शनिवार, ३१ मार्च, २०१८

ग्रेट भेट

'' कुठलीही स्त्री असो. ती वात्सल्यमूर्ती असते. मायेचा अथांग पान्हा.... ''
काल कसं कुणास माहित नाही त्यांना पाहिलं आणि आतून एकच कंठ फुटला. 'माई' 
कधी भेटलो नाही. कधी पाहिलं नाही. 

बंद कवाड हळूच उघडत , पुढे ढकलत त्या उंबरठा ओलांडून आत आल्या आणि कुठलंसं नातं जन्मोजन्मीचं असं क्षणात घट्ट रुजल्यासारखं झालं. 

क्षणभर वाटलं त्वरित त्यांच्या जवळ जावं अन त्यांना खेटून बसावं . त्यांच्या वात्सल्यरुपी पंख छायेत.
पण नाही. तसं करता आलं नाही . कारण पहिल्यांदाच आज त्यांना भेटत होतो. पहिल्यांदाच त्यांच्या ह्या साहित्यरूपी सदनात प्रवेश दाखल झालो होतो.
म्हणूनच थोडं आवरलं स्वतःला...... भावनेचं हे उथळतं हृदय सांभाळून घेत .म्हटलं बोलावं आधी आपण मनमोकळंपणानं ..
तर असो,
थोर असे साहित्यिक कवी सूर्यकांत मालुसरे , ज्यांच्या नावातच (मालुसरे) कर्तृत्वाचा शिखर उंचवलं गेलंय असे दिग्गज कवी , त्यांच्या घरी आज भेटी गाठीचा योग जुळून आला होता.
कवी -लेखक आणि एक डोळस भटकंती करणारा, आमचा भटक्या मित्र चंदन ह्यांसोबत ,
प्रभादेवीच्या त्यांच्या त्या राहत्या घरात....

एखाद दीड तासाची अवघी ती भेट , पण त्यात हि त्यांचे साहित्यविश्व , त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी भूषवलेली अध्यक्षपद , त्यांनी लिहलेली काव्यसंग्रह ..आणि अनुभवाची गतमोकळी शिदोरी त्यांनी त्यात आम्हांपुढं उघड केली.
सोबतीला चहा बिस्किटांचा गोड मधाळ असा पाहुणचार हा होताच.
त्यासोबत एकीकडे माईंचं बोलणं देखील , मनावर अधोरेखित होत होतं. इतिहासावरचा त्यांचा अभ्यास आणि विचारांची सशक्त शैली त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
काका , माई मी आणि चंदन हि चौकट आज विचारांत मिसळली होती.
एकंदरीत भूत वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मिलाफ... आम्हा बोलण्यातून एकत्रित असा उकळत होता. ''तुम्ही इतरांपेक्षा जरा वेगळेच आहात हा'' ..निघता निघता ...निरोप घेता घेता हा शेरा माईंनी देऊ केला.
'शिवगाथा' हि प्रत काकांनी आमच्या कडे सुपूर्त केली. एक भेट म्हणून ....
ह्यातील एक एक कविता म्हणजे जणू प्रेरित भव- सागर, न्हाहून उसळून निघावं असं.
सहज- सरळ आणि सोप्या अश्या भाषेतलं . सहज गुणगुणायला लावणारं. ओठी स्थिरावणारं ...
वयाच्या ८७ तही काकांचा लिखाण काम सुरु आहे . आणि लवकरच त्यांचा एक काव्यसंग्रही हि येतोय . त्याचीच आतुरता आहे.
निघता निघता मनातली इच्छा हि पुरी करून घेतली.
माईंसोबतचा एकत्रित असा फोटो ...
- संकेत पाटेकर
१३/०३/२०१८




मंगळवार, १३ मार्च, २०१८

'' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....''


'' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....'' 
चालता चालता एक कटाक्ष त्याकडे टाकत , बारिकतेने ती बोलून मोकळी झाली. 
पण त्याबोलण्यानं तो मात्र काहीसा धीर-गंभीर होत आला. 
पण तत्क्षणी चेहऱयावर त्यानं तसं काही येऊ दिलं  नाही. उलट विचारांच्या भावगर्दीत तो   एकाकी असा अधीन होत गेला . उभ्या आयुष्यभराचा प्रश्न  ? होणारच होतं ते  ?  काही न बोलता दोघे हि लागभगिने पुढे होतं गेले.  ऑफिस दिशेनं चाल करत.  
अवघे काही महिनेच  ओलांडले होते . तिला हे ऑफिस जॉईन करून. त्यांनतरची तिची नि त्याची काय ती ओळख.   
एकाच डिपार्टमेंट मध्ये असल्याने नित्य नेमाचं बोलणं हे ठरलेलंच होतं . त्यातही 'खेळकरपणा अन तिचा अट्टाहासपणा'  ह्यामुळे ती मनाच्या समीप आली होती. ऑफिसला 'येणं - जाणं' हि सोबतच होतं असल्याने आणि होणाऱ्या 'मुक्तछंदी'  संवादाने तिच्या मनात आपसूक त्याच्याविषयी 'आपलेपणा' गहिवरला गेला  होता. दाटून बहरला होता.   ह्याची धग आता त्याला मात्र अधिक जाणवू लागलेली    आणि म्हणूनच आजच्या त्या निसटत्या वाक्याने  '' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....'' ह्याने त्याचं मन काहीसं अस्वस्थ होऊन गेलं . 
आपल्याला काय हवं काय नकोय  , ह्याबाबत , अगदी एखाद्या जोडीदारासारखं (पत्नींत्व स्वीकारून जणू ) सतत काळजी घेऊ पाहारणारी ती   ....इतक्या कमी वेळात मनाच्या इतक्या जवळ  येईल हे त्याला  देखील वाटलं न्हवतं. पण तसं झालं होतं.  

तसा त्याचा 'वाहता' स्वभाव-गुणच  असल्याने , त्याच्या मनात काही तसले  भाव अद्याप उठले न्हवते. आपलेपणा मनाशी बांधूनच असलेला तो त्याच्या मित्रवर्गात हि तितकाच खास होता. प्रिय होता. आणि प्रेमाच्या  प्रांतात म्हणावं तर 'अनुभवाची शिदोरी'  घेऊनच  त्याच  तो आयुष्य जगत होता. कसंबसं आपल्या तुटल्या मनाला सांभाळून घेत. सावरून घेत. 
म्हणावं तर कित्येक असे क्षण  धारधार पातेसारखे,  जखम करणारे...अंगमनाशी त्याने हळूच झेलले होते.  ती व्रण अजून हि भरून आली नव्हती . तरीही आले क्षण तो आनंदाने मिरवत होता.  
ण असे किती दिवस   ? 
किती दिवस स्वतःला स्वतःचा आधार देणार  ? स्वतःच स्वतःच सांत्वन करून घेणार , 
कुणी तरी हवं असतंच ना सोबतीला , ह्या उभ्या आयुष्यासाठी. आपलं आधार होणार, आपल्या सुख दुःखाशी एकजीव होणार ... आपलं , आपलं म्हणून जगणारं.  
त्याला हि अश्या कुण्या एका  जोडीदाराची  आता सोबत हवी होती.   मनातली असली नसलेली रिकामी पोकळी भरून काढणारी. त्या 'तिची' 
तिच्याच शोधात तो होता.  त्याच  दिशेने त्याची आणि घरच्यांचीहि वाटचाल सुरु होती. 
आणि ह्याच अश्या नेमक्या वेळेस,  योगायोगानं तिचं,  त्याच्या आयुष्यात येणं  आणि जवळीक साधनं, ह्याचा जो काय परिणाम हॊणार होता , तो त्याच्यावर  झाला होता. प्रश्नांची  खरं तर रीघ लागली होती. 
स्वतःलाच तो तपासून पाहे. . आपलं तिच्याबद्दल नक्की काय मत आहे. ? काय आहे आपल्या मनात, तिच्याबद्दल  , प्रेम  कि.... ? 
त्यालाच कळत नव्हतं. मन ओढलं जात होतं हे नक्की. पण त्यात तशी भावना  नव्हती. शारीरिक उठाठेव हि नव्हती. मैत्रीचे धागे मात्र घट्ट रोवले जात होते . 
हे झालं त्याच्या मनाचं . पण तिचं ....
नित्य नेहेमीच्या ह्या  क्षणामध्ये तिचं हे असं व्यक्त होणं . त्याच्या मनाला गर्द विचारांच्या डोहात ढकलण्यासारखं होतं, अवघे काही महिनेच झाले होते . तिला हे ऑफिस जॉईन करून ...
अन नवी नवी ओळख होऊन. तिथपासून , आतापर्यंत ह्या एवढ्या वेळेत  ...किती जवळ आली होती ती. 
आणि कित्येक असे क्षण त्यात विणले गेले होते. 
तिनं ते हात पडकून ...'चल ना' असं लाडीगोडीनं बोलत ...मंदिरात घेऊन जाणं. 
मंदिरात जाणं पसंत नसलं तरी , तिच्यासाठी म्हणून एखाद्या नव्या नव्या जोडप्यासारखं रांगेत उभं राहणं. देव देवितांचा एकत्रित आशीर्वाद घेणं , चालता बोलता कधीही कसलाही हट्ट धरणं  , रुसवा धरणं. ऐन गर्दीतल्या मेट्रो मध्ये , आपल्या हाताचा आधार घेत कुठल्याश्या गहिवराल्या  धुंदीत हळूच डोकं टेकवण ,  जे जे आपल्याला हवंय नकोय त्यासाठी,  पुढे पुढ़े धावत येणं .पुढाकार घेणं .  ह्याची आता त्याला सवय झाली होती.  दिवसातले  ८-९ तास सोबत  असूनही, रात्रीच्या व्हाट्सअप चॅट वर  'मिस यु टू' असा रिप्लाय न दिल्याने रुसलेली ती....तिचे हे  सर्व भाव कळून येत होते . 
एकदा तर तिने कहरच केला होता. कहर म्हणजे मोठं धाडसच म्हणावं लागेल ते ,  ते हि अनपेक्षित असं ..
मंदिराच्या दर्शनाच्या नावाने  थेट राहते  त्या तिच्या , घरच्या इमारतीखाली ...कधी कसं उभं केलं ह्याचा पत्ताच लागला न्हवता. 
 ''वरतून आई बघतेय हा , चल घरी '' असं म्हणत नकट्या बोलीत, प्रेम अदबीनं तिनं  बळजबरी करत शेवटी घराशी नेलं होतं.  मग घरच्यांशी ओळख पाळख. बोलणं . हे सर्व  यथोयाथीत झालं होतं. 
एकदा असाच आणि एक  हट्ट धरून बसली होती. उद्या महाशिवरात्री आहे हा...माझा उपवास आहे. तू हि उपवास धर. 
धर म्हटलं तर धर , कसाबसा नाही नाही म्हणता म्हणता तो राजी झाला होता. 
पण दुसऱ्याच  दिवशी ऐन मध्यान्हीला तडाखून भूख लागल्याने त्याने उपवासाचा फेर तिथेच रदबदली करत ,   भरपेट खाऊन घेतलं होतं . तिथेच आणि  तेंव्हा एक दिवसाचा बेमुदत संप पाळला होता तिने. 
एक दिवस बोलणं पुरतं बंद केलं होतं. पण पुन्हा स्वतः ला स्वतः थोपवत,  नव्याने  बोलती झाली होती ती ...
अश्या कितीतरी घटना रंगल्या होत्या. तिच्या सहवासीक क्षणात...मंत्रमुग्ध होऊन. 
पण अजूनही त्याच्या मनाचा  काही ठोस निर्णय होतं न्हवता. तिचं प्रेम जाणून असलेला तो 
स्वतःच्या मनाशी मात्र अजूनही साशंक  होता.  
बोलावं तर मनात तसे काही भाव  उमटत न्हवते .  

उंचीला जेमतेम त्याला फिट बसणारी , अध्यात्मिक वळणाची , गव्हाळ वर्णाची , शिकली सावरलेली , गंमत म्हणजे एकाच ऑफिस आणि एकाच विभागात एकत्रित काम करत असलेली ,एकत्रित ये जा करणारी , साधीशीच पण सतत काळजी घेणारी ती , विचारी पंक्तीत मात्र फिट बसत न्हवती. 
स्वभाव भिन्न होता . विचार भिन्न होते . पण तरीही काळजीचा तिचा स्वर नेहमीच मनाचा ठाव घेत राही. त्याची त्याला आता सवय झाली होती.  
भांडण , बडबड , चेष्टा -  मस्करी वगैरे ह्याची रीघ तर सुरुच होती. 
पण रोज़च्या मुक्त ह्या संवादातून  तिच्या मनातला कल हि ओळखून येत होता . 
आजही असे दोघे एकत्रित चालता चालता.  एक कटाक्ष त्याकडे टाकत , लय साधत  ती बोलून मोकळी झाली. 
'' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....'' 
तिच्या ह्या अनपेक्षित आणि स्पष्ट बोलण्याने... तो  मात्र भांबावला गेला. गर्द विचारी डोहात.....प्रश्नांकित होतं. 

म्हणावं तर प्रत्येकाच्या आयुष्यात  असे  'क्षण' येतात आणि येत राहतात . जिथे निर्णय घेणं ..हे आव्हान असतं. कसोटी असते . त्याचा होणारा चांगला वाईट परिणाम हे त्या एका निर्णयावर अवलंबून असतं. पण वेळेत निर्णय घेणं हि तितकंच महत्वाचं असतं . तो हि त्याचं डोहात आता पहुडला होता. 
निर्णयावर येऊन पोहचला होता. 
 - समाप्त 
संकेत पाटेकर 
खूप दिवसाने असं काही ....
लिहता लिहता