Sunday, August 5, 2018

'बाळा' ये..मागे बैस...'बाळा' ये..मागे बैस...
कधी कधी नकळत कुठूनसा.. ऐकू आलेला एखाद 'शब्द' सुद्धा आपल्या ह्या मनाला एक 'आत्मिक समाधान' मिळवून देतं .
भले ही , आंतरिक भावनेतून किंव्हा सहज असा उमटला गेलेला तो 'शब्द' आपल्यासाठी असेलच असं नाही. असं असून देखील , त्यातला भावार्थ आपल्या ह्या मनाला , कुठल्याश्या एका हळव्या भावनेशी आणि क्षणांशी जोडून देतं.
माझ्याबाबतीत देखील आज असंच झालं.
'बाळा' ये ...मागे बैस...ह्यातील ,
'बाळा' हा वास्त्यल्यपूर्ण शब्द ऐकताच माझ्या मनाची अवस्था , हि 'आई-मुलाच्या' नात्या मधल्या 'सुखाच्या अवीट क्षणांसारखी' झाली.
क्षणात बालपण उघड झालं.
आईनं हळूच आपल्याला जवळ घ्यावं, आपण तिच्या कुशीत शिरावं आणि तिनं प्रेमानं- मायेनं आपल्याला थोपटावं. गोंजारावं.
असे हळवे क्षण तत्क्षणी नजरेत मिसळून गेले.
डोळे ही लगेचच मिटून आले, पापण्या ओलावून गेल्या .
हास्याची एक निमुळती कड ओठाशी झिरपत ...अंतरंगात मिसळून गेली.
खरंच , किती जादू असते न्हाई ह्या शब्दात...
अलगद हळुवार स्पर्शून जातात ह्या मनाला...भावनेचा हा अथांग सागर क्षणभरात उसवून देत.
शब्दांची ही सारी किमया..
ह्या शब्द शब्दात असतो गहिरा अर्थ दडलेला ..
सुख दुःखानं न्हालेला ज्याने त्याने जाणलेला..
इवलासा जीव , आपल्या खांदयावर थोपटत ..रिक्षात बसलेल्या त्या माऊलीच्या मुखातून
'बाळा ये, मागे बैस...
हे 'शब्दसुख' जेंव्हा बाहेर पडले. तेंव्हा मायेचा स्पर्श अंगा खांद्यावरून फिरल्याचा भास झाला. सुखानं मन भरून आलं.
अर्थात ते बोल काही माझ्यासाठी न्हवतेच.
माझ्या लहानग्या पुतण्यासाठी होते. तरीही त्यातलं सुख हे अवीट गोडींनं भरलं होतं.
कुहलिही स्त्री .. ही 'मायेचा पान्हा' घेऊनच 'जन्म' घेत असते.
तिच्या मनातच जन्मतः एक 'आई' दडलेली असते.
तिचं दर्शन असं कुठे ना कुठे घडत जातं.
अमुक ठिकाणहून तमुक ठिकाण्यापर्यंतच्या, एकूण प्रवासादरम्यान मी आणि माझा आठ वर्षाचा पुतण्या , रिक्षात ...मागे जागा नाही म्हणून ड्राइव्हर काकांच्या सोबत खेटून बसलो होतो .
मागे तीन स्त्रिया (एक मुलगी दोन आया, त्यातलीच एक तान्हं बाळ घेऊन ) आसनस्थ झाले होते. मी चौथ्या सीटला पुढे आणि आमचा कार्टून , काकांनी त्यांच्या समोर म्हणजे पुढ्यात बसवला होता.
घे गाडी चालावितोस? चालव , असं गोडीनं म्हणत , त्याचा हात हँडल वर ठेवून ते स्वतः रिक्षा चालवू लागले.
मोजून पंधरा एक मिनिटांचा तो प्रवास...
मन विचारात ढळून गेलं होतं. एकीकडे सुरू असलेलं (रिक्षा आतलं) हरिभजनाचं गाणं मनाला भक्ती प्रवाहकडे ओढत नेत होतं. अवतीभोवतीच्या दूरतफा झाडीतून, आणि अथांग वाहत असलेल्या खाडीच्या ब्रिज वरून रिक्षा पुढे सरत होती. रस्ता तसा मोकळा होता. पाऊस नसल्याने रिक्षा वेगात धावत होती.
थोड्या वेळानं एका स्टॉप जवळ त्या दोन्ही स्त्रियां उतरत्या झाल्या. मागची सीट रिकामी झाली.
आणि तो स्वर कानी आला.
जो अजुनि गुंजतोय...
'बाळा..'
संकेत पाटेकर
५/०८/२०१८


No comments:

Post a Comment

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .