मंगळवार, १३ मे, २०१४

'प्रिय 'आई‘

ह्या पूर्वी मी कधीच तुला पत्र लिहिले नाही.
कसे लिहतात ते हि मला ठाऊक नाही. पण आज लिहावयास घेतले. कारण तुझी खूप खूप आठवण येते गं !
नि येत राहते .
I Love you आई ...
आता म्हणशील हे काय नवं खूळ ? अस मी कधी तुला म्हणालो हि नसेन , म्हणायची ती तशी गरजच भासली नाही . प्रेम काही शब्दात व्यक्त करायची गोष्ट नाही .
पण आज म्हणतो , कारण तू सोबत नाहीस. मायेचा हात पाठीशी आहे. पण ...तू जवळ नाहीस .
I Love you आई …
क्षण बघ ना कसे हे , मनास कधी खूप आनंद तर कधी दु:ख देऊन जातात .
‘मोठे’असल्याची  जाण क्षणो क्षणी करवून देतात .

लहानपणी सतत वाटायचं गं...कधी आपण मोठे होऊ , कधी ह्या शाळेय अभ्यासातून सुटू ..
कधी ऑफिसला जावू..मस्त मज्जा नि धम्माल करू…
पण ह्या सगळ्याच्या अगदी उलट वाटतं गं आता…
वाटतं पुर्वीसारखं पुन्हा लहान ह्वावं. तुझ्या संगतीत , तुझ्या मायेच्या उबदार कुशीत शांत पडावं .
नि तुझ्या मंजुळ गोड आवजात ती ‘ बहिण भावाची ‘ गोष्ट पुन्हा ऐकावी .
ती गोष्ट आज हि मला आठवते.
बहिणीची भावा वरची वेडी माया , तिने त्याचे वाचविलेले प्राण . किती आत्मयतेने ऐकायचो गं ती गोष्ट. 
तिथपासून कुणास ठाऊक , माझी हि एखादी सख्खी बहिण असावी अस सतत वाटत रहायचं.
अन अजून हि वाटतं तसं, त्यासाठी मी तुझ्याकडे हट्ट हि करायचो , आठवतंय तुला ?
मला बहिण हवी अस म्हणून तुला किती त्रास द्यायचो न्हाई ?
 त्यावर तुझं नेहमीच ठरलेल उत्तर असायचं.
“आणू हा आपण, हॉस्पिटल मध्ये जावू नि घेऊन येवू तुझ्यासाठी एक बहिण “
तेंव्हा तुझे हे लाडीगोडीचे शब्द ऐकून मी कुठे शांत व्हायचो .
अन पळत सुटायचो बाहेर खेळायला. .आज ह्या सर्व गोष्टी आठवतात नि हळूच डोळे पाणवतात.
बघता बघता बघ ना हे क्षण कसे निघून गेले ते काही कळलंच नाही.
त्याचबरोबर तू हि हळूच दूर निघून गेलीस. फक्त जाताना बोलून गेलीस.

 “ मी कुठेही असले तरी तुमच्यावर माझी नजर असेल '' 
तुझे हेच वाक्य मला वाईट प्रवृत्ती पासून दूर ठेवतात ..आई.. !
तुने केलेलं चांगले संस्कार कधी हि मोडणार नाही .
आज खूप आठवण आली तुझी , म्हटलं लिहावं काहीतरी ...नि सर सर लिहू लागलो एक एक ओळ .

आयुष्याच्या माझा प्रवास आता कुठे सुरु झाला आहे . नि एक एक गोष्ट त्या प्रवास दरम्यान हळू हळू समजू लागली आहे. आयुष्यं हे खरच खूप गुंतागुंतीच आहे गं …
इथे प्रश्न अनेक निर्माण होतात , एका मागोमाग रांगेत उभे…
जणू वारूळातल्या मुंग्यांप्रमाणे. त्याची उत्तर मात्र , जवळ नसतात कधी.
शोधावी लागतात ती….कधी पळतं , धडपडतं , तर कधी शांत पणाने… शांत मनाने.
लहानपणं एक ठीक असत गं …
मनात तसं ठेवण्यासारखं काहीच नसतं. जे असतं ते आपण मनमोकळेपणाने बोलून टाकतो . तिथे काही लपविण्याची गरजच नसते. पण एकदा का मोठे झालो , नि जबाबदारीचे एक एक भार अंगा खांद्यावर येऊ लागले कि , मनात असणाऱ्या गोष्टी बाहेर पडतच नाही.
त्या मनातच दाबून ठेवाव्या लागतात .  जोपर्यंत आपल्या मनाला साजेस अस समजून घेणारं एखादं दुसरं मनं सापडत नाही .

 खूप काही गोष्टी आहेत. ज्या आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात. त्याचा बारकाईने विचार केला असता त्यामागचं सत्य काय ते उघडकीस येतं. अन मनं शहाणं होतं.

आयुष्य हि एक शाळाच आहे गं ! इथे शिकविणारे हे समाजातीलच सर्व घटक आहेत , अन हा निसर्ग हि आहे जोडीला शिकवायला. . मनास आकार द्यायला .. अनुभवाचे धडे गिरवून.
असो , बऱ्याच गोष्टी शिकलोय आई. अन शिकत राहीन अजूनही , जोपर्यंत माझा हा जीवनपट चालू राहील.
तुला ठाऊक आहे ?
ह्या प्रवासा दरम्यान मला अनेक चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभला आहे.
त्याचं भरभरून प्रेम हि मिळत आहे.  आपण जस वागतो , तसे लोक आपल्याशी वागतात.

आज एकमेकांशी न बोलणारे , एकमेकांत वाद असणारे , माझ्याशी मात्र चांगल्याने बोलतात.
 कारण मी त्यांच्याशी तसा प्रेमाने मिसळून राहतो .
प्रेमानं माणसं जोडायला तूच तर शिकवलेस. हे सर्व तुझे संस्कार आहेत आई , ते मी विसरणार नाही.
खूप बर वाटलं आज तुझ्याशी बोलून ........मन हलक झालं.
 तू जवळ असावीस अस नेहमीच वाटतं.
 कारण ''आई'' हि हाक मला द्यायची आहे , दि देता येत नाही.
तुझ्या उबदार मायेचं स्पर्श मला हवा आहे. तो मिळत नाही आहे.
 पण असो , तुझ्यासारखेचं मायेचे काही जण आहेत, जे मला आपल्या मुलाप्रमाणे मानतात.
मुलाप्रमाणे प्रेम करतात . पण तरीही शेवटी आई हि आई च असते ना ?
प्रेम स्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावुं तूज आतां मी कोणत्या उपायीं ?
I Love you आई …
तुझाच लाडका…
संकेत
मनातले काही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .