रविवार, १४ जुलै, २०१९

जगणं


शालेय जीवनात , वडीलधारी मंडळींना पाहून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं ,हाती बॅग वगैरे घेऊन, टापटीप होत ऑफिसला निघायचं. आणि आपल्या मर्जीनं वाट्टेल तेंव्हा घरी यायचं.
ना कुठल्या पुस्तकीय अभ्यासाच टेंशन, ना कुठला गृहपाठ , ना कुठली परीक्षा आणि रिझल्टच टेंशन..
मुक्त आणि मनासारखं जीवन..है ना ?
कसलंच कुठे बंधन नाही. कुणाचा ओरडा नाही, अभ्यास नाही केला म्हणून मार नाही. शिक्षा नाही. दटावणी नाही. कसलं आणि कसलंचं टेन्शन नाही.
आपली लाईफ आणि आपण, मोकाट अगदी..भारी ना ?
किती हे अप्रूप ?
वेड्यावाणी ही, अशी स्वप्नं डोळ्यात साठवून घ्यायचो .
कोवळं वय , त्यामुळे तितकीशी जाणीव कुठे ? आणि कुठे होती ?
मित्रांच्या घोळक्यात आणि मोकळ्या मैदानात उरलेला वेळ असाच सरत जायचा.
बरं, तेंव्हा मोबाईल ही न्हवता , हे नशीब, पण तरीही सगळा मित्रावळ जमा व्हायचा. धुडगूस घालायचा.
किती ते मैदानी खेळ बरं? आठवतंय का ?
सोनसाखळी पासून, पकडा पकडी, चोर शिपाई, खांब खांब, अबादुबी, सोमवार मंगळवार, राजा राणी (गोट्या) , लपंडाव, आंधळी कोशिंबीर..,पंतग, क्रिकेट, भोवरा.., ना ना तर्हा आणि खेळ,
वेळ पुरायचा नाही.
मात्र तो एक प्रश्न मनाच्या काठावर सतत तरंगत राहायचा.
" कधी एकदाचे मोठे होऊ आणि कधी एकदाचे आपण ह्या शालेय जीवनातून मुक्त होऊ ?
हळूहळू हे दिवस ही सरत गेले. शाळा घर, मित्र अभ्यास आणि सोबत मस्ती..ही सुरूच होती.
वय मात्र वाढत होतं , शरीर मनाची ही वाढ होत होती.
बाळंसं धरून मिसरूड फुटताना, थोडी समज ही आता येऊ लागलेली.
त्यातच तरुणपणाचा उंबरठा हा हा म्हणता नशिबी आला
आणि खेळता बागडता डोळ्यात साठवलेलं ते स्वप्नं सत्यात उतरू लागलं.
एक अध्याय संपला. शालेय शिक्षणातून मोकळीक मिळाली. दुसरा नव्या अध्यायाला प्रारंभ झाला.
" कश्यासाठी पोटासाठी " म्हणत चौकटीतली नोकरी जाळं पसरू लागली.
बदलाचे असंख्य वारे सोबत घेऊनच..
एखाद्या चित्रपट फिती प्रमाणे जीवनपट त्यानं बदलू लागलं. वर्ष नि वर्ष सरू लागली.
जबाबदारी आल्या, वाढल्या ..त्याही सोबत टांगत्या जाणिवा आणि उणिवा घेऊनच आणि त्या सोबतच अपेक्षा निराशा आदि इत्यादी भाव भावकीचा खेळ..
"वयाने वाढलो वा मोठ्ठ झालं" की ह्या अश्या जबाबदाऱ्या ..गळाभेट घेतात हे तेंव्हा कुठं माहीत होतं.
डोळ्यात साठवलेलं आत्तापर्यंत ते अप्रूप आणि त्यातली ही आजची सत्यता पाहिली तेंव्हा कडवट पणने हसलो.
कधी मोठे होऊ आपण ? हे स्वप्नं उराशी बाळगून असायचो तेंव्हा आणि आता
लहान असण्यातच खरं सुख होतं रे, ही जाणीव हळवं स्मित चेहऱ्याशी उमटवत नेते.
सुखी होतो रे तेंव्हा.
खरंच..!
लहानपण देगा देवा...
डोळे क्षणभर त्या आठवांत मिटले की
गुलजार ह्यांच्या ओळी नेमक्या ओठी येतात.
" ज्यादा कुछ नही बदला उम्र के साथ..
बस्स , बचपन की जिद् समझोते मै बदल जाती है.."

खरंय,
जे चित्र डोळ्यासमोर उभं केलं होतं. मोठ्यांना पाहून,
त्या चित्राचा डोलाराच क्षणार्धात गळून पडला.
किती ती आव्हानं, किती तो संघर्ष, किती तडजोड, किती कष्ट, त्या वेदना, दुःख आणि टोचण्या..आणि बंधनं,
स्वतः करिता हि वेळ नाही , मग स्वतःच्या अपेक्षापूर्तीच काय ? जाऊ दे,
कसलं आणि हे कुठलं आलंय मुक्त जीवन..
ही देखील एक बंदी शाळाच...
स्वतःचा आनंद जेंव्हा असा मोडीत निघतो. वा दडपून राहतो आतल्या आत मनात, तेंव्हा वपु हळूच थोपवुन धरतात..जगण्याला नवा आयाम देत.
" आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं. आयुष्याचा महोत्सव करायचा असतो "
शेवटी प्रत्येक अवस्था ह्या जगण्यासाठी असतात.
बालपण असो, तरुणपण असो..
इथे कणकण जगणं महत्वाचं.
आत्ताचा आनंद महत्वाचा, आत्ता चा क्षण महत्वाचा,
उद्याच्या स्वप्नांसाठी ..
कळतंय ना रे ?

उठ .. कणकण जगून घे एकेक क्षण , थांबायचं नाही कुठे. चालत राहायचं. आनंदाची वहिवाट शोधत..
- संकेत पाटेकर 

http://www.sanketpatekar.com/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .