गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

आज पावसाने आनंद दिला...

आज पावसाने आनंद दिला...

वय वर्ष साधारण पासष्ट ते सत्तर च्या आसपास असणाऱ्या त्या आजी आणि पावसाच्या नितळत्या सरींसोबत, रस्त्याच्या कडेकडेनं  ..हळुवार , चालता बोलता झालेला  आमचा मन मोकळा संवाद...

अगदी क्षणभराची ओळख, पंधरा एक मिनिटे ,  अन  त्या एवढ्याश्या ओळखींमध्ये सुद्धा माणसं आपलं जीवनपट दिल खुलास मांडतात . त्याचा हा अनुभव. 

सकाळची साडे आठची वेळ , नेहमीच्या घाईगडबडीत आपला ऑफिस साठी निघालो. 
नित्य नेहेमीची लोकल आपली वाट पाहत बसणार नाही . म्हणून पाऊलं झपझप पुढे  पडत होती. 
पण पावसाने ऐनवेळी मुसंडी मारल्याने पाउलांचा वेग काहीसा मंदावला होता. तरीही  दहा एक मिनिटाच्या चालीनंतर कुठेसा भास्कर कॉलनीतून ..हितवर्धिनी मैदानाच्या आसपास पोहचलो. स्टेशन (ठाणे ) अजून हि दहा एक मिनिटाच्या अंतरावर होतं.  

पाऊस मनाची ओघळती टपटप रस्त्याशी सुरुच होती. छत्रीचा आडोसा घेतं माणसं ये जा करत होती. 
त्याच रस्त्याकडेनं एक आजी मात्र , डोक्याशी ओढणी घेतं ... पावसाच्या सरींपासून स्वतःला  सांभाळत,  हळुवार (वयोमानाप्रमाणे )एकटक अश्या  पुढे सरत होत्या. 

पावसाने ऐनवेळी हजेरी लावल्याने , छत्रीअभावी  त्या बाहेर निघाल्या असाव्यात ...असा एक  साधा सोपा कयास बांधत मी पुढे सरलो. 
ह्या वयोमानाप्रमाणे  पावसात भिजणे म्हणजे आजारला आमंत्रण देणे वा ओढवून घेणे आहे. असं स्वतःशी म्हणत , त्यांच्या जवळ गेलो. डोईवरी छत्री धरली. 

त्यांनी हळुवार नजरेने माझ्याकडे पाहिलं. 
अन धीम्या स्वरात म्हणाले '' अरे तुला उशीर होईल...कामावर जायला ?''  मी हि तितक्याच अदबीने  म्हणालो , नाही ..नाही , अजून वेळ आहे, नाही होतं उशीर...
कुठे जायचं आहे तुम्हाला  ? 
' तो समोर वटवृक्ष  आहे नं तिथे राहते मी ...पाचव्या मजल्यावर ...' समोर बोट दाखवत त्या म्हणाल्या, 
'अच्छा ...! चला मग,  तिथवर  सोडतो मी तुम्हाला ' ...असं म्हणत मी त्यांच्यासोबत चालू लागलो. 

चालता बोलता दोन अनोळखी 'मनं' क्षणातच मोकळ्या संवादात कधी  मिसळून गेली.. ते कळलंच नाही . 
मनातलं पाखरू उघडपणे भिरभिरू लागलं . 

त्यांनी त्यांचा जीवनपट थोडक्यात सांगायला सुरवात केली . मी  ते सगळं मनाशी टिपत होतो. 
आडनाव - धारप...
वय वर्ष साधारण 65 ते 70 च्या आसपास...
 मूळचे नागपूरकर , नंतर गिरगाव ..मग आता ठाणे.  
पेशा - शिक्षकी - भायखळा येथे एका शाळेत  गणित अन विज्ञान विषय घेऊन आठवी ते दहावी वर्गाला त्या शिकवत असत . गणित हे त्यांचा आवडीचा विषय .  
आता मात्र रिटायर्ड आहेत. 

लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपलं . तरीही त्या जिद्दीने  शिकल्या. आपलं शिक्षण पूर्ण केलं . अन शाळेत रुजू झाले  . त्यांच्या भावंडात त्या एकट्याच जास्त शिकलेल्या. त्यांना एकूण तीन भाऊ ( दोघं आता हयात नाहीत )  अश्या एक ना अनेक गोष्टी त्या  सांगू लागल्या . 
गणपतीचा त्या वेळेसचा उत्सव , आताच उत्सव ह्यावर हि थोडीफार  चर्चा रंगली..अन चालता बोलता आम्ही त्यांच्या वटवृक्ष असलेल्या संकुलात येऊन पोहचलो.  

त्यांनी चहासाठी आग्रह धरला. '' घरी ये ...बैस , चहा  घेऊन जा '' 
कामावर जायचं असल्याने,  मी  पुन्हा कधी , नक्की येईन असं म्हणत माघारी वळलो. नवा क्षण अन नवा आनंद मनात साठवत....

आपल्या रोजच्या आयुष्यात,  ह्या  जगण्यात अगदी लहान सहान गोष्टीतही किती आनंद असतो बघा... 
''आनंद देण्यातहि आहे अन आनंद घेण्यातही ''  . आज  मला आनंद मिळाला तो आशीर्वादाच्या रूपाने ...डोईवरी छत्र  धरत..

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. 

- संकेत पाटेकर 
08.09.2016 

२ टिप्पण्या:

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .