Saturday, February 2, 2019

" सहवास.. तुझा माझा "

थोडं थांबशील ?
बिलगू दे असंच काहीवेळ अजून...
हट्टाने मला कवटाळून घेऊ दे.. असंच, नाहीतरी तू पुन्हा कुठं भेटणार आहेस ?
एकदा वेळ निसटली कि निसटलीच ...पुन्हा ती माघार घेत नाही आणि सांगूनही परतणार नाही . मला माझा वेळ घेऊ दे रे..
निदान आज तरी... ह्या घटकेला..
क्षणभर त्याने तिच्याकडे एकटक रोखून पाहिलं. तिच्या नजरेतला ओलावा स्पष्ट दिसून येत होता.
नेहमीच स्मित हास्यानं उजळलेला , हसता - मोहरता चेहरा आज मात्र विरह भावनेने सुरकुतला गेला होता.
क्षितीज रंगाचं सांजपण जणू दाटून आलं होतं.
वेळ हि तीच होती.
दोघेही ऑफिसमधून सुटल्यावर मरिन ड्राईव्हच्या गारव्यात एकटक चालले होते.
सूर्य अस्तेला लागला होता. आभाळ विविध रंगांनी न्हाहून सजलं होतं. किलबिल करत पाखरं घरच्या ओढीनं माघारी फिरत होती .
गंधित वारा त्यांना स्पर्श करून जणू पुढे सरत होता . उनाडपणाच्या ह्याच त्याच्या लहरी स्वभावमुळे , त्याचा आवेग क्षणा क्षणाला बदलत होता.
त्याने दिशा दिशा शहारून उठे, मोहरून उठे, सागराचं गहिरेपण  हि त्यानेच खवळलं होतं.
त्याच्या अथांग देहमीठीतुन असंख्य लाटा जणू उसळ्या घेत होत्या.
जीवन वर्तुळाचं अस्तित्वं दाखवत..जणू..
क्षणांचा असा धूसर - लख्ख  खेळ सुरु असताना दुसरीकडे मात्र,
सहवासातील तृप्त - अतृप्त आठवणींच्या भवसागरात ती फिरक्या घेऊ लागली होती.
भास - आभासापलीकडे तिचं मन झेपावलं गेलं होतं .
काय होतंय तुला ? तिची तंद्री मोडत, त्याने मधेच सवाल साधला.
काही नाही..
बोल..ग ..मन मोकळं करावं .
स्मित हास्य करत, ...त्याकडे न बघता तिने काहीसं बोलायला सुरवात केली .
“सगळं काही जवळ आहे रे,
पण ..
पण काय ?
पण, हवं ते जवळ असून देखील आणि इच्छा असतानाही,
आपल्याला आपल्याच इच्छा , आपल्या मनात दडवून ठेवाव्या लागतात..दाबाव्या लागतात. त्याचाच त्रास होतो.
म्हणजे बघ ना ,
मला आता, ह्या क्षणी.. तुझ्या मिठीत सामावून घ्यायचं आहे .
घट्ट बिलगायचं आहे तुझ्या बाहुपाशात..
अनेक स्वप्नं रंगवायची आहेत.
आयुष्यं भरासाठी केवळ आणि केवळ तुझी होत , तुझ्या स्वाधीन होत बस्स..
पण नाही .. नाही तसं करता येत ना..?
बोलता येतं पण साधता येत नाही.
इच्छा असूनही आणि अतोनात प्रेम असूनही मनावर पांघरून घालावंच लागतं.
कधी ह्या लोकांसाठी ..''लोक काय म्हणतील म्हणून'
कधी आखलेल्या रूढी परंपरा म्हणून , तर कधी घरच्यांनी आखून दिलेल्या मर्यादांचा मान सन्मान ठेवत , त्यांचा विश्वास मोडू नये म्हणून.., त्यांच्या हितार्थ..
कुठे चुकतो रे आपण..?
बोल..?
जिव्हाळा निर्माण व्हावा अश्या ज्याच्यावर भरभरून प्रेम करावं..त्यानं ही आपल्यावर तितकंच भरभरून प्रेम करावं, द्यावं. अनेकानेक स्वप्नं रंगवावीत आणि ती अशी एकाकी , क्षणभरात धुळीस मिळावी.
काय अर्थ ह्याला..?
प्रेम तरी का व्हावं मग?
का अश्या भेटी गाठी घडाव्या? का जुळावेत मनाचे हे धागे दोरे, का उसवावी ही नाती आणि केवळ,  ती ही क्षणासाठी  , क्षणाच्याच सहवासासाठी ?का ?
मी प्रेम केलं ही चूक झाली का?
तुझं ही माझ्यावर प्रेम आहेच ना ?
मग घरच्यांनी तरी का नाकारायचे आपल्याला , आपल्या ह्या नात्याला.
का लग्नास नकार दिला त्यांनी ?
कुठे कमी पडलो आपण...? का घडलं असं?
क्षणभर तिने उसासा घेतला. श्वास मोकळा केला
जाऊ दे..
प्रश्नांनी नुसतं पछाडलं रे, नकोसं केलंय.
क्षणभरात ती शांत झाली. पुन्हा गहन अश्या विचारात गढून..
त्याच वेळी त्याने बोलायला सुरुवात केली.
होईल ग सगळं नीट., असा त्रास नको करून घेऊस ,
काळ हाच..ह्या सगळ्यांवर औषध आहे.
आपण प्रयत्नं केले नाहीत, असं थोडीच आहे ना?
आपण फक्त समाजाने आखून दिलेल्या नियमात बसलो नाही. इतकंच ,
बाकी आपलं प्रेम आहेच की एकमेकांवर , ते कुणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि घेणार ही नाही..
बस्स , तू सावर ग स्वतःला..
मला असा पडता चेहरा तुझा पाहवत नाही हा,
बघ कसा कोमेजून गेलाय पार.. माकड दिसू लागलेय आता तर,
हाहाहा…तिने हसावं म्हणून त्याने विषय मुद्दामहून बदलला.
थट्टा नको ह पुरे...? तिने एकसुरात म्हटलं.
ठिकाय ...
पण प्लिज,  नको राहुस अशी...
जे घडतं ते योग्यच…आपल्यासाठीच..
आपण विवाह बंधनात सफल झालो नसलो आणि आयुष्यं - भरासाठी ‘नवरा- बायको’ म्हणून एकमेकांचे होऊ शकलो नसलो तरी, मैत्रीचा हा वटवृक्ष नेहेमीच राहील ग..सावलीचं छ्त्र धरत..
काळजी नको..
पण का जातोयस तू..नको ना जाऊ ? पाणावलेल्या डोळ्यांनी तिने त्याकडे एकटक पाहत म्हटले..
"नशिबाने दिलेल्या वाटेवर जाणे येतंच ग..
मार्ग त्याने आखलेला असतो. आपण चालायचं फक्त, प्रयत्नांची शिकस्त करत.."
आपण ही प्रयत्न केले , पण त्याला यश मिळालं नाही. बस्स इतकंच,
पण हा , ह्याचा अर्थ असा ही नाही की आपण हरलो.
"प्रेमाची बाजू नेहमीच यशाच्याच स्वाधीन असते"
विजयाची ग्वाही देत.
बस्स बस्स ,नेहमीच असा शब्दात भुलवतोस..
राहू दे..
आपल्या निमुळत्या स्मित हास्याने त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तो पुन्हा बोलता झाला.
‘प्रेम हे जीवनाचं स्वरूप आहे ..' मीरा ' आणि 'त्याग' हा त्याचा मूळ..’
माणसाचं आपल्या आयुष्यात येणं ' जवळीक साधणं आणि परस्पर निघून जाणं ' हे नियतीनेच आखून दिलेलं संकेत आहेत. आपलं मनोधैर्य आणि मनोबळ वाढविण्याचं...
कळतंय ?
समज ही आपली पूर्वपरीक्षा आहे.
पुढच्या क्षणाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी..
मिळालेला हा एक नवा अनुभव , नवा अध्याय..ज्याचं मोल कधीही वाया जाणार नाही.
बोलता बोलता तो शांत झाला.
डोळ्यावरची कड मात्र भावनेने ओथंबून गेली होती.
मनात असंख्य तंरग उमटत होते.
नातंच तसं होतं ,प्रेम ह्या भावनेने जोडलेलं गेलेलं.
सहवासाच्या मगरमीठीतून उमळलेलं..
वर्षभराची त्यांची ओळख...
ऑफिस सुटण्याची दोघांची एकच वेळ , एकच ठिकाण, एकत्रच जाणं येणं.., त्यामुळे सहवासाच्या गर्द मिठीत आणि संवादाच्या हृदयी भावसागरात ते दोघे एकमेकांशी कधी एकसंध झाले ते त्यांनाही कळलं नाही.
मन मात्र दोघांचं मोकळं होतं होतं. लग्न करावं असं ठरवूनही झालं.
रीतसर घरातल्यांना सांगणं झालं.
आणि तिथूनच पुढे ...
पाहिल्या त्या साऱ्या स्वप्नांचा धुरळा उडाला...
घरच्यांचा विरोध...आणि समाज आड आला.
तुटलं सगळं..एकाच वेळी..एकाच क्षणी.
मनाची बाजू पोखरली गेली.
व्यथेने, वेदनेने ते कळवळून उठलं.
‘’ प्रेमाची सांगता ही स्पर्शाने होते असे म्हणतात..’’
तो स्पर्श होण्याआधीच वावटळ उठलं.
संपलं.
मनाचे धागेदोरे उसवत...
ती चालता चालता त्याच्या बॅगेला घट्ट बिलगून होती.
छातीशी कवटाळूनच घेतलं होतं तिने..त्याच्याच सहवासात नित्य नेहमी असलेल्या त्या बॅगेला..
जणू त्याचीच ऊब तिला त्यातून मिळत होती.
‘’ मला ह्या क्षणी तुला आता घट्ट बिलगावं वाटतंय श्याम ‘’
दुःखाचे , विरहाचे हे क्लेश सारे दूर करत..गहिऱ्या वेदनेने तिने त्याकडे हळुवार पाहत म्हटलं.
त्याने केवळ त्यावर स्मित हास्य केलं. बस्स..
जाऊ दे..
इच्छा आहे पण ही वेळ नाही.
आणि त्यात लोकं काय म्हणतील...हा प्रश्न आहेच..
सोड..
तुझी ही ऑफिस ची बॅग , तू आहेस असं समजून घेते..
बिलगु दे मला असंच काही वेळ..थांबवू नकोस..प्लिज..
मला माझा वेळ घेऊ दे..
निदान आता तरी, ह्या घटकेला..ह्यावर तरी कुणी काही बोलणार नाही.
अंधार चढत होता.
मरिन ड्राईव्ह हुन..ते पुन्हा परतीच्या मार्गला लागले होते.
ती गहन विचारात होती. त्याचं मन ही काव्यधारांनी धुमसत होतं..
पुन्हा मन आज शांत झालं
पुन्हा एक कारण मिळालं..
पुन्हा उठली कळ वेदनेची
पुन्हा हसणं ओघानं आलं..
पुन्हा झाली क्षितिज सांजा..
पुन्हा तेच काळोखी गाणं
पुन्हा नवी पहाट मोकळी
पुन्हा क्षणाचं येणं जाणं..
- संकेत य. पाटेकर
http://www.sanketpatekar.com/
प्रतिलिपी :


No comments:

Post a Comment

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .