सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

'नाळ'


जिथे शब्द अपुरे पडतात , तिथे नजरेची भाषा बोलू लागते. 
आणि जिथे नजरच क्षणासोबत लपंडावचा खेळ मांडते तिथे स्थिर हृद्य हि कोसळतच..
अश्याच नजरेशी भाषा , भाबड्या  हळव्या शब्दांची  भाषा , खेळाची भाषा , मौनाची भाषा आणि  प्रेमाची मृदाल भाषा 'नाळह्या चित्रपटातून काल अनुभवली. 

आईच्या काळजाचा स्वर , झिरपणारा मायेचा हळुवार कोपरा , झेपावणारं, दौडणारं आणि आल्या प्रश्नाची उकल करू पाहणारं , त्यासाठी धडपडणारंचैतूचं ते भाबडं निरागस मन , हे सगळं मनावर हळुवार कोंदून जातं . 
 इथं 
आल्या त्या  प्रसंगाशी आणि परिस्थितीशी सामोरे जाताना , स्वतःच्या  मनाची  तडफड बाजूला ठेवून ,स्व - आनंदाच रोपटं दुसऱ्याच्या दारी लावणं, हे हि काही  सहज पेलण्यासारखं नाही . त्यासाठी  आईपण लाभलेलं काळीजच असावं लागतं.  ते पुन्हा प्रकर्षानं जाणवलं.  

म्हणावा तर  चित्रपट अगदी साधासरळ आहे, सौम्य आहे. 
एखाद्या भिरभिरत्या फुलपाखरानं  नावीन्य घेऊन अलगद आपल्या तळ-हाताशी येऊन  क्षणभर  विसावं आणि भावरंगाचा क्षितिजगंध.. नजरेत उगाळत , आल्या पावलानिशी पुन्हा भिरभरीत निघून जावं
तसा हा चित्रपट हळुवार स्पर्श करत जातो .  भावनेचे ना ना असे कंगोरे जोडत. 

चित्रपटाचं चित्रीकरण, अँगल वगैरे अप्रतिम आहे.  भाषेतला  हि गोडवा आहेच आणि त्याचबरोबर 
सगळ्यांचा अभिनय..अगदी त्या म्हशीचा हि..  निव्वळ  नैसर्गिक आहे. त्यात कुठेही खोटेपणा दिसत नाही. इतका तो शुद्ध आहे. 
बालपणात रमायला लावणारा , खुद्कन हसू  आणणारा , डोळे पाणवणारा आणि आई च्या ममत्वेशी नाळ जोडणारा हा चित्रपट ...
माझ्या दृष्टीने अप्रतिम आहे . मला तरी खूप भावला. 
कारण 
आईची थोरवीच इतकी अगाध आहे नि असते 
कि आई ह्या एका शब्दानं आणि नुसत्या हाकेनं ‘ मन गलबलून उठतं. 
 - संकेत पाटेकर 
१९.११.२०१८ 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .