या गोष्टी मनात राहत नाही , त्यांना एक मोकळी वाट मिळते, त्यांचा मार्ग खुला होतो . समोर तशी व्यक्ती असल्यास .
संकेत , खूप कंटाळले रे ,
अस वाटतं दूर जाव कुठे तरी ..........
चालता चालता तिच्या मनातल्या विचारांचे बंदिस्त दार तिने आता उघडायला सुरवात केली होती . एखाद्यावर दृढ विश्वास असेल तर मनातल्या अगदी संवेदनशील भावना हि आपण समोरील व्यक्ती कडे व्यक्त करून टाकतो , मन मोकळ करून टाकतो तसं तिनेही केल . तीच मन मोकळे करायला .
संकेत , खरच खूप कंटाळले रे ,
लग्न होत नाही अजून ?
बघ ना कुणी असेल तर ? तिच्या कडे पाहून मी स्मित हास्य केल .
अन म्हणलो होईल ग , भेटल भेटल .. पण कधी ?
प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते ग , त्या त्या वेळी भेटी गाठी घडत असतात.
नाती जुळत असतात. त्यामुळे बिनधास्त रहा . सर्व काही सुरळीत होईल . समजावण्याच्या हेतूने मी तिला म्हणालो .
मम्मी - पप्पा ना हि उगाच त्रास ना , पप्पा असे काही बोलत नाही ,पण त्यांच्या हि मनात माझ्या लग्ना बद्दलचा विषय चालूच असतो . स्थळ येत आहेत रे , पण मुलगा वयाने माझ्या पेक्षाही ६ - ६ वर्षाने मोठा, अस , मला ते पसंद पडत नाही, मी नाकारते मग आलेलं स्थळ . मम्मी मग त्यावर बडबडते , नाराज होते.
त्या दिवशी खूपच त्रास झाला होता रे ह्या सगळ्याचा , मी मनातलं सर्व भाव लिहून काढायला सुरवात केली होती , एका कागदावर , अन लिहून हि काढलं. त्यावेळेस अस वाटत होत कि स्वतःचच काहीतरी बर ...
अग वेडी आहेस का ? मी तिचे वाक्य पूर्ण होऊ न देता तिला दटावूनच म्हणलो .
अस भलत सलत काही करायचं नाही , मनात अस आणायचं हि नाही . कळल. जीवन एकदाच मिळत ..आणि ते जगावं, भले ते किती हि दुखाने व्यापलेले का असो,
तुला माहित आहे . माझी एक मैत्रीण आहे . ती ने असंच एकदा मला एक हादरा दिला होता .
अचानक बोलून कि , मला जीवनाचा कंटाळा आला आहे , मी जीवन संपवीत आहे . तिच्या त्या बोलण्याने मी गोंधळून गेलो होतो तेंव्हा , काय कराव ते हि कळत न्हवत.
माझे फोन calls हि उचलत न्हवती , तेंव्हा मनाने मी अगदी सैर वैर झालो होतो . . पण नंतर मात्र तिने call उचलला तेंव्हा मी तिच्याशी जे काही बोललो , ते तिने अगदी मनाने ऐकल .
तिच्या घरी हि सेम प्रोब्लेम , पण सोबत जॉब , तीच करिअर, अशा अनेकानेक गोष्टी तिला त्रास दायक ठरत होत्या. त्यानेच तिची मनस्थिती ढासळली होती . तशात तिने तो निणर्य घेतला होता.
माणसाने आलेल्या परिस्थितीशी झुंजायचं असत . तिला शरण जायचं नसत . शरण जाणे म्हणजे हार पत्करणे.
त्यावेळेस तिने माझे हे बोल , शब्द ना शब्द अगदी मनापसून ऐकले . एवढ बोलून मी जरा शांत राहिलो.
,निशब्द झालेल्या माझ्या चेहऱ्याकडे पाहून , तिने बोलायला सुरवात केली . खरच यार , मला वाटत होत कि माझंच दुख फार मोठ आहे. पण माझ्या पेक्षा हि कुणी अधिक दुखी आहे . ह्याची मला कल्पना न्हवती . तिच्या ह्या वाक्याने मात्र मला माझ्या आवडत्या लेखकाची वपुंची आठवण झाली .
त्यांच्या कथा कथानातील अनामिक ह्या पात्राची.......
- संकेत पाटेकर
मनतले काही ..
नात तुझ माझ

मंगळवार, १३ मे, २०१४

'प्रिय 'आई‘

ह्या पूर्वी मी कधीच तुला पत्र लिहिले नाही.
कसे लिहतात ते हि मला ठाऊक नाही. पण आज लिहावयास घेतले. कारण तुझी खूप खूप आठवण येते गं !
नि येत राहते .
I Love you आई ...
आता म्हणशील हे काय नवं खूळ ? अस मी कधी तुला म्हणालो हि नसेन , म्हणायची ती तशी गरजच भासली नाही . प्रेम काही शब्दात व्यक्त करायची गोष्ट नाही .
पण आज म्हणतो , कारण तू सोबत नाहीस. मायेचा हात पाठीशी आहे. पण ...तू जवळ नाहीस .
I Love you आई …
क्षण बघ ना कसे हे , मनास कधी खूप आनंद तर कधी दु:ख देऊन जातात .
‘मोठे’असल्याची  जाण क्षणो क्षणी करवून देतात .

लहानपणी सतत वाटायचं गं...कधी आपण मोठे होऊ , कधी ह्या शाळेय अभ्यासातून सुटू ..
कधी ऑफिसला जावू..मस्त मज्जा नि धम्माल करू…
पण ह्या सगळ्याच्या अगदी उलट वाटतं गं आता…
वाटतं पुर्वीसारखं पुन्हा लहान ह्वावं. तुझ्या संगतीत , तुझ्या मायेच्या उबदार कुशीत शांत पडावं .
नि तुझ्या मंजुळ गोड आवजात ती ‘ बहिण भावाची ‘ गोष्ट पुन्हा ऐकावी .
ती गोष्ट आज हि मला आठवते.
बहिणीची भावा वरची वेडी माया , तिने त्याचे वाचविलेले प्राण . किती आत्मयतेने ऐकायचो गं ती गोष्ट. 
तिथपासून कुणास ठाऊक , माझी हि एखादी सख्खी बहिण असावी अस सतत वाटत रहायचं.
अन अजून हि वाटतं तसं, त्यासाठी मी तुझ्याकडे हट्ट हि करायचो , आठवतंय तुला ?
मला बहिण हवी अस म्हणून तुला किती त्रास द्यायचो न्हाई ?
 त्यावर तुझं नेहमीच ठरलेल उत्तर असायचं.
“आणू हा आपण, हॉस्पिटल मध्ये जावू नि घेऊन येवू तुझ्यासाठी एक बहिण “
तेंव्हा तुझे हे लाडीगोडीचे शब्द ऐकून मी कुठे शांत व्हायचो .
अन पळत सुटायचो बाहेर खेळायला. .आज ह्या सर्व गोष्टी आठवतात नि हळूच डोळे पाणवतात.
बघता बघता बघ ना हे क्षण कसे निघून गेले ते काही कळलंच नाही.
त्याचबरोबर तू हि हळूच दूर निघून गेलीस. फक्त जाताना बोलून गेलीस.

 “ मी कुठेही असले तरी तुमच्यावर माझी नजर असेल '' 
तुझे हेच वाक्य मला वाईट प्रवृत्ती पासून दूर ठेवतात ..आई.. !
तुने केलेलं चांगले संस्कार कधी हि मोडणार नाही .
आज खूप आठवण आली तुझी , म्हटलं लिहावं काहीतरी ...नि सर सर लिहू लागलो एक एक ओळ .

आयुष्याच्या माझा प्रवास आता कुठे सुरु झाला आहे . नि एक एक गोष्ट त्या प्रवास दरम्यान हळू हळू समजू लागली आहे. आयुष्यं हे खरच खूप गुंतागुंतीच आहे गं …
इथे प्रश्न अनेक निर्माण होतात , एका मागोमाग रांगेत उभे…
जणू वारूळातल्या मुंग्यांप्रमाणे. त्याची उत्तर मात्र , जवळ नसतात कधी.
शोधावी लागतात ती….कधी पळतं , धडपडतं , तर कधी शांत पणाने… शांत मनाने.
लहानपणं एक ठीक असत गं …
मनात तसं ठेवण्यासारखं काहीच नसतं. जे असतं ते आपण मनमोकळेपणाने बोलून टाकतो . तिथे काही लपविण्याची गरजच नसते. पण एकदा का मोठे झालो , नि जबाबदारीचे एक एक भार अंगा खांद्यावर येऊ लागले कि , मनात असणाऱ्या गोष्टी बाहेर पडतच नाही.
त्या मनातच दाबून ठेवाव्या लागतात .  जोपर्यंत आपल्या मनाला साजेस अस समजून घेणारं एखादं दुसरं मनं सापडत नाही .

 खूप काही गोष्टी आहेत. ज्या आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात. त्याचा बारकाईने विचार केला असता त्यामागचं सत्य काय ते उघडकीस येतं. अन मनं शहाणं होतं.

आयुष्य हि एक शाळाच आहे गं ! इथे शिकविणारे हे समाजातीलच सर्व घटक आहेत , अन हा निसर्ग हि आहे जोडीला शिकवायला. . मनास आकार द्यायला .. अनुभवाचे धडे गिरवून.
असो , बऱ्याच गोष्टी शिकलोय आई. अन शिकत राहीन अजूनही , जोपर्यंत माझा हा जीवनपट चालू राहील.
तुला ठाऊक आहे ?
ह्या प्रवासा दरम्यान मला अनेक चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभला आहे.
त्याचं भरभरून प्रेम हि मिळत आहे.  आपण जस वागतो , तसे लोक आपल्याशी वागतात.

आज एकमेकांशी न बोलणारे , एकमेकांत वाद असणारे , माझ्याशी मात्र चांगल्याने बोलतात.
 कारण मी त्यांच्याशी तसा प्रेमाने मिसळून राहतो .
प्रेमानं माणसं जोडायला तूच तर शिकवलेस. हे सर्व तुझे संस्कार आहेत आई , ते मी विसरणार नाही.
खूप बर वाटलं आज तुझ्याशी बोलून ........मन हलक झालं.
 तू जवळ असावीस अस नेहमीच वाटतं.
 कारण ''आई'' हि हाक मला द्यायची आहे , दि देता येत नाही.
तुझ्या उबदार मायेचं स्पर्श मला हवा आहे. तो मिळत नाही आहे.
 पण असो , तुझ्यासारखेचं मायेचे काही जण आहेत, जे मला आपल्या मुलाप्रमाणे मानतात.
मुलाप्रमाणे प्रेम करतात . पण तरीही शेवटी आई हि आई च असते ना ?
प्रेम स्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावुं तूज आतां मी कोणत्या उपायीं ?
I Love you आई …
तुझाच लाडका…
संकेत
मनातले काही..

शुक्रवार, ९ मे, २०१४

क्षण घडवतात अन आपण घडत जातो ...


क्षण घडवतात . अन आपण घडत जातो .
आयुष्यात एक गोष्ट शिकलोय .
सुरवातीला वाटायचं हि जी नाती आहेत . चार भिंती पलीकडची .
जी मी माझ्या आयुष्याच्या प्रवासात नव्याने जुळवली आहेत . ती मला कायमची जपायची आहेत.
तुटू द्यायची नाही आहेत. भले कितीही वाईट प्रसंग येवोत.
मला ती जपायची आहेत बस्स. अन त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असायचो , भले कुणाकडून हि मनाला कितीही शाब्दिक घाव बसले तरीही, कुणी मान अपमान केला तरीही, कुणी कितीही दुर्लक्ष केल तरीही, कुणी बोलायचं थांबल तरीही.
मी माझ्या स्वभावानुसार पुन्हा बोलता व्हायचो. मागचं सार काही विसरून . कारण ते नातं हव असायचं मला . पण हळू हळू हे जाणवू लागलं कि नाही .
जुळलेल्या नात्यांपैकी काही नाती हि क्षणाचेच सोबती आहेत . काही नात्यांना आपलेपणाची किंमतच उरली नाही आहे.   भगवंताने नेमून दिलेलं कार्य करून ते आपल्या ' आयुष्याच' परीघ रेषा ओलांडून पुढे निघून जाण्याच्या तयारीत आहेत .
मग त्यांना रोखणारे आपण तरी कोण ? ते त्यांच्या जीवनाचे वाटकरी... काही अवधी साठी ते आपल्या जीवनाच्या वाटेवर चालू लागतात . बोलू लागतात . अन मग निघून जातात .
त्यामुळे जे जाणारे आहेत ते जाणारच कसेही करून . बस ह्यापुढे आपण त्यांना रोखायचे नाही.

उगाच नातं नात करत बसायचं नाही. त्यातच गुंतून राहायचं नाही .
आपल्या परीने आपण चांगल वागावं. हसावं , बोलावं. जे जाणारे आहेत ते जातील . काही आपल्या बरोबरीने सोबत चालतील . किती अवधी साठी ते मात्र सांगता येत नाही.
कारण ज्याचा त्याचा जीवनमार्ग ...
कोणतीही व्यक्ती कितीही अनुभवाने मोठी असली तरी अन त्यांच्या अनुभवाचे पाठ त्यांनी आपल्याला सांगितले तरीहि आपले अनुभव शेवटी आपल्यालाच अनुभवावे लागतात . 
अन ते अनुभवी धडे त्या त्या वेळेनुसार आपल्याला परिस्थिती नुसार मिळत जातात .
असंच लिहिता लिहिता ..
- संकेत य पाटेकर
०९.०५.२०१४