शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

निर्दयी मन...

 ‘’अरे बाबा , अंदर  खडे रेहने के लिये जगह नही है  ..’’
‘और तुम ये हे बच्चा  लेके ..., ‘ ना ना , पीछे और एक गाडी हे ..उससे आ जावं.’ 
कंडक्टर ने जरा हेकाटा देतंच म्हटले .
तरीही ती बाई काही ऐकेना...
चलेगा .. अस म्हणत ती शेवटी लगबगीने  आत शिरलीच.
कडेवर  दोन तीन वर्षाचं  तिचं पोर  अन मागोमाग  सत्तरीच्या पुढे असलेली ती म्हातारी (बहुदा आई असावी )दोघीही  एसटीत कसेबसे चढले. तसे  कंडक्टर ने एसटीच दार थाड करून  ओढून घेतले. अन एसटी पुन्हा मुंबई दिशेने धावू  लागली.

खेड  डेपोतून निघून आताशा एखाद तास  झाला होता.
पन्हाळे- मुंबई मार्गे असणारी हि एसटी रविवार असल्यामुळे जरा भरगच्चच भरली  होती.
आसनस्थ होण्यास हि  जागा उरली न्हवती. त्यात प्रत्येक एका व्यक्ती मागे त्याच्या ३ -४ पट असलेलं सामान. ते  सांभाळता सांभाळता त्यांनाच नाकी नऊ येत होते. 
आम्ही खेड वरूनच एसटी पकडली असल्याने बसण्यास तेवढी काय ती जागा मिळाली.
३ दिवसात ३ किल्ले  सर करून थकले भागलेले हे शरीर आता घरच्या  ओढीने,  बसल्या जागी निवांत पहुडल होतं.
दाराच्या उजवीकडच्या  बाजूलाच म्हणजे वाहन चालकाच्या रांगेत असलेली ,  पुढील एक सीट सोडून मागील दोन सीट वर आमचे तिघे मित्र ऐसपैस बसले होते.
कुणाचं आरक्षण नसल्यामुळे कसलीच चिंता न्हवती. पण चौथी सीट म्हणजे पाच नंबरची सीट तेवढी आरक्षित होती.
खेडच्याच असलेल्या गावाच्या एक काकू कितीतरी बोचकी सोबत घेऊन मुंबईला निघाले होते . कुणा नातेवाईकाकडे  त्यांची ती सीट...
तश्या त्या  एकट्याच होत्या पण त्याचं  सामान म्हणजे  दोन तीन जणांच बिऱ्हाड असेल एवढ.  .
ते सामान एसटीत पोहोचवण्यासाठी कुणी एक माणूस त्यांच्या  सोबत आलं  होतं. .  ते  सामान  त्यांनी एसटीत  तेवढ चढवून  दिलं . अन ते निघून गेले .
पण त्या सामानाची आवरा- आवर करता करता , व्यवस्थित जागी  ठेवता ठेवता , त्या काकूंची पार धांदल उडाली.
कंडक्टर हि नेमका त्याचवेळेस तिकिटासाठी उभा राहिल्याने , ऐनवेळी तिकीट हि मिळेना अशी त्यांची  अवस्था...
शेवटी इकडे तिकडे शोधा शोध करत  एकदाची काय ती तिकीट गवसली .
अन त्या काकू सामान आवरून ,  स्वतःला सावरून ,  चौथ्या सीटवर आपल्या जागी  निवांत बसल्या .
आमच्या मित्रांनीही त्यांना सामान आवरण्यास हवी   ती मदत केली.

मी मात्र ह्या सर्वांपासून जरा दूरच बसलो होतो. ते सगळ पाहत होतो.
पाच नंबरच्या त्या चौथ्या सीटवर त्या काकू आल्यामुळे मला दुसऱ्या एका  सीटवर बसण भाग होतं. मित्रांपासून  म्हणून जरा विलगलो गेलो होतो  .
कंडक्टरच्या रांगेत अगदी दुसरी  सीट सोडून तिसऱ्या सीट वर मला जागा मिळाली.

मी  तिथे निवांत पहुडलो.    आम्हा चौघा मित्रांच्या , तीन  दिवसाच्या ,सह्याद्रीतल्या  कॅमेरात टिपलेल्या त्या आठवणी पाहत...कधी सभोवताली हळूच डोकवतं.    

एसटी तले सर्वच तसे त्यांच्या त्यांच्या दुनियेत गाढ झाले होते. 
एसटी हि तिच्या गतीनं  वळण घेत धावत होती.

दुपारचं  उन्हं  पसरलं होतं.
दोनच्या आसपास खेडवरून निघालेली हि  पन्हाळे मार्गे मुंबई एसटी , वाशी ला पोहचेपर्यंत रात्रीचे चांगलेच  आठ ते साडे आठ वाजणारे होते . अन  खेड सोडून आताशा  फक्त  एक  तासाच  झाला होता . अजून  बराच  अवधी तसा बाकी  होता.
खेड ते मुंबई  ह्या धावत्या प्रवासात ,ह्या कोकण मुंबई प्रवासात  .. ना ना चेहऱ्यांची,  ना ना स्वभावाची माणसं  भेटत होती. 
अनोळख्यांची स्वभाव शैली दुरूनच ओळखून येत होती,  नवं नवीन शब्दावली कानावरून  अधोरेखित होत होती,  तसेच खिडकीच्या चौकटीतून  सृष्टी सौंदर्याच  विहिन्ग्मय दृश्य  हि नजरेस पडत होतं .

हे आयुष्य म्हणजेच हा एक प्रवास आहे .  जन्म अन  मृत्यु मधला संघर्षमय अन तितकाच रोमहर्षक असा प्रवास. ह्या प्रवासात आनंदी लहरी आहेत , शरीरमनाला उजळू देणारे , चैतन्य सुख देणारे  तसेच दुःखाचं भवसागर हि आहे  ..शरीर मनाला पार जखडून टाकणारं ...वेदना देणारे ..

मानवी भावनांचे कितीतरी पैलू इथे अनुभवयास मिळतात आपल्याला, सर्र्रास रोजच्या रोज अगदी ..
कधी हासू , कधी अश्रू , कधी राग कधी लोभ , कधी ओढ कधी विरह ...कधी एकांत कधी एकाकीपण.....
भावनांची किती हि उथळ खोली . त्याचं माप घेता येत का ?
क्षणा क्षणाचे हे नवं नवे अनुभव घेत , नव्या विचारांची सकारात्मक उजळणी करत, आल्यावाटे  मार्गीस्थ होत,  हे आयुष्याचं प्रवासी पुस्तक  आपल्याला रंगवायच असतं, रेखाटायचं असतं .
 ह्यातून आपण  जगण्याला अन ह्या  जीवनाला अनुरूप असे एक वळण  देत असतो.
एसटीतला  हा आमचा आजचा प्रवास देखील त्यातलाच एक भाग.

गाडी एका थांब्यावर थांबली .   तसा कंडक्टरचा आवाज कानी गुंजला .
‘’अरे बाबा , अंदर  खडे रेहने के लिये जगह नही है  ..’’
‘और तुम ये हे बच्चा  लेके ..., ‘ ना ना , पीछे और एक गाडी हे ..उससे आ जावं  ‘
त्या आवाजाने  माझी  नजर अन कान दोन्ही त्या दरवाजाकडे अन त्या बाईकडे एकवटले . 
ती बाई , त्या कंडक्टरच्या ओरडण्याला न  जुमानता बिगीबिगी आत शिरली.  
अन तिच्या मागोमाग सत्तरच्या आसपासची, वयोमानानुसार सुरकुत्या पसरलेली अन थरथरत्या अंगाची म्हातारी  हि ..

दोघेही जागा पाहू लागल्या.एसटी तशी भरगच्च होती.  बैसन्यास अशी जागा नव्हतीच. पण   
तितक्याच एक प्रवासी , माझ्या पुढच्या सीटवरला  जागेवरून उठला अन 
त्या सीटवर ,  त्या तरण्याकाठ्या   बाईस लगेचच  जागा मिळाली. 

हाती एकुलतं  एक पोर सांभाळत तिने महाड ची दोन तिकीट घेतली.  अन निवांतपाने ऐटीत बसली.
आपल्या सोबत कुणी एक म्हतारं माणूस देखील आहे . ह्याची तिला पर्वा नसावी .
हे  उघड उघड दिसत होतं. 
तिच्यासोबत असलेली ती म्हातारी  धावत्या ह्या एसटीत स्वतःच तोल सांभाळत कशीबशी उभी होती.
नजरेनेच  विनवत होती , ‘ अरे बाबा , कुणी ह्या म्हातारीला  बसायला जागा देत का रे ? जागा ? ‘
वय झालं रे बाबा , नाही उभ राहता येत . दया करा रे कुणी  , असच जणू सांगत होती. 
तिच्या एकुलता एक पोरीला देखील  तिची कीव येईना.  साधं ढुंकूनही  तिच्याकडे पाहण्याचे कष्ट ती घेत नव्हती .  इतकी निर्लज्ज ., इतकी कठोर ..इतकी निर्दयी ..

कशी कशी लोकं असतात एक एक ,  ज्या  पालकांनी  अपार कष्ट करून  लहानाचं  मोठ केलं ,  त्या पालकांवर अश्या अवस्थेत हि सजा . अरे कुठे फेडणार हे पाप सगळ, इथेच ना .., थोडी लाज अन  भय बाळगा .

त्या म्हातारीची  अवस्था पाहवत न्हवती. दूरचा पल्ला असल्याने कुणीही बसल्या जागेवरून उठायला तयार न्हवते.
शेवटी   राहवलं नाही .  मी जागेवरचा उठलो. म्हटलं , आजी निवांत होवून बसा अगदी…
त्यांना थोड आधार देत . त्यांचा  हात धरत , माझ्या जागी त्यांना बसवलं. अन त्या निवांत झाल्या.
त्यांना निवांत झालेलं पाहून मला हि बर वाटलं.   
जीवनात तसा प्रत्येकाला आधार हवा असतो .  ती आधार धारी व्यक्ती मग कोणतीही असो तिला वयाची अट नसते . असते ती प्रेम भरल्या मायेची अन  मानसिक आधाराची फक्त गरज . 
प्रसंगी कुणासाठी तो  आधार आपण हि कधी व्हावं. जगण्यासठी अन लढून जगण्यासाग्ठी हे बळ पुरेसं  असतं. विचारांचं चक्र अस वाहत होतं.
तिच्या मुलीवरचा राग मात्र अधिकतेने  वाढत होता. दोन तीन शब्दांचे डोस तिलाही द्यावेत   अस वाटू लागलं.
पण ते काही मी केलं नाही . पण मनात विचारांचे  चक्र तेजाने फिरू लागले.
अरे आपल्या आई बाबांची  काळजी घ्या रे...
आई बाबांचीच कशाला ..जे कुणी आपल्या आयुष्यात येत ..त्यांची काळजी घ्या . प्रेम द्या प्रेमाने रहा.
जितकं  प्रेम द्याल तितकं अर्थपूर्ण जीवन जगालं.
- संकेत य पाटेकर
०८.०१.२०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .