बुधवार, १५ जानेवारी, २०२०

Let's Enjoy

जगताना कधी कधी नित्य नेहमीतलं काहीतरी हरवल्यासारखं जाणवत राहतं.
मनाची स्थिर घडी कुठेतरी अस्थिर झाल्यासारखी होत राहते.
कळत असतं नेमकं काय खुपतय, काय असह्य होतंय..आपल्याला,
पण उघडपणे बोलता येत नाही. आणि टाळू म्हटलं तरी टाळता येत नाही.
कारण प्रश्न नात्याचा असतो.
नात्यातल्या त्या हळव्या हसऱ्या आणि आनंदी मनाचा असतो.
बांधलेल्या कित्येक स्वप्नांचा असतो. अगणित पुढच्या क्षणांचा असतो.
त्यामुळे नात्याला कुठेही तडा जाऊ नये , ते दुखावलं जाऊ नये.
ह्याची मन काळजी घेत राहतं. तसं प्रयत्न करतं ..
स्वतःलाच बजावत ...
' संयम ठेव रे बाबा, उगाच अस्थिर होऊ नकोस.
प्रश्नाच्या जाळ्यात अजिबात फसू नकोस ?
हे अविचारांचं जाळं आधी क्षणात मिटवून टाक.
निश्चिंत राहा. मन आभाळी ठेव.
येणारी योग्य वेळच तुला सारं काही मिळवून देईल.
Let's Enjoy this Moment...
क्षणांचा महोत्सव करता आला पाहिजे.
कळतंय ना ?
- संकेत पाटेकर
१३.०१.२०२०





Hanging Pendant Ceiling Lamp
Kharedibazar

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

कुणी तरी हवं असतं...


कुणी तरी हवं असतं...! मला नाही मांडता येत रे , तुझ्या सारखं असं काही, पण सांगू... कुणी तरी हवं असतं आपल्याला , आपल्या जवळ बसून ,आपलेपणाच्या संवादात हरवून देणारं असं कुणी... आपल्या नजर कवाड्यातून मनातलं अचूक भाव ओळखणारं कुणी.. आपल्या मनाला जाणंणारं, हवं तेंव्हा, हवं त्या क्षणी , हवं त्या वेळी, कुठूनही , कसंही हळूच येऊन ,आपल्याला थोपवणारं, घट्ट मिठीत घेणारं,आपल्यात मिसळणारं,हसवणारं , छेडणारं, वेडं म्हणणारं आणि म्हणवंणार कुणी... कुणी तरी हवं असतं....रे . कधी रागावणारं, कधी लाड पुरवणारं, प्रसंगी समजून घेणारं, समजून देणारं, आपली काळजी वाहणारं , काळजी घेणारं, आणि भरभरून प्रेम करणारं कुणी.. कुणी तरी हवं असतं ..... । आपल्या मनाची हि बाजू घेणारं.., मनातून मनाशी नातं जोडणारं, आपलं वर्तमान आणि भविष्य घडवणारं...आपलं स्वप्नं होणारं, आपल्यात विसावणारं, कुणी तरी.. कुणी तरी हवं असतं रे..... एकटेपणात साथ देणारं, आणि एकांतात हि आपल्या मनाला सुगंधित करणारं.. कुणी तरी हवं असतं...बस्स..! ~ संकेत पाटेकर


रविवार, १४ जुलै, २०१९

जगणं


शालेय जीवनात , वडीलधारी मंडळींना पाहून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं ,हाती बॅग वगैरे घेऊन, टापटीप होत ऑफिसला निघायचं. आणि आपल्या मर्जीनं वाट्टेल तेंव्हा घरी यायचं.
ना कुठल्या पुस्तकीय अभ्यासाच टेंशन, ना कुठला गृहपाठ , ना कुठली परीक्षा आणि रिझल्टच टेंशन..
मुक्त आणि मनासारखं जीवन..है ना ?
कसलंच कुठे बंधन नाही. कुणाचा ओरडा नाही, अभ्यास नाही केला म्हणून मार नाही. शिक्षा नाही. दटावणी नाही. कसलं आणि कसलंचं टेन्शन नाही.
आपली लाईफ आणि आपण, मोकाट अगदी..भारी ना ?
किती हे अप्रूप ?
वेड्यावाणी ही, अशी स्वप्नं डोळ्यात साठवून घ्यायचो .
कोवळं वय , त्यामुळे तितकीशी जाणीव कुठे ? आणि कुठे होती ?
मित्रांच्या घोळक्यात आणि मोकळ्या मैदानात उरलेला वेळ असाच सरत जायचा.
बरं, तेंव्हा मोबाईल ही न्हवता , हे नशीब, पण तरीही सगळा मित्रावळ जमा व्हायचा. धुडगूस घालायचा.
किती ते मैदानी खेळ बरं? आठवतंय का ?
सोनसाखळी पासून, पकडा पकडी, चोर शिपाई, खांब खांब, अबादुबी, सोमवार मंगळवार, राजा राणी (गोट्या) , लपंडाव, आंधळी कोशिंबीर..,पंतग, क्रिकेट, भोवरा.., ना ना तर्हा आणि खेळ,
वेळ पुरायचा नाही.
मात्र तो एक प्रश्न मनाच्या काठावर सतत तरंगत राहायचा.
" कधी एकदाचे मोठे होऊ आणि कधी एकदाचे आपण ह्या शालेय जीवनातून मुक्त होऊ ?
हळूहळू हे दिवस ही सरत गेले. शाळा घर, मित्र अभ्यास आणि सोबत मस्ती..ही सुरूच होती.
वय मात्र वाढत होतं , शरीर मनाची ही वाढ होत होती.
बाळंसं धरून मिसरूड फुटताना, थोडी समज ही आता येऊ लागलेली.
त्यातच तरुणपणाचा उंबरठा हा हा म्हणता नशिबी आला
आणि खेळता बागडता डोळ्यात साठवलेलं ते स्वप्नं सत्यात उतरू लागलं.
एक अध्याय संपला. शालेय शिक्षणातून मोकळीक मिळाली. दुसरा नव्या अध्यायाला प्रारंभ झाला.
" कश्यासाठी पोटासाठी " म्हणत चौकटीतली नोकरी जाळं पसरू लागली.
बदलाचे असंख्य वारे सोबत घेऊनच..
एखाद्या चित्रपट फिती प्रमाणे जीवनपट त्यानं बदलू लागलं. वर्ष नि वर्ष सरू लागली.
जबाबदारी आल्या, वाढल्या ..त्याही सोबत टांगत्या जाणिवा आणि उणिवा घेऊनच आणि त्या सोबतच अपेक्षा निराशा आदि इत्यादी भाव भावकीचा खेळ..
"वयाने वाढलो वा मोठ्ठ झालं" की ह्या अश्या जबाबदाऱ्या ..गळाभेट घेतात हे तेंव्हा कुठं माहीत होतं.
डोळ्यात साठवलेलं आत्तापर्यंत ते अप्रूप आणि त्यातली ही आजची सत्यता पाहिली तेंव्हा कडवट पणने हसलो.
कधी मोठे होऊ आपण ? हे स्वप्नं उराशी बाळगून असायचो तेंव्हा आणि आता
लहान असण्यातच खरं सुख होतं रे, ही जाणीव हळवं स्मित चेहऱ्याशी उमटवत नेते.
सुखी होतो रे तेंव्हा.
खरंच..!
लहानपण देगा देवा...
डोळे क्षणभर त्या आठवांत मिटले की
गुलजार ह्यांच्या ओळी नेमक्या ओठी येतात.
" ज्यादा कुछ नही बदला उम्र के साथ..
बस्स , बचपन की जिद् समझोते मै बदल जाती है.."

खरंय,
जे चित्र डोळ्यासमोर उभं केलं होतं. मोठ्यांना पाहून,
त्या चित्राचा डोलाराच क्षणार्धात गळून पडला.
किती ती आव्हानं, किती तो संघर्ष, किती तडजोड, किती कष्ट, त्या वेदना, दुःख आणि टोचण्या..आणि बंधनं,
स्वतः करिता हि वेळ नाही , मग स्वतःच्या अपेक्षापूर्तीच काय ? जाऊ दे,
कसलं आणि हे कुठलं आलंय मुक्त जीवन..
ही देखील एक बंदी शाळाच...
स्वतःचा आनंद जेंव्हा असा मोडीत निघतो. वा दडपून राहतो आतल्या आत मनात, तेंव्हा वपु हळूच थोपवुन धरतात..जगण्याला नवा आयाम देत.
" आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं. आयुष्याचा महोत्सव करायचा असतो "
शेवटी प्रत्येक अवस्था ह्या जगण्यासाठी असतात.
बालपण असो, तरुणपण असो..
इथे कणकण जगणं महत्वाचं.
आत्ताचा आनंद महत्वाचा, आत्ता चा क्षण महत्वाचा,
उद्याच्या स्वप्नांसाठी ..
कळतंय ना रे ?

उठ .. कणकण जगून घे एकेक क्षण , थांबायचं नाही कुठे. चालत राहायचं. आनंदाची वहिवाट शोधत..
- संकेत पाटेकर 

http://www.sanketpatekar.com/


मंगळवार, २५ जून, २०१९

प्रवाह..

पहिल्या भेटीत किंव्हा त्या आधी सुरु असलेला ‘दोघातला ‘ तो ‘मुक्त नि हसरा संवाद’  पुन्हा तसाच अगदी पहिल्यासारखा उत्साहित आणि  प्रभावित  राहील का  ? राहू शकतो का ?
 हे निश्चित कधीच सांगता येत नाही . 

कारण व्यक्ती स्वभावानुसार  किंव्हा क्षणा प्रसांगानुसार ,  होणारा भावनांचा चढ उतार, मनाच्या पुढच्या वळणाला सर्वस्वी कारणीभूत ठरतो. आणि जे घडणार  आहे ते घडतं.
जे  खरं तर आपल्याला नको असतं.  पण ते घडतं आणि त्याला कारणीभूत आपणच  असतो.

कळतंय , काय म्हणायचंय ?
मनाचा कल नक्की कुठे ? हेच कधी कळून येत नाही. आणि त्यामुळेच हे सगळं निर्माण होतं.

हि अस्वस्थता ..हि चलबिचलता ..हि अस्थिरता …
कठीण असतं बुवा  हे ..मनाचं प्रकरण   ?

नव्याची आस धरतं. भेट घडवतं. ओढ निर्माण करतं.  बोलतं  करतं  आणि एकाकी  निवळतं सगळं  ..साऱ्यासह…
कळतं हि नाही   …कधी ? काय? कसं ? आणि  कुठे ?
फक्त प्रश्न निर्माण होतात  ? ज्याचं उत्तरं आपल्याकडे तेंव्हा नसतं.  आणि कदाचित मिळणारं हि नसतं .
पण हे कदाचितच हा .. पुढे सकारात्मक पाऊलं उचलायला हरकत नसावी.
पण तसं होत नाही.  आपण हताश होतो.  असलेला संवाद हि मिटवतो आणि  कुठल्याश्या गर्दीत स्वतःला गुरफटून घेतो.  न काही सांगता न काही बोलता …

प्रवास इथूनच सुरु होतो मग,  जुळवलेल्या नात्याचा ..
पूर्वेकडून पश्चिमेकडे …
कळतंय ?
सहवासात घडतात म्हणतात मन ..
पण तरीही का बिथरतात हि मन ?
कठीण आहे बुवा.. हे मनाचं सारं प्रकरण ..!
कळतं असतं पण जुळवून घेत नाही.
हृदयातले भाव ओठावर येऊ देतं नाही..?

मन कि बात समजेलच कशी  मग ?
मनात जागा निर्माण व्हायला  ‘सहवास’  आणि त्याचबरोबर ‘संवाद’  लागतो.
आणि संवादाचं हे हसरं अंकुर हृदयाशी रुजलं कि प्रेमाचं बीज फळफळायला  वेळ लागतं नाही.

तू संवाद ठेव . मुक्त मोकळा ..
मी  होतो परीघ आभाळाएवढा …
लव्ह यु …
उगाच – सहज सुचलेलं

– संकेत पाटेकर
http://www.sanketpatekar.com/






रविवार, ३१ मार्च, २०१९

'एक एप्रिल आणि ती'

तर उद्या १ एप्रिल ..हाय, उगाचच कुणाला फसवत बसू नका..   
कारण काय तर उगाच्च हंस होतं ओ,  
मला चांगलाच आठवतंय , म्हणजे मी विसरू शकणारच  नाही...
काही वर्षांपूर्वी , 
बरोरबर ह्या तारखेला ...म्हणजे १ एप्रिलला , सहज फोनवरून बोलता बोलता, माझ्या एका मैत्रिणीनें   मला  ''आय लव्ह यु '' म्हणून  चक्क  लग्नाची मागणी घातली होती. ..
WILL YOU MARRY ME ?
मैत्री होती इथपर्यंत ठीक  होतं ओ , त्यामुळे बोलणं हे  असायचंच.,, पण असं अचानक भयानक काही ऐकायला  मिळेल ह्याची मला हि ग्वाही न्हवती. 

तिच्या ह्या अश्या मागणीने काय बोलावं तेंव्हा कळेना  सुचेना ,जणू विचारांनी पळवाट शोधली होती . 
मी म्हटलं मला थोडा वेळ दे ,  सांगतो तुला आणि तो दिवस झोपच नाही हो ...
नुसती आलटा पालट मनाची ...

हो म्हणावं कि नाही  ? हा मोठ्ठा प्रश्न  'आ 'वासून उभा होता ?
कारण माझ्या मनात असे काही भावच उमटले न्हवते  , हा असा विचारच कधी शिवला नव्हता. 

ह्या अश्या गोंगाटातच 
दुसरा दिवस उजाडला आणि  पुन्हा मनभर कल्लोळ माजला.  म्हटलं जाऊ दे , जे होईल ते होईल , बघू तिचा कॉल आला कि , 
ऑफिसला निघालो आणि प्रवासातच तिच्या नावाने फोन खणाणला, .
ते पाहून क्षणभर कपाळावरच्या आठ्या विस्तारल्या गेल्या ...हृदयाचे ठोके हि श्वास रोकुन दडून राहिले.  
कॉल उचालला गेला. 
हॅल्लो SANKY ,  (प्रेमाने म्हणायची ओ .. )
फसलास ना ? 
खरं वाटलं ना तुला ? अरे येडपट काल एक एप्रिल होतं ..
‘’एप्रिल फुल ‘’
लहान मुलीने तिच्या आनंदात जश्या टाळ्या पिटाव्यात , उडया घेऊन ...तसं क्षणभर मला तीच बोलणं ऐकून वाटलं , तिच्याच बाबतीत ..
तरतर  तिने एकदाच काय ते  बोलून टाकलं आणि तेंव्हा मला हि कुठे  हायसं वाटलं. 
आता तिचं लग्न झालं म्हणा ,पण  हे क्षण मी कदापि विसरू शकणार नाही . 

कुणीतरी आपल्यालाही 'प्रपोज' केलं होतं. लग्नाची मागणी घातली होती .
हि  माझ्या आयुष्यातली सामान्यातली  'असामान्य गोष्ट' मी  सध्या मिरवत असतो. 
उगाच - 
संकेत पाटेकर 
३१.०३.२०१९ 

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

'व्हाय नॉट आय'


किती सुंदर होती ती...! 
अगदी रोजच्या जगण्यातला साधेपणा तिच्या त्या सौन्दर्यातून ही खुलून येत होता..
क्षणभर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. एकामागोमाग पडणाऱ्या तिच्या पाऊला कडे आणि कुठलीही न्यूनगंडता न बाळगणाऱ्या तिच्या स्मित चेहऱ्याकडे... 
रेल्वेचा तो जिना त्याच आणि तितक्याच सहजतेणे ती उतरत असताना..

मी ही तेंव्हा त्याच बाजूने..जिना उतरत होतो.
क्षणभर तेंव्हा वाटलं तिचा हात धरावा..आणि तिला सोबत करत हळुवार उतरावं..
पण नाही...
कुठेतरी हे विचार मी सरसकट फेकून दिले..
आणि पाठमोऱ्या जाणाऱ्या त्या आकृतीकडे मी सॅल्युट करून..उभा राहिलो..

नजर मिट्ट काळोख्याने मिटली असली तरी मनभर पसरलेल्या प्रकाशाची प्रेरित किरणं, तिला दिशा देत होती..
तिच्या आयुष्याच्या वाटेवर..

खरंच, काहीतरी करण्याची जिद्द आणि त्यासासाठी चाललेली धडपड , न तुटलेला बिथरलेला..आत्मविश्वास , आपल्याला आयुष्यात खूप काही मिळवून देतो.. 

'व्हाय नॉट आय' ..
ह्या पुस्तकातून भेटलेल्या त्या 'सिद्धी देसाईच्या' संघर्षमय पण प्रेरित जीवनाची तेंव्हा प्रकर्षाने आठवण झाली.
- संकेत पाटेकर
29.03.2019







रविवार, २४ मार्च, २०१९

'दुर्गसखा आणि धुळवड'

आनंद मिळवून देणारी (अगदी निस्वार्थ हेतूने केली गेलेली.. ) कुठलीही गुंतवणूक हि इतर गुंतवणूक पेक्षा वेगळी नि सर्वश्रेष्ठ असते. असं मी मानतो, कारण  हृदयाच्या तळ गाभ्यातनं , मना मनावर आरूढ होणारी , हास्याची ती केवळ  एक निमुळती छटा,   आपल्या अंतरंगासोबतच आपल्या आयुष्याचा मार्ग हि  सुखासिद्ध करत असते. ते हि समाधानाने परिपूर्ण असं ..!

आणि  हेच महत्वाचं आहे आयुष्यात..'' आनंदाच्या स्वाधीन होणं , आनंद घेणं आणि देणं ''
कारण आनंदाला व्याज नसतो.  मापदंड नसतो. ते निर्व्याज असतं .मोकळं असतं. सहज सोपं असतं आणि म्हणूनच ते सहज मिळविता येतं आणि सहज देता हि येतं . 
त्याला कारण हवंच असं काही नाही. मनाची तेवढी जाणीव असावी लागते. 
आनंद नेमका कश्यात आहे आणि कुठे आहे ? 
 हेच 'दुर्गसखा' सारखी संस्था अचूकपणे जाणून आहे. 

''जीवनाला आनंदाचा लेप हवाच, त्याशिवाय  जगण्याला मोहर कसा येईल ?''  हा लेप देण्याचं महत्वाचं कार्य 'दुर्गसखा' सारखी संस्था आणि संस्थेतील  सदस्य आज करत आहे. 
कुठलाही मोबदला न घेता ...अगदी निस्वार्थेने (आणि हेच  सर्वाधिक भावतं मनाला...) 

'धुळवड' हा त्याचाच एक भाग . 
दुर्गम ..ग्रामीण भागातल्या आपल्याच लहान मोठ्या भावंडांसोबत , त्या पालकांसोबत , शिक्षकांसोबत  आपला आनंद वाटून तो द्विगुणित करणं. 
केवळ  आनंद नाही तर इथला आजचा हा विदयार्थी उद्याचा  सुजाण नागरिक व्हावा. आपल्या पायावर उभा रहावा . समाजमनाचा आरसा व्हावा.  ह्यासाठी शैक्षणिक जबाबदरी हि घेतली जाते. 
शैक्षणिक साहित्य वाटप आणि असे अनेक उपक्रम म्हणूनच  वर्षभर सुरू असतात.  

आपण ज्या समाजात राहतो , त्या समाजाचं आपण हि देणं लागतो . हि जाणीव माणसाला मोठ्ठ करते.आणि त्याचबरोबर समाजमनाचा आदर्श हि ठरते. 

मला ह्या आनंदात सहभागी होता आलं. हाच मोठ्ठा आनंद. 
पर्यटनांतून प्रबोधन हे ब्रीद घेऊन समाजमनाच्या हितासाठी झटणाऱ्या दुर्गसखा ला मनाचा मुजरा. 
तुमचं हे कार्य अखंड सुरु राहो ..! 
     आपलाच , 
- संकेत पाटेकर 
२४.०३.२०१९ 
http://www.sanketpatekar.com/






शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

" सहवास.. तुझा माझा "

थोडं थांबशील ?
बिलगू दे असंच काहीवेळ अजून...
हट्टाने मला कवटाळून घेऊ दे.. असंच, नाहीतरी तू पुन्हा कुठं भेटणार आहेस ?
एकदा वेळ निसटली कि निसटलीच ...पुन्हा ती माघार घेत नाही आणि सांगूनही परतणार नाही . मला माझा वेळ घेऊ दे रे..
निदान आज तरी... ह्या घटकेला..
क्षणभर त्याने तिच्याकडे एकटक रोखून पाहिलं. तिच्या नजरेतला ओलावा स्पष्ट दिसून येत होता.
नेहमीच स्मित हास्यानं उजळलेला , हसता - मोहरता चेहरा आज मात्र विरह भावनेने सुरकुतला गेला होता.
क्षितीज रंगाचं सांजपण जणू दाटून आलं होतं.
वेळ हि तीच होती.
दोघेही ऑफिसमधून सुटल्यावर मरिन ड्राईव्हच्या गारव्यात एकटक चालले होते.
सूर्य अस्तेला लागला होता. आभाळ विविध रंगांनी न्हाहून सजलं होतं. किलबिल करत पाखरं घरच्या ओढीनं माघारी फिरत होती .
गंधित वारा त्यांना स्पर्श करून जणू पुढे सरत होता . उनाडपणाच्या ह्याच त्याच्या लहरी स्वभावमुळे , त्याचा आवेग क्षणा क्षणाला बदलत होता.
त्याने दिशा दिशा शहारून उठे, मोहरून उठे, सागराचं गहिरेपण  हि त्यानेच खवळलं होतं.
त्याच्या अथांग देहमीठीतुन असंख्य लाटा जणू उसळ्या घेत होत्या.
जीवन वर्तुळाचं अस्तित्वं दाखवत..जणू..
क्षणांचा असा धूसर - लख्ख  खेळ सुरु असताना दुसरीकडे मात्र,
सहवासातील तृप्त - अतृप्त आठवणींच्या भवसागरात ती फिरक्या घेऊ लागली होती.
भास - आभासापलीकडे तिचं मन झेपावलं गेलं होतं .
काय होतंय तुला ? तिची तंद्री मोडत, त्याने मधेच सवाल साधला.
काही नाही..
बोल..ग ..मन मोकळं करावं .
स्मित हास्य करत, ...त्याकडे न बघता तिने काहीसं बोलायला सुरवात केली .
“सगळं काही जवळ आहे रे,
पण ..
पण काय ?
पण, हवं ते जवळ असून देखील आणि इच्छा असतानाही,
आपल्याला आपल्याच इच्छा , आपल्या मनात दडवून ठेवाव्या लागतात..दाबाव्या लागतात. त्याचाच त्रास होतो.
म्हणजे बघ ना ,
मला आता, ह्या क्षणी.. तुझ्या मिठीत सामावून घ्यायचं आहे .
घट्ट बिलगायचं आहे तुझ्या बाहुपाशात..
अनेक स्वप्नं रंगवायची आहेत.
आयुष्यं भरासाठी केवळ आणि केवळ तुझी होत , तुझ्या स्वाधीन होत बस्स..
पण नाही .. नाही तसं करता येत ना..?
बोलता येतं पण साधता येत नाही.
इच्छा असूनही आणि अतोनात प्रेम असूनही मनावर पांघरून घालावंच लागतं.
कधी ह्या लोकांसाठी ..''लोक काय म्हणतील म्हणून'
कधी आखलेल्या रूढी परंपरा म्हणून , तर कधी घरच्यांनी आखून दिलेल्या मर्यादांचा मान सन्मान ठेवत , त्यांचा विश्वास मोडू नये म्हणून.., त्यांच्या हितार्थ..
कुठे चुकतो रे आपण..?
बोल..?
जिव्हाळा निर्माण व्हावा अश्या ज्याच्यावर भरभरून प्रेम करावं..त्यानं ही आपल्यावर तितकंच भरभरून प्रेम करावं, द्यावं. अनेकानेक स्वप्नं रंगवावीत आणि ती अशी एकाकी , क्षणभरात धुळीस मिळावी.
काय अर्थ ह्याला..?
प्रेम तरी का व्हावं मग?
का अश्या भेटी गाठी घडाव्या? का जुळावेत मनाचे हे धागे दोरे, का उसवावी ही नाती आणि केवळ,  ती ही क्षणासाठी  , क्षणाच्याच सहवासासाठी ?का ?
मी प्रेम केलं ही चूक झाली का?
तुझं ही माझ्यावर प्रेम आहेच ना ?
मग घरच्यांनी तरी का नाकारायचे आपल्याला , आपल्या ह्या नात्याला.
का लग्नास नकार दिला त्यांनी ?
कुठे कमी पडलो आपण...? का घडलं असं?
क्षणभर तिने उसासा घेतला. श्वास मोकळा केला
जाऊ दे..
प्रश्नांनी नुसतं पछाडलं रे, नकोसं केलंय.
क्षणभरात ती शांत झाली. पुन्हा गहन अश्या विचारात गढून..
त्याच वेळी त्याने बोलायला सुरुवात केली.
होईल ग सगळं नीट., असा त्रास नको करून घेऊस ,
काळ हाच..ह्या सगळ्यांवर औषध आहे.
आपण प्रयत्नं केले नाहीत, असं थोडीच आहे ना?
आपण फक्त समाजाने आखून दिलेल्या नियमात बसलो नाही. इतकंच ,
बाकी आपलं प्रेम आहेच की एकमेकांवर , ते कुणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि घेणार ही नाही..
बस्स , तू सावर ग स्वतःला..
मला असा पडता चेहरा तुझा पाहवत नाही हा,
बघ कसा कोमेजून गेलाय पार.. माकड दिसू लागलेय आता तर,
हाहाहा…तिने हसावं म्हणून त्याने विषय मुद्दामहून बदलला.
थट्टा नको ह पुरे...? तिने एकसुरात म्हटलं.
ठिकाय ...
पण प्लिज,  नको राहुस अशी...
जे घडतं ते योग्यच…आपल्यासाठीच..
आपण विवाह बंधनात सफल झालो नसलो आणि आयुष्यं - भरासाठी ‘नवरा- बायको’ म्हणून एकमेकांचे होऊ शकलो नसलो तरी, मैत्रीचा हा वटवृक्ष नेहेमीच राहील ग..सावलीचं छ्त्र धरत..
काळजी नको..
पण का जातोयस तू..नको ना जाऊ ? पाणावलेल्या डोळ्यांनी तिने त्याकडे एकटक पाहत म्हटले..
"नशिबाने दिलेल्या वाटेवर जाणे येतंच ग..
मार्ग त्याने आखलेला असतो. आपण चालायचं फक्त, प्रयत्नांची शिकस्त करत.."
आपण ही प्रयत्न केले , पण त्याला यश मिळालं नाही. बस्स इतकंच,
पण हा , ह्याचा अर्थ असा ही नाही की आपण हरलो.
"प्रेमाची बाजू नेहमीच यशाच्याच स्वाधीन असते"
विजयाची ग्वाही देत.
बस्स बस्स ,नेहमीच असा शब्दात भुलवतोस..
राहू दे..
आपल्या निमुळत्या स्मित हास्याने त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तो पुन्हा बोलता झाला.
‘प्रेम हे जीवनाचं स्वरूप आहे ..' मीरा ' आणि 'त्याग' हा त्याचा मूळ..’
माणसाचं आपल्या आयुष्यात येणं ' जवळीक साधणं आणि परस्पर निघून जाणं ' हे नियतीनेच आखून दिलेलं संकेत आहेत. आपलं मनोधैर्य आणि मनोबळ वाढविण्याचं...
कळतंय ?
समज ही आपली पूर्वपरीक्षा आहे.
पुढच्या क्षणाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी..
मिळालेला हा एक नवा अनुभव , नवा अध्याय..ज्याचं मोल कधीही वाया जाणार नाही.
बोलता बोलता तो शांत झाला.
डोळ्यावरची कड मात्र भावनेने ओथंबून गेली होती.
मनात असंख्य तंरग उमटत होते.
नातंच तसं होतं ,प्रेम ह्या भावनेने जोडलेलं गेलेलं.
सहवासाच्या मगरमीठीतून उमळलेलं..
वर्षभराची त्यांची ओळख...
ऑफिस सुटण्याची दोघांची एकच वेळ , एकच ठिकाण, एकत्रच जाणं येणं.., त्यामुळे सहवासाच्या गर्द मिठीत आणि संवादाच्या हृदयी भावसागरात ते दोघे एकमेकांशी कधी एकसंध झाले ते त्यांनाही कळलं नाही.
मन मात्र दोघांचं मोकळं होतं होतं. लग्न करावं असं ठरवूनही झालं.
रीतसर घरातल्यांना सांगणं झालं.
आणि तिथूनच पुढे ...
पाहिल्या त्या साऱ्या स्वप्नांचा धुरळा उडाला...
घरच्यांचा विरोध...आणि समाज आड आला.
तुटलं सगळं..एकाच वेळी..एकाच क्षणी.
मनाची बाजू पोखरली गेली.
व्यथेने, वेदनेने ते कळवळून उठलं.
‘’ प्रेमाची सांगता ही स्पर्शाने होते असे म्हणतात..’’
तो स्पर्श होण्याआधीच वावटळ उठलं.
संपलं.
मनाचे धागेदोरे उसवत...
ती चालता चालता त्याच्या बॅगेला घट्ट बिलगून होती.
छातीशी कवटाळूनच घेतलं होतं तिने..त्याच्याच सहवासात नित्य नेहमी असलेल्या त्या बॅगेला..
जणू त्याचीच ऊब तिला त्यातून मिळत होती.
‘’ मला ह्या क्षणी तुला आता घट्ट बिलगावं वाटतंय श्याम ‘’
दुःखाचे , विरहाचे हे क्लेश सारे दूर करत..गहिऱ्या वेदनेने तिने त्याकडे हळुवार पाहत म्हटलं.
त्याने केवळ त्यावर स्मित हास्य केलं. बस्स..
जाऊ दे..
इच्छा आहे पण ही वेळ नाही.
आणि त्यात लोकं काय म्हणतील...हा प्रश्न आहेच..
सोड..
तुझी ही ऑफिस ची बॅग , तू आहेस असं समजून घेते..
बिलगु दे मला असंच काही वेळ..थांबवू नकोस..प्लिज..
मला माझा वेळ घेऊ दे..
निदान आता तरी, ह्या घटकेला..ह्यावर तरी कुणी काही बोलणार नाही.
अंधार चढत होता.
मरिन ड्राईव्ह हुन..ते पुन्हा परतीच्या मार्गला लागले होते.
ती गहन विचारात होती. त्याचं मन ही काव्यधारांनी धुमसत होतं..
पुन्हा मन आज शांत झालं
पुन्हा एक कारण मिळालं..
पुन्हा उठली कळ वेदनेची
पुन्हा हसणं ओघानं आलं..
पुन्हा झाली क्षितिज सांजा..
पुन्हा तेच काळोखी गाणं
पुन्हा नवी पहाट मोकळी
पुन्हा क्षणाचं येणं जाणं..
- संकेत य. पाटेकर
http://www.sanketpatekar.com/
प्रतिलिपी :


सोमवार, ७ जानेवारी, २०१९

भाई- व्यक्ती की वल्ली

क्षण ..कधी केंव्हा कुठे आणि कसा रंग उधळवतील ना ह्याचा काही नेम नाही आणि नसतोच असा कधी, अगदी क्षणा क्षणातच म्हणायला, तश्या खूप काही घडामोडी घडतात. ध्यानी मनी नसताना एखाद मैफिल ही जुळून येते आणि अफलातून अशी रंगून जाते. अशी रंगते की ती कायम स्मरणाशी उरते  , आपल्याच माणसाच्या सहवासाचा आणि आपुलकीचा अत्तरीय गंध दरवळून 
आणि म्हणूनच अश्या त्या गत क्षणांना , त्या सर्व आठवांना.. कधी शिणवटा येत नाही. 
ते क्षण नेहमीच प्रसन्नतेत वाहतात, आनंदाचा फुलोरा घेऊन येतात. फुलतात आणि हसवतात.
भूत वर्तमान काहीही असो,

काल 'भाई' व्यक्ती की वल्ली हा पुलं वर आधारित चित्रपट पाहताना , पदोपदी त्यांचा जणू सहवासच घडत होता. इतकं एकरूप झालो होतो. 

वाक्य वाक्यातनं आणि त्यांच्या हास्य विनोदातंन मनमोकळी आरोळी फुटत होती.
टाळ्या पडत होत्या. 

वाह..! वाह..! मिळत होती.
त्यांनी जगलेले आणि जागविलेले क्षण आमच्यापुढे असे नव्याने उभे होत असताना, 
स्वरगंगेत मिसळलेली ती मैफिल..काय आणि कसं बरं वर्णवू..
तोड नाही हो त्याला, 
साक्षात कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी , वसंत , ह्या आदी दिग्गजांच्या स्वर्गीय सुरात आणि विठू माऊलीच्या नामजपात रंगलेली ती दर्दी मैफिल..
ह्याने माझ्यासोबत इतर प्रेक्षवर्ग ही तल्लीन होऊन त्या सुराशी मिसळला गेला होता..
त्या मैफिलीला खरंच तोड नाही...

कानडा राजा पंढरीचा ..
अजूनही गुणगुणतोय मी..

गदिमा सोबत 'नाच रे मोरा' शी जुळलेली बैठक..
ती रंगत...आहा..!

तो काळ खरच वेगळा होता..ती कलावंत आणि कलारसिक ,कला जोपासणारी माणसंच वेगळी होती. कलेने झपाटलेली आणि तशीच दर्दी देखील..

पुलं.. असो, ग.दि मा असो, सुधीर फडके असो, 
भीमशेन जोशी..कुमार गंधर्व, बालगंधर्व..
किती नावं घेऊ..

"कला जगवते आणि जीवन घडवते ही "

पुलंचा 'सहवास' आज ह्या चित्रपटातून घेता आला..
ह्यातच आनंदी आनंद..
अजून काय हवंय..

भेटू आता पुन्हा ८ फेब्रुवारीला ...
तोपर्यंत हसा खेळा आणि क्षणा क्षणांचा आनंद घ्या..आणि एखादी मैफिल ही रंगवा..
धन्यवाद..! 
- संकेत पाटेकर
०६/०१/२०१९

#भाई- व्यक्ती की वल्ली

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2117663381589894&id=100000387574764