शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

वरळी सी-लिंक अन ती पावसाळी रात्र ...

रात्रीचे आठचे ठोके पडले.  तलाव पाळीला वळसा घेत संथ पाऊलानिशि मी आपला  गडकरी रंगायतन च्या प्रांगणात प्रवेश करता झालो. मित्र  अजूनही वेळेवर काही पोचला न्हवता .
नेहमीचीच त्याची सवय   , सांगून  कधी वेळेत पोहचलाय  म्हणून शप्पथ .....

आजही नेमकं असच, सांगितलेली वेळ टळून गेली होती . 
मी आपला उगाचं  ईकडनं - तिकडनं चौफेर नजर टाकत ताटकळत उभा होतो.  
पाउस,  गुणगुणनाऱ्या  वार्यासोबत ताल धरून अद्यापही  सूर लावून होता .
सकाळपासूनच त्याची जी रिपरिप  सुरु होती ती अद्याप हि सुरूच होती .
 कृष्ण मेघांनी हे आभाळ घेरलं होतं. विद्युलत्ता  हि अधून मधून आपलं अस्तित्व दाखवून जाई. 
तेंव्हा  मनात काहीशी धडकी भरी . पण क्षणभरासाठी ....

वातावरणात  हि मस्त हुडहुडी आणणारा गारवा पसरला होता .  
मनसोक्त पावसात न्हाऊन निघण्याची इच्छा आज पूर्णत्वाला जाणार होती .
 तनं -मनं  त्यासाठीच  तर  आतुरलं  होतं  .
माझ्या सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यांतून,  उनाड वार्यासंग चौफेर उधळणाऱ्या पावसाची सर, ' ह्या मुंबईतल्या पावसाला कुठे येणार , हे ठाऊक होतं.
तरी हि  भिजायचंच  होतं  बस्स.. ह्या एकाच  कारणांन  आज मित्रासोबत त्याच्या दुचाकीने कुठेशी जाण्याचं योजील होतं . 
पण त्याच्याच अजून ठावठिकाणा नव्हता. दिलेल्या वेळेपत्रिकेनुसार हा भाई  जरा दहा-पंधरा  मिनिटे उशिरानेच पोहचला .  तो हि पूर्णतः भिजलेला  .. कुडकुडलेला   ..दातखिळ्या  वाजवतच .

मी मात्र अजूनही कोरडा करकरीत  डोक्यावर छत्रीचं पातं धरून  उभा होतो.
तो येताच  रस्त्याकडेला खेटून असलेल्या , ' एका हॉटेलमध्ये वाफाळलेल्या चहाचा घोट घेत, आम्ही गप्पांचा  फड रंगवला  अन त्यातच गप्पांच्या  ओघात  बोलता बोलता मुंबईतलं  धावतं ठिकाण हि  ठरवलं .
ठाणे - वरळी सी लिंक -- मरीन ड्राईव्ह  अन तिथून पुन्हा घरी ...
मनसोक्त भिजायचं ...अन भिजायचं.  बस्स ...

साधारण साडेआठ वाजता , ठाणे  पूर्वद्रुतगती मार्गे , आमचा हा  दुचाकीप्रवास सरू  झाला.
वाऱ्यागतीनं  ..पावसाच्या  टपोर्या थेंबाचा मारा झेलत , कधी तो  चुकवण्याचा प्रयत्न करत,   वेगावर नियंत्रण ठेवत , आम्ही सुसाट निघालो.

माझा जन्म हा मुंबईचा . लहानाचा मोठा इथेच झालो. त्याचा सार्थ अभिमान आहेच.  पण तरीही मुंबई अजून काही पूर्णपणे फिरलो नाही. इथेले रस्तो रस्ते , गल्लो गल्ली चा अजूनही धुंडावा नाही .  
इथल्या प्रसिद्ध असलेल्या काही  देवस्थानाचं  दर्शन हि अजून दुर्लभच म्हणा  ...
मात्र आजच्या हा  दुग्धशर्करा योग  म्हणावा  लागेल.  
काळोख्या रात्रीची हि लखलखति  मुंबई , अन इथले रस्तो रस्ते पाहण्याचा योग आज जुळून आला होता . सोबत वरून राजाची  कृपा ..हि होतीच .

उधाणलेल्या सागराची धून  तर आताच कानी गुंजत  होती. त्यासाठी मनं धडाडत होतं.
 मुंबईतलं  मरीन ड्राईव्ह हे माझं सगळ्यात  आवडतं  ठिकाण.
भर गर्दीतही इथला एकांत मनाला स्पर्शून  जातो . म्हणून अधेमधे  एखाद फेरफटका हमखास
इथे  असतोच असतो....
तरीही  पावसातलं अन काळोख्या   रात्रीचं अनोखं रूप  , मी अद्याप अनुभवलं  न्हवतं  .  
ते आज  अनुभवयास मिळणार होतं .  त्यासाठीच निघालो होतो ....आनंदसरी झेलत..

ठाणे - भांडूप - विक्रीली - चेंबूर असा प्रवास  करत आता आम्ही पुढे सरसावलो. 
पावसाची संततधार अद्याप हि  सुरू  होती.
ठीक ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा नजरेस  येत होत्या . 
त्यांच्या त्या लाल पिवळ्या रंग छाटायीमुळे, मनाभोवती सुरेल रंग मिश्रित नक्षत्रांच वलय निर्माण झाल होतं. 

डांबरी  काळ्या रस्त्यांना  झळाळी  मिळाली  होती . पावसाच्या सरींमुळे ते हि आधीच स्वच्छ न्हाहून  निघाले होते. त्याचे प्रतिबिंब मनाशी उमटत होतं.   
तसेच ..काळोख्या रात्रीची हि  मुंबई  ,  तिचा झगमगाट ,  उंच आकाशाला गवसणी घालणाऱ्या   टोलेजंग इमारती , त्यांचा दिमाखीपणा  त्याची  रोषणाई मनाभोवती विलासात होती.

खर तर  रात्रीचा हा प्रवासच  सर्वार्थाने वेगळा असतो .  निरव शांततेचे  पडघम अलगदपणे  सुरु असते
अन अश्यावेळी नाना विचारांचं  बीज मनात आकर घेऊ लागतं . मग सृष्टीच्या नवलाईच्या दुनियेतुन  स्वतःचे प्रश्न हि सुटले जातात. काही प्रश्नासाहित ऊतर मिळू लागतात . 
म्हणून दिवसापेक्षा हि रात्रच अधिक तपस्वी वाटते मला  . शांत निच्छलं अगदी ...
तर असो

रात्रीचे साधारण दहा वाजले होते. . रस्त्याला फारशी रहदारी  न्हवती.
दादर प्रभादेवी  मार्गे येता येता सिद्धिविनायकाचं  मनोमनं  दर्शन घेत आम्ही  वरळी सी लिंकच्या किंचित पुढे येउन पोहचलो. 
तिथेच रस्त्या कडेला बाईक उभी केली. अन सागराचं  उधाणलेलं रूप न्हाहाळू लागलो. 
किती अथांग अन अफाट आहे हा  समुद्र .......शब्दांची गुंफण होऊ लागली. 
लाटांचा आवेग  कानाशी  हळूच झुलक्या  घेऊ  लागला .  भरून आलेल्या आभाळची आर्त हाक आता शब्दांची लय पकडू लागली. 

अरे ऐक रे मानवा 
किती वेदना रे पोटी 
घेउनि दुखाचे पारडे 
उधळतो हास्य मोती ! 

हा सागर विलास 
घेतो सामावूनी सारं 
त्याचं  मन रे मोठालं
त्याचं  मन रे विशालं  ! 

किती अथांग अन अफाट आहे हा समुद्र ?   कितीतरी अनाकलनीय गूढ , कितीतरी लक्षणीय घटना , कीत्येक वर्ष आपल्या पोटी एकवटून आहे हा.. 
वरवरून जरी हा  उधाणलेला ,खवळलेला  दिसत असला तरी त्याच अंतर्बाह्य मन एखाद्या तपस्वी साधू सारखच तेजस्वी अन शांत वाटतं. खरच आत्मसात करून घेण्यासारख्या कितीतरी मौलिक  गोष्टी आहेत ह्याकडे ..त्यासाठी तशी दृष्टी हवी .. एकांत साधणार मनं हवं. 
मी स्थिर मनानं ते न्याहाळत होतो.  

निरव शांततेचे पडघम अद्याप हि सुरु होते .रस्त्यावरच्या  मिणमिणता प्रकाशात सोडला तर कालोख्याने सर्वत्र अंधारलेलं. 
अधून मधून शिवशिवनारा अल्लड वारा अन सागरी तुषार अंगावरून शिड्कावून जातं  . त्याने अंग शहारून येई . 
आम्ही दोघेही तसे   पूर्णपणे भिजलो होतो . कुडकुडू लागलो होतो
तरीही क्षितिजाशी जड अंतकरणाने भरली रेखा नजरेआड होत न्हवती . वेळ मात्र  पुढे सरत होती . 

निघायची वेळ झाली. घरी जाईपर्यंत तरी आता बारा वाजणार होते. 

पण त्याचा प्रश्न न्हवता . मनसोक्त भिजलो होतो . आता फक्त कडकडीत वाफालेलेला चहा तेवढा  हवा होता........................

 संकेत य पाटेकर 
०७.०८.२०१५ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .