बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

जीवन कोणावाचूनहि थांबत नाही ...

मनमोकळं हास्य घेऊन, किती सहजतेने आयुष्यात आलीस तू .. हो ना ?
जितक्या सहजतेने आलीस तितक्याच सहजतेने...एक दिवस निघून हि गेलीस.. 
मागे हि वळून पहिले नाहीस तू ? एकदाही ...
भिरभिरणारं एखाद सुंदर फुलपाखरू...आपल्या कळत नकळतं जसं हाती विसावंतं , मनमोकळं हसू उजळवतं , आनंद देतं आणि भावनिकतेची कड ओलावतं हळुवार निघून जातंतसं झालंय... माझं अगदी..

कळलचं नाही ...कधी आलीस ,निघून गेलीस तू...
कळले इतकेचं...ते श्वास रोखुनी गेलीस तू...

एकमेकां सहवासातले ते सोनेरी क्षण ...तेच आयुष्यं झालंय ...माझं...

किती जवळ होतो रे आपण...
बघ ..किती दूर निघूनि गेलो ....

हाती उरलेत ते केवळ आठवणीतले उबदार क्षण ...
अन भावनेने व्याकुळलेल्या अन ओथंबलेल्या ह्या प्रेमसरी ...त्यातच ओलचिंब झालोयं मी...

बघ, ऐकू येतेयं का ....... हृदयी साद ...... ?
बघ जरा माझ्याकडे .. बघ ना ...
हसतोय मी ...पाहिलंस माझं हास्य....? कुणी हि सहज वेडा म्हणेल............

कसा वेडासारखा हसतोय ..स्वतःशीच ...हाहाहा...
पण त्यांना कुठे कळणार .... का हसतोयं ते ....? 
गर्द आठवणीच्या धुंद नशेत झुळतोय मी ..आणि नजरेसमोर... तू आहेस ....केवळ तू ....

जीवन कोणावाचूनहि थांबत नाही बघ ...  पण सहजीवनातल्या त्या क्षणीक ( क्षणासोबत विसावलेल्या..बेधुंद ) आठवणी... साथ सोबत सोडत नाही ..हे हि खरं, नाही का ?
बघ , जरा मागे वळून ....अजूनही झुळतोय मी ............तुझ्या प्रेमरंगात ...

असंच काही सुचलेलं..
मनातलं काही ..- संकेत पाटेकर 
20.09.2016 



शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

ऐक सखे...

काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
काही जुन्या क्षणांना..
जरा गोंजरायचे होते..

क्षण हसवायचे होते..
जरा रुसवायचे होते..
मनं, नव्या क्षणांशी ..
जरा मिसळायचे होते..

भाव निरखायचे होते..
हृदयी जमवायचे होते..
मन तुझे आणि माझे..
जरा उसवायचे होते..

नाते झुलवायचे होते..
जरा फुलवायचे होते..
गंध मोकळ्या मनाचे..
तळ शोधायचे होते...

काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
ऐक सखे.....
जरा भेटायचे होते

~ संकेत पाटेकर
१७/०९/२०१६

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

आज पावसाने आनंद दिला...

आज पावसाने आनंद दिला...

वय वर्ष साधारण पासष्ट ते सत्तर च्या आसपास असणाऱ्या त्या आजी आणि पावसाच्या नितळत्या सरींसोबत, रस्त्याच्या कडेकडेनं  ..हळुवार , चालता बोलता झालेला  आमचा मन मोकळा संवाद...

अगदी क्षणभराची ओळख, पंधरा एक मिनिटे ,  अन  त्या एवढ्याश्या ओळखींमध्ये सुद्धा माणसं आपलं जीवनपट दिल खुलास मांडतात . त्याचा हा अनुभव. 

सकाळची साडे आठची वेळ , नेहमीच्या घाईगडबडीत आपला ऑफिस साठी निघालो. 
नित्य नेहेमीची लोकल आपली वाट पाहत बसणार नाही . म्हणून पाऊलं झपझप पुढे  पडत होती. 
पण पावसाने ऐनवेळी मुसंडी मारल्याने पाउलांचा वेग काहीसा मंदावला होता. तरीही  दहा एक मिनिटाच्या चालीनंतर कुठेसा भास्कर कॉलनीतून ..हितवर्धिनी मैदानाच्या आसपास पोहचलो. स्टेशन (ठाणे ) अजून हि दहा एक मिनिटाच्या अंतरावर होतं.  

पाऊस मनाची ओघळती टपटप रस्त्याशी सुरुच होती. छत्रीचा आडोसा घेतं माणसं ये जा करत होती. 
त्याच रस्त्याकडेनं एक आजी मात्र , डोक्याशी ओढणी घेतं ... पावसाच्या सरींपासून स्वतःला  सांभाळत,  हळुवार (वयोमानाप्रमाणे )एकटक अश्या  पुढे सरत होत्या. 

पावसाने ऐनवेळी हजेरी लावल्याने , छत्रीअभावी  त्या बाहेर निघाल्या असाव्यात ...असा एक  साधा सोपा कयास बांधत मी पुढे सरलो. 
ह्या वयोमानाप्रमाणे  पावसात भिजणे म्हणजे आजारला आमंत्रण देणे वा ओढवून घेणे आहे. असं स्वतःशी म्हणत , त्यांच्या जवळ गेलो. डोईवरी छत्री धरली. 

त्यांनी हळुवार नजरेने माझ्याकडे पाहिलं. 
अन धीम्या स्वरात म्हणाले '' अरे तुला उशीर होईल...कामावर जायला ?''  मी हि तितक्याच अदबीने  म्हणालो , नाही ..नाही , अजून वेळ आहे, नाही होतं उशीर...
कुठे जायचं आहे तुम्हाला  ? 
' तो समोर वटवृक्ष  आहे नं तिथे राहते मी ...पाचव्या मजल्यावर ...' समोर बोट दाखवत त्या म्हणाल्या, 
'अच्छा ...! चला मग,  तिथवर  सोडतो मी तुम्हाला ' ...असं म्हणत मी त्यांच्यासोबत चालू लागलो. 

चालता बोलता दोन अनोळखी 'मनं' क्षणातच मोकळ्या संवादात कधी  मिसळून गेली.. ते कळलंच नाही . 
मनातलं पाखरू उघडपणे भिरभिरू लागलं . 

त्यांनी त्यांचा जीवनपट थोडक्यात सांगायला सुरवात केली . मी  ते सगळं मनाशी टिपत होतो. 
आडनाव - धारप...
वय वर्ष साधारण 65 ते 70 च्या आसपास...
 मूळचे नागपूरकर , नंतर गिरगाव ..मग आता ठाणे.  
पेशा - शिक्षकी - भायखळा येथे एका शाळेत  गणित अन विज्ञान विषय घेऊन आठवी ते दहावी वर्गाला त्या शिकवत असत . गणित हे त्यांचा आवडीचा विषय .  
आता मात्र रिटायर्ड आहेत. 

लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपलं . तरीही त्या जिद्दीने  शिकल्या. आपलं शिक्षण पूर्ण केलं . अन शाळेत रुजू झाले  . त्यांच्या भावंडात त्या एकट्याच जास्त शिकलेल्या. त्यांना एकूण तीन भाऊ ( दोघं आता हयात नाहीत )  अश्या एक ना अनेक गोष्टी त्या  सांगू लागल्या . 
गणपतीचा त्या वेळेसचा उत्सव , आताच उत्सव ह्यावर हि थोडीफार  चर्चा रंगली..अन चालता बोलता आम्ही त्यांच्या वटवृक्ष असलेल्या संकुलात येऊन पोहचलो.  

त्यांनी चहासाठी आग्रह धरला. '' घरी ये ...बैस , चहा  घेऊन जा '' 
कामावर जायचं असल्याने,  मी  पुन्हा कधी , नक्की येईन असं म्हणत माघारी वळलो. नवा क्षण अन नवा आनंद मनात साठवत....

आपल्या रोजच्या आयुष्यात,  ह्या  जगण्यात अगदी लहान सहान गोष्टीतही किती आनंद असतो बघा... 
''आनंद देण्यातहि आहे अन आनंद घेण्यातही ''  . आज  मला आनंद मिळाला तो आशीर्वादाच्या रूपाने ...डोईवरी छत्र  धरत..

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. 

- संकेत पाटेकर 
08.09.2016 

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

तिच्या मनातून ...

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ह्या हृदयाला

बाळकवींच्या ह्या ओळीने तिचं मन आज कुठल्याश्या गर्दीत हरखून गेलं होतं.
बराच वेळ म्हणा ,  त्या ओळी  ती स्वतः शीच अशी  गुणगुणत होती. 
आणि विचारमग्न होतं होती.

काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतहृदयाला ....

रात्रीच्या शांत प्रहरी,  ह्या ओळींचा तिच्या  मनावर हळुवार  असर  होऊ लागला होता. कुठल्याश्या अनामिक ओढीने  मन गहिवरलं  जातं होतं .
त्याने ती बैचेन झाली  होती . 

आज हे असं का होतंय  आपल्या बाबत   ?
आभाळ दाटून यावं , अशी एकाकी अवस्था झाली आहे ह्या मनाची  .  

कुणी तरी जवळ असावं  , आपल्याशी बसावं , आणि आपलं म्हणून  मी  त्याच्याशी मोकळेपणाने बोलावं  हलकं व्हावं  , असं मनोमन  वाटतंय ? 

हि हुरहूर हि रुखरुख ..........त्याबाबतीत तर नाही ना?

अगदी काही दिवस तर झालेत ...त्याच्याशी  ओळख हॊऊन ..आणि काय तो संवाद साधून , अजून भेटलो  हि कुठे आम्ही..,
नुसता काय तो  संवाद आहे ..आपलेपणाने भरलेला. मोकळा असा  आणि
त्याने एवढ्यात ..! 

खरंच,  माणसं इतक्या लवकर आपलीशी होतात. ?
जादूची काडी एकाकी फिरवावी आणि चुटकीशी सगळं बदलावं अशी हि किमया साधता येते?
असेल हि…………
माणसाचा चांगुलपणा आणि मोकळेपणा कुठेशी भावतोच ना मनाला ..... त्याबाबतीत हि तेच असेल.
पण हि ओढ…..
हि ओढ .......आज मला काही स्वस्थ बसू देत नाही आहे आणि देणार  हि नाहीये.
 बोलायला हवं मला त्याच्याशी .
पण इतक्या रात्री ..?
जागा असेल  ना तो ? 
रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. 
करू का कॉल ? ...
काही कळत नाहीये...,   छे ?
पण नाही बोलले तर मन  तग धरणार नाही. 
झोप तर दूरची गोष्ट . तळमळायला होईल रात्रभर.

पण इतक्या रात्री फोन  करून त्यालाही त्रासच ना ?
काय करू…? (क्षणभर विचारमग्न होंऊन ..)
 कॉल केल्याविना मला काही चैन पडणार नाही.  
असेल तो जागा ..

(मनाच्या निश्चयाने ती फोन करते… )
(रात्रीच्या शांत प्रहरी ... अर्धनिद्रा अवस्थेत असता , त्याचा फोन खणाणतो .
तिंचा तो कॉल पाहिल्यावर .. क्षणभर विचारमग्न होऊन ..... )

बारा वाजून गेले आहेत . इतक्या उशिरा हिचा कॉल ? 
बाल्कनीच्या  चौकटीत येऊन ...त्याने बोलायला सुरवात केली .
रात्रीच्या शांत प्रहरात तिचा हळुवार  आवाज हि मनास गोडवा देत होता.  
हॅलो ..!
हाय .....!
जागा आहेस ?
नाही ...म्हणजे जागाच होतो मी.
अच्छा ...
हम्म ....
' बोल काय झालं . ? सगळं ठीक ?
इतक्या रात्री कॉल केला आहेस म्हणून विचारतोय ?
काही नाही रे , जरा  अस्वस्थ वाटत होतं. एकटं...... म्हटलं बोलू तुझ्याशी ..
अच्छा...
बोल मग ....
काय म्हणतेस आणि का असं  वाटतंय ?
माहित नाही.
ठीकाय….
(काही क्षणाच्या शांततेनंतर …)

चल फार उशीर  झालाय ...शांत पणे झोप ... जास्त विचार करू नकोस !
आपण सकाळी बोलू .. 
हम्म ... 
गुड नाईट ,
काळजी घे….!

गुड नाईट….!

आपलेपणाच्या त्या स्वराने ...तिच्या  काळजाची हुरहूर क्षणात मंदावली. उद्याच्या स्वप्नाची हातमिळवणी करत ..गाढ निद्रेत विसावतं ....
क्रमश :
तिच्या मनातून ...  
हृदया- एक स्वप्नं सखी 
- संकेत पाटेकर -  08-08-2016 



सोमवार, ११ जुलै, २०१६

मैत्रीचं नातं...

मैत्रीचं नातं...
तुला १०१ उठा बश्या काढाव्या लागतील हा ..

मी म्हटलं ठीकायं , पण त्या मोबदल्यात मला काय मिळेल हं ?

ती म्हणाली : पनीर चिल्ली ,
मी म्हटलं वाह ...छानच ! माझी आवडती पनीर चिली मिळणार तर ..!
हम्म ...
मग ... आधी उठा बश्या काढ चल , तिने लगभगिने म्हटलं.
मी म्हणालो ..फोन वरून कुठे गं , तुला भेटल्यावर , तुझ्या समोरच , उठा बश्या काढेन की ..!
ती म्हणाली ..ओके ,
मग भेटू आपण उद्या ...
मी म्हटलं बरं ....

बरेच दिवसाने मैत्रणीचा असा फोन खणाणला होता. पण जरा रागारागानेच ...त्यातला हां गोड मधाळ संवाद. म्हणावं तर रागातही मधाळता साचलेली.
मैत्रीच्या नात्यातलं आमचं हे आपुलकी अन प्रेमस्नेहाने जुळलेलं एक नातं.
मोजुन् म्हणायच्या तर मला मोजक्याच् अश्या मैत्रिणी, स्नेह राखूनअसलेल्या .. त्यातली ही एक वेडू...

स्वभाव गोड , निरागसता मनाशी ठासून भरलेली. माझ्याइतकीच हळवी पण ज़रा नाजूक अशी,
चांदण्याच्या शीतल ते प्रमाणे सौम्य ...
आमचं मैत्रीचं नातं ही असंच निर्मळतेच्या झऱ्यावानी ....वाहतं. खळखळत.
गेले कित्येक वर्षांपासून...भावगंध जपुन असलेल.
पण मागील काही दिवसापासून तिच्याशी संपर्क न्हवता . ना भेट, ना संवाद. ना काही ..
म्हणावे तर मीच जाणूनबुजून करत होतो सगळं . संवाद वगैरे टाळन...
गंमत म्हणून पहावं म्हटलं ...
ही स्वतःहून आठवण काढतेय का ? फोन करतेय का ?

कारण लग्न झाल्यापासून वा त्या आधी पासून एक भेट न्हवती . तिच्या लग्नालाही तसे चार पाच महिने ओलांडले होते . म्हणून म्हटलं बघूयाच...
जरा खेळी करून ..काही दिवस संवाद टाळून ...
बघूच ...स्वतःहून कॉल येतोय का ?
आणि अश्यात तिचा कॉल खणाणला आणि क्षणभरात मनाशी स्तब्धता पसरली. शांततेला एकाकी उधाण भरलं .

विसरलास ना ?
मी म्हटलं नाही, मी कसा विसरेन .
तूच मला विसरलीस , हो ना ?
बाबू .... ( प्रेमाने कधी बाबू म्हणेल...कधी जाड्या , कधी काय नि काय ,मनात येईल ते विशेषणे असतात माझ्या मागे .  )

मी ...........हॉस्पिटल मध्ये होते ...
वर पोहचण्याच्या स्थितीत,मरणोत्तर अवस्थेत..आणि
वरतून तू मला सांगतोय , विसरलास म्हणून ...
तिच्या अश्या बोलण्याने क्षणभर मी स्तब्ध झालो . काय बोलावं ते कळेना.
नको तिथे उगाच शब्द संवाद टाळून.....फार मोठी चूक केली होती.
का असं मी वागलो ?
कुठेशी माझंच लिहलेलं वाक्य माझ्याच मनाशी घेर करू लागलं होतं. 

गैरसमजुतीचे धागे आपणच आपल्याभोवती गुंडाळतो.. संकेत. आणि हा धागा तू गुंडाळलायस .
गमतीतं ही म्हण, पण आपलेपणाच्या नात्यात अशी खेळी कधी करू नकोस .

संवाद हा नात्यातला दुवा . तोच जर नसेल तर नातं ही नसल्याप्रमाणे आहे रे पडीक.
समजतोयस ना ,
दिव्याच्या ज्योती प्रमाणे नातं असतं रे, संवादाची दिव्य ज्योत जोपर्यंत जळत असते .तोपर्यँत नातं प्रकाश दीपाने उजळत राहतं. ती ज्योत एकदा मिटली की , मग उरतो तो केवळ काळाकुट्ट अंधार.

म्हणूनच सांगतोय , ' संवादाची ती ज्योत अखंड तेवत ठेव. जाणिवेच्या अथांगतेतून ..'
तसे आपण क्षणभराचे सोबती असतो . ह्या जीवनाचं कधी कुठे कधी सांगता येतयं ?

मृत्यू अटळ आहे , कुठल्या पावलांनिशी कुठून कसा तो येईल ते ही ठाऊक नसतं. मग आपलेपणाने जोडल्या गेलेल्या ह्या नात्यांशी असा खेळ कशाला ?आणि का ? कशासाठी ?

क्षणभराच्या ह्या आयुष्यात ही नाती आणि नात्यातला जाणिवेतेचा अनमोल ठेवा , तो सहवासीक गंध ...
प्रत्येकाला जपायला हवाच.
तो ...तू ही जप आणि वपुंच्या शैलीत म्हणायचं तर आयुष्याचं महोत्सवं कर ....

शब्द संवाद असा मनाशी सुरू होता. चूक उमगली होती.
कळकळीने सॉरी म्हटलं गेलं. माफी मागितली .
पण ती ..
सॉरी अजिबात चालणार नाही .
तुला १०१ उठा बश्या काढाव्या लागतील हा ..
तिच्या अश्या लाडिक बोलीने पुन्हा हास्य उमललं गेलं .
पण मनाशी अजूनही विचार चक्र सुरू होतं.
हृदयाशी जोडलेलं मनाशी जुळलेलं आणिक एक अनमोल नातं .......कुठेशी संवाद हरवून आहे.... संकेत..
जरा लक्ष दे ...!
मनातलं काही ...
संकेत य पाटेकर