शुक्रवार, १७ मार्च, २०१७

'मोकळा श्वास...'

सर सर बरसणाऱ्या व्हाट्स अँप  वरील चॅट नोटिफिकेशन्सने  त्याच्या  मनातली तळमळ अधिक  वाढू लागली.  अन  अढळ आत्मीयतेने  एक एक प्रोफाइल पाहत , तो तिचा शोध घेऊ  लागला. 
तिचं नाव  त्यामध्ये कुठे दिसतंय का ? 
होळीच्या निमित्त  एखाद मेसेज तरी , तिच्याकडून   ? किंव्हा इतर काही,  तेवढंच ह्या मनाला आधार  वा दिलासा....
एवढी तरी माफक अपेक्षा धरून असतोच ना आपण , आपल्या म्हणून मानलेल्या वा सर्वस्व वाहिलेल्या आपल्या माणसांकडून , हे ना ?  त्याने स्वतःलाच स्वतःच्या प्रश्नावलीत  पुन्हा कैद केलं.
तीन दिवसानंतर कुठे आज  त्याने व्हाट्सअँप सुरु केलं होतं. म्हणावं तर रि- इन्स्टॉल केलं होतं.   अन ह्या तीन दिवसात होळी - धुळवड  च्या शुभेच्छांचा एव्हाना वर्षाव झाला होता.
त्यातून  त्याची नजर सर्वत्र भिरभिरत होती. अधीरतेने , आलेल्या त्या असंख्य शुभेच्छांच्या भाव वाटेतून , त्या ठरविक भावसंगीतच्या सुरावटीत....तो  हृदयी ठोका  शोधत ..त्याचा मागोवा घेत  …

शोध अजूनही सुरु आहे …
तुझ्या माझ्या त्या वाटेवरचा
तुझ्या हृदयातल्या होकाराचा
माझ्या स्वप्नातल्या जाणिवेचा

असं म्हणतात प्रेम हे माणसाला आंधळ करतं.
म्हणजे त्या व्यक्ती शिवाय आपल्याला दुसरं तिसरं काही दिसत नाही. सुचत नाही. 
सदा तो चेहरा, त्यावरचे हास्य मधाळ बोल ,  अश्या कितीतरी क्षणांचे भावगंधीत  लघुपट  नजरेसमोर उभं राहतं.  अगदी क्षणा क्षणाला…
मनातली  हि ओढ हि  वादळवाटेसारखी  सतत त्याच व्यक्तीच्या दिशेने फिरकू लागते. 
त्या व्यक्तीच्या काळजीत आपलं मन  वाहू लागतं.  तिच्याशी बोलण्यासाठी ,  भेटण्यासाठी ते सतत आतुरलं जातं.  हि ओढ, कधी न संपणारी असते. 
तो हि असाच भावव्याकुळ झाला होता. अधीर झाला होता.
आला असेल का तिचा एखाद मेसेज तरी ? असेल का शिल्लक …आपल्याविषयी अजूनही आपुलकी ? प्रेम ?ती  जाणीव  ?  
वर खाली नजर फ़िरवत , त्याने व्हाट्स अँप  वरील तिच्या प्रोफाइल वर क्लीक केलं . अन   क्षणभर त्यात डोकावून तो मिश्कीलपने  हसू लागला.  
नवं असं काही न्हवतंच.  एक ओळ हि नाही .
जुनंच जैसे थे सगळं , दिनांक २३ जानेवारी...
वादविवादाने मावळलेला तो क्षण,  तो  संवाद , ती शेवटची ओळ...
तो  पुन्हा ते सगळं भरभर वाचू लागला.   अन त्या एका वाक्यातील त्या शब्दावर  येऊन थांबला...
‘मोकळा श्वास...’
क्रमश :-
 - संकेत पाटेकर
१७.०३.२०१७






  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .