शनिवार, ५ मे, २०१८

दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त




''तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत....मार्गसानिला तिथून साखरमार्गे  तुम्हाला जवळ पडलं असतं.  आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..''
एखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि  ते सगळं ऐकूनही त्या कार्ट्याने ,  आपल्याच अकलेचा आलेख उभा करावा , ' असं काहीस आज माझ्याबाबतीत झालं. 

गाडीने नसरापूर फाटा ओलांडला , गुंजवणे कडे नेणारा मार्गसानि  हि मागे सरला ..आणि पाबे मार्गे एसटी वेल्हेल्याकडे धावू  लागली.  गावोगावाला  जणू एक सांगावा धाडत .  
''कुणीतरी आलंय हं  ...कुणीतरी आलंय , आपलं ..आपलं   माणूस ''  

गावोगाव जोडणारी आणि माणसं बांधून ठेवणारी  हि एसटी ...मानवी भावनांचा बांध अजूनही तसाच जपून आहे. 
असो, 

दिवस  एव्हाना  वर येऊन  स्थिरावला होता .  क्षितीज  नव्या इच्छा आकांक्षाने सजलं मोहरलं होतं.   
स्वप्नं पूर्ततेच्या ध्यासाने मनाची उत्कंठा हि केंव्हाच शिगेस  पोचली होती. राजमार्ग  खुणावू लागलेला, 
रस्ते , झाडी मी माणसं , घरे,  दारे , वास्तू , सरसर मागे पडत  होती. एसटी तिच्या आवेशात गुर्मीनच  जणू   धावत होती . 

हळू-हळुवार  दूरवर उभी असलेली ती डोंगररांग नजरेच्या कप्प्यात  येऊ लागली. 
आणि एसटीच्या खुल्या चौकटीतनं , राजगडाचं ते   विस्तृत , देखणं आणि भारदस्त असं  रूप स्पष्ट दिसू लागलं . आनंद ओसंडून जाऊ लागला. 
'' राजमार्ग असलेल्या पाली मार्गाची धूळ , आपण आता  मस्तकी मिरणवणार''  ..अहा..., काय भाग्य ..काय योगायोग.. म्ह्णून हृदयाची स्पंदन जोर घेऊ लागली. 

सलग दोन वेळा...  हा तीर्थरूपी राजगड , गुंजवणेच्या  चोर दरवाजातून सर केला होता .  ह्यावेळेस तसं न्हवतं. 
होळीचा मुहूर्त साधत  ..'राजमार्ग प्रवेश दाखल होंऊ'  असा  दृढ निश्चय करूनच , आम्ही इथं दाखल झालो होतो .आणि त्यावरच पूर्णपणे ठाम होतो .  

 ''तुम्ही, मागच उतरायला हवं  व्हुत, शेजारीच आसनस्थ झालेला आजोबा पुन्हा बोलते झाले. 
शेजारी बसल्यापासून त्यांचं ...तेच सांगणं सुरु  होतं . 
राजगडला जायचं आहे ना , मग मार्गसानि ला उतरा आणि साखरमार्गे पुढे व्हा......ते जवळ पडेल.  पाबे वरून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..,

मार्गसनी मागे सरलं  पण आम्ही उतरलो नाही. 
मूळचे , आसपासच्या गावातलेच असलेले ते आजोबा , आम्ही काही ऐकेनात म्हणून पुन्हा शांत  झाले. 
''मागे दोन वेळा तिथून जाऊन आलोय आजोबा, 'आता वाजेघर मार्गे जायचे आहे'' पायवाटेलाच येणाऱ्या एकेका  गावांची आणि तोरणा रायगडच्या आमच्या त्या मोहिमेची,  सांगड घालत मी  त्यांच्यापुढे  बोलता झालो. त्यावर,  तुम्ही इथलेच वाटताय ' असा  शेरा उमटवला.  
हा , अधून मधून फेऱ्या होतात आमच्या ...

बोलता बोलता पाबे जवळ आलं . आणि त्या संर्वांचा निरोप घेत आम्ही  एसटीतून खाली उतरलो. 
गुगल ज्ञान भंडारातून  आणि पुस्तकीय दाखल्यातून   हवी असलेली  माहिती मिळवलीच  होती.  बस्स , आता  चढाई  आणि पायपीट चा श्री गणेश करायचा  होता. 
तत्पूर्वी आसपास , आपल्या मार्गाची खात्री करावी म्हणून,  कुणी दिसतंय का ते पाहू लागलो. पण आमच्या शिवाय तिथं कुणी एक दिसेना,  
ये ते बघ , त्या काकांना विचार ? 
आमच्यातल्याच कुणी एकाने ...रस्त्या कडेला असलेल्या दुकानातल्या त्या काकांकडे बोट ठेवलं.
काका , राजगड साठी कुठून वाट आहे? 
त्यांच्याशी  संवाद  साधताना एक गोष्ट   निदर्शनास आली कि आम्ही साधारण एक किमोमीटर पुढे आलो होतो. एसटीतून उतरलोच ते एक  किलोमीटर पुढे , मूळ मार्ग  सोडून , 
आता पुन्हा माघारी .... , चला इथूनच सुरवात ट्रेकला :  मनाशीच म्हटलं .  
काकांनी शेता बांधावरून  जाण्याचा योग्य तो सल्ला दिला. 
पुढे गेलं कि पूल लागेल . तिथून योग्य वाटेला लागाल. 
काकांना धन्यवाद म्हणत आणि त्यांचा  निरोप घेत आम्ही आमच्या पायपिटीला लागलो. आता  इथून पुढे किती वेळ  चालावे लागणार ह्याचा आलेख आता पुढेच ठरणार होता. 
क्रमश : 
संकेत पाटेकर 
५/५२०१८ 





शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

प्रेम हे ..

आणि अजून एक बोलायचास... 
ते तू विसरलास ? ''
'' काय....? काहीसं प्रश्नांकित होंऊनच त्याने तिला विचारले ''
''काही नाही जाऊ दे...''
''अगं सांग.. ''
''काही नाही ....''
''तुझ्या लक्षात नाही ते ...सोड '' 
''अगं .....,
लग्नानंतर कित्येक दिवसाने दोघांमध्ये मोकळा असा संवाद सुरु होता. 
म्हणावं तर लाडीगोडीचं भांडण जुंपलं होतं. 
जणू आयुष्यतल्या त्या गोड स्वप्नील क्षणाची हि पुनवृत्तीच ...
खरंच , प्रेम हे सर्वांग सुंदर आहे.
त्याला मरण नाही, त्याचं अस्तित्व हे हृदयात कुठेशी आत आत साठलेलं असतंच आणि तेच असं वेळोवेळी वर उफाळून येतं , व्यक्त होतं जातं . मनाला सुख दुःखाच्या चौकटीत बांधून ठेवत . 
आठवणींचं हि तसंच ....तेच ,
उदबत्तीच्या धुपगंधाप्रमाणे आपल्या ह्या भावना असतात . एकदा का हा भावनांचा मोहर उधळला कि शब्दमोत्यांची पाकळी हि हळुवाररित्या...मोकळी होत जाते.
रात्रीच्या गर्द एकांतात संवादाचा परिमल दरवळत होता. दोघेही व्हाट्सपवर एकमेक्नाशी बोलण्यात दंग झाले होते. 
इकडं तिकडच्या गप्पात वेळ भुर्रकन त्याचा तो पुढे सरत होता. 
आपल्या अस्तित्वाची जणू ग्वाही देत , 
''चला रे झोपून घ्या निजा आता ....चला ...''
तासभर बोलून निरोप घ्यायच्या तयारीत ...त्याने , 
''Gnsdtc & kps...'' असा मेसेज केला . 
आणि त्वरित त्यास रिप्लाय मिळाला. 
''Kps म्हणजे ? ''
विसरलीस ? 
'' लग्नाआधी पण मी बोलायचो ? '' 
''नाही.....''
'' अगं हो ...''
'' मला आठवत नाही..'' 
'' श्या....विसरभोळी...श्या श्या श्या ''
;) 
'' सांग ना ? ''
'' Kps म्हणजे Keep Smiling ...''

'' ओह्ह ....
'' हं...
'' इसरलीस इसरलीस .. हाहा ...
आणि अजून एक बोलायचास 
ते तू विसरलास ?
'' काय ...?'' काहीसं प्रश्नांकित होंऊनच त्याने तिला विचारले . 
'' काही नाही जाऊ दे...''
'' अगं सांग.. '
' काही नाही ....'
'तुझ्या लक्षात नाही ते ...सोड, 
'' अगं .....
'' बोल..
'' येडे बोलते कि नाही .'' : तो रागाने
(ती : काहीसा श्वास रोखून .... थोडं थांबून ..)
''आय लव्ह यु .....'' असं बोलायचास तू ...
''हाहाहा .वाटलंच मला ...''
पण त्याच कारण देखील तुला माहित्ये , म्हणजे लग्नानंतर ते योग्य नाही किंव्हा तुला आवडणार नाही वगैरे ? 
हो , तरी...देखील? रोज थोडी बोलतोस ..
हो , बोलू शकतो पण तुला नाही आवडलं तर ..?
प्रेम करणारी माणसाचं फक्त ''आय लव्ह यु'' म्हणतात का ? तिने सवाल उपस्थित केला . 
हो , कारण ते प्रेम असतं , कुणाचंही कुणावर हि असो ...
अरे तसे नाही . म्हणजे ज्यांचं लफडं असतं तेच बोलतात का ?
असं काही नाही ग ,
प्रेम हे सर्व स्तरावर करता येतं. कुणावरही करता येतं . ते क्षण काळ पाहत नाही. ते फक्त आतलं माणूस जाणतं. आणि त्यावरच ते भूलतं आणि आपलेपणाने ...त्यात मिसळून जातं. काळ मर्यादा सारं विसरून जातं .
आय लव्ह यु डिअर ...
आय लव्ह यु टू...
गुड नाईट . ..
आपलं म्हणण्यात आणि आपलंस होऊन जाण्यात एक वेगळाच आनंद असतो . है ना ? 
कुणीतरी आपल्याशी अजूनही त्याच भावनेशी जोडलं गेलेय हि भावनाच खरंच खूप सुखदायक असते . मनाला सदा टवटवीत करणारी , मन आनंदात न्हाऊ घालणारी ...खरंच ,
तिच्या लग्नानंतर... आज तो प्रथमच मोकळेपणानं बोलला होता आणि ती हि , त्याचं मोकळेपणाने वाहून निघाली होती . 
प्रेमाला मरण नाही आणि मैत्रीला खरंच तोड नाही . 
त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम...आजही तो जपून होता . आणि हे... तिला देखील ठाऊक होतं. 
वैवाहिक नात्याने जरी, ती त्याच्या आयुष्यात आली नसली , तरी मैत्रीच्या अनमोल नात्यात , ती दोघे केंव्हाच एकजीव झाली होती . 
आणि त्याच विश्वासानं ....भावनांचा हा अस्तर , आज उधळला गेला होता .
प्रेम कुणावरही करावं, कुणावरही ...बस्स आपलेपणा राखून ....
कुसुमाग्रजांच्या ओळी अश्यावेळी सहज ओठी येतात.
प्रेम योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं...
सहज लिहता लिहता..
@ संकेत पाटेकर 
२७/०४/२०१८


शनिवार, ३१ मार्च, २०१८

ग्रेट भेट

'' कुठलीही स्त्री असो. ती वात्सल्यमूर्ती असते. मायेचा अथांग पान्हा.... ''
काल कसं कुणास माहित नाही त्यांना पाहिलं आणि आतून एकच कंठ फुटला. 'माई' 
कधी भेटलो नाही. कधी पाहिलं नाही. 

बंद कवाड हळूच उघडत , पुढे ढकलत त्या उंबरठा ओलांडून आत आल्या आणि कुठलंसं नातं जन्मोजन्मीचं असं क्षणात घट्ट रुजल्यासारखं झालं. 

क्षणभर वाटलं त्वरित त्यांच्या जवळ जावं अन त्यांना खेटून बसावं . त्यांच्या वात्सल्यरुपी पंख छायेत.
पण नाही. तसं करता आलं नाही . कारण पहिल्यांदाच आज त्यांना भेटत होतो. पहिल्यांदाच त्यांच्या ह्या साहित्यरूपी सदनात प्रवेश दाखल झालो होतो.
म्हणूनच थोडं आवरलं स्वतःला...... भावनेचं हे उथळतं हृदय सांभाळून घेत .म्हटलं बोलावं आधी आपण मनमोकळंपणानं ..
तर असो,
थोर असे साहित्यिक कवी सूर्यकांत मालुसरे , ज्यांच्या नावातच (मालुसरे) कर्तृत्वाचा शिखर उंचवलं गेलंय असे दिग्गज कवी , त्यांच्या घरी आज भेटी गाठीचा योग जुळून आला होता.
कवी -लेखक आणि एक डोळस भटकंती करणारा, आमचा भटक्या मित्र चंदन ह्यांसोबत ,
प्रभादेवीच्या त्यांच्या त्या राहत्या घरात....

एखाद दीड तासाची अवघी ती भेट , पण त्यात हि त्यांचे साहित्यविश्व , त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी भूषवलेली अध्यक्षपद , त्यांनी लिहलेली काव्यसंग्रह ..आणि अनुभवाची गतमोकळी शिदोरी त्यांनी त्यात आम्हांपुढं उघड केली.
सोबतीला चहा बिस्किटांचा गोड मधाळ असा पाहुणचार हा होताच.
त्यासोबत एकीकडे माईंचं बोलणं देखील , मनावर अधोरेखित होत होतं. इतिहासावरचा त्यांचा अभ्यास आणि विचारांची सशक्त शैली त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
काका , माई मी आणि चंदन हि चौकट आज विचारांत मिसळली होती.
एकंदरीत भूत वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मिलाफ... आम्हा बोलण्यातून एकत्रित असा उकळत होता. ''तुम्ही इतरांपेक्षा जरा वेगळेच आहात हा'' ..निघता निघता ...निरोप घेता घेता हा शेरा माईंनी देऊ केला.
'शिवगाथा' हि प्रत काकांनी आमच्या कडे सुपूर्त केली. एक भेट म्हणून ....
ह्यातील एक एक कविता म्हणजे जणू प्रेरित भव- सागर, न्हाहून उसळून निघावं असं.
सहज- सरळ आणि सोप्या अश्या भाषेतलं . सहज गुणगुणायला लावणारं. ओठी स्थिरावणारं ...
वयाच्या ८७ तही काकांचा लिखाण काम सुरु आहे . आणि लवकरच त्यांचा एक काव्यसंग्रही हि येतोय . त्याचीच आतुरता आहे.
निघता निघता मनातली इच्छा हि पुरी करून घेतली.
माईंसोबतचा एकत्रित असा फोटो ...
- संकेत पाटेकर
१३/०३/२०१८




मंगळवार, १३ मार्च, २०१८

'' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....''


'' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....'' 
चालता चालता एक कटाक्ष त्याकडे टाकत , बारिकतेने ती बोलून मोकळी झाली. 
पण त्याबोलण्यानं तो मात्र काहीसा धीर-गंभीर होत आला. 
पण तत्क्षणी चेहऱयावर त्यानं तसं काही येऊ दिलं  नाही. उलट विचारांच्या भावगर्दीत तो   एकाकी असा अधीन होत गेला . उभ्या आयुष्यभराचा प्रश्न  ? होणारच होतं ते  ?  काही न बोलता दोघे हि लागभगिने पुढे होतं गेले.  ऑफिस दिशेनं चाल करत.  
अवघे काही महिनेच  ओलांडले होते . तिला हे ऑफिस जॉईन करून. त्यांनतरची तिची नि त्याची काय ती ओळख.   
एकाच डिपार्टमेंट मध्ये असल्याने नित्य नेमाचं बोलणं हे ठरलेलंच होतं . त्यातही 'खेळकरपणा अन तिचा अट्टाहासपणा'  ह्यामुळे ती मनाच्या समीप आली होती. ऑफिसला 'येणं - जाणं' हि सोबतच होतं असल्याने आणि होणाऱ्या 'मुक्तछंदी'  संवादाने तिच्या मनात आपसूक त्याच्याविषयी 'आपलेपणा' गहिवरला गेला  होता. दाटून बहरला होता.   ह्याची धग आता त्याला मात्र अधिक जाणवू लागलेली    आणि म्हणूनच आजच्या त्या निसटत्या वाक्याने  '' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....'' ह्याने त्याचं मन काहीसं अस्वस्थ होऊन गेलं . 
आपल्याला काय हवं काय नकोय  , ह्याबाबत , अगदी एखाद्या जोडीदारासारखं (पत्नींत्व स्वीकारून जणू ) सतत काळजी घेऊ पाहारणारी ती   ....इतक्या कमी वेळात मनाच्या इतक्या जवळ  येईल हे त्याला  देखील वाटलं न्हवतं. पण तसं झालं होतं.  

तसा त्याचा 'वाहता' स्वभाव-गुणच  असल्याने , त्याच्या मनात काही तसले  भाव अद्याप उठले न्हवते. आपलेपणा मनाशी बांधूनच असलेला तो त्याच्या मित्रवर्गात हि तितकाच खास होता. प्रिय होता. आणि प्रेमाच्या  प्रांतात म्हणावं तर 'अनुभवाची शिदोरी'  घेऊनच  त्याच  तो आयुष्य जगत होता. कसंबसं आपल्या तुटल्या मनाला सांभाळून घेत. सावरून घेत. 
म्हणावं तर कित्येक असे क्षण  धारधार पातेसारखे,  जखम करणारे...अंगमनाशी त्याने हळूच झेलले होते.  ती व्रण अजून हि भरून आली नव्हती . तरीही आले क्षण तो आनंदाने मिरवत होता.  
ण असे किती दिवस   ? 
किती दिवस स्वतःला स्वतःचा आधार देणार  ? स्वतःच स्वतःच सांत्वन करून घेणार , 
कुणी तरी हवं असतंच ना सोबतीला , ह्या उभ्या आयुष्यासाठी. आपलं आधार होणार, आपल्या सुख दुःखाशी एकजीव होणार ... आपलं , आपलं म्हणून जगणारं.  
त्याला हि अश्या कुण्या एका  जोडीदाराची  आता सोबत हवी होती.   मनातली असली नसलेली रिकामी पोकळी भरून काढणारी. त्या 'तिची' 
तिच्याच शोधात तो होता.  त्याच  दिशेने त्याची आणि घरच्यांचीहि वाटचाल सुरु होती. 
आणि ह्याच अश्या नेमक्या वेळेस,  योगायोगानं तिचं,  त्याच्या आयुष्यात येणं  आणि जवळीक साधनं, ह्याचा जो काय परिणाम हॊणार होता , तो त्याच्यावर  झाला होता. प्रश्नांची  खरं तर रीघ लागली होती. 
स्वतःलाच तो तपासून पाहे. . आपलं तिच्याबद्दल नक्की काय मत आहे. ? काय आहे आपल्या मनात, तिच्याबद्दल  , प्रेम  कि.... ? 
त्यालाच कळत नव्हतं. मन ओढलं जात होतं हे नक्की. पण त्यात तशी भावना  नव्हती. शारीरिक उठाठेव हि नव्हती. मैत्रीचे धागे मात्र घट्ट रोवले जात होते . 
हे झालं त्याच्या मनाचं . पण तिचं ....
नित्य नेहेमीच्या ह्या  क्षणामध्ये तिचं हे असं व्यक्त होणं . त्याच्या मनाला गर्द विचारांच्या डोहात ढकलण्यासारखं होतं, अवघे काही महिनेच झाले होते . तिला हे ऑफिस जॉईन करून ...
अन नवी नवी ओळख होऊन. तिथपासून , आतापर्यंत ह्या एवढ्या वेळेत  ...किती जवळ आली होती ती. 
आणि कित्येक असे क्षण त्यात विणले गेले होते. 
तिनं ते हात पडकून ...'चल ना' असं लाडीगोडीनं बोलत ...मंदिरात घेऊन जाणं. 
मंदिरात जाणं पसंत नसलं तरी , तिच्यासाठी म्हणून एखाद्या नव्या नव्या जोडप्यासारखं रांगेत उभं राहणं. देव देवितांचा एकत्रित आशीर्वाद घेणं , चालता बोलता कधीही कसलाही हट्ट धरणं  , रुसवा धरणं. ऐन गर्दीतल्या मेट्रो मध्ये , आपल्या हाताचा आधार घेत कुठल्याश्या गहिवराल्या  धुंदीत हळूच डोकं टेकवण ,  जे जे आपल्याला हवंय नकोय त्यासाठी,  पुढे पुढ़े धावत येणं .पुढाकार घेणं .  ह्याची आता त्याला सवय झाली होती.  दिवसातले  ८-९ तास सोबत  असूनही, रात्रीच्या व्हाट्सअप चॅट वर  'मिस यु टू' असा रिप्लाय न दिल्याने रुसलेली ती....तिचे हे  सर्व भाव कळून येत होते . 
एकदा तर तिने कहरच केला होता. कहर म्हणजे मोठं धाडसच म्हणावं लागेल ते ,  ते हि अनपेक्षित असं ..
मंदिराच्या दर्शनाच्या नावाने  थेट राहते  त्या तिच्या , घरच्या इमारतीखाली ...कधी कसं उभं केलं ह्याचा पत्ताच लागला न्हवता. 
 ''वरतून आई बघतेय हा , चल घरी '' असं म्हणत नकट्या बोलीत, प्रेम अदबीनं तिनं  बळजबरी करत शेवटी घराशी नेलं होतं.  मग घरच्यांशी ओळख पाळख. बोलणं . हे सर्व  यथोयाथीत झालं होतं. 
एकदा असाच आणि एक  हट्ट धरून बसली होती. उद्या महाशिवरात्री आहे हा...माझा उपवास आहे. तू हि उपवास धर. 
धर म्हटलं तर धर , कसाबसा नाही नाही म्हणता म्हणता तो राजी झाला होता. 
पण दुसऱ्याच  दिवशी ऐन मध्यान्हीला तडाखून भूख लागल्याने त्याने उपवासाचा फेर तिथेच रदबदली करत ,   भरपेट खाऊन घेतलं होतं . तिथेच आणि  तेंव्हा एक दिवसाचा बेमुदत संप पाळला होता तिने. 
एक दिवस बोलणं पुरतं बंद केलं होतं. पण पुन्हा स्वतः ला स्वतः थोपवत,  नव्याने  बोलती झाली होती ती ...
अश्या कितीतरी घटना रंगल्या होत्या. तिच्या सहवासीक क्षणात...मंत्रमुग्ध होऊन. 
पण अजूनही त्याच्या मनाचा  काही ठोस निर्णय होतं न्हवता. तिचं प्रेम जाणून असलेला तो 
स्वतःच्या मनाशी मात्र अजूनही साशंक  होता.  
बोलावं तर मनात तसे काही भाव  उमटत न्हवते .  

उंचीला जेमतेम त्याला फिट बसणारी , अध्यात्मिक वळणाची , गव्हाळ वर्णाची , शिकली सावरलेली , गंमत म्हणजे एकाच ऑफिस आणि एकाच विभागात एकत्रित काम करत असलेली ,एकत्रित ये जा करणारी , साधीशीच पण सतत काळजी घेणारी ती , विचारी पंक्तीत मात्र फिट बसत न्हवती. 
स्वभाव भिन्न होता . विचार भिन्न होते . पण तरीही काळजीचा तिचा स्वर नेहमीच मनाचा ठाव घेत राही. त्याची त्याला आता सवय झाली होती.  
भांडण , बडबड , चेष्टा -  मस्करी वगैरे ह्याची रीघ तर सुरुच होती. 
पण रोज़च्या मुक्त ह्या संवादातून  तिच्या मनातला कल हि ओळखून येत होता . 
आजही असे दोघे एकत्रित चालता चालता.  एक कटाक्ष त्याकडे टाकत , लय साधत  ती बोलून मोकळी झाली. 
'' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....'' 
तिच्या ह्या अनपेक्षित आणि स्पष्ट बोलण्याने... तो  मात्र भांबावला गेला. गर्द विचारी डोहात.....प्रश्नांकित होतं. 

म्हणावं तर प्रत्येकाच्या आयुष्यात  असे  'क्षण' येतात आणि येत राहतात . जिथे निर्णय घेणं ..हे आव्हान असतं. कसोटी असते . त्याचा होणारा चांगला वाईट परिणाम हे त्या एका निर्णयावर अवलंबून असतं. पण वेळेत निर्णय घेणं हि तितकंच महत्वाचं असतं . तो हि त्याचं डोहात आता पहुडला होता. 
निर्णयावर येऊन पोहचला होता. 
 - समाप्त 
संकेत पाटेकर 
खूप दिवसाने असं काही ....
लिहता लिहता 






रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

आठवणींचा झुला ...

भांडुप ला आलो कि मी भांडुपचाच होऊन जातो.
खूप साऱ्या आठवणी इथे दडल्यात, जगल्यात..
..त्या जाग्या होऊन पुन्हा नव्याने खेळू लागतात, जगू लागतात.
ती शाळा..., दिसतेय, हा तीच,।
एकमजली, भांडुप व्हिलेज शाळा नं 2. पूर्व,
जिथे पहिली ते सातवी शिक्षण झालं.
तोच शाळेजवळचा गोपाळ वडापाव, अद्यापहि सुरू आहे.
त्यावेळी दीड एक रुपया वडा पाव आणि एक रुपया चटनी पाव मिळायचा, तो शाळेच्या मधल्या सुट्टीत घेत असे.
तो दिना बामा पाटील मैदान , हा तोच ,
रेल्वे जवळचा..
जिथे लहानाचे मोठे झालो, मैदानी खेळ खेळून, सराव करून,
त्याच्या खुणा अद्यापही तश्याच आहेत जागत्या, जित्या,
नशीब त्यावेळेस मोबाईल वगैरे हा प्रकार अस्तित्वात न्हवता.
मात्र सुरवात झाली होती ,पेजर ह्या प्रकाराने..
असो,
खेळासोबत , मनोरंजनाचे हि विविध कार्यक्रम पाह्यला मिळत. दिना बामा पाटील हॉल च्या आवारात,मैदानात..
मग वस्त्रहरण सारखं नाटक असेल,, दिवाळीतले विविध कार्यक्रम असतील, नाचगाणी (नृत्य स्पर्धा ) वगैरे, पहाटे चार चार वाजेपर्यंत खेळला गेलेला गरबा असेल , शीमग्यात घेतलेले सोंग..आणि मैदानी जत्रा, जी आजही सुरु आहे.
ते पिंपळाचं झाड दिसतंय,
येस तेच, तिथे आसपास आम्ही राहत असू,
रेल्वे ट्रॅक च्या अगदी बाजूलाच खेटून,
छोट्याश्या अगदी , चार पाच माणसं झोपू शकतील इतक्या पत्राच्या भिंती असलेल्या आणि कोबा असलेल्या जमीनी जागेत,
तेंव्हा ते घर हि स्वर्गाहून मोठं वाटत. आपण ह्या श्या फाटक्या तुटक्या घरात राहतोय असं कधी जाणवलं हि नाही.
कारण त्यात आईच वात्सल्य रुपी प्रेम होतं.
आणि तिच्या कुशीतली जागा...
ते दिसतंय मंदिर, गावातलं, हनुमान आणि गणेश मंदिर, आज जिथे जत्रा भरली होती.
हा तेच ते,
तिथे आम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत वा सुट्टी असल्यावर खांब खांब खेळत असू..
मंदिरा भोवती घिरट्या घालत असू,
आज त्याच मंदिरा ला भेट देण्याचा योग पुन्हा आला. यथार्थ दर्शन झालं. त्या आठवणींना उजाळा देत.
ते बघ आता, ते
चिंचेचं झाडं, माझ्या जन्माच्या आधी पासून आहे ते, पूर्व पाश्चिम रेषा जोडणाऱ्या ब्रिज वर सावली घेऊन, कित्येक वर्ष उभं.
सातवी नंतर मी कस्तुरीत (कस्तुरी विद्यालयात) दाखल झालो. त्यावेळेस शाळेत जाता जाता वा येता येता त्याची पानं चघळायचो.
आता हि तेच वाटत होतं, त्याखालून जाता जाता, तोडावी काही पाने आणि पुन्हा चघळून बघावी, तीच चव आहे का ? त्यावेळी असलेली कि बदलली, माणसं बदलतात त्याप्रमाणे ..वा जगाच्या नियमाप्रमाणे,
असो,
तो ब्रिज उतरलो कि पहिलंच लागतं ते गावदेवी मंदिर,
परीक्षा असली कि न चुकता देवीच्या समोर उभं राहायचो, गार्हाणं घालत..
'' हे देवी माते, आजचा पेपर सोपा जाऊ दे..हं '' अभ्यास होवो अथवा ना होवो , परीक्षा असल्यावरच हे असं सुचायचं अन्यथा बाहेरूनच मनातून नमस्कार करत पुढे सरायचो..
असं असायचं एकूणचं सगळं..
तो रेशनिंगच दुकानं..
रॉकेल आणि अन्य गोष्टीं साठी, तासनतास रांगेत घालवलेले ते क्षण...
ती बेकरी
जिथे दिवाळीत आई नानकटाई बनवून घेत...
जिथून आम्ही पेलाभर दूत आणत असू, चहासाठी..
ती बेकरी अजून हि सुरु आहे.
तो ब्रिज खालचा वडापाव, ते दुकान,
बाबांसोबत बाहेर आलो कि हमखास तिथे वडापाव खायला मिळत, डाळ वडे मिळत, आणि सोबत मिर्ची भजी हि..न काही सांगता..
आज तिथेच आपण पेटीस ण समोसा खाल्ला न्हाई,
असो अश्या कित्येक आठवणी आहेत..
गल्ली बोलीतल्या..
तू जुरासिक पार्क पहिला असशीलचं ना,
पहिला वाहिला, अचंबित करणारा..तो चित्रपट.
मी तो सगळा चित्रपट एका घराच्या बाहेर उभं राहून, एकाग्र नजरेनं पहिला होता..
तीच ती गल्ली..
जिथून आज आपण चालत आलो..
भांडुप ला आलो कि हे असं होतं.
भटकतं मन...आठवणीच्या झुल्यात..
शेवटी जन्मस्थळ ते माझं.
बालपण गेलेलं.
- संकेत पाटेकर

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

समज- गैरसमज ...

गुड नाईट ..शुभ रात्री ..!
बोलयला आत्ता कुठे सुरवात केली असतानाच त्याने अचानक
 एक्झिट घेतली. आणि तो तिच्या व्हाट्सअप रिप्लाय ची वाट बघू लागला.
त्याला वाटलं , तिचं हि तेच रिप्लाय येईल . तसंच काहीस, केवळ शुभ रात्री म्हणून ...इतर काहीही न बोलता , पुढे संवाद न वाढू देता,
पण झालं ते उलटंच...
तिचे धडाधड मेसेज येऊ लागले.
''लगेच शुभ रात्री
रागावला आहेस का ?
कि असे काही बोलले , कि आवडत नाही. ?
क्षणभर ते वाचून बरं हि वाटलं ( म्हणजे तिला हि वाटतं तर आपल्याशी बोलावेस .ह्या हेतूने... ) आणि तितकंच लागलं देखील मनाला...(नाहक त्रास दिला म्हणून )
पण त्यावर काय रिप्लाय द्यावं ते सुचत नव्हतं . कळत हि नव्हतं
शेवटी.. 'असं काही नाही''
इतकंच तिच्या त्या प्रश्नाला अधोरेखित करत त्यानं उत्तर धाडलं.
आणि तिथून पुन्हा त्यावर प्रतिक्रिया येऊ लागली .
''ठीक आहे
सॉरी ,
यापुढे काही बोलणार नाही ....''
वेदनेची ठिणगी आता पुन्हा एकदा उडाली.
आपण उगाच तिला त्रास देत आहोत , ह्या भावनेने मन व्यथित होऊ लागलं.
 आणि ते कळवळतच पुन्हा हाका देऊ लागलं.
अगं..
नको काही गैर वगैरे मनात आणू ..
सॉरी..
रागावलीस ...?
बोल ना ....
मला चैन पडणार नाही ग .., रिप्लाय दे
सॉरी......
व्हाट्सअप मेसेज चा रिप्लाय येत न्हवता. मनात धडधड वाढू लागली होती. रात्रीचे साडे बारा वाजले होते . त्या शांत एकप्रहारी रात्री, मन अधीकच वेडावून गेलं होतं. अस्वस्थ अवस्थेत ..
कित्येक दिवस....कित्येक दिवस झाले होते, फोन वर बोलणं न्हवतं. हवा तसा मोकळा संवाद न्हवता . व्हाट्सअप वर अधूनमधूनच कधीतरी जुजबी बोलणं व्हायचं . इतकंच काय ते ..,
बाकी फुल स्टॉप. पूर्णविराम अगदी...
आपण आता पूर्णपणे दुर्लक्षिले जात आहोत...हि भावनाच कुठेतरी , मनास छळ करू लागली होती.
जिच्यावर आपलं मन जडलंय. जिच्यासाठी ते तळमळतंय ...ओढवतंय, तिच्याकडून असे दुलक्षिले जाणे...
ह्याचा फार मोठा परिणाम झाला होता मनावर आणि त्याचंच रूपांतर आज तिच्याशी असं तुटक बोलण्यात झालं होतं. आणि त्यातूनच
सुरवातीची , एखाद दोन वाक्य काय ती वाचून, पुढे काही बोलण्याआधीच , शुभ रात्री असा मसेज त्याने धाडला होता .
त्याचाच तिला राग आला होता. आणि तेच तिच्या मनाला अधिक लागलं होतं .
माणसाला काय हवं असतं बरं ह्या आयुष्याकडून ? आपल्या माणसाकडून ?
आपलेपणा असलेला प्रेम ओलावाच ना , है ना ? सतत नाही , पण मनाला बांधून ठेवणारा , जोडून धरणारा हा संवाद. आणि सहवासाचे एखाद दोन क्षण, इतकंच ना ?
दुर्भाग्यानं तेच मिळत नाही .
इतक्या उण्या पुऱ्या अपेक्षा हि पूर्ण होत नसल्या कि नातं डबघाईला येतं.
तुटतं ते आतून आणि कण्हत कण्हत दूर होत जातं हळुवार, आयुष्याच्या एकाकी वाटेकडे झुकत ...
त्याचंही तेच झालं होतं. मनाचं पोखरणं झुरू झालेलं...
आणि नकळत त्यातून , तिला हि ठेच पोचली होती. जे actually त्याला नको हवं होतं .
'' सॉरी ,
यापुढे काही बोलणार नाही ....''
तिच्या ह्या बोलण्यावर त्याने आपला मनाचा हळुवार काठ ठेवला.
अगं ...
नको काही असं गैर वगैरे मनात आणू .
रागावलीस ...?
बोल ना ....
मला चैन पडणार नाही अगं .., रिप्लाय दे
सॉरी......न ,
मागोमाग एक एक मेसेज तो धाडत गेला. बस्स , तिचं रिप्लाय येणं केवळ आता बाकी होतं . त्याचीच तो वाट बघत होता.
तेवढ्यात....
'' बोल,
रागावले नाही . ''
पण तू रागावला आहेस किंव्हा काय झाले ते माहित नाही .
मनात काही ठेवू नकोस. बिंदास बोल.
मला राग येणार नाही.
थोड्यावेळाने त्यावर तिची हि प्रतिक्रिया उमटली आणि वाहता मनमोकळा संवाद दोघात सुरु झाला.
जे मनात होतं ते उघड उघडपणे बोलणं होंऊ लागलं. संवादाची मनमोकळी देवाणघेवाण होऊ लागली.
स्वतःच्या प्रश्न संचासोबत ,
तिच्या आयुष्यातील घडामोडींची , परिस्थितीची , आणि तिच्या एकंदरीत झुलत्या अस्थिर मनाची हि जाण झाली.
ज्याची पुसटशीही कल्पना न्हवती.
'' मलाच आतल्या आत घुसमटायला होतंय रे , कुणाला ते सांगता हि येतं नाही नि बोलता हि येतं नाही , आणि मी ते माझ्या फेसवरून (चेहऱ्यावरून ) कधी जाणवू हि देत नाही .
अशी आनंदी दिसत असले नेहमी तरीही , मनात कुठेशी ती 'दुखरी कढ' असते . सळणारी , वेदनादायी , मला माझंच ते माहित आहे.
खूप काही घडत रे , आपल्या अवतीभोवती , आपल्या घरात ..घरा बाहेर , ज्याचा त्रास होतो. त्याने कुठे लक्ष लागेनासं होतं बस्स...
आज मी तुझ्यापुढे एवढी मोकळी झालेय.... जे आहे ते सगळं मांडलंय.
तू मनात असं काही वेडंवाकडं आणू नकोस.
मी आहे तिचं आहे. तुझी .... बस्स थोडं ....
मना आत कोंडून ठेवलेल्या त्या असंख्य भावनांना तिने आज मोकळीक देऊ केली. नि आपलं मन थोडं हलकं फुलकं करून घेतलं.
वर वर हास्यतेजानं पुलकित दिसलेल्या , ह्या चेहऱ्यामागची हि अज्ञात बाजू आज नेमकी कळून आली. उमगली
त्याने त्याचं मन हि थोडं स्थिरावलं. विचार ध्यान झालं .
आपण नेहमी एकपात्रीच विचार करत असतो . मनाची दुसरी बाजू मात्र काळोख्यात राहते. त्याचा विचार होतं नाही. विचार झाला तरीही तो तर्क वितर्कने केवळ ...त्याला सत्याचा आधार असा नसतो . प्रति संवादाची जोड अशी नसते. आणि म्हणून ते फसतं. आणि त्याचंच उलटवार होतो .
आपल्यावर ..आपल्या ह्या मनावर ..आणि आपल्या हसऱ्या गोजिऱ्या ह्या नात्यावरही ..
थँक्स, छान वाटलं बोलून ..
शुभ रात्री , बोलू उद्या ...
मनमोकळेपणाने बोलून झाल्यावर ....तिने शुभरात्रीची घडी मोडली.
त्यावर त्याने हि आपलं प्रतिउउतर दिल.
मला हि खूप हलकं वाटलं ...थँक्स,
शुभ रात्री ...
लॅब्यू ..xxxxxx
लॅब्यू ..टू...
हलक्या मोकळ्या स्माईल निशी रात्र पुढे , हळुवार सरत गेली.
- संकेत पाटेकर
२३.०१.२०१८

शनिवार, २० जानेवारी, २०१८

'दिलखुलास' व्यक्तिमत्वं आणि संवाद ..

  साऱ्यांनाच प्रेमात पाडतं. आपलंसं करून घेतं ते.. लगेचच.
हॉस्पिटल मधल्या साफसफाई करण्याऱया त्या मावशी..
लगबगीने पुढे होत बोलू लागल्या.
" ती कालची  माणसं होती ना, तुमच्या बाबांच्या शेजारी, त्या पलीकडं , खूप चांगली होती हा...
त्यांचा तो मुलगा,
(त्यांच्याकडे  पाहत...मी  ) ...हं, ते बहीण भाऊ असलेलं दोघे ना, त्यांच्या वडिलांच्या शेजारी  बसलेले ते ....मी  त्यांना ईचारल.
व्हय..तेच,
हॉस्पिटलात आल्या आल्या ईचारायचे,
''काय मावशी, आलात का ?''
 ''या, या ...''
''गुड मोर्निंग, गुड मोर्निंग...''
''आज लवकर...आलात. ? ''
 ''चहा नाशता घेतलात ना  ? ''
माझी सुरवात ह्यांच्या ह्या अश्या गोडं  बोलण्याने व्हायची.

सकाळी सातला हॉस्पिटला रुजू झाले कि ह्यांचा आवाज..

 मावाशीsssss.. मावशीssssss ..
मावाशीssssss.. मावशीssssss...

कशी अगदी मोकळ्या मनाची होती.
रोज काय ना काय विषय निघायचा. बोलती असायची.
कालच डिसचार्ज मिळालं त्यांना, निघून गेली. पण मनात जागा करून...


मावशीच ते बोलणं ऐकत होतो.
जनरल वॉर्ड मधला आमचा एक पलंग आणि आमचं पेशंट (बाबा)  सोडल्यास,  इतर सगळी आता  .
आपल्या घरी योग्य तो ईलाज घेऊन परतली होती.
रिकाम्या, आठ 'रुग्ण' राहतील , इतक्या ह्या प्रशस्त खोलीत मात्र,
आता .. गत आठवणींचा एकांत तेवढा कुजबुज करून राहिला  होता.
आणि ह्या अश्या  एकांतातही...
आपणहून नि आपलेपणाने साधला गेलेला तो  स्वर' , ती वाक्य , ते हसू ते मोकळपण..  मावशी चौफेर नजरेनं  शोधत राही.

अवघ्या काही दिवसाची  ती ओळख , त्यांच्यासोबत असलेली.  ती दोघं बहीण भाऊ..
हॉस्पिटल मध्ये वडलांना उपचारासाठी म्हणून आणले असताना त्यांना सोबत म्हणून केवळ  इथं  राहिलेले .  ते हि जास्तीत जास्त किती ..तर आठवडा भर ...बस्स.
पण तरीही ... ह्या मावशीवर...
केवळ सफाई कामगार म्हणून,  रुजू असलेल्या ह्या इथल्या बाईवर...
काय जादू करून गेले कुणास ठाऊक , जीव अडकून राहिलाय  त्या दोघात.
नजर म्हणुनच भिरभिरतेयं...
नाहीतर इथं  कोण कुणाला इचारतंय.  कुणीबी नाही .
मावशीच्या चेहर्यावरून आणि बोलण्यावरून  त्यांचा मनातले भाव कळून येत होते.
कुणीतरी आपलं , आपल्यापासून  दूर निघून जावं . मनाला हुरहूर लावून , एकटं टाकून , असं  काहीसं त्यांना जाणवत असावं.
म्हणूनच आज त्यांचं मन कश्यात लागत न्हवतं.  
ओढवलं जातं होतं ते , केवळ त्याच त्याच आठवणींमध्ये..पुन्हा पुन्हा...
स्वतःला ( म्हणजे त्याना ) माझ्यापुढं असं बोलतं करून देत.

'संवादाची' हीच तर खरी ताकद आहे.
कुणाला हि..अगदी  कुणालाही ...मग तो कुणी, अनोळखा  हि का असेना , क्षणात पुढे असा उभा राहिलेला हि , त्याला आपलंस करून घेण्याची  आणि सामावून घेण्याची हि  ताकद ..  ह्या 'संवादाचीच', ह्या 'शब्दसख्यांची'..
मनाची ‘सात्त्विकता’ नि ‘आपलेपणाचा’ कोवळा हसरा अर्क ...तेवढा त्यात असला म्हणजे झालं.
मग कुठल्या हि नात्याला 'नाव - गाव' ची गरज भासत नाही. पूर्व ओळखीची गरज लागत नाही .
ते आपलेपणानं , स्नेहगोडीनं मनाशी जोडलं जातं. फुलपाखरावाणी क्षणभर आपल्याशी विसावलं जातं, मुग्ध आनंद देऊन..  
अजून काय लिहू..
नात्यातला   'दुवा' म्हणजेच हा  ‘संवाद  आपण तो योग्य पद्धीतीने  कसा साधतो , त्यावरच  नात्याची वीण हि जुळली जाते.
सांगायचंय काय ...
संवाद असू द्यावा...पण आत्मप्रेमळ .. :) सहज असा ...
 - संकेत पाटेकर

२०/०१/२०१८

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

''संवाद ...''

अगदी म्हणावं तर घसा कोरडा होईपर्यंत मला केकटून  ओरडावं लागतं. प्रत्येकवेळी.. 
 ''अरे बाबा.., अगं बाई .''
आहेस का जिवंत ? कि गेलात ? हा ?
एक साधा कॉल नाही करू शकत , म्हणजे कमाल आहे यार  ? विसरलात ना ? 
तेंव्हा समोरून प्रतिउत्तर  येतं. 
जरा माफीच्या स्वरात....नमत्या अदबीनं ..
''सॉरी सॉरी ... ''
आहे रे , आहे इथेच आहे. 
नाही सोडून जाणार इतक्यात..,  थोडं..... 
मग नेहमीचच  त्यांचं 'कारणे द्या'' सत्र सुरु होतं. कधी तास भर , तर कधी काही मिनिटं ,गप्पांच्या   गुणगुणत्या ओघात  आणि ते मी सगळं  निमूटपणे ऐकून घेतो. (घ्यावं लागतंच म्हणा...पर्यात नसतो नं  )    ''पनीर चिली आणि भेटीच्या शर्थीवर ...  '' 
असो, तर सांगायचं काय आहे  , 
संवाद हा नात्यांचा 'मूळ' ..म्हणावा तर 'दुवा' 
मनं बांधून ठेवणारा. जोडणारा . 
तो असा 'जागता' ठेवावा लागतो. भलेही  ''जिवाभावाची'' स्नेहगोडीने , ममत्वेने जोडली गेलेली हि  कार्टी आप आपल्या संसारात , दुनियेत कितीही व्यस्त आणि धावपळत असली तरीही ... 
शेवटी 'आयुष्य' हे अश्या नात्यांच्या सहवासातच ( क्षणांच्या  विविध अंगाने ) झुलत असतं , न्हाई का ? 
म्हणूनच कधीतरी,  साधावा संवाद .  आपल्या ह्या  मनाला सांभाळून ..थोपवून आणि घ्याव्यात अवचित भेटी गाठी. नात्यांची  वीण पुन्हा घट्ट रोवत. 
जगण्यातला गोडवा वाढवत…
तुमचाच ..
- संकेत पाटेकर 
०६ /०१/२०१८