बुधवार, १ एप्रिल, २०२०

त्या बसल्या जागेवर..

झाडांना ही स्पर्शाची जाणीव होते का ?
मनात विचारांची कोंडी सुरू झाली आणि मोबाईलवर चुलबुल करत फिरणारे हात, तसेच मागे घेत. उठून उभा राहिलो.
मोबाईलचा नेट बंद करून, चार्जिंगला लावत ठेवला. आणि सरळ...पायात चपलांची जोडी घालत, झप झप पाऊलानिशी, शेत बांधावरच्या आंबाच्या झाडाखाली येऊन बसलो.

मोकळं उघडं माळरान ते...उन्हाचं तिडीक सर्वत्र पसरलेलं असताना,
रणरणत्या एवढ्या उन्हात ही डोईवर आभाळ घेऊन, सावलीचं छत्र धरणारं हे झाड पाहिलं आणि स्मित उजळलं अन त्याबरोबर प्रश्न ही पडला?
कसं काय जमतं बुवा ह्यांना?

इतकं उन्ह अंगावर घेऊन ही...सोसूनही, सळसळत्या हिरव्या पानांचा तो नाद...त्यातून उठणारा हास्याचा खळखळाट, कुठे ही चिंतेची..दुखऱ्या मनाचा लवलेश नाही.
इतकंच नाही.
अगदी मुळापासून शेंड्यापर्यन्त अगणित जीव आपलं बस्तान बांधून असतानाही..
त्यांची खरडपट्टी सुरू असतानाही,
कुठेही वेदनांचा आक्रोश नाही. कुठलाही हेवा दावा नाही?

कसं काय जमतं ?

मी बसल्या जागेवरून उठलो आणि हळूच झाडाच्या बुध्याला, फांद्यांना स्पर्श करू लागलो.
घट्ट एक मिठीच मारावी असं मनात होतं पण ते मनातच ठेवलं आणि
म्हटलं बघावं , ह्यांना ही भावनांचा सख्य आहे का?
प्रेमाचा उमाळा ह्यांना ही कळतो का ? स्पर्शाची जाणीव ह्यांना ही होते का ?
नुसताच स्पर्श नाही तर मनातलं ही ओळखता येत असेल का ? मनातलं ओळखलं तर आपल्या वेदनांना ही आणि आत उधळलेल्या असंख्य प्रश्नांना ही थोपवता येत असेल का ? प्रश्नांचा असा मोगोमाग तडाखा सुरू झाला.आणि नजर कान एकाकी फांदीवरल्या त्या कोवळ्या पांनाकडे वळली.

उन्हाच्या किरणांनी ते लक्ख उठून दिसत होतं. हिरवाईंचा कोंब फुटला होता. चैतन्य सळसळत होतं.
आणि जणू माझ्याकडे बघून टिंगल टवाळ्याानिशी ते खळखळून हसत होतं.
- संकेत पाटेकर
०१ एप्रिल २०२०
"मनआभाळ"
www.sanketpatekar.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .