शनिवार, २० जानेवारी, २०१८

'दिलखुलास' व्यक्तिमत्वं आणि संवाद ..

  साऱ्यांनाच प्रेमात पाडतं. आपलंसं करून घेतं ते.. लगेचच.
हॉस्पिटल मधल्या साफसफाई करण्याऱया त्या मावशी..
लगबगीने पुढे होत बोलू लागल्या.
" ती कालची  माणसं होती ना, तुमच्या बाबांच्या शेजारी, त्या पलीकडं , खूप चांगली होती हा...
त्यांचा तो मुलगा,
(त्यांच्याकडे  पाहत...मी  ) ...हं, ते बहीण भाऊ असलेलं दोघे ना, त्यांच्या वडिलांच्या शेजारी  बसलेले ते ....मी  त्यांना ईचारल.
व्हय..तेच,
हॉस्पिटलात आल्या आल्या ईचारायचे,
''काय मावशी, आलात का ?''
 ''या, या ...''
''गुड मोर्निंग, गुड मोर्निंग...''
''आज लवकर...आलात. ? ''
 ''चहा नाशता घेतलात ना  ? ''
माझी सुरवात ह्यांच्या ह्या अश्या गोडं  बोलण्याने व्हायची.

सकाळी सातला हॉस्पिटला रुजू झाले कि ह्यांचा आवाज..

 मावाशीsssss.. मावशीssssss ..
मावाशीssssss.. मावशीssssss...

कशी अगदी मोकळ्या मनाची होती.
रोज काय ना काय विषय निघायचा. बोलती असायची.
कालच डिसचार्ज मिळालं त्यांना, निघून गेली. पण मनात जागा करून...


मावशीच ते बोलणं ऐकत होतो.
जनरल वॉर्ड मधला आमचा एक पलंग आणि आमचं पेशंट (बाबा)  सोडल्यास,  इतर सगळी आता  .
आपल्या घरी योग्य तो ईलाज घेऊन परतली होती.
रिकाम्या, आठ 'रुग्ण' राहतील , इतक्या ह्या प्रशस्त खोलीत मात्र,
आता .. गत आठवणींचा एकांत तेवढा कुजबुज करून राहिला  होता.
आणि ह्या अश्या  एकांतातही...
आपणहून नि आपलेपणाने साधला गेलेला तो  स्वर' , ती वाक्य , ते हसू ते मोकळपण..  मावशी चौफेर नजरेनं  शोधत राही.

अवघ्या काही दिवसाची  ती ओळख , त्यांच्यासोबत असलेली.  ती दोघं बहीण भाऊ..
हॉस्पिटल मध्ये वडलांना उपचारासाठी म्हणून आणले असताना त्यांना सोबत म्हणून केवळ  इथं  राहिलेले .  ते हि जास्तीत जास्त किती ..तर आठवडा भर ...बस्स.
पण तरीही ... ह्या मावशीवर...
केवळ सफाई कामगार म्हणून,  रुजू असलेल्या ह्या इथल्या बाईवर...
काय जादू करून गेले कुणास ठाऊक , जीव अडकून राहिलाय  त्या दोघात.
नजर म्हणुनच भिरभिरतेयं...
नाहीतर इथं  कोण कुणाला इचारतंय.  कुणीबी नाही .
मावशीच्या चेहर्यावरून आणि बोलण्यावरून  त्यांचा मनातले भाव कळून येत होते.
कुणीतरी आपलं , आपल्यापासून  दूर निघून जावं . मनाला हुरहूर लावून , एकटं टाकून , असं  काहीसं त्यांना जाणवत असावं.
म्हणूनच आज त्यांचं मन कश्यात लागत न्हवतं.  
ओढवलं जातं होतं ते , केवळ त्याच त्याच आठवणींमध्ये..पुन्हा पुन्हा...
स्वतःला ( म्हणजे त्याना ) माझ्यापुढं असं बोलतं करून देत.

'संवादाची' हीच तर खरी ताकद आहे.
कुणाला हि..अगदी  कुणालाही ...मग तो कुणी, अनोळखा  हि का असेना , क्षणात पुढे असा उभा राहिलेला हि , त्याला आपलंस करून घेण्याची  आणि सामावून घेण्याची हि  ताकद ..  ह्या 'संवादाचीच', ह्या 'शब्दसख्यांची'..
मनाची ‘सात्त्विकता’ नि ‘आपलेपणाचा’ कोवळा हसरा अर्क ...तेवढा त्यात असला म्हणजे झालं.
मग कुठल्या हि नात्याला 'नाव - गाव' ची गरज भासत नाही. पूर्व ओळखीची गरज लागत नाही .
ते आपलेपणानं , स्नेहगोडीनं मनाशी जोडलं जातं. फुलपाखरावाणी क्षणभर आपल्याशी विसावलं जातं, मुग्ध आनंद देऊन..  
अजून काय लिहू..
नात्यातला   'दुवा' म्हणजेच हा  ‘संवाद  आपण तो योग्य पद्धीतीने  कसा साधतो , त्यावरच  नात्याची वीण हि जुळली जाते.
सांगायचंय काय ...
संवाद असू द्यावा...पण आत्मप्रेमळ .. :) सहज असा ...
 - संकेत पाटेकर

२०/०१/२०१८

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

''संवाद ...''

अगदी म्हणावं तर घसा कोरडा होईपर्यंत मला केकटून  ओरडावं लागतं. प्रत्येकवेळी.. 
 ''अरे बाबा.., अगं बाई .''
आहेस का जिवंत ? कि गेलात ? हा ?
एक साधा कॉल नाही करू शकत , म्हणजे कमाल आहे यार  ? विसरलात ना ? 
तेंव्हा समोरून प्रतिउत्तर  येतं. 
जरा माफीच्या स्वरात....नमत्या अदबीनं ..
''सॉरी सॉरी ... ''
आहे रे , आहे इथेच आहे. 
नाही सोडून जाणार इतक्यात..,  थोडं..... 
मग नेहमीचच  त्यांचं 'कारणे द्या'' सत्र सुरु होतं. कधी तास भर , तर कधी काही मिनिटं ,गप्पांच्या   गुणगुणत्या ओघात  आणि ते मी सगळं  निमूटपणे ऐकून घेतो. (घ्यावं लागतंच म्हणा...पर्यात नसतो नं  )    ''पनीर चिली आणि भेटीच्या शर्थीवर ...  '' 
असो, तर सांगायचं काय आहे  , 
संवाद हा नात्यांचा 'मूळ' ..म्हणावा तर 'दुवा' 
मनं बांधून ठेवणारा. जोडणारा . 
तो असा 'जागता' ठेवावा लागतो. भलेही  ''जिवाभावाची'' स्नेहगोडीने , ममत्वेने जोडली गेलेली हि  कार्टी आप आपल्या संसारात , दुनियेत कितीही व्यस्त आणि धावपळत असली तरीही ... 
शेवटी 'आयुष्य' हे अश्या नात्यांच्या सहवासातच ( क्षणांच्या  विविध अंगाने ) झुलत असतं , न्हाई का ? 
म्हणूनच कधीतरी,  साधावा संवाद .  आपल्या ह्या  मनाला सांभाळून ..थोपवून आणि घ्याव्यात अवचित भेटी गाठी. नात्यांची  वीण पुन्हा घट्ट रोवत. 
जगण्यातला गोडवा वाढवत…
तुमचाच ..
- संकेत पाटेकर 
०६ /०१/२०१८ 




मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

प्रेम हे ....

विसरलास कि विसरतोयस ?

कधी कधी सहवासाची इतकी सवय होंऊन जाते नाकि जिवाभावाची ती सावली क्षणभर  
जरी आपल्यापासून नजरेआड झाली वा दुरावली तरी मन आपलं अस्वस्थ  आणि कावरंबावरं
होऊन जातं.
अश्यावेळी काय करावं काय नाही ह्यांचादेखील विसर पडतो . कुठंच लक्ष लागेनासं 
होतं. जोपर्यंत ती व्यक्ती पुन्हा आपल्याशी संवादाने  जुडत नाही. बोलत नाही.

दोन एक दिवसापासून त्याची देखील अशीच काहीशी अवस्था झाली होती . मन एकटेपणात वेढलं गेलं होतं. एकांतात  विचाराधीन झालं होतं.

खरं तर
एखाद्या व्यक्तीशी,  जवळीक वाढली.  सहवास मिळत गेला. आणि मनमोकळा असा संवाद
ज्वर धरू लागला  कि प्रेमाचं  बीज तिथं अंकुरायला लागतं. 

त्या बाबतीत देखील  तेच 
झालं. प्रेमाचं बीज अंकुरलं जाऊन त्यांचं आता रोपटं झालं होतं. त्याच मूळ 
मनाच्या गर्भाशी घट्ट रोवलं गेलंलं.

रोजचं बोलणं,  शब्दांसंवेत हसणं अधून मधून भेटी गाठी होणंह्याने जीव ओढवला जात होता. 
क्षणाची उसंत मिळत न्हवती . ह्याचाच   परिणाम काय तो ,  
जराशी देखील चुकामुक झाली. इकडचा क्षण तिकडे झाला  कि त्याच्या मनाची अवस्था  वर खाली 
होई. जीव वेडावून जाईकासावीस होत ते ,

तिच्यविना आता  खरं तर,क्षण क्षण जगणं हि त्याला असह्य जात होतं,
तिने सतत आपल्या सहवासात रहावं . आपल्याशी मनमोकळं बोलावं बोलत राहावं .गुणगुणावंह्यासाठी मनाची एकूण धडपड सुरु राही.  हि धडपड ,  हि मनाची तळमळ तिने हि जाणली 
होती. पहिली होती. पाहत होती.

भेटीच्या  पहिल्या क्षणापासून ..
नात्यातली वाढत असलेली जवळीक वाढत असलेला 
स्नेहबंध . प्रेमभरला संवाद आणि एके दिवस.  भेटीगाठीचं ठरलेला तो  खास असा क्षण.
डोळ्यासमोर अजूनही त्याच्या जश्याच तसा उभा राहायचा.

वार बुधवार ,क्षितीजाच्या पंख-सावलीत मोहरले गेलेले क्षण.  
सहाची वेळ ,  ऑफिस मध्ये One Hour Early चा मेल टाकून धावत पळत निघालेला तो 
आणि घरातून  सहाच्या बरोबरपाच एक  मिनिट आधी त्या जागेशी येऊन पोचलेली ती ...

साधीच अशी,  पण पाहताच,  कुणाचं हि  ध्यान मन हरपून जाईल अशी  ...नाजुक गुलाब कळी
निळपंती रेखीव नजर मृदू हळुवार आवाज तजेलदार असा उजळकांती  चेहरा 
कमनीय देहबोली आणि मनमोकळं असं खेळतं बागडतं  मन....! 
सुदंरतेचा म्हणावा तर अति नाजूक आणि रत्नमोल दागिनाच जणू तो, ...!  ईश्वरी देणच दृष्ट लागू नये 
कुणाची..कधी ! 


आयुष्यात पहिल्यांदाच असं कुणा मुलीसोबत,  जिच्यावर आपलं मन ओढवलं आहे . 
जिच्यासाठी  आपण अक्षरशः  वेडावलो गेलो आहे. त्या अश्या खास  व्यक्तीसोबत एखाद कुठला चित्रपट पाहण्याचा योग जुळून येणं,  हा आनंदच  निराळा    , ह्याची व्याप्ती अशी शब्दातहि  मांडता   येणार नाही. 
जीवसृष्टीतल्या पाखर- जीवांनी वृक्ष सावल्यांनी जसं  वाऱ्या संगे  ताल धरावा आणि आंनदाच्या स्वर लहरीत धुंद-मान व्हावे . तशी मनाची अवस्था झाली होती. तन - मन भेटीच्या ओढीनं अधिरलं आणि शहारलं जात  होतं. अवघ्या क्षणांची ती काय आता उसंत होती . 

ऑफिस मध्ये दाखल होताच ,  ...लवकर निघण्याकरिता  मेल हि  केला गेला होता .  तिच्याशी बोलणं झालं होतं . 
दोन तिकीटं आधीच ऑनलाईन बुक करून झाली होती . बस्स आता पाचच्या टोळ्याची ती घडी वाट पाहत होती. लक्ष सगळं त्या येणाऱ्या क्षणांशी  वाहत होतं.  उत्कंठा प्राणपणानं जणू झपाटून गेली  होती . 
आदल्या दिवशीचा तो संवाद 
लडिवाळ शब्दसंख्यांची जादुई मोहर त्यात 
येऊन ठाकलेल्या चित्रपटा विषयक केलेली चर्चा आणि त्याच चित्रपटाच्या शो ला एकत्रित जाण्याचा दोघांचा  तो नेमका  कट,  हा निव्वळ  योग,  नियतीच्या संमतिनेच तर ठरला जात  होता . 
क्षणाचा हि  विलंब न घेता तिने हि होकार देऊन आनंदची  व्याप्ती वाढवली होती . 
सगळं कसं जुळून आलं होतं. स्वप्नवत पण सत्य ..

बस्स आता अजून एका निर्णयाशी ठाम व्हायचं  होतं .   मोठं धाडस करायचं होतं. त्यानेच  धाकधूक वाढली होती.   
क्रमश : 
संकेत पाटेकर 






मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

कितीदा नव्याने तुला आठवावे....

'' कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे....''
गाणं ऐकता ऐकता त्याच्या डोळ्यात आसवं उतरू लागली. विरह एकांताने टाहो फोडावा
तशी एकूण त्याची अवस्था झाली. आक्रोश नि आकांताने मन ढवळलं गेलं.
भरल्या नजरेनेच त्यानं
बाजूच्या रिकाम्या ख्रुचीजवळ एकटक पाहिलं. आणि तो आठवणींच्या विरह जाळात
पुरता स्वाधीन झाला.
'' किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला..''
जोगेश्वरीच्या २४ कॅरट चित्रपट गृहात , लागलेला तो सिनेमा 'ती सध्या काय
करते'
संध्याकाळची ती हुरहुरती वेळ...
चित्रपट जवळ जवळ शेवट होण्याच्या
मार्गी असताना, लागलेलं गाणं आणि त्या गाण्यानं , शब्द शब्दानं
तिच्या आठवणी संगे काहूरलेला तो...
आज मनाशी तसा तो ठरवूनच बाहेर पडला होता. तिच्यासोबत हा चित्रपट आपण पहायचा.
म्हणून दोन तिकिटं त्यानं आगाऊचं बुक करून ठेवली होती. आणि भेटीच्या त्या
घडीव आशेनं, नव्यानं स्वप्नं रंगवायला सुरवात हि....
वर्ष झालं होतं म्हणा , त्यांच्या त्या भेटीला आता...
आठवतंय ते सगळं ,
ती पहिली भेट .
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये , सांजवेळी , एकांतात.... एकमेकांच्या सहवासात
नजरेशी लपंडाव खेळत , मनाशी साधला गेलेला तो संवाद ,गढून गेलेली ती क्षणांची मैफिल , मोहरून उमळलेले ते क्षण ,ती अविस्मरणीय भेट ...
आठवतंय,
कित्येक दिवस ओलांडले , महिनो सरले , पण कधी भेटणं झालंचं नाही , पुन्हा ?
प्रचंड तहानेने एखाद्याचं मन कासावीस नि भावव्याकुळ व्हावं, तडफडावं, तशी मात्र ...
ह्या मनाची अवस्था
झालेय माझी..एकाकी अशी... तुझ्या त्या एका भेटीसाठी....तुला आपलंसं करण्यासाठी, तुला मिळविण्यासाठी...
किती ते कॉल्स , किती ते मेसेजेस .....कितीत्या विनविण्या , माफी ,
क्षमायाचना , ह्याची गणती नाही.
पण काहीच परिणाम नाही.
मुद्दामहून टाळायचीस ना मला ?
तुझं ते टाळणं आणि माझं मलाच सांभाळणं, हे होतंच राहिलं.
दरवेळेस सांभाळून
घेत होतो मी स्वतःला .. ,स्वतःचीचं समजूत काढत..
आज ना उद्याच्या ह्या आशेवर...
दिवस ह्यातच सरसर निघून गेले .
तू बदलली नाहीस. तुझ्या निर्णयावर ठाम राहिलीस आणि मी...
संध्याकाळच्या बोचऱ्या वाऱ्यासारखा सैरवैर होत गेलो...
माणसं प्रेमात आंधळी होतात , ह्याचा तो प्रत्यय होता . मी आंधळा झालो होतो ,
प्रेमात पुरेपूर..तुझ्या.
कशाचीचं उसंत न्हवती. तहान भूख न्हवती. झपाटलो होतो नुसता, प्रेम ह्या
अवस्थेने...
,प्रेम ह्या भावनेने,प्रेम ह्या वेदनेने,
पण ते तुला कळूनही , तू कधी, पटवूंन घेतलं नाहीस .
मी मात्र ...तासंतास वेड्यावानी नजर रोखून असायचो.
दिसतेयस का कुठे ? शोध घ्यायचो. तुझ्याच , राहत्या परिसरात येऊन कित्येकदा..
कित्येकदा तसा आलो , आलो तसाच निघून गेलो मी ,
पण तो भेटीचा योग कधी जुळून आला नाही . तू भेटलीसचं नाही आणि तुझं उत्तर हि कधी आलं नाही.
आठवतंय ते सगळं...
तरीही प्रेमवेड हे मन ..ऐकतंय कुणाचं ?
काढल्या तिकिट्स , नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ''ती सध्या काय करते'' ह्या निमित्ताने तरी तू भेटशील , येशील सोबत , बोलशील ..., संवाद साधशील ,
ह्या वेड्या खुळ्या आणि भाबड्या आशेपायी..
वाट पहिली मी...
आलो, लोकलच्या भर गर्दीतून मार्ग काढत एकदाचा जोगेश्वरीला. सेंट्रल ते वेस्टर्न असा प्रवास करत, गाठलं ते चित्रपट गृह .. नजर फिरवली , इकडून तिकडे सर्वत्र, पण दिसलीच नाही कुठे तू ,
ओल्या नजरेनेचं मोबाईलकडे पाहत राहिलो एकटक ...तसाच,
पुन्हा स्वतःची समजूत काढत, पुन्हा स्वतःला थोपवून घेत,
येईल ..येईल...येईल रे ती... वेळ गेलेली नाहीये अजून, थांब,
पंधरा एक मिनिटं आहेत नं शिल्लक ..?
थांबलो पुन्हा, मनाचं ऐकून...
पाऊलं थबकली होतीच जागी , जाणार तरी कशी ती पुढे ?
नजर पुन्हा नव्याने वेध घेऊ लागली , कान अधिक संयमाने टवकारले जाऊ लागले.
आणि वेळ मात्र नेहमीच्या आपुल्या खोडीप्रमाणे,वाकोल्या देत पुढे सरत होती. वेडा वेडा म्हणत..
मी नुसताच उभा..त्या वाटेकडे, तिची वाट पाहत..
ती ...
आलीच नाही.
मनाची पूर्तता झालीच नाही.
चित्रपट मात्र पुढे सरत राहिला, आठवणींना उसवून,जागवून...वेळोवेळी,
संयमाच्या गहिऱ्या जखमा देत...गाणं मनाशी झुलवत ..
'' किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला..
कितीदा रडुनी जीवाने हसावे…''
'' कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे..''
भरल्या नजरेनं त्यानं आपल्या बाजूच्या रिकाम्या सीटकडे पुन्हा एकटक पाहिलं आणि तो पुन्हा आठवणीत गढून गेला...
प्रेमानं... एव्हाना त्याला,  वेदनेला कसं थोपवावं आणि जगावं ते शिकवलं होतं.
- संकेत पाटेकर
२४.१०.२०१७


क्षितीज सावल्या...

नमस्कार ...मित्रहो,
मी प्रोफेशनल असा फोटाग्राफर अजिबात नाही आहे. :D
पण हा , सृष्टीच्या ह्या अथांग रंगसोहळ्यात आणि माणसांच्या भावगर्दीत..मिसळून जाताना ..
माझ्या नजरेच्या कवाड्यातून आणि कॅमेराच्या पडद्यातून ..
जे जे क्षण मला टिपता आलेत , ते ते इथे मांडण्याचा प्रयत्न...
नवा पेज ....घेऊन आलोय .
'क्षितीज सावल्या'
नजरेच्या कवाड्यातून ..मनाच्या भावरंगातून

संकेत पाटेकर आणि फोटोग्राफी
आवडल्यास लाईक करा.

लिंक इथे देत आहे :
https://www.facebook.com/sanketpatekar.photography/ क्षितीज सावल्या

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

कुणी तरी हवं असतं...!

मला नाही मांडता येत रे , तुझ्या सारखं असं काही, पण सांगू...
कुणी तरी हवं असतं आपल्याला ,
आपल्या जवळ बसून ,आपलेपणाच्या संवादात हरवून देणारं असं कुणी...
आपल्या नजर कवाड्यातून मनातलं अचूक भाव ओळखणारं कुणी.. 
आपल्या मनाला जाणंणारं,
हवं तेंव्हा, हवं त्या क्षणी , हवं त्या वेळी, कुठूनही , कसंही हळूच येऊन ,आपल्याला थोपवणारं,
घट्ट मिठीत घेणारं,आपल्यात मिसळणारं,हसवणारं , छेडणारं, वेडं म्हणणारं आणि म्हणवंणार कुणी...
कुणी तरी हवं असतं....रे .
कधी रागावणारं, कधी लाड पुरवणारं, प्रसंगी समजून घेणारं, समजून देणारं, 
आपली काळजी वाहणारं , काळजी घेणारं, आणि भरभरून प्रेम करणारं कुणी..
कुणी तरी हवं असतं ..... ।
आपल्या मनाची हि बाजू घेणारं.., मनातून मनाशी नातं जोडणारं, 
आपलं वर्तमान आणि भविष्य घडवणारं...आपलं स्वप्नं होणारं,
आपल्यात विसावणारं,
कुणी तरी..
कुणी तरी हवं असतं रे.....
एकटेपणात साथ देणारं, आणि
एकांतात हि आपल्या मनाला सुगंधित करणारं.. कुणी तरी हवं असतं...बस्स..!
~ संकेत पाटेकर
१६/१०/२०१७

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

क्षण..

संध्याकाळची वेळ.  ऑफिस मधून निघाल्यावर ..लोकलमधल्या त्या घामाजल्या  गर्दीचे धक्के पचवत मी ठाण्यात उतरलो.  कुठल्याश्या जाणिवेने आणि व्याकुळतेने आज  मनाची स्थिरता तशी  ढळली होती. 
अस्वस्थता दाटून आली होती देहभर , मनभर संचार करून आणि म्हणूनच थेट घरी जाण्यास हि हे मन आज  मज्जाव करत होतं . त्यालाच  थोडी मोकळीक आणि आपुलकीची  थाप द्यावी  म्हणून मी मुद्दाम तलाव पाळीच्या दिशेनं एकटक 
चालत सुटलो. माणसाच्या स्वभावशैलीच्या रंगीत तालमीतून स्वतःच्या मनाची दखल स्वतः घेत , मी पोचलो त्या ठिकाणी. 
नजरेच्या एका  कोपऱ्यातून ,  मनाच्या एकांता करीत  योग्य   मोकळी  जागा हेरत,  मी एका ठिकाणी    आसनस्थ झालो .विचारांचं प्रहर पुन्हा  सुरु झालं . थांबलंच कुठे होतं म्हणा ते,  पण आता नव्या विचारांची ये जा सुरु झाली. त्यात पुरता गढून गेलो . स्वतःला उसवत,  हळुवार उलगडत गेलो . 
त्या विचारातून  स्वतःच शोध घेत असता....

'काका' अशी हळुवार हाक ऐकू आली. क्षणभर हसलो मी त्या शब्दांनी स्वतःशीच   ...आणि नजरेपुढे आलेल्या त्या कागदाकडे कुतूहलाने पाहत राहिलो . म्हटलं काय आहे हे?  मनाशी उलगडून पाहत होतो . तेव्हड्यात शब्द पुन्हा कानी आले. 
काका, उद्या नाटक आहे गडकरी ला ?  हे दाखवल्यावर तुम्हाला तिकिटावर सूट मिळेल .  
सुरवातीला वाटलं कसलीशी पावती  दाखवून हा  पॆसे वा वर्गणी  गोळा करत असणार , पण नाही 
 त्याने पुन्हा बोलायला सुरवात केली. 
हल्ली ना  सेक्स ह्या विषयाला धरून बरेच अढी तढी निर्माण झाल्यात समाजात  , गैरसमज आहेत. 
त्या विषयाला धरून हे नाटक आहे . जरूर पहा . 
मगासपासून मी त्याचा चेहऱ्याकडे लक्ष दिलं न्हवतं. हाती असलेल्या त्या कागदाकडे शून्य नजरेने एकटक पाहत होतो.  
मात्र त्याच्या ह्या सेक्स विषयी , असे  परखड दोन एक शब्द कानी पडल्यावर  आपसूक त्याकडे लक्ष गेलं.  मान उंचावली गेली. 
सहावी सातवीतला तो विद्यार्थी असावा,  हाफ पॅन्ट आणि इन केलेला शर्ट,  गोलाकार चेहरा आणि चेहऱयावर खिळलेले नितळ  हास्यभाव , सोबत इतर कुणी न्हवतं.
तरीही बेधकडं असं त्याच बोलणं आणि हे सांगणं हेच  मला   कमाल वाटली.  
उघडपणे सेक्स हा विषय तसा  कुणापुढे मांडणं बोलणं हेच खरतरं धाडसाचं , कारण आपल्या समाजमनात त्याविषयी काही बोलणं म्हणजे भलतं सलतं मनात येऊ घालतं. आणि ते काहीसं पापच असं  ठरतं.  
खरं तर ह्या गोष्टीच शिक्षण वेळेत देणं गरजेचं आहे ,  
बलात्काराच्या वाढलेल्या एकूण घटना , वाढत चाललेली स्त्री विषयक वासनांतक  भोग दृष्टी ...हि  मनाची विकृति आणि त्याला बळी ठरलेल्या निरपराध नाज़कू कोवळ्या  मुली, स्त्री... हे सगळं कुठेशी थांबायला हवं. रोखायला हवं . 
आणि त्यासाठी शिक्षण आणि कायद्याचा धाक, ह्या दोन्ही गोष्टींची  कडक अंमलबजावणी आपल्या समाजमनात लागू केली पाहिजे. 
स्त्रीचा आदर , मान सन्मान असेल तर  ह्या देशाची प्रगती आहे . भारत हि मातृभूमी जशी मानतो. तिच्यापुढे जसं आदराने पाहतो. नवरात्रीला देवीला जशी पुजतो . तसं  इथल्या स्त्री  मनाचा हि आदर झाला पाहिजे. नाही नाही ,  तो केलाच पाहिजे. समाज मनाला लागलेल्या ह्या वासनात्मक किडीचा मुळासकट नायनाट करून....

काही क्षण असाच  विचारधुन्द झालो होतो. चेहऱ्यापुढे गोडशी स्माईल देऊन तो मुलगा केंव्हाच निघून गेला होता . आणि मी पुन्हा आपल्या दुनियेत ..
- संकेत पाटेकर 


रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

'मैत्री'...

दंगात धुंद होऊन 'दवगंधीत' करणारी हि मैत्री...
हास्याचा 'गोफ' हृदयाशी हळुवार झुलवणारी हि मैत्री ...
सह्याद्रीच्या कातळकोरीव प्रमाणे कधी कठोर, कधी सुमधुर वाणी ठरणारी हि मैत्री ..!
मनाला 'चिरतरुण' करणारी, नवं हिरवशार पानातलं 'जीवनमान' होणारी हि मैत्री ...
सूर्याच्या 'तेजाला' हि 'आवाहन' देणारी हि मैत्री. 
अथांग सागराच्या 'विशालतेवढ़ी' प्रेमाचं 'जलस्रोत' होणारी हि मैत्री .
क्षितीजाच्या रंगाइतकी आयुष्य 'क्षितिजमान' करणारी हि मैत्री .
अन मना- मनाने , अन आपलेपणाच्या स्नेह गोडीत जोडली गेलेली , विसावलेली हि लाडिक मैत्री ...
अहो, ह्या 'मैत्रीला' आणि आणि ह्या 'प्रेमाला' वयोमानाची कसलीच अट नाही.
आयुष्याच्या आपल्या प्रवाही मार्गे ती आपल्याला भेटत जाते..नवं नव्या रूपात ..नवं नव्या रंगनिशी नवं नव्या अंतरंगी गोष्टी घेऊनच...
'मैत्री दिनाच्या' माझ्या मित्र मैत्रिणींना भरभरून शुभेच्छा ..
असेच सोबत राहा ..! मस्तीत राहा ...! मिसळत राहा !
तुमचा आपलाच ,
संकेत पाटेकर