शनिवार, १९ जुलै, २०१४

स्वच्छंदी मनं पाखरू ..

कसल्याश्या आवाजाने रात्रीची झोप पूर्ण झाली , डोळे सताड उघडले .
घराबाहेर एक नजर टाकली .
काळोख्याचा केंव्हाच अस्त झाला होता .
सुर्य नारायण हि उगवनिला आला होता . पण रिमझिमती पाउसाची सर , अन काळेदाट मेघ त्यास जणू क्षितिजाच्या पंखावरती झुळन्यास आज सक्त मनाई आहे हे सांगू पाहत होते.
हे सर्व पाहत असता तन- मन- अन पाउलं अंगावरल पांघरून तसंच एकीकडे लोटत, घराबाहेरील चौकटीत दाखल झालं.
येथून ते भरल्या पावसाचं मायेनं भरलं रूप नजरेच्या पटलावर हळुवार तरंगू लागलं.
पक्षी पाखरांची त्या रिमझिमत्या सरीनं मधून इकडून तिकडून सुरु असणारी नाच गाणी , मनात चैतन्याचा नवा स्वर उमटवू लागली.
त्यातच पाउसाचा वेग वाढू लागला. अन सर्वांचीच धांदल उडाली.
जो तो आडोसा शोधण्यासठी सैर वैर पळू लागला. कुणी पिंपळाच्या असंख्य गर्दी केलेल्या पानांफांदी मध्ये दडून बसलं.  तर कुणी कुठल्या छपराखाली आसरा घेतला.
आसमंत फक्त नि फक्त आता टपोर्या सरींनी अन काळ्या दाट मेघानीच तेवढ सजल होतं .
पक्षी पाखरांची रेल्चाल हि एव्हांना कमी झाली होती.
आकाशी झेप घेणाऱ्या इमारती पावसाच्या सरींनी न्हाऊन अगदी उठून दिसत होत्या . दाटी दाटीने उभे राहिलेल्या चाळी अन त्यावरील छप्पर आता चकाकू लागली होती. अगदी धुतल्या दळासारखी ..
चौकस नजर प्रत्येक क्षण अस टिपू पाहत होती.
मनाला नव चैतन्याचं , नवं विचारांचं पाठबळ बहाल करत . अशातच एका इवल्याश्या पक्षाचा थवा मुसळधार सरींमधून देखील अगदी मुक्तपणे विहार करताना दिसला . इकडून तिकडून त्याचं ठिकाणी तो चकरा मारत , घिरट्या घेत .
जोडीने पुन्हा त्याचं ठिकाणी येत . पुन्हा इकडून तिकडून फिरकत .
 जणू त्यांच्या जीवनातला तो सर्वोच्च क्षण असावा . किती मुक्तपणे ते आनंद घेत होते त्या क्षणाचा.
त्या मोकळ्या सरत्या नभात ...
इतर कोणते हि पक्षी ..त्या मुसळधार पाउसात पुढे येण्यास धजत न्हवते.
भीती असावी बहुदा ओलेचिंब होण्याची ... पण ह्यांना कसली तमा .
ते अगदी मुक्तपणे विहार करत होते. आनंद लुटत होते.. त्या क्षणाचा अन ते सर्व क्षण मी मनाच्या चौकटीतून अगदी तन्मयतेने न्ह्याहाळत होतो.
आयुष्यातील हर एक क्षण कुठली तमा न बाळगता असंच अगदी मुक्तपणे जगावं . नाही का ?
आपलाच
- संकेत य पाटेकर
१८.०७.२०१४

गुरुवार, १७ जुलै, २०१४

टप्परवेअर चा गोल डब्बा...

अहो, बघा तुमच्या दुकानातच असतील ? शोधा पाहू पुन्हा एकदा ?
घरभर सर्वत्र शोधलं. नाहीच कुठे , तुमच्या दुकानातच असलं पाहिजे ? 
 नेहमीचच आहे हे तुमचं , डब्बा दुकानातच विसरायचं . आठवण देऊनही , आठवण करून देऊनही अशी स्थिती ...आता काय म्हणू मी ह्या पुढे ?
वहिनीची आज जरा चीडचिड सुरु होती. ते स्वाभाविकच होतं म्हणा.
नेहमीची सकाळी उठल्यावर होणारी धावपळ , घाई , अन त्यात दोन दिवसापासून न सापडणारे हे टप्परवेअरचे डबे , त्यामुळे डब्याचा एक मोठा प्रश्नच निर्माण झाला होता ?
खास आम्हा दोघांसाठी म्हणजेच माझा भाऊ अन मी ' आमच्यासाठी वहिनीने खास टप्परवेअर चे महागडे डबे विकत घेतले होते . अन ते आता मिळत न्हवते.
 कुणीतरी कुठेतरी विसरले असणार हे नक्कीच , हे जाणून वहिनीने आपल्या हक्काच्या पतीवर म्हणजेच माझ्या भावावर शब्दांची तोफ डागली होती .
 मी मात्र त्यातून निसटलो होतो. वहिनी सहसा कधी मला बोलत नाही.  त्यामुळे जे काही बोल आहे ते माझ्या भावालाच ऐकावे लागे.
आज हि तसेच ते बोल ऐकून भाऊ म्हणला , 'अग नाही आहे , शोधलं सर्वत्र , नाही सापडत.

चिडूनच जरा...ह्या संक्या (संक्या म्हणजेच मी, घरी मला संक्या नावाने संबोधतात ) कडेच असतील.
भाऊची नजर अन बोल माझ्याकडे फिरले , तेंव्हा मी हि उत्तर दिले .
माझ्याकडे नाही आहे. मी त्याला ऑफिस ची Bag दाखवली , बघ नाही आहे .
तुझ्या ऑफिस मध्ये विसरला असणार , बघ गेल्यावर ...

काहीच न बोलता , हो ह्या अर्थी मान डोलावत मी ऑफिस ला निघू लागलो.
त्यांनतर असे कित्येक दिवस ओलांडले . डब्याचा कुठेच पत्ता नाही .
अचानक हे डबे गेले कुठे ? काही कळेना ? कळण्यास मार्ग नाही. कधी कधी एखादा कुणी घरी येई तेंव्हा तो विषय आपणहून निघे , तेंव्हा कुठे त्या डब्याची आठवण होई.
असंच एकदा नेहमीप्रमाणे ऑफिस ला होतो. निघायची वेळ झाली होती .
त्यामुळे पटपट ऑफिस मध्ये डेस्क वर मांडलेला सारा पसारा उरकून घेतला . अन बाहेर पडायला लागलो. तोच समोर ऑफिस प्यून येउन ठेपला .
अरे , तुझा डबा राहिला आहे का ? इथे केंव्हापासून एक डबा आहे , तुझा आहे का बघ ?
त्या बोलाने मी काही क्षण जरा भूतकाळातच गढून गेलो . घरात घडलेला तो सारा प्रसंग , वहिनीचे बोल कानी भिनू लागले.
डब्बा आपलाच असला म्हणजे?  मी त्या पाठो पाठ pantry मध्ये गेलो .
त्याने कित्येक दिवसाचा धूळ खात पडलेला , तो गोल डब्बा डोळ्यासमोर आणला.
 तेंव्हा आज घरी हशा पिकणार हे पक्क झालं.
कित्येक दिवस न सापडलेला टप्परवेअरचा तो गोल डब्बा.
माझ्याच ऑफिस मध्ये कित्येक दिवस धूळ खात पडला होता . अन मी निर्दोष आहे.
माझ्याकडे डबा नाही आहे ह्या भावनेने तेंव्हा त्यातून सुखरूप निसटलो होतो.
पण आता मात्र माझा अपराध मला स्वीकारावा लागणार होता . नकळत कित्येक दिवस धूळ खात पडला तो डबा ...आज घरी हशा पिकवणार हे अगदी नक्की होतं.
असेच आयुष्यात येणारे काही क्षण आपल्या जीवनात आनंद घेऊ येतात . मग त्या आनंदाला कोणतही निमित्त पुरेस असतं.
आज टप्परवेअर चा डब्बा हा त्या आनंदाचा एक निमित्त झाला.
वर लिहिलेल्या गोष्टी ह्या गमतीशीर आहेत , रागावलेले क्षण हे तेवढ्यापुरत आहे , त्यातही मधुरता आहे. रागात हि मधुरता आली म्हणजे नातं अधिक बहरतं .
- संकेत पाटेकर
असंच लिहिता लिहिता...
१७.०७.२०१४ हा फोटो आंतरजाळातून घेतला आहे.

शनिवार, १२ जुलै, २०१४

छत्री पेक्षा रेनकोट बरा ..

काल ऑफिस मध्ये असता फोन खणाणला.  घरातूनच होता , मोठ्या भावाचा ..
हेलो , मी रेनकोट घेतोय. सातशे ला आहे , तुझ्यासाठी हि घेऊ का , अजून एक ?
मी म्हटलं ? नको , तू घेतो आहेस ना तुझ्यासाठी ? तोच वापरेन ..
मला कुठे जास्त गरज आहे.
ट्रेकिंग ला जाताना लागेल तोच ...इतर वेळी छत्री आहेच .
भाऊ मात्र थोडा रागावूनच (असच गंमतीने हो ) म्हणाला .
' माझा रेनकोट मी देणार नाही, माझी कामे असतात अन मला बाहेर जाव लागतं रविवार हि , गाडी घेऊन (आमची दुचाकी), .. मी म्हटलं बर ..ठीक आहे . घे मग माझ्यासाठी हि एक ..
ऑफिस मधून सुटलो अन नेहमीच्या नित्य क्रमानुसार ग्रंथालयात जावून बसलो .
थोडं इकडचं तिकडच वाचन केलं अन भावाच्या दुकानासमोर (संगणक दुरुश्तीच आमचं छोटस दुकान आहे ) हजर झालो. मनात त्या घेतलेल्या गोष्टीबद्दल उत्सुकता तर होतीच .
कारण ज्या ज्या वेळी मी ह्याला काही विकत घ्यायला सांगतो माझ्यासाठी म्हणून तेंव्हा ती घेतलेली वस्तू मला मुळीच पसंद पडत नाही .
मात्र घेतलेल्या वस्तू चा दर्जा तो कापड वगैरे महागडं असतं. हे खर ...
' सस्ती चीजो का हम शौख नही रखते' ,हा दुनियादारी मधला डाईलॉग अशावेळी कधीतरी आठवून जातो.
तर असो , प्रत्येकवेळी अस घडत नाही , काही वस्तू नक्कीच पसंद पडतात . कारण त्या प्रत्येकामागे प्रेमभावना असते . ह्या वेळेस घेतलेल ते नवं कोर रेनकोट पसंदीत आलं.
बाहेर पाउसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे अंगात ते रेनकोट चढवलं .
अन टपोरया थेंबाचा आनंद लुटू लागलो. टप टप असा आवाज करत ' सरींचा' तो टपोरा स्पर्श अन त्यातून अंगभर संचारलेली रोमांचित वलय मला , नसलेल्या पण असायला हवी असलेल्या प्रेयशिचि आठवण करू देत होते.
त्यातच छत्री पेक्षा रेनकोटच बरा ..असा एक विचार त्यावेळेस मनावर उमटून गेला .
रिमझिमत्या पाउसात मनसोक्त भिजायची फार इच्छा असते. पण भिजता येत नाही . 
अशावेळी रेनकोट अंगात असला म्हणजे रिमझिमत्या त्या पाउसाचा स्पर्श अनुभवता येतो. 
तो टपोरा थेंब अंगा खांद्यावर अलगद झेलता येतो. मनभर नाचता येत बागडता येत. 
भिजून हि न भिजण्याचा एक वेगळा आनंद मिळत असतो त्यातून .. जो छत्री बाळगून मिळत नाही.
असंच लिहिता लिहिता ..
- संकेत पाटेकर
१२.०७.२०१४

गुरुवार, ३ जुलै, २०१४

खाऊ दे नाहीतर पैसे दे .

खाऊ दे नाहीतर पैसे दे ...
काल ट्रेक दरम्यान एका पायवाटेवरती ' त्या कोवळ्या चिमुरड्यांच हे वाक्य अजूनहि त्या स्वरानिशी कानाशी गुंजतंय ..आयुष्याच्या व्याख्या ची पुन्हा नव्याने उजळणी करत .
त्यावेळेस मनालाच ते वाक्य इतकं सरकन घासून गेलं कि खोल जखम व्हावी इतपत ...
त्यावेळेस हाती जे होतं ते देऊ केलं पण त्याने मन काही समाधानी झालं नाही .
 कुठेतरी ते चित्र अन ते वाक्य मनात सळ करून राहिलंय.
कळसुबाईची ती छोटी ताई असो .
पोटाच्या खळगीसाठी म्हणून भर उन्हा तान्हात झाडाचा आडोशा पकडून , 'दादाss दादाss ताक घ्याना ?
अस म्हणत मोठ्या आशेने बघणारी .
नको म्हणताच मागे मागे पळत येउन केविलवाण्या स्वराने ' दादा काही खायला द्याना ?
म्हणत काळजाच पाणी पाणी करणारी ..वा खाऊ दे नाहीतर पैसे दे ...म्हणणारी हि चिमुरडी .....
मनाला एक विचार देतात . 
अजूनही कुणाला कुणाची तरी गरज आहे . प्रेमाची गरज आहे. 
मायेच्या स्पर्शाची गरज आहे. मदतीची गरज आहे. आपलेपणाची गरज आहे.
- संकेत

शुक्रवार, २० जून, २०१४

अंकल मत कहो ना...

अंकल घाटकोपर उतरेंगे क्या ?
सकाळचं ऐन गर्दीच्या वेळी ट्रेन मध्ये धक्के बुक्के खात असता , पाठीमागून एक आवाज आला.
अंकल घाटकोपर उतरेंगे क्या ?
माझ्याच वयाचा तो ,जेंव्हा हे अस म्हणाला , 'तेंव्हा त्या वाक्यातला फक्त ' अंकल' हा शब्द एखाद्या चाबुका प्रमाणे सरकन मनावर बसला .
अन डोळ्यासमोर चित्र उमटलं.
 हाती लाकडी काठी , सुरकुत्या पडलेल शरीर , डोळ्यावर जाड भिंगेचा चष्मा , थरथरते हात , अन थकलेलं ते मन ...म्हातारपणाचं हुबेहुब चित्र अस डोळ्यसमोर उमटलं.
 क्षणभर तरी ते चित्र डोळ्यापुढून हटेना. म्हटलं , काय मुलगा आहे हा...
अजून वयाची तिशी नाही पार केली मी , तर मला हा अंकल म्हणतोय.
आणि तो हि माझ्याच वयाचा ..काय म्हणावं त्याला .
गल्ली बोलीतला एखादा मुलगा हि कधी ' दादा ' म्हणायचा सोडून जेंव्हा अंकलंच म्हणतो,
तेंव्हा ' अकालीच म्हातारपण आलं असल्यासारखं भासत.
अन मन आरश्यात आपलं प्रतीबिंद पाहून खरंच कि काय ते निरखू लागतं.
अन मन म्हणतं चल चल अजून आपण काही म्हातारे नाही झालो बुवा , तेवढ आयुष्य हि देईल कि नाही कुणास ठाऊक हा ईश्वर आपल्याला .
- संकेत य पाटेकर
असंच लिहिता लिहिता ...
२०.०६.२०१४

गुरुवार, १९ जून, २०१४

नातं बहिण भावाचं - नातं प्रेमाचं

सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात .
आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता...
त्यात बहिण भावाच्या ह्या अनमोल रत्नाचं हि समावेश असतो .
भावाचं निरागस 'प्रेम' अन बहिणीची अफाट 'माया' हे सर्वांच्या भाग्योदयी नसतं.  अन म्हणूनच मनाला एक आस लागून राहते . कायम ...
आपल्यालाही एखादी नाजुकशी फुलसुंदर भोळीभाबडी, सुंदर कोमल मनाची लाडी वाडी करणारी , खट्याळ-खेळकर अशी बहिण असावी.
किंव्हा सदैव साथ न सोडणारा , अडचणीत नेहमीच आपल्यासोबत असणारा , समजुददार प्रेमळ असा भाऊ असावा . अस सतत वाटत राहतं.
आणि आपण जे मनापासून इच्छितो ते बहुदा पूर्ण हि होतं.
जन्मतःच आपल्याला सर्व काही मिळत नाही . काही गोष्टी आपल्याला आयुष्याची झगडताना मिळवायच्या असतात तर काही ' अनमोल नात्यांसारख्या ' गोष्टी ईश्वर योग्य त्या वेळेत ' भेटी-गाठींचा कार्यक्रम आखून ' ते जुळवून देत असतो.
मग अशातच कुणाला बहिणीचं प्रेम मिळालं नसेल . कुणाला बहिण नसेल तर त्याला एखाद्या वळणावर तो तोची भेट घडवून देतो. भले ते नातं रक्ताचं नसो. पण त्या व्यक्तीत ते नातं अन नात्यातलं ते निरागस प्रेम आपल्या नजरेच्या कक्षेत बागडू लागतं. खेळकर क्षणांना सोबत करून .
बहिणीची किंमत अन तीच प्रेम तिची माया काय असते ह्याची जाण असतेच आपल्याला .
 भले हि सख्खी बहिण नसली तरीहि ...कारण त्या प्रेमासाठी आपण आसुसलेलो असतो गेली कित्येक वर्ष . पण ते प्रेम आपण इत्क्यावेळेस फक्त आपल्या नजरेनी पाहत असतो. इतर कुटुंबातील त्या भावा- बहिणीच्या जोडी कडे पाहून ....बस्स
पण कधी ना कधी आपल्याला आपल्या मनातील ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटते. एका वळणावर , अन नात जुळलं जातं विश्वासाचं .
बहिणीचं ते कृपाळू प्रेम मिळू लागतं . तोच हट्टीपणा तोच बहिण भावातला खेळकरपणा . तीच लाडी गोडी . तेच गोंडस प्रेम . क्षण अगदी फुलू लागतात . नव्याने हसऱ्या मार्गाने आनंदाचा सुगंधी द्रव्य दाही दिशांना पसरवून .. ज्या प्रेमासाठी आपण इतके वर्ष आसुसलेलो असतो. ते प्रेम आता मिळतं असतं . मिळू लागतं . त्यामुळे चैतन्याचा नवा सागरच जणू आपल्यात संचारलेला असतो.
अशा बहिणी तुम्हा आम्हाला लाभलेल्या असतात . किंव्हा एखाद्या बहिणीला आपल्यासारखा भाऊ लाभलेला असतो.
हे नातं जरी रक्ताचं नसलं तरी ..प्रेमाचं , विश्वासाचं अन मना मनाचं असतं. अन ते कायम तसंच राहावं हीच आपली प्रामाणिक इच्छा अन प्रार्थना असते भगवंताजवळ . माझी हि अशीच प्रामाणिक इच्छा अन प्रार्थना आहे . देवा ऐकतोयस नारे ...;););)
नातं बहिण भावाचं - नातं प्रेमाचं
आपलाच ,
संकेत य पाटेकर (संकेत उर्फ संकु )
१९.०६.२०१४

सोमवार, ९ जून, २०१४

विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती '

मानवी मनासारखा तो कधी भावनेशी खेळत नाही .
अन म्हणून मन दुखावण्याचा प्रश्नच उभा ठाकत नाही . अन म्हणून
कधी कधी वाटतं ' विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती ' जपण्यापेक्षा निसर्गाच्या उबदार मायेने भरलेल्या कुशीत शांत पडून रहावं. त्याच्याशीच मनमोकळेपणाने काय तो संवाद साधावा . 
तृप्त नजरेने निसर्गाच्या विवध घटकांकडे नुसतंच पाहत राहावं. 

अन त्यातून उतू जाणारा आनंद घटका घटकाने गिळंकृत करावा .
बस्स..
- संकेत य पाटेकर
 ०९.०६.२०१४

जगण्याला एक वेगळ रूपं देत ' प्रेमं.'

प्रेम हे शब्दात व्यक्त करू नये असं म्हणतात .. पण ज्यांना ते आपल्या सहवासातून कळत नाही . 
किंबहुना कळत असूनही त्याबद्दल हवीतशी प्रतिक्रिया त्यांसकडून मिळत नाही . 
तेंव्हा मात्र मनातल्या भावनेला ' शब्दात' च गुंफाव लागतं.
काही वेळा ओरडून सांगाव लागतं. अग वेडे ..प्रेम आहे तुझ्यावर ...जीवापाड ..ऐकतेसं ना ?
तर काही वेळा ओरडून हि हवा तो प्रतिसाद न मिळाल्यास निशब्द राहून ...
फक्त योग्य त्या क्षणाची वाट पहावी लागते.

प्रेम मिळेल न मिळेल हे कधीच सांगता येत नाही .
कारण  दुसऱ्या  मनाचा अचूक धागा कधीच पकडता येत नाही .
अपेक्षा तर नक्कीच असते आपली त्यांच्याकडून ते निर्मळपणानं मिळाव म्हणून ..
पण अपेक्षापूर्ती न होवूनही जिथे प्रेम केले जाते ते खरे प्रेमं ...
हव्या त्या व्यक्तीचं प्रेमं मिळालं तर हे जग स्वर्गाहून हि सुंदर भासतं. 
पण तेच जर नाही मिळालं तर खूप त्रास सहन करावा लागतो. सहन करण्याची तशी तयारी हि ठेवावी लागते.
पण एक मात्र नक्की ,ह्या सर्वांतून आपण हळूहळू का होईना प्रेमाचे धडे गिरवत जातो .
प्रेमा बद्दलची व्याख्या आपल्या मनी तयार होत जाते .
प्रेम मिळालं अन नाही मिळालं तरी..जगण्याला एक वेगळ रूपं देत प्रेमं.
खऱ्या अर्थानं नवी दिशा नवा ध्यास देत प्रेमं ..
मनातले काही ..
संकेत य पाटेकर
०९.०६.२०१४
खालील इमेज हि नेट वरून घेतलेली आहे .

शुक्रवार, ३० मे, २०१४

" मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. "

" मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. "
मुंबई -पुणे -मुंबई चित्रपटातील स्वप्नील जोशी ने म्हटलेला हा डायलॉग अगदीच फ़ेमस झाला सर्वत्र . मित्रांच्या टोळक्यात म्हणा किंव्हा कट्ट्यावर वा कुठे हि चारचौघात किंव्हा आपल्याच घरी घ्या ना , घरातले कुणी वडील धारी मंडळी किंव्हा बहिण - भाऊ रागा रागाने कधी म्हणतोच ...
" चिटकून रहा त्या मोबाईल ला ..दिवसभर कामधंदे सोडून "
" मोबाईल मधून पाहेर पडूच नकोस. अक्खा दिवस तो मोबाईल नि मोबाईल ...."
" फेकून दे तो मोबाईल आधी "

" काय वेड लागलंय ह्या मुलाला ह्या मोबाईलच "
" आग लाव त्याला " ...अशी भन्नाट वाक्य कानी पडतात . :) ;) 
सकाळी उठल्यापासून ते थेट झोपेपर्यंत (आणि झोपेतही रात्री अपरात्री )मोबाईल आपली साथ काही सोडत नाही . इतक त्यान झपाटलंय .. एक दिवस काय एक क्षण देखील मोबाईल शिवाय राहणं हि कल्पना देखील मनास शिवत नाही .
एक वेळ आपल्या लाडूल्या प्रेयशिचि आठवण होणार नाही .
पण एक क्षण मोबईल नजरेआड झाला कि हृदयाचा ठोका चुकू लागतो. :) :)
सकाळी जाग येताच भिंतीवरल्या तटस्थ घड्याळाकडे न पाहता आपली नजर थेट मोबाईल मधल्या डिजीटल आकड्याकडे सर्वप्रथम वळते . अन मग हळूच बोटं Whatsapp वरून फेसबुक वर फिरकू लागतात .

नाही म्हटलं तरी एकवार Whatsapp ओपेन करून पाहिला जातो .
कुणाचे मेसेज असो वा नसो . मग पुढचा कार्यक्रमास सुरवात होते . पुढे नाश्ता करता करता पुन्हा एकदा बोटं मोबाईल वर फिरकू लागतात . अन घरातून ऑफिसला जाईपर्यंत तो काही आपली साथ सोडत नाही .
ऑफिस मध्ये हि कामच्या वेळेस .... मधेच टीव टीव करत , ओरडत तो आपला लक्ष वेधून घेतो .   संध्याकाळच्या वेळेस ..हि तेच ..बस मधून अथवा ट्रेन मधून जाता जाता कधी गाणी कधी Whatsapp कधी फेसबुक कधी फोटो शूट तर कधी गेम्स अश्या विविध बिन कामाच्या कार्यक्रमामध्ये तो आपल्याला अगदी गुंतवून ठेवतो .
हल्ली आपण Whatsapp वर असू तर थेट संवाद न साधता बरीच लोक Whatsapp वर द्वारे आपल्याशी संवाद साधतात . खर तर तो संवाद न्हवेच .
एखादा मित्रांचा घोळका बरेच दिवसाने एकत्रित जमला असेल .
अथवा एखादा नातेवाईक बरेच दिवसाने भेटला असेल तर त्याच्याशी बोलताना , त्याचं बोलण ऐकताना आपलं अधिकतर लक्ष आपल्या मोबाईलकडे झुकलेल असतं.
हाताची बोटं देखील त्यावेळेस मोबाईल वर हळूच फिरकत असतात . ते सार बघून अर्थातच मित्र चवताळून उठतो , अबे , ठेवून दे फोन ..
घर असो अथवा बाहेर मोबाईल काही साथ सोडत नाही . रात्री उशिरापर्यंत मग घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत का असो आपण मात्र जागे असतो नजर मोबईल वर स्थिर ठेवत . कारण Whatsapp अन फेसबुक सुरु असते . मग कधी Whatsapp वर स्टेट्स अपडेट करत असतो. तर कधी फोटो .
तर कधी नुसतंच आपली आपली लाडकी व्यक्ती online आहे का ते पाहण्यात आपण गर्क असतो अन नसेल तर लास्ट सीन पाहून फेसबुक आहेच लाईक अन comments साठी.... त्यानंतरच जर आठवण झालीच , फार उशीर झालंय, आता झोपायला हवं , तेंव्हा कुठे आपण त्याला आपल्या उशापाशी किंव्हा हाताला लागेल इतक्या जवळ ठेवून घेतो.
असा हा मोबाईल दिवस रात्र आपल्या जवळ असतो . म्हणूनच " मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. " आणि ते व्यसन मला हि जडलंय. तुम्हालाही जडलंय का ? :)
असंच लिहिता लिहिता ...:)
संकेत य पाटेकर
२९.०५.२०१४

शनिवार, १७ मे, २०१४

'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."


मन हि मन में...
'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."
बरंच काही लिहायचं आहे आज ...पण कसं लिहू ?
कुठून सुरवात करू? काही कळत नाही .
"मन" नावाचा हा प्रकारच खूप अजब आहे . विचार विचार आणि फक्त विचार ..अगदी भेडसावून सोडतात . एखाद्या भुताटकीसारखं ...पिच्छा सोडत नाही
जगात सर्वात गतीवान काय असेल तर मी म्हणेन हे आपले विचार ....सतत धावत असतात सतत .
ह्यांच्या वेगाचा मोजमापाच नाही . करताच येणार नाही . करणार तरी कसं ते ...शक्य आहे का ?
दर सेकांद्ला मिनिटाला कित्येक विचार बाहेर पडतात . ते कुठून कसे येतात? कुठे जातात काही माहित नाही . त्या त्या परिस्थितीनुसार , वेळेनुसार सार घडतं . अशावेळी विचारांची संख्या हि अगणिक असते.
कधी हेच विचार मनाला पार खचून टाकतात . आपल्या दुबळेपनाच कारण ठरतात .
तर कधी तेच मनाला बळकटी प्राप्त करून देतात काल अशीच एक घटना घडली.
सकाळपासून विचारांनी अगदी हैराण करून सोडलं होतं. मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते.
असलेल्या प्रश्नाची उकल होत न्हवती .
शेवटी मनाचा निर्णय घेऊन ती उकल करण्यास काहीसा (पूर्णपणे नाही ) सफल झालो. मनाचा थोडा भार कमी झाला . प्रश्नाचं उत्तर मिळालं . मात्र ह्याचा त्रास समोरच्याला झाला . नाईलाज होता. अन तो होणारच होता. त्यासाठी माफी मागतो .
माफ कर, ...करशील का ? प्लीज
तसं दर वेळेसच आहे हे माझं . चुका करायच्या अन नंतर माफी मागायची.
 पण त्या मागे हि कारण होत. एका उत्तरासाठी धडपडत होतो . ते मिळत न्हवतं .कित्येक दिवस..
ते आज मिळालं . मनात अस काही नाही . तुला त्रास वगैरे देणं , त्रास द्यावा हा मुळीच हेतू नाही .
 आपल्या आवडत्या जिवलग अश्या व्यक्तीला त्रास देण कुणाला आवडेल का ? नाही , अजिबात नाही .
उलट कितीही काही झालं तरी त्या भगवंताजवळ एकच प्रार्थना असते नेहमी .
हे देवा ,भगवंता ' माझ्या त्या लाडक्या व्यक्तीला सदा आंनदी अन सुखी ठेव . तिच्या चेहऱ्यावरचे हास्यतरंग नेहमीच बहरू दे प्रसन्नतेच्या वाटेवर सदा ..न सदा ..
दु:खाची जर देवाण घेवाण करता आली असती तर , नक्कीच तीच दु:ख, तिच्या मनाला पिडणार्या वेदना मी हसत हसत माझ्याकडे घेतल्या असत्या . पण त्या कर्त्याने असा काही नियम लागू केला नाही .
अशी सूट दिली नाही . ज्याचं त्याचं दु:ख ज्याने त्यानेच भोगावं . हा नियम त्याने लागू केला . अन त्या नियामा प्रमाणेच आपण आता सारं सहन करतोय . त्यातून घडतोय .
आयुष्यात मला एक ' चांगला माणूस' म्हणून नाव कमवायचं आहे .
एक चांगला माणूस व्हायचं आहे आहे .
 माझ्या भाऊ- बहिणींचा एक ' चांगला भाऊ' . माझ्या वाहिनीचा चांगला दीर , माझ्या आई वडलांचा चांगला मुलगा , माझ्या पुतण्या - भाच्यान्चां एक चांगला काका - मामा , माझ्या मित्रांचा एक चांगला मित्र .
अन पुढे भविष्यात माझ्या पत्नीचा एक चांगला पती . बस्स प्रयत्नाची कसर चालू आहे .
त्यात अजून तरी सफल झालो नाही. पण शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहतील .
जुळलेल नातं कधी तोडणार नाही . ह्या मताचा मी आहे.
नात्यांच्या ह्या असंख्य धाग्यातूनच हे जीवन गुंफल आहे . वेगवेगळ्या रंगाचे स्वभावाचे हे धागे आपलं जीवन खरया अर्थाने समृद्ध करतात . जीवनाची व्याख्या अश्या विविध धाग्यातूनच तर मिळते .
कुठेतरी कधी एक धागा सैल होतो शब्दांच्या धारेने , कधी मूकपणाने ...तेंव्हा मनाची फरफराट उडते .
बस्स हे शब्द बोचू लागतात . मग सार निरर्थक वाटू लागतं.
कितीही चांगलं वागलं ..तरी कुठेतरी काहीतरी खटकत समोरच्याला .
ते आपणास कळत नाही . मग हेटाळणी सूर होते. कुणी मूकपणाने दूर जावू लागतं....
कुणी त्वेषाने बघू लागतं . कुणी दुर्लक्ष करू लागतं .
हे जाणून हि आपल्याशिवाय ती व्यक्ती जगू शकत नाही . तर कुणी मुकपनाचं शाब्दिक घाव देतं.
चुकी कुणाची हि असेना ते महत्वाच नसतं .
अश्यावेळी आपण एकमेकांना समजून कसं घेतो हे महत्वाच ..पण ...घडतं वेगळंच . तेंव्हा वाटू लागतं .....
आयुष्यात एकच असा दिवस आहे . जिथे आपले शत्रू पक्ष हि , जीवापाड प्रेम असूनही आपल्या पासून दुरावलेले...आपली हेटालनी करणारे एक चांगली गोष्ट बोलून जातात.
अगदी मनापासून, ते म्हणजे ' तो खरचं खूप चांगला होता '
असा दिवस एकदाच येतो .पण तो कधी येईल तो सांगता येत नाही .त्याचा नेम नाही .
पण आलच तर सर्वांना एकत्रित आणतो हे खरे,  तो दिवस म्हणजे आपला ' मृत्यू' शेवटची घटका. 
 हा मृत्यू हि कधी फार जवळून बघता येतो .
स्वतःच्या डोळ्यांनी ..स्वतःचाच मृत्यू . विश्वास बसत नाही आहे ना? पण येतो पाहता..
स्वतःच्या डोळ्यांनी .....जिवंतपणी .
मी तरी पाहतो ...
कोण कोण आणि कितीजण बरं अश्रू वाहतील आपल्यासाठी .
कोण येईल सर्वप्रथम ?
 त्यांच्या मनातल्या भावना काय असतील अश्यावेळी?
 आपली आवडती जिवलग व्यक्ती येईल का ?
तिच्या भावना काय असतील अश्यावेळी ? गणिताची अशी आकडेमोड सुरु होते .

पण हे सारं निरर्थक . जागेपणीच हे दृश्य मनाला ..मात्र पुन्हा चांगल्या मार्गाकडे वळवत.
तुला अजून खूप काही कमवायचं आहे . माणसं जुळवायची आहेत . हे नातं फुलवायचं आहे,  टिकवायचं आहे .
हे जीवन जगतानाच अस जगायचं आहे कि त्याचं जिवंतपणीचं सार्थक झाल पाहिजे .
मृत्यूनंतर हि प्रत्येकाच्या ओठी आपलं नाव उमटलं पाहिजे .
बस्स..जीवन असाच जगायचं आहे .
काही प्रश्नाची उत्तर हि आपल्याकडेच असतात . जुळलेल्या नात्याची , समोरच्याशी संबंधित अशी ...
पण ती उत्तर देताना मनाची तारांबळ उडते . जेंव्हा समोरील व्यक्ती अशा प्रश्नाचं सतत पाठपुरावा करत राहते . तेंव्हा खूप अवघड जातं . मनातले भाव बोलून दाखवणे . ते व्यक्त करणे . तेंव्हा शब्द बोलतात ते मूकपणाचे ....
कुठून तरी आलेले ..पण अंतरीचे ... मी हि असाच पाठपुरावा करत राहिलो तेंव्हा हे एक इंग्रजी वाक्य नजरेस पडलं.
'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."
काही प्रश्नांची उत्तर तयार असतात आपल्या मनात. हे असच का , ते तसच का ? तर्क वितर्कावर आपण बरेच निष्कर्ष काढतो हि . पण साऱ्यांच गोष्टी तर्क वितर्कावर सोडवल्या जात नाहीत.
त्यास खरेपणाची पृष्टी मिळावी लागते. त्यासाठी इतर मनाचा त्या व्यक्तीच्या अंतरीचा वेध घ्यावा लागतो. पण कळूनही काही गोष्टी स्वीकारण्याची आपल्या मनाची तयारी होत नसते .
एक तर आपलं खूप जीव असतो अश्या गोष्टींवर अशा व्यक्तींवर ... अन अशापासून स्वतःला दूर करण , बाजूला सारण फारच अवघड जातं . वाटते तितकी सोपी गोष्टी नसते ती .
एक घट्ट धागा विणलेला असतो नात्याचा . तो सहजा सहजी सोडता सोडवता येत नाही.
मन हि मन में...
असंच लिहिता लिहिता ...
नातं तुझं माझं..
संकेत य पाटेकर
१९.०३.२०१४

" अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही...


" अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही .
 "आपल्याच व्यक्तीकडून ....आपल्याच स्वकियांकडून "
हे लहाणपण एक बरं असतं.. एखादी गोष्ट नाही मिळाली तर निदान हट्ट तरी करता येतो.
आपल्या स्वकीयांसमोर...

त्यासाठी अश्रुंचा बांध फोडता येतो .रागाने हात पाय झटकता येतात.
घरभर गोंधळ घालता येतो . हवा तसा आक्रोश हि करता येतो .
पण हवी असलेली ती गोष्ट मिळविता येते. कसे हि काहीही करून.
त्यात आपला आंनद जो सामावला असतो. आपल्याला जे हवं असत ते हवंच असतं ...
बस्स आणि ते मिळवतो हि ...
त्यावेळेस फारस कळत नसतं समजत नसतं उमगत नसतं . इतर मनाचा अंदाज घेता येत नसतो.
 कुणा मनाला आपल्यामूळे किती कष्ट सोसावे लागत आहे .
किती त्रास सहन करावा लागत आहे ह्याचा हि विचार आपल्या मनाला शिवत नसतो .
आपल्याला जे हवं असतं ते बिन्धिक्तपणे आपण बोलून टाकतो .
इतर मनाचा विचार न करता . आणि ते आपलं हट्ट पुरवलं हि जातं. आपल्या मनाचा विचार करून ..
ते करावंच लागतं त्यांना...
इथे मोठ्यापणी मात्र तसं नसत. कारण अकलेचे अन समजुददारपणाचे नवे अंकुर आपल्या मनात फुललेले असतात. त्यामुळे इथे हट्ट करता येत नाही.
अश्रुंचा बांध फोडता येत नाही . रागाने हात पाय झटकता येत नाही.
हवा तसा आक्रोश हि करता येत नाही .मनातल्या मनातच कित्येक गोष्टी तश्याच दडून राहतात .
मनातल्या मनातच अश्रुंचा बांध आटुन जातो. शब्द निशब्द होवून जातात . विचारांच्या भाउक गर्दीत मन हरवून जातं.
कारण काळजी असते , थोडी भीती असते .. 
समोरील व्यक्तीची , तिच्या संवेदनशील मनाची . तिला होणारया त्रासाची.
त्यामुळे जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपल्या मनातच राहते.
त्याची पूर्तता होत नाही . काही वेळा ..., काही वेळा मात्र होऊन जाते .

मोठेपण जे लाभलेलं असतं आपल्याला,  अन म्हणूनच हवा तसा हट्ट करता येत नाही .
आपल्याच व्यक्तीकडून ....आपल्याच स्वकियांकडून .. म्हणून लहाणपण एक बरं असतं.. नाही का ?
असाच लिहिता लिहिता..
मनातलं काही...
नातं तुझं माझं...
संकेत य पाटेकर
२४.०२.२०१४

बुधवार, १४ मे, २०१४

आक्रोश मृत्यूचा ..

आक्रोश मृत्यूचा ........नि तो अखेरचा निरोप ...!!
नेहमीप्रमाणे नि त्याच ठरल्या वेळेप्रमाणे मी ऑफिस ला पोहचलो.
आज मन जरा रंगातच होते ,अन उत्साही हि , त्याच उत्साहात ऑफिस मध्ये पाउल टाकले.
अन ऑफिस मधल्या माझ्या सहाकारयांशी गंमती जमतीत दम दाटी करत माझ्या जागेवर जाऊन बसलो . काही वेळेत कामाला हि सुरवात केली . नि बघता बघता घड्याळाचा तास काटा ११ वर स्थिरावला .
 नि तेवढ्यात मोबाईल ची रिंग वाजू लागली . तो call मी रिसीव्ह केला .
पण बोलणारे त्या शब्दांनी मनावर एकच आघात केला .  डोळ्यासमोर एक एक चित्र उमटू लागलं.
वर्तमानातून माझं मन भूतकाळात केंव्हाच गढून गेलं.
 आठवणी एक एक करून बाहेर पडू लागल्या.
ती व्यक्ती अन त्या व्यक्तीचा लाभलेला सहवास ........ मन खोल विचारात हरवून गेलं.
अनपेक्षितपणे काही घटना मनावर आघात करतात ..त्यात मृत्यू हा सर्वात मोठा आघात .
एखाद्या मनाला फार मोठा धक्का देऊन जातो तो ...
तो धक्का बसला ..त्या कॉल ने, त्या कॉल नन्तर लगेच ऑफिस मधून बाहेर पडलो एक ई-मेल करून...
 आज माझ्या सख्या आत्याच अकस्मात निधन झालं.
गत आठवणीच चित्र डोळ्यसमोर घेत मी भांडूप ला पोहचलो खरा .. पण मनात एक प्रकारे भीतीच सावट पसरल होत. भीती कसली तर .......
तो आक्रोश ते दु:खद हुंदके .......मला पाहवत नाही , ऐकवत नाही ........
एखाद्याचे दु:ख तो आक्रोश ते अश्रू ..पाहवणार तरी कसे .........कुणाला
मृत्यू येतो नि जीव घेऊन जातो .
पण जाता जाता आजुबाजूच वातावरणात अश्रूमय दुखद हुंदक्यांनी अगदी ढवळून देतो .
सरणावरचे ते शांत देह निपचित पडलेलं असत काही वेळ , ' त्याला कसल्या आल्या संवेदना?
 पण तरी हि हे मन हे माहित असता म्हणत स्वतःशीच...
'' अरे , नका अग्नी देऊ रे त्या देहाला'' ..
किती त्रास होईल , चटके लागतील , भाजेल अंग ..कुणीतरी थांबवा हे ...थांबवा हे ..............पाहवत नाही रे ..
पण देह तो शेवटी अग्नी मध्ये विलीन होतो .......नि अखेरचा निरोप घेतो .
काही दिवसा पूर्वीच घडलेली ती भेट ..शेवटी अखेरची ठरते .
संकेत य पाटेकर
मनातले काही
२४.०५.२०१३

नातं तुझं माझं ..

ज्या व्यक्तीवर मनापासुन प्रेम अन जिव्हाळा असतो.
त्या व्यक्तीच्या सहवासासाठी आपल 'मन' प्रत्येक क्षणी धडपडत राहत.

कधी फोन वर , तर कधी SMS ने,  तर कधी प्रत्यक्ष भेटून वगैरे , आपण त्या व्यक्ती पर्यंत पोहचण्याचा तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्नात असतो .
काही कारणास्तव जर त्या नात्यात दुरावा वाढला असता , संपर्क तुटला असता
 'भेटीची ती ओढ'' अधिकच प्रमाणात वाढते , अन ज्यावेळेस अप्रत्यक्षरीत्या जेव्हा तिची जेव्हा भेट घडते.
तेंव्हाचा तो आनंद काही औरच असतो , जो शब्दात वर्णन करता येणार नाही .
त्या भेटीत तो इतक्या दिवसाचा मनात असलेला राग ..क्षणात कुठे पळून जातो.
कुणास ठाऊक , शब्द हि ओठावरच अडले जातात.
मुके होतात जणू,.
कान टवरले जातात ते फक्त तिच्या एक एक प्रेमळ शब्दांची गुंफण ऐकण्यास....
नजर हि गुंतली जाते ते तिच्या आपल्याबद्दल असणार्या प्रेमळ भावना टिपण्यास ..............
पण वेळ मात्र नेहमीच्याच तिच्या स्वभावाप्रमाणे पुढे निघून जाते , ते क्षण मागे टाकून...
असलेल्या गैरसमजुतीचे निरासन करून ...नात्यातले रुसवे तोडून ...
मनातले काही ..
नातं तुझं माझं
संकेत य पाटेकर

















Hiiiii.... मला आज भेटायचं , भेटशील??
तिच्याकडून ऊतर मिळेल ह्याची शाश्वती न्हवतीच , तरी सुद्धा whatsapp वर आज तिला मेसेज केला.

प्रत्येक वेळेस काही विचारला असता तिच्या कडून कसलाही प्रतिसाद मिळत नसे.
असे कित्येक दिवस ओलांडले ,महिनो महिने उलटले , एक वर्ष उलटल हे असंच चालू आहे .
 ना फोन , ना मेजेस , ना भेट , ना बोलनं. नात्याची ती रेशीम गाठ जणू ढिली होत चालले .
संवाद हा नात्यातला महत्वाचा दुवा , तोच इथे नाही , मग हे असच होणार. ..
मन विचारांच्या असंख्य गर्दीत हरवणारच ..
माणूस हा स्वतहा पेक्षा दुसर्यांच्याच विचारांमध्येच अधिक गुंतलेला असतो, रममान असतो.
आणि म्हणून नात्यात जिथे प्रेम अधिक दृढ ..खोलवर रुजलेल असतं. तिथे त्या व्यक्तीशिवाय इतर विचार मनात शिवत हि नाहीत.
' प्रेमासारखी अजब गोष्ट ह्या दुनियेत नाहीच ' .
प्रेम अन नातं , नातं अन प्रेम , ह्या शिवाय दुसरा विषयच माझ्या मनात तसा फिरकत नाही.
का ? का कुणास ठाऊक ..नातं अन अन प्रेम ह्या विषयक इतकी आपुलकी कशी निर्माण झाली.
असो छानच आहे , देवाने दिलेली ती देणगी आहे आणि ती सांभाळायला हवीच.
 पण ते सांभाळता वेळ अन परिस्थितीशी सांगड घालावी लागते आणि त्यात आपलं अनमोल नातं अन त्यातल निरागस निर्मल प्रेम जपाव लागतं.
माणसं बदलतात अस म्हणतात , 'तू फारच बदललाय स रे ? तू फार बदललीस गं ?
असे प्रश्न एखाद्य्ला आपण विचारतोच ..कधी ना कधी..
कारण सुरवातीचे त्याच्या सोबत तिच्या सोबत घालावालेले ते क्षण आणि आताचे हे क्षण ह्या मध्ये बराच फरक , बदल आपल्याला जाणवायला लागतो , दिसतो प्रत्यक्ष , आणि म्हणून आपण त्याना बोलून जातो.
तसे काही बदल आपल्या अपेक्षानुसार असतात, घडायला हवे असे आपण मानत असतो.
 पण काही अपेक्षा नसताना घडतात , तेंव्हा मात्र मनाला चटके बसतात.
माणूस परिस्थितीशी झुंजता झुंजता स्व:तहा झिजून निघतो...आणि ते आपल्यला बघवत नाही.
आणि त्यात आपली जिवाभावाची व्यक्ती असेल तर मग मन बैचेन झाल्यावाचून राहतच नाही.
 ती तिथे दुखाने पोळली असता, आपण अस आनंदाच्या लहरींमध्ये तरंगायचं ?
अस कस हा विचार मनाला शिवून जातो. नि आपण काय करू शकतो जे केल्याने ती व्यक्ती ह्यातून बाहेर पडेल ? ह्याच्या विचारात गुंततो.
काही वेळा मार्ग दिसतो , काही वेळा नाही . सर्वच गोष्टी तश्या आपल्या हाती नसतात.
जे समोर आहे ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नसतो.
काहीवेळा आपल्याला बघ्याची भूमिकाच स्वीकारावी लागते. पण अशावेळी मन मात्र आपल धडपडत , तळमळत .......केवीळवान होत .
मनातले काही
नातं .....तुझं माझं
संकेत य पाटेकर
२२.०१.२०१३
 ______________________________________________________________________ ______________________________________________________________________
सहज रस्त्याने चालत होतो. रात्रीचे ९ वाजले होते. रस्त्यावर फार तशी रहदारी हि न्हवती.
पाउस हि आताशी कुठे निवांत झाला होता . दोघे हि तसे शांत मनाने एक एक पाउलं हळूच पुढ टाकत होतो ,पण तिच्या मनात मात्र विचारांच्या गतीने अधिक वेग घेतला होता. चेहर्या वरून तिच्या ते स्पष्ट दिसून येत होत.
जवळचीच , पण विश्वासातील कुणी व्यक्ती सोबत असल्यास ,मनात सळनारया मनातल्या गोष्टी मनात राहत नाही , त्यांना एक मोकळी वाट मिळते, त्यांचा मार्ग खुला होतो . समोर तशी व्यक्ती असल्यास .
संकेत , खूप कंटाळले रे ,
अस वाटतं दूर जाव कुठे तरी ..........
चालता चालता तिच्या मनातल्या विचारांचे बंदिस्त दार तिने आता उघडायला सुरवात केली होती . एखाद्यावर दृढ विश्वास असेल तर मनातल्या अगदी संवेदनशील भावना हि आपण समोरील व्यक्ती कडे व्यक्त करून टाकतो , मन मोकळ करून टाकतो तसं तिनेही केल . तीच मन मोकळे करायला .
संकेत , खरच खूप कंटाळले रे ,
लग्न होत नाही अजून ?
बघ ना कुणी असेल तर ? तिच्या कडे पाहून मी स्मित हास्य केल .
अन म्हणलो होईल ग , भेटल भेटल .. पण कधी ?
प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते ग , त्या त्या वेळी भेटी गाठी घडत असतात.
नाती जुळत असतात. त्यामुळे बिनधास्त रहा . सर्व काही सुरळीत होईल . समजावण्याच्या हेतूने मी तिला म्हणालो .
मम्मी - पप्पा ना हि उगाच त्रास ना , पप्पा असे काही बोलत नाही ,पण त्यांच्या हि मनात माझ्या लग्ना बद्दलचा विषय चालूच असतो . स्थळ येत आहेत रे , पण मुलगा वयाने माझ्या पेक्षाही ६ - ६ वर्षाने मोठा, अस , मला ते पसंद पडत नाही, मी नाकारते मग आलेलं स्थळ . मम्मी मग त्यावर बडबडते , नाराज होते.
त्या दिवशी खूपच त्रास झाला होता रे ह्या सगळ्याचा , मी मनातलं सर्व भाव लिहून काढायला सुरवात केली होती , एका कागदावर , अन लिहून हि काढलं. त्यावेळेस अस वाटत होत कि स्वतःचच काहीतरी बर ...
अग वेडी आहेस का ? मी तिचे वाक्य पूर्ण होऊ न देता तिला दटावूनच म्हणलो .
अस भलत सलत काही करायचं नाही , मनात अस आणायचं हि नाही . कळल. जीवन एकदाच मिळत ..आणि ते जगावं, भले ते किती हि दुखाने व्यापलेले का असो,
तुला माहित आहे . माझी एक मैत्रीण आहे . ती ने असंच एकदा मला एक हादरा दिला होता .
अचानक बोलून कि , मला जीवनाचा कंटाळा आला आहे , मी जीवन संपवीत आहे . तिच्या त्या बोलण्याने मी गोंधळून गेलो होतो तेंव्हा , काय कराव ते हि कळत न्हवत.
माझे फोन calls हि उचलत न्हवती , तेंव्हा मनाने मी अगदी सैर वैर झालो होतो . . पण नंतर मात्र तिने call उचलला तेंव्हा मी तिच्याशी जे काही बोललो , ते तिने अगदी मनाने ऐकल .
तिच्या घरी हि सेम प्रोब्लेम , पण सोबत जॉब , तीच करिअर, अशा अनेकानेक गोष्टी तिला त्रास दायक ठरत होत्या. त्यानेच तिची मनस्थिती ढासळली होती . तशात तिने तो निणर्य घेतला होता.
माणसाने आलेल्या परिस्थितीशी झुंजायचं असत . तिला शरण जायचं नसत . शरण जाणे म्हणजे हार पत्करणे.
त्यावेळेस तिने माझे हे बोल , शब्द ना शब्द अगदी मनापसून ऐकले . एवढ बोलून मी जरा शांत राहिलो.
,निशब्द झालेल्या माझ्या चेहऱ्याकडे पाहून , तिने बोलायला सुरवात केली . खरच यार , मला वाटत होत कि माझंच दुख फार मोठ आहे. पण माझ्या पेक्षा हि कुणी अधिक दुखी आहे . ह्याची मला कल्पना न्हवती . तिच्या ह्या वाक्याने मात्र मला माझ्या आवडत्या लेखकाची वपुंची आठवण झाली .
त्यांच्या कथा कथानातील अनामिक ह्या पात्राची.......
- संकेत पाटेकर
मनतले काही ..
नात तुझ माझ

मंगळवार, १३ मे, २०१४

'प्रिय 'आई‘

ह्या पूर्वी मी कधीच तुला पत्र लिहिले नाही.
कसे लिहतात ते हि मला ठाऊक नाही. पण आज लिहावयास घेतले. कारण तुझी खूप खूप आठवण येते गं !
नि येत राहते .
I Love you आई ...
आता म्हणशील हे काय नवं खूळ ? अस मी कधी तुला म्हणालो हि नसेन , म्हणायची ती तशी गरजच भासली नाही . प्रेम काही शब्दात व्यक्त करायची गोष्ट नाही .
पण आज म्हणतो , कारण तू सोबत नाहीस. मायेचा हात पाठीशी आहे. पण ...तू जवळ नाहीस .
I Love you आई …
क्षण बघ ना कसे हे , मनास कधी खूप आनंद तर कधी दु:ख देऊन जातात .
‘मोठे’असल्याची  जाण क्षणो क्षणी करवून देतात .

लहानपणी सतत वाटायचं गं...कधी आपण मोठे होऊ , कधी ह्या शाळेय अभ्यासातून सुटू ..
कधी ऑफिसला जावू..मस्त मज्जा नि धम्माल करू…
पण ह्या सगळ्याच्या अगदी उलट वाटतं गं आता…
वाटतं पुर्वीसारखं पुन्हा लहान ह्वावं. तुझ्या संगतीत , तुझ्या मायेच्या उबदार कुशीत शांत पडावं .
नि तुझ्या मंजुळ गोड आवजात ती ‘ बहिण भावाची ‘ गोष्ट पुन्हा ऐकावी .
ती गोष्ट आज हि मला आठवते.
बहिणीची भावा वरची वेडी माया , तिने त्याचे वाचविलेले प्राण . किती आत्मयतेने ऐकायचो गं ती गोष्ट. 
तिथपासून कुणास ठाऊक , माझी हि एखादी सख्खी बहिण असावी अस सतत वाटत रहायचं.
अन अजून हि वाटतं तसं, त्यासाठी मी तुझ्याकडे हट्ट हि करायचो , आठवतंय तुला ?
मला बहिण हवी अस म्हणून तुला किती त्रास द्यायचो न्हाई ?
 त्यावर तुझं नेहमीच ठरलेल उत्तर असायचं.
“आणू हा आपण, हॉस्पिटल मध्ये जावू नि घेऊन येवू तुझ्यासाठी एक बहिण “
तेंव्हा तुझे हे लाडीगोडीचे शब्द ऐकून मी कुठे शांत व्हायचो .
अन पळत सुटायचो बाहेर खेळायला. .आज ह्या सर्व गोष्टी आठवतात नि हळूच डोळे पाणवतात.
बघता बघता बघ ना हे क्षण कसे निघून गेले ते काही कळलंच नाही.
त्याचबरोबर तू हि हळूच दूर निघून गेलीस. फक्त जाताना बोलून गेलीस.

 “ मी कुठेही असले तरी तुमच्यावर माझी नजर असेल '' 
तुझे हेच वाक्य मला वाईट प्रवृत्ती पासून दूर ठेवतात ..आई.. !
तुने केलेलं चांगले संस्कार कधी हि मोडणार नाही .
आज खूप आठवण आली तुझी , म्हटलं लिहावं काहीतरी ...नि सर सर लिहू लागलो एक एक ओळ .

आयुष्याच्या माझा प्रवास आता कुठे सुरु झाला आहे . नि एक एक गोष्ट त्या प्रवास दरम्यान हळू हळू समजू लागली आहे. आयुष्यं हे खरच खूप गुंतागुंतीच आहे गं …
इथे प्रश्न अनेक निर्माण होतात , एका मागोमाग रांगेत उभे…
जणू वारूळातल्या मुंग्यांप्रमाणे. त्याची उत्तर मात्र , जवळ नसतात कधी.
शोधावी लागतात ती….कधी पळतं , धडपडतं , तर कधी शांत पणाने… शांत मनाने.
लहानपणं एक ठीक असत गं …
मनात तसं ठेवण्यासारखं काहीच नसतं. जे असतं ते आपण मनमोकळेपणाने बोलून टाकतो . तिथे काही लपविण्याची गरजच नसते. पण एकदा का मोठे झालो , नि जबाबदारीचे एक एक भार अंगा खांद्यावर येऊ लागले कि , मनात असणाऱ्या गोष्टी बाहेर पडतच नाही.
त्या मनातच दाबून ठेवाव्या लागतात .  जोपर्यंत आपल्या मनाला साजेस अस समजून घेणारं एखादं दुसरं मनं सापडत नाही .

 खूप काही गोष्टी आहेत. ज्या आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात. त्याचा बारकाईने विचार केला असता त्यामागचं सत्य काय ते उघडकीस येतं. अन मनं शहाणं होतं.

आयुष्य हि एक शाळाच आहे गं ! इथे शिकविणारे हे समाजातीलच सर्व घटक आहेत , अन हा निसर्ग हि आहे जोडीला शिकवायला. . मनास आकार द्यायला .. अनुभवाचे धडे गिरवून.
असो , बऱ्याच गोष्टी शिकलोय आई. अन शिकत राहीन अजूनही , जोपर्यंत माझा हा जीवनपट चालू राहील.
तुला ठाऊक आहे ?
ह्या प्रवासा दरम्यान मला अनेक चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभला आहे.
त्याचं भरभरून प्रेम हि मिळत आहे.  आपण जस वागतो , तसे लोक आपल्याशी वागतात.

आज एकमेकांशी न बोलणारे , एकमेकांत वाद असणारे , माझ्याशी मात्र चांगल्याने बोलतात.
 कारण मी त्यांच्याशी तसा प्रेमाने मिसळून राहतो .
प्रेमानं माणसं जोडायला तूच तर शिकवलेस. हे सर्व तुझे संस्कार आहेत आई , ते मी विसरणार नाही.
खूप बर वाटलं आज तुझ्याशी बोलून ........मन हलक झालं.
 तू जवळ असावीस अस नेहमीच वाटतं.
 कारण ''आई'' हि हाक मला द्यायची आहे , दि देता येत नाही.
तुझ्या उबदार मायेचं स्पर्श मला हवा आहे. तो मिळत नाही आहे.
 पण असो , तुझ्यासारखेचं मायेचे काही जण आहेत, जे मला आपल्या मुलाप्रमाणे मानतात.
मुलाप्रमाणे प्रेम करतात . पण तरीही शेवटी आई हि आई च असते ना ?
प्रेम स्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावुं तूज आतां मी कोणत्या उपायीं ?
I Love you आई …
तुझाच लाडका…
संकेत
मनातले काही..

शुक्रवार, ९ मे, २०१४

क्षण घडवतात अन आपण घडत जातो ...


क्षण घडवतात . अन आपण घडत जातो .
आयुष्यात एक गोष्ट शिकलोय .
सुरवातीला वाटायचं हि जी नाती आहेत . चार भिंती पलीकडची .
जी मी माझ्या आयुष्याच्या प्रवासात नव्याने जुळवली आहेत . ती मला कायमची जपायची आहेत.
तुटू द्यायची नाही आहेत. भले कितीही वाईट प्रसंग येवोत.
मला ती जपायची आहेत बस्स. अन त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असायचो , भले कुणाकडून हि मनाला कितीही शाब्दिक घाव बसले तरीही, कुणी मान अपमान केला तरीही, कुणी कितीही दुर्लक्ष केल तरीही, कुणी बोलायचं थांबल तरीही.
मी माझ्या स्वभावानुसार पुन्हा बोलता व्हायचो. मागचं सार काही विसरून . कारण ते नातं हव असायचं मला . पण हळू हळू हे जाणवू लागलं कि नाही .
जुळलेल्या नात्यांपैकी काही नाती हि क्षणाचेच सोबती आहेत . काही नात्यांना आपलेपणाची किंमतच उरली नाही आहे.   भगवंताने नेमून दिलेलं कार्य करून ते आपल्या ' आयुष्याच' परीघ रेषा ओलांडून पुढे निघून जाण्याच्या तयारीत आहेत .
मग त्यांना रोखणारे आपण तरी कोण ? ते त्यांच्या जीवनाचे वाटकरी... काही अवधी साठी ते आपल्या जीवनाच्या वाटेवर चालू लागतात . बोलू लागतात . अन मग निघून जातात .
त्यामुळे जे जाणारे आहेत ते जाणारच कसेही करून . बस ह्यापुढे आपण त्यांना रोखायचे नाही.

उगाच नातं नात करत बसायचं नाही. त्यातच गुंतून राहायचं नाही .
आपल्या परीने आपण चांगल वागावं. हसावं , बोलावं. जे जाणारे आहेत ते जातील . काही आपल्या बरोबरीने सोबत चालतील . किती अवधी साठी ते मात्र सांगता येत नाही.
कारण ज्याचा त्याचा जीवनमार्ग ...
कोणतीही व्यक्ती कितीही अनुभवाने मोठी असली तरी अन त्यांच्या अनुभवाचे पाठ त्यांनी आपल्याला सांगितले तरीहि आपले अनुभव शेवटी आपल्यालाच अनुभवावे लागतात . 
अन ते अनुभवी धडे त्या त्या वेळेनुसार आपल्याला परिस्थिती नुसार मिळत जातात .
असंच लिहिता लिहिता ..
- संकेत य पाटेकर
०९.०५.२०१४