शनिवार, ७ मार्च, २०१५

'घर'चे अन 'घर' च्याबाहेरचे..

२०१२ ला लिहिलेली हि एक पोस्ट..

काल योगायोग म्हणा , माझं  नशीब म्हणा ...
माझं ज्या व्यक्तीवर मनापासून अन जीवापाड प्रेम आहे त्या व्यक्तीची नि माझी बरेच दिवसाने भेट घडली.

तसं हे मनं नेहमीच आतुरलेलं  असतं. जिच्यावर आपल जीव असतो ...भरभरून प्रेमं  असत .
त्या व्यक्तीच्या भेटीसाठी ..
आपलेपणाचे तिचे गोड प्रेमळ  शब्द ऐकण्यासाठी ...
तिला भरभरून नजरेनी पाहण्यासाठी .....
तिच्या सहवासाच्या चाह्येखाली निवांत पहुडण्यासाठी ..
मग ती  कोणत्याही नात्यातली व्यक्ती असो .........प्रेम माणसाला त्या रेशीम बंधनात अडकवून ठेवतो ..

काल ती भेटली.
नाही नाही  मीच भेटलो तिला   .. .सायंकाळी.
रिक्षाने घरी परतत असता,  वाटेतल्या  रस्ताच्या कडेला फोन वर कुणाशी तरी बोलत असता दिसली.
बस्स तेंव्हाच ठरवलं आज हिला भेटूनच जायचं . मनातल सारं  बोलून टाकायचं .
तसं हि मनात मी काही ठेवत नाही . तरीही वाटत मनातल्या त्या भावना,
ज्या सतत वादळासारखे घुन्गावत राहतात  ते बोलून द्याव अन शांत करावं  ह्या वादळी मनाला .

तसं  बऱ्याच दिवसापासून ..कित्येक महिन्या पासून पाहतोय.  तिचं वागणं, तिचं  बोलणं..
 बदललंय...खुपसा फरक पडला आहे .
पूर्वीची  अन  आताची ती... ह्यात...

क्षण हे असे का , का बर्र बदलावेत,  अस राहून राहून वाटत कधी .
सुखाचे अवघे क्षण ..ते हि अगदी मोजून अन दुख हा  पाठशिवणी सारखा मागेच सतत... का हे अस ?
का हे क्षण असे बदलतात ?
असत्याच न्हवतं  करून टाकतात . एखाद्या मनाला घुसमटून देतात ?

कुठे ते हास्य लहरीत गुंफलेले , बहरलेले  सोनेरी  क्षण ? अन कुठे हे अत्ताच्चे तळपत्या उन्हात पार काळपटून गेलेले  मरगळलेले  निरुत्साही क्षण....

परिस्थिती सार वेळ , वेळेनुसार  परिस्थिती  अन वेळ- परिस्थिती  नुसार माणसाचे आचार विचार , त्याचं   वागणं , बोलणं सार काही बदलतं.
अन ह्याचा होणारा परिणाम त्या व्यक्तीसोबत इतर  मनावर हि होतोच.
हे नातच तसं असत .
म्हणून आपण हि आपल्याच विचारात बुडतो. आठवणीचं  गाठोड हळूच उघडून  स्वताहाशीच  संवाद  साधत.

किती सुंदर आणिक सोनेरी क्षण होते ते ..किती आनंद..अन उत्साहाने  बहरलेले  दिवस होते ते ....
पण सांर  अचानक कुठे गेलं ? कस गायब झालं.
बहरलेला तो हास्य गंध कुठे नाहीसा झाला ? .कुठे गेले ते दिवस ?
मन  चाचपडतं  ..गढून जातं  त्या अश्या असंख्य विचारांच्या भाव गर्दीत ....

काल ती दिसली .
रस्त्याच्या कडेला उभी कुणाची तर प्रतीक्षेत....मी  रिक्षाने जात असता ,तेंव्हा ठरवलं आज भेटूनच जावू तिला ..कित्येक दिवस भेट न्हवती .म्हणून रिक्षातून उतरलो नि थेट तिच्या समोर उभा राहिलो.

क्षणभर तिच्या चेहऱ्यांकडे नजर खिळून राहिली.
असंख्य विचारांच्या छटा अन कुठल्यातरी विवंचनेत असलेला तिचा  हताश,  निराश,अन थकलेला निरुत्साही चेहरा पाहून मन काळवंडल अन मनोमन म्हणून लागलं.

हीच का ती ? हसऱ्या  मनाची ..खेळकर वृत्तीची, माझी प्रिय अन प्रेमळ...

काही वेळ  तसाच अगदी  शांत उभा  होतो तिच्या  चेहऱ्यावरील  भाव टकमकते ने  निरखत .
काहीच क्षण असेच गेले... निशब्दतेत..  पण मीच पुढे  बोलण्यास सुरवात केली .

मनात असलेल्या अनेक विचारांना , मनातल्या शंकांना अन माझ्या त्या प्रेमळ रागाला तिच्या समोर कसं   मांडाव , कसं  व्यक्त करावं हाच  एक मोठा  प्रश्न होता.
त्यातही तिची ती अवस्था पाहून खरचं  आपण आता बोलावं  का ? बोलत व्हावं का ?
अगोदरच ताणतणावा खाली असेल , अन अस असताना आपल्या बोलण्याने तिला अजून त्रास झाला तर ? ह्याविचाराने मन पुन्हा हळवं झालं. पण ना ना म्हणता मी बोलण्यास सुरवात केली.

कशी  आहेस ?
ठीक...
एक विचारू ?
बोल  ...,
का अशी वागतेस ?

संकेत , Please..
मला पुन्हा पुन्हा ह्या गोष्टीत खेचू नकोस.
अंतर मनाला  भिडलेल्या त्या माझ्या प्रश्नांनी तिला बोलतं  केल.

मी अगोदरच खूप ताण तणावात आहे . मलाच नकोस झालं  आहे सगळ .
तूच बघतोयस ना ..

क्षणभर ती  थांबली , एक निश्वास टाकत पुन्हा बोलती झाली .

'संकेत,  खरच इतकं जीव नको लावूस  कुणावर...
हव तर घरच्यांवर जीव लाव   , पण  बाहेरच्यांनवर  नको ....'

ह्या तिच्या शब्दांनी काळजावरच  घाव पडला.
मग तू घरातली नाही आहेस का . ? तिच्या प्रश्नाला कसबसं उत्तर देत मी म्हटलं .

ह्या प्रश्नवार तिने उत्तर दिल नाही. पण पुढे बोलत राहिली.

काही नाही  रे मिळत ह्यातून... . त्रासाच होतो खूप ....
मनातल्या  सार्या अनुभवी क्षणांना  एकवटून  ती पुन्हा बोलती  झाली

तुझ्यात आता 'मी' पाहतेय ...'संकेत'
माझ्या जागी  आता तू आहेस , वेड लागेल अश्याने .. . त्रास होईल खूप  ..नको जीव लावूस माझ्यावर . 
खरच ...
क्षणभर सगळ शांत झालं.....
पुढे काय बोलावं ते माझाच मला  कळेना .

मी तसाच हताश अन पोखरल्या मनाने तिचा निरोप घेत मागे फिरलो.
मनात पुन्हा विचारांचं वादळी वादळ  उठल.

इतके दिवस ती मला का टाळू पाहते ह्याच कारण आज मला मिळाल होत .
का तर तिच्यासारखं मला हि तसा त्रास होऊ नये,  त्या ताणतणावातून मी जावू नये म्हणून ..
माझ्या काळजी पोटी .. इतक्या तळमळीने ती बोलली  आज...

तिने तिच्या परीने माझा विचार केला होता . पण माझ्या मनाची वेदना काय  कशी बर सांगावी ....
मला त्रास तर होणारच...मी तयार हि आहे त्रास सोसायला.

पण असं टाळाटाळ नको.....आपलेपणात तुट नको...दुरावा नको ..
मनापासून प्रेम आहे ग ...

अन प्रेमं  हे आंधळ असतं. अन ते घरातले अन बाहेरचं असं   बघून कधी होत नाही .
नाती हि रक्ताचीच असतात असं हि नाही .
मनात घर केलेली माणसं  हि  तितक्याच रक्तमोलाची , प्रेमाची  अन ..आपलेपणाची ...

नातं कुठलेही असो   एकदा ते जुळलं कि ते शेवटपर्यंत निभवावं.
प्रेमाचं पारड  हि शेवटच्या श्वासापर्यंत ... तोलून राहावं
भले त्यात कितीही खाचखळगी   येवोत.

माझ प्रेम हि असंच आहे . भले त्यात थोडा स्वार्थ असेल पण ते निखळ आहे अन तसंच राहील शेवटच्या श्वासागणिक ....

संकेत य पाटेकर
मनातले काही ...
११.०९.२०१२

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०१५

बा'चा बाची...

आज  कुणास ठाऊक कसला परिणाम झाला होता मनावर ,  कुठलीशी प्रेरित शक्ती अंगभर संचारली होती जणू ..
डोळ्यादेखत,समोर जे  विपरीत घडतंय ते थांबविण्यासाठी  ...

आपली जीवनवाहिनी म्हणजे हि 'मुंबई लोकल' , दिवसभरात हजारो लाखो लोक आपला जीव मुठीत घेऊनच रोजचा हा  जीवावरच प्रवास करतात . कशासाठी तर पोटासाठी ...आपल्या कुटुंबियांसाठी ..

रोजची ये जा करणारी, धावणारी हि मुंबई लोकल ..आपल्याला तशी  अनेक  भावचित्रांचे कधी हसरे कधी अधिक दु:खद असे प्रसंग डोळ्यादेखत घडवून आणते. आणि आपल्या मनाला विचारांच्या भाउक गर्दीत हळूच लोटून देते . काय घ्यायचा तो धडा आपण त्यातून  घेतो हि किंव्हा काही जणू  घडलच नाही अश्या अविर्भावात आपण  सगळ सोडून देतो हि  .

अवघा क्षणभरचा  प्रवास काय तो   ....तुमचा आमचा ....अनोळख्यांचा ... एकाच  वाटेचा , त्या  क्षणापुरती काय तो   ..,
प्रत्येकाची  वाट  निराळी  तरी हि भेटतोच आपण एका वळणावर ..
पण तो  वळण हि असा जिवावर लोटला तर ...कल्पनाच नको करायला .

ह्या आपल्या धावत्या  मुंबई लोकल मध्ये  रोज बघावं  तर आपली बाचा- बाची सुरूच असते.
कधी ह्याची तर कधी त्याची ,
नुसता हलकासा धक्का लागला   कि त्यावरून   वाद , चौथ्या सीटसाठी वाद   , ट्रेन मध्ये चढता उतरता  वाद , त्यातून एकमेकांना शिवीगाळ , अन त्या हि पुढे मग टोकाची भूमिका अर्थात  ..हाणामारी ..

अवघा क्षणाचा प्रवास, रम्य कधी रटाळ हि असेल पण हे लोक बेरंग करून टाकतात . कुणी ऐकून घेत नाही अन समजून हि घेत नाही .अन हे थांबावं म्हणून बघणारे सुद्धा पुढे येत नाही . ते फक्त बघ्याची भूमिका घेतात. येणारे येऊ पाहतात पुढे  . पण त्याना हि जागीच अडवलं  जात . कशाला नुस्कारण मध्ये पडतोयस  ? ते ऐकणार नाहीत अस बोलून गप्प बसवलं जातं  . अन पुढे जे घडणार तेच घडतं  . 

आजचा हि असाच काहीसा प्रसंग
विषय तोच , पण जरा वेगळा ,
वेगळा ह्या अर्थी   कि फक्त वयोमानाचा फरक काय तो ...

एकीकडे  सळसळतं  तरुणपण मनगटात पोलादी ताकत असलेल तर दुसरीकडे  वृद्धत्वाकडे झुकलेलं  म्हातारपण.. अनुभवी बोल तेच काय त्याचं  प्रभावी  शस्त्र ...

वार शनिवार ,  काला घोडा फेस्टिवल पाहून झाल्यावर सी एस टी   वरून ठाणे लोकल पकडली अन निवांत सीट वर बसलो होतो . तीन चार स्थानक अशीच निघून गेली .
अन वारे माप शब्दांचा एकंच गोंधळ उडाला. त्यान सार्यांचे लक्ष  वेधून घेतलं .

बापाने हे असच  शिकवलं का रे ?XXXXXX
बाप काढू नका हा , अन शिव्या हि देऊ नका .
ये ..XXXXXX
वाद वाढत होता...पण कुणीच  ऐकेना अन समजूनच घेईना..

जागेवरून काहीतरी बिनसलं होत . त्या दोघात .
ते दोघे म्हणजे  एक साठीच्या आसपास असलेले  'काका' अन एक हट्टा कट्टा 'तरुण'
अन त्या दोघां समवेत असलेले त्यांचे इतरसहकारी ...

सुरवातीला साधेपणाचेच  शब्द काय ते रागाने वरचढ करत होते मग मात्र  हळूहळू त्यात इतर अवजड शब्दांची (शिवीगाळ )रस मिसळ होऊ लागली अन हात उगारन्यापर्यंत  मजल  गेली.
पण ते ते थांबविन्यास्ठी कुणी हि पुढे येईना .
जणू काही मनोरंजनाचा खेळ चालू  होता . अन लोक टकमकतेने अविर्भावपणे ते  बघत होते. मजा घेत होते .

कुणी हि मोठी व्यक्ती असो , वयोमानानुसार एक आदर असतोच  त्यांची विषयी आपल्या मनात,
मग ती व्यक्ती ओळखीची असो वा अनोळखी.
त्याना एकेरी शब्दाने बोलण्या इतपत  आपण कुसंस्कारित  नसतो..अन बोललो तर
'हेच का रे तुझ्या आई वडलांनी  दिलेले संस्कार' असे बोल समोरच्या मुखातून हमखास निघून जातात .

इथे हि असच झालं.
त्या काकांनी रागा भरात एक शिवी हाणली काय अन बाप काढला काय ? त्या तरुणाच सळसळ रक्त ताप लं  अन तो लगेच 'अरे तुरे' ची भाषा करू लागला.
इतपर्यंत सगळ ठीक होत पण त्याने जेंव्हा वयोमानाच भान सोडून त्यांच्यवर जेव्हा हात उगारायला सुरवात केली  तेंव्हा तो तिथेच चुकला .....अस म्हणाव लागेल. कारण मनगटात ताकद असली म्हणून काय झालं समोरील व्यक्ती कोण कशी आहे त्याचा तरी विचार करावा. निदान वयोमनचा तरी ..

इथे वादाला सुरवात पहिला कुणी केली हे महत्वाच नाही.
महत्वाच हे होत कि सुरु झालेला वाद , दोघांपैकी एकाने हि समजून न घेता , तो  मिटवावा ह्या करिता  प्रयत्न हि केला नाही उलट तो  वाढत नेला  ...

अन गम्मत  अशी कि जेंव्हा मी  त्यांच्या मध्ये पडू लागलो . सगळ निवळण्यासाठी  म्हणून ..तर एका दोघांनी मला , कशाला मध्ये पडतोयस ? ते ऐकणार नाहीत अस बोलून निवांत  राहायला सांगितल .
पण ते सगळ  ऐकून घेणार अन निवांत बसणार माझ मन तेंव्हा माझ नव्हतच  ..ते प्रयत्न करत होत . शांत होण्यसाठी ..ये दादा, वोह काका ...अशी आर्त हाक मारत ..
हे  झालं माझ्याबाबतीत ,

पण त्याचवेळेस माझ्या शेजारी उभ्या असलेल्या .. त्या बाईनी सुद्धा हातवारे करत अन 'तुम्ही गप्प बसा हो, कशाला मध्ये पडतायेत अस म्हणत आपल्या नवऱ्याला   हि त्यामध्ये पडू दिलं नाही .

पुढे हे सगळ निवांत झालं ..खरं ..

पण वयोमानाच विचार करता....वाद घालणाऱ्या त्या दोघात
एकमेकांना समजून घेण्याची वृत्तीच कुठे दिसली नाही.

आपल्या पेक्षा वयोमानाने मोठे म्हणून शांत राहावं ते त्या तरुणाला कळून आलं नाही .
अन आपण मोठे आहोत जाणकार आहोत अस समजूनही त्या काकांनी  माघार घेतली नाही .
अन हा वाद सुरु असता  बघनार्यांनी हि नुसतीच बघ्याची भूमिका घेतली .

शब्दाने शब्द अन वादाने वाद वाढत जातो. तो वाढविण्यापेक्षा कुणी एकाने तरी माघार घ्यावी  लागते. अन्यथा 
क्षणाच्या त्या प्रवासात तुमच्या अमुच्या आयुष्याची राख होवू शकते . 
हे कुणी समजूनच घेत नाही . 

- संकेत य पाटेकर
१६.०२.२०१५ 

बुधवार, २१ जानेवारी, २०१५

ते ओघळते अश्रू थेंब....

शनिवार , संध्याकाळची वेळ . साधारण ६ वाजत आले होते.
माटुंगा स्थानकात एका मित्राची वाट पाहत बसलो होतो . पाच एक मिनिटे बोलूनही तो अद्याप आला न्हवता . त्यामुळे रिकामा वेळ , मोबाईल हि हाती पण त्यात न रेंगाळता नजर इकडे तिकडे सहजच भिरभिरत होती.
नित्य नेहमीच्या ठरल्या वेळेप्रमाणे लोकल ये जा करत . त्यातून नवं नवीन चेहरे पायऊतार होई . तेंव्हा नजर आपुसकच त्या येणा जाणाऱ्या चेहऱ्यावरील , विविध रंगी भाव छटा टिपून घेण्यात मश्गुल होई, अशातच काही वेळ निघून गेला. अन एके ठिकाणी अचानकपणे मनाच्या अंतरंगाला एकच घाव बसला ते ताडकनं जागं झालं . काहीसं कळवळल हि...
त्या ''ओघळत्या अश्रू थेंबानी ''
अश्रू आनंदाचे ,
अश्रू वेदनांचे,
अश्रू धडधडनाऱ्या,
हृदयी स्पंदनांचे

नजर स्तब्ध झाली. एकवटली, त्या वेदनामय अश्रू थेंबाकडे... काय झाले असेल ? का ,असे ओघळतायेत, हे अश्रू थेंब ? न थांबता , आळी पाळीने लगातार ...
काय कारण असावं ? का ?
'क' ची बाराखडी सुरु झाली. तिच्या अंतरंगाचा, मनाचा आढावा घेत.
साधारण ३० एक वर्षाची ती विवाहित स्त्री , मनातले हुंदके तिला अनावर होत होते. इतके कि आपण रेल्वे परिसरात , सार्वजनिक ठिकाणी , ऐन गर्दीत , फलाटावर उभे आहोत हे माहित असूनही त्या अश्रूं थेंबांना , तिला आवर घालता येत न्हवता. ते मोकाट सुटले होते.
वेदनामय हाल अपेष्टा सहन करून , भोगून ...जणू मुक्तीच्या दिशेने ...गालावरून सरसर......सरसर...धाव घेत.
मनातल्या हृदयी भावनेला जरा तरी कुठे असा धक्का लागला कि अश्रूचा बांध फुटतोच फुटतो . मग ते ठिकाण एकांतातलं असो वा सार्वजनिक कुठलही ..त्या आतल्या भावनेस रोकता येत नाही . ते ओघळतातच ...अश्रू रूपाने ..
हे अश्रू हि असेच.....भावस्पर्शी , ओघळते ..
मी ते टिपून घेत होतो . माझ्या मनाच्या भावपटलावर. ह्या पलीकडे काही करता येत न्हवतं . अन करू हि शकत न्हवतो . काय करणार मी ? काही क्षण असंच टकमक पाहत राहिलो.
मोबाईल च्या स्क्रीनवर एक वेळ ती पाही अन पुन्हा , वेदामानय हुंदके तिला अनावर होई . अन तिच्या अश्रूंचा बांध फुटे. ते दडवण्याचा ती प्रयत्न हि करे ..पण व्यर्थ ..., कसल्या तरी गहिर्या वेदनेने तिला वेढून धरलं होतं. त्यातून सुटका मात्र होत न्हवती. भरीस भर म्हणून कुठेतरी हृदय चिरणार हिंदी गाण हि नेमकं त्याच वेळेस सुरु होत.
मी ते पहात होतो . न्हाहाळत होतो. ऐकत होतो .
काही क्षण असेच निघून गेले अन पाटोपाट धावणाऱ्या एका लोकल मध्ये ती हि तिच्या वाटे ....पुढे झाली. मनात , त्या क्षणाची छबी ठेवत. ना- ना विचारांना उमाळा देत.
आयुष्यात खरचं सर्वात अधिक जर वेदना होत असतील तर त्या आपण, आपलं म्हणून घेणाऱ्या, अन आपल्या असलेल्या, त्या जीवापाड व्यक्तीन मुळेच.
जिथे प्रेम तिथे वेदना ह्या आल्याच . जसं प्रेम निखळ आनंद देत तसं ते कळवळनारया न शमनारया वेदना हि देत. नात्यांची हि मोतीमाळ, कधी कधी अश्रूंच्या ह्या भावगंध दवबिंदू नि न्हाऊन निघते. प्रेमाचा ओघळता वर्षाव जणू.....
प्रेम प्रेम प्रेम अन प्रेम ...
प्रेमात माझ्या, हृदयी स्नेह बंध
डोळ्यात तरळते, तुझेच प्रतिबिंब
संकेत य. पाटेकर
२१.०१.२०१५
खालील इमेज हि अंतरजालातून घेतली आहे.

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

कट्ट्याचं नुतनीकरणं- अन आठवणीतले ते क्षण ..

कट्ट्याच नुतनीकरणं- अन आठवणीतले क्षण
'पुष्पक कट्टा'
एकदा का लिखाणाला सुरवात केली अन शब्दांशी सुत जुळले कि ना -ना विविध विषय आपुसकच मागे मागे धावून येतात . मग ते कधी कुठे कसे ... ते काय सांगता येत नाही. आसाच हा एक विषय काल रात्री अचानक डोक्यात भूनभुनला अन म्हटलं चला ह्यावर लिहू काहीतरी .म्हणून लिहावयास घेतले.
तसा 'कट्टा' म्हटला कि नजरेसमोर येते ती नित्य नेहमीचीच, एक ठराविक भेटीची जागा . मित्र मैतरणी अन ना ना विविध गप्पांत उधळलेले , कधीही न विसरता येणारे, ते सुवर्णरेषित सोनेरी क्षण ..
अन क्षण म्हटले कि ते विविध ढंगी, विविध रंगी असतातच. . मनाच्या अंतरंगात उसळणाऱ्या अश्या विविध ढंगी, विविध रंगी भावनांना अश्या कट्ट्यांवर एक मोकळीक मिळून जाते.
आपल्या आयुष्यातले मग ते सुखाचे प्रसंग असो , वा वेदनेने कळवळनारे भाउक क्षण असो , समोर विश्वासार्थ नात्याची गुंफण असलेली व्यक्ती असली म्हणजे मनात दडलेल्या त्या असंख्य भावनांचं दार हळूच उघडलं जातं. असाच हा आमचा किंव्हा माझा म्हटलं तरी चालेल एक 'कट्टा' विवध रंगी भावनांचा , हसऱ्या भाव गंधाचा 'पुष्पक' 'कट्टा' पुष्पक हॉटेल ....

नात्यातली पहिली जोडी जी ह्या कट्ट्यावर अवतरली असेल ती म्हणजे आम्हा भाऊ- बहिणीची जोडी. माझी लाडकी प्रिय बहिण ....जिने तिच्या प्रेममऊ शब्दाने अन मायेनं मला आपलंस करून टाकलं. वेडावून सोडलं.
लोकं प्रेमात वेडी होतात...ते प्रेयशीच्या ,मैत्रिणीच्या ..मी मात्र माझ्या बहिणीच्या प्रेमात हरखून गेलो. ह्या कट्ट्यावरच , बिर्याणीवर ताव मारत, एक एक कप चायचा घोट घेत ते सारे सुवासिक क्षण मनाच्या कप्यात कैद होत गेले.
ह्या कट्ट्यावरच आम्हा दोघांनी मिळून एक कविता हि रचली. ती पूर्ण केली. तो कागद तिच्या हस्त लिखीताचा अजून जपून ठेवलाय.
ह्या कट्ट्यावर तिच्या लग्ना आधी कित्येकदा भेटत असू....बोलत असू ...एकमेकां विषय...जीवनाविषयक कधी तासभर तर कधी दहा पंधरा मिनिटे . ..गप्पांत अवांतर ..
आता ते सारे क्षण फक्त आठवणीत उरलेत . कारण वेळेनुसार आहे ती परिस्थिती हि बदलत जाते. आता भेट होत नाही अस नाही. होते भेट, पण ह्या कट्ट्यावर नाही...,
पण जाता येता नित्य नेहमीचा तोच रस्ता असल्याने ..ती आठवण मात्र प्रकर्षाने होतेच होते. मग स्वताशीच पुटपुटत जातो ...
किती हसरे क्षण होते ते !...असो
लग्ना नंतर मुलींच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते . सारंच चित्र पालटतं. तसंच काही तिच्या बाबतीतही ... पण कधीतरी ह्या कट्ट्यावर पुन्हा नक्कीच एकत्रित येउच ...त्या आठवणी पुन्हा उजळवत...... ह्यात शंका नाही.
ह्या कट्ट्यावरची दुसरी भेट म्हणजे माझ्या जीवाभावाचा मित्र ..हेमंत.
मित्र कधी साथ सोडत नाही. ते सोबतच असतात कायम असे म्हणतात वेळेप्रसंगी वेळेत हजर हि होतात. त्यातलाच हा खास जीवाभावाचा मित्र...हे माझं भाग्यच म्हणा ..! आठवड्यातून दोन एकदा तरी ह्या कट्ट्यावर ,आमची भेटहि ठरलेलीच.
पण ह्याच्या वेळेचा ठावठिकाणा हा कधीच नसतो. नित्य नेहमीच्या सवयीप्रमाणे हा भाई पाच एक मिनिटे बोलून ,कधी कधी अर्धा एक तास खोळंबून ठेवतो . अन हजर झाल्यावर कारणे द्या ? चा तास अवितपणे सुरु होतो .
मग कधी चहा तर कधी कॉफ्फी च्या एक एक घोट सोबत (ह्याशिवाय आम्ही इतर पदार्थांकडे वळतच नाही म्हणा ) ना- ना तर्हेच्या विषयवार आमचं अवांतर बोलन होत. तर कधी ट्रेक विषयी गप्पा , पुढील ट्रेक चे प्लान ( असे प्लान कितीसे करतो पण त्यातले निम्मे हि पूर्ण होत नाही हि ह्यातली गंमत.) असो.
उद्यां नाटकाला जावूया का रे ? चल नाही तर एखाद चित्रपट बघू ? अरे आपल्या बाळू दा ला फोन कर, अरे आपल्या ओमी बाबाला विचार येतोय का ? अरे तो नाय तो शॉपिंग करत असेल रे ...हे ते नाना विविध हास्य क्षण ...
कधी भविष्याचा वेध घेत केलेली चर्चा , मग ते 'लग्न' असो वा लग्नातली 'ती' वा नोकरी ... विषय खूप असतात बोलण्यासारखे ..न संपणारे ....अवांतर .. तर मित्रा येतोयस ना ..कट्ट्याच नुतनीकरणं झालय आता ...चल ये कट्ट्यावर ...
ह्या कट्ट्याची एक आवर्जून आठवण सांगायची तर माझा 'Wallet'..
बहिणीसोबत असंच एकदा बसलो होतो. गप्पात दंग होवून ....चहाचा एक एक प्याला घशात लोटत. चहा पिउन झाल्या नंतर आद्य कर्तव्य म्हणून वालेट काढलं , पैसे देऊ केले अन तिथून दोघेही निघालो. .अर्ध्या वाटेत आलो तेंव्हा काहीतरी विसरल्याची आठवण झाली.
एक एक खिसे तपासून पहिले तेंव्हा लक्षात आल. कि 'वालेट' बहुदा ते कट्ट्यावरच विसरलो किंव्हा कुठेतरी पडलं. पैसे देवाण घेवाण मध्ये .. PAN कार्ड ATM कार्ड , LICENCE ह्या त्या गोष्टींचा भरणा त्या WALLET मध्ये होता. त्यामुळे घाबरलोच . तडक पळत सुटलो कट्ट्यावर, हॉटेल मालकाशी चौकशी केली. पण नाही माझं किमती 'WALLET' आता हरवलं होतं. . निराश मनाने तिथेच अवती भोवती चकरा मारत राहिलो, रात्री उशिरा पर्यंत पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. . माझा किमती WALLET..
किमती ह्यासाठी कि ते माझ्या बहिणीने भाऊबीज म्हणून गिफ्ट केलेलं. अन त्याबरोबर इतर महत्वाची हि कार्ड्स हि होती. घरी गेल्यावर ATM कार्ड वगैरे BLOCK करून टाकलं . रात्री तशी झोप लागलीच नाही म्हणा . पण सकाळी उठल्य बरोबर जो फोन खणाणला त्याने तर आनंदुनच गेलो. नाचू बागडू लागलो.
WALLET मिळालं होत. एका सज्जन गृहस्थाला. तडक त्याची भेट घेतली. त्याच्या घरी जावून अन THANKU म्हणत परतलो. तिथपासून त्या गृहस्थाची अन त्याच्या कुटुंबाशी भावपूर्ण नातं जुळल . आता आवर्जून कधी एखाद फोन येतो.
ओळखलतं का मी मनीष सावंत ......?काय कस काय चाललय ?
खरचं अशी सज्जन अन प्रामाणिक माणसं क़्वचितच भेटतात. कट्ट्याशी निगडीत हा एक क्षण मी कधी विसरणार नाही. असो..
ह्या कट्ट्यावरची अजून एक भेट आठवणीत राहणारी म्हणजे माझी एक जवळची मैत्रीण.
स्वतःच्या मनाशी अनेक प्रश्नात गुंतून राहणरी , प्रश्नाचं उत्तर नाहीच मिळालं तर मला हमखास विचारणारी अन मला हि त्या प्रश्न कोड्याच विचार करण्यास भाग करणारी ...अशी हि मैत्रीण हळव्या मनाची हळवी मैत्रीण..... , ते क्षण हि आठवणीत आहेत.
तसे प्रश्न अन त्याची उत्तर हि आपल्या सभोव तालीच कुठेतरी आसपास दडलेली असतात. बस्स त्याचा शोध घेतला कि ती मिळून जातात.
तर असो. असा हा आमचा 'पुष्पक कट्टा' विविध ढंगी, विविध रंगी क्षणांनी फुललेला. अन तो फुलतच जाणार पुढेही .. . किती वेळ अन कधी पर्यंत अन अजून कोणा सोबत ते माहित नाही. पण मित्रा हेमंत आपल्याला भेटायचाच आहे . आपल्या ह्या कट्ट्यावर ..चहाचा एक एक घोट घेत..ना ना विषयाचे फडसे पाडत.....
चला तर भेटू पुन्हा.....कट्ट्यावर....
ह्या कट्ट्यात सहभागी झालेले मित्र परिवार .... माझी प्रिय बहिण श्रद्धा , मित्र हेमंत, ओमकार , शीतल , पुनम , राज , निलेश , बाळू दा ...अन मी..
अजून हि लिस्ट पुढे वाढतच जाईल... भरोसा काय ...
आपलाच , संकेत उर्फ संकु...
संकेत पाटेकर
१४.०१.२०१५

मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

वहिनीचा एक दिवस...

काल सकाळपासून सुरु झालेली धांदल गडबड..
संध्याकाळी वहिनी अन भाऊ घरी परतल्यावर काहीशी कमी झाली. नित्य नेहमीची , पहाटेपासून सुरु होणारी अन रात्री उशिरा पर्यंत हि सुरु असलेली...
वहिनीच्या कामाची लगभग ,धावपळ...काल काहीश्या प्रमाणात प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली.
जी आतापर्यंत नित्यनेहमी पाहत होतो.
काही कारणात्सव अचानक भाऊ - अन वहिनीला काही बाहेर जाणे जरुरीचे झाल्याने,  कालचा एक दिवस ' वहिनीचा' माझ्या हाती आला. खास त्या करिता सुट्टी घेतली.
सकाळी स्वतः लवकर उठून आमच्या छोट्या राणी सरकारला जागे करून , आंघोळी पासून ते वेणी फणी करे पर्यंत ,त्यांचा मूड सांभाळेपर्यंत नाश्ता पासून शाळेत वेळेत सोडेपर्यंत कामाची धांदल गडबड सुरु झाली . (गंमत म्हणजे आमच्या छोट्या राणी सरकारची वेणी- फणी करताच येत न्हवती.
मुलींचे लांबलचक केस वळविण्याची तशी सवयच नाही आहे म्हणा.
त्यामुळे वरच्यावर हेअर बेंड घातलं कस बसं अन दिली पाठवून शाळेत...) सकाळी ७:३० ची तिची शाळा...
घरी पुन्हा परतल्यानंतर छोट्या राणी सरकारचे छोटे राजकुमार भाऊ , ह्यांना गाढ झोपेतून कसेबसे जागे करत , त्यांना आंघोळ घालून , नाश्ता देऊन , शाळे ला सोडेपर्यंत सकाळचे ११:३० झाले.
घरी परतल्यावर जेवणाच्या तयारीला लागलो . त्यात १ ते दीड तास कसा गेला ते कळलेच नाही.
पुन्हा शाळेतून आमचं छोट्या बच्चुंना घरी आण्याची वेळ. पुन्हा तेच घर- शाळा- घर जेवण खावनं , दुपारच शांत पडावं  तर ह्याचं धांगड धिंगाणा सुरु ...झोपूच देईना .
त्याना ओरडता ओरडता घसा कोरडा पडे.. . शेवटी काय मुलं ती मुलंच, कसली एक्तायेत एकदा सांगून .....
पुन्हा क्लास ची वेळ , पुन्हा सोडायला एक फेरी ... अस करता करता सूर्य मावळतीला आला.
पुढे भाऊ- वहिनी घरी परतल्या नंतर काय तो श्वास मोकळा केला.
हुश्ह ... !
कितीही हि धावपळ - पळापळ .
दिवस ह्यातच पटकन कसा निघून जातो . ...कळत हि नाही. मग स्वतःसाठी तरी वेळ काय देणार ...?
आपल्या कुटुंबात असा सदस्य असतोच. आपल्यासाठीची त्यांची धडपड , कष्ट, ह्याची मोजदाद कधी नसतेच. अन ती करूहि नये. बस्स , त्या मनास कोवळ्या फुलाच्या पाकळ्या सारखं हळुवारपणे जपावं. 
कधी एकत्रित गप्पांत रंगून जावं , कधी चीटूकल्या हास्य गंधात एकत्रित मिसळाव.
 ह्यातच त्यांच्या मनातला क्षीण कुठल्या कुठे निघून जातो.
असंच लिहिता लिहिता ....
- संकेत पाटेकर

बुधवार, ७ जानेवारी, २०१५

'त्रिकुट' - बहिण- भावाच्या प्रेमावर आधारित एक छोटीशी कहाणी..

बहिण- भावाच्या प्रेमावर आधारित एक छोटीशी कहाणी ...लिहिण्याचा प्रयत्न बघू कितपत जमतंय ...सुरवात तर झालेय ...
नाती कधी ठरवून जुळवता येत नाही , अन म्हणूनच मनाच्या अंतरंगी उसळणाऱ्या उत्कट भावनांना हि कधी थोपवून ठेवता येत नाही . अशावेळी मनाचं हे वेडेपण शब्दांतून कथित होत जातं.
पुढच्या जन्मी , मी ' तुझा भाऊ ' म्हणून जन्म घेईन.
किंव्हा तू ' माझी बहिण' म्हणून जन्म घे ? कसही असो.
पण हे नातं आपलं जन्मापासून हवंय मला ... बस्स ? आपल्या दोघांच ...बहीण - भावाचं
मी आधीच माझ्या देवाकडे साकडं घातलंय , तू हि साकडं घालं.
पण त्या आधी ,तुझ्या अंतकरणातून उमटलेले शब्द मला कळू देतं, ऐकू देतं. मनभरून ..!
मिळेल ना हे नातं ..बहीण - भावाचं ..सक्खेपणाचं , बोल ना ..

बहिणीच्या नजरेला नजर देतं पाणावलेल्या डोळ्यांनी अन जड अंतकरणानी तो बोलत होता. पुढ्यात असलेला चहा हि एव्हाना थंड झाला होता .
कित्येक दिवसाच्या भेटी नंतर हा असा दुर्मिळ योग पुन्हा जुळून आला होता . त्यामुळे दोघं हि बोलण्यात अगदी गुंग झाले होते. . गत आठवणीच्या क्षणांना सुगंधित अत्तराची फोडणी देतं.
तसं आयुष्यात नाती हि अनमोल असतात. सुवर्ण मुद्रित मुखुटासारखी ,अभिमानाने लखलखनारी.., हेवा वाटून घ्यावी अशी.. कायम हृदय समीप हवी असलेली ... ती नाती मग रक्ताची असो वा मनाची , मनाने जुळलेली , हृदयाची धडधड थांबेपर्यंत ती आपली असतात. आपल्यात असतात.
जन्म मरण हा तर प्रकृतीचा नियम . जन्मापासून ते मरणापर्यंत सगळ काही ठरवून दिलेलं . अन त्या त्या प्रमाणे, त्या नुसार घडणारं . पण तरीही भविष्याचा वेध घेत जगत असणारे आपण जीवनातला हर एक क्षण एकमेकांच्या ओढीने, एकमेकां सहाय्याने , ओथंबून निथळनाऱ्या मायेने, शब्द गोडव्याने , गोंजारणार्या भावगंध स्पर्शाने , प्रेमाने, कायम घट्ट विणून राहावं म्हणून प्रयत्नशील असतो.
असाच हा एक प्रयत्न आयुष्याच्या एका वळणावर जुळलेल्या त्या नात्याची वीण कायम घट्ट राहावी म्हणून धडपडनाऱ्या त्या एका मुलाचा ... त्या प्रेम वेड्या भावाचा...
क्रमश :-
संकेत य पाटेकर
०७.०१.२०१५
खालील इमेज हि नेट वरून घेतली आहे .

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

जिथे प्रेम तिथे जीवन ..

प्रेम' विना जीवनाला ना रंग आहे ना गंध आहे. हे आयुष्यं प्रेम' विना खरचं बेरंग आहे.
सगळं काही असूनही .., केवल कुणाच्या प्रेमासाठी साठी , काळजी वाहू स्पर्शासाठी , शब्द न शब्दांसाठी माणूस आयुष्यभर कळवळत राहतो .
मनाची ती कळवळ ऐकणार कुणी भेटलं कि तो दाह तेंव्हा कुठे कमी होतो. पण तोपर्यंत.....
असो..
जीवापाड असणारी आपली माणसं सोबत असली कि कसली आलेय चिंता ? मनाच्या अंतर्बाही उसळणार्या अनेकानेक वेदना हि अश्याच मग खळखळत्या हास्य तवांगमध्ये हळूच गुडूप होवून जातात. ते कळत हि नाही, पण त्यासाठी आपल्या माणसांची आपलेपणाची साथ मात्र हवी असते.
अपेक्षेप्रमाणे सगळंच काही मिळतं अस नाही. पण अनपेक्षितपणाचे सुखद धक्के नक्कीच एखाद्याचं आयुष्य उजळून देतात. त्यात तिळमात्र शंका नाही. असे सुखद धक्के प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.असतात,पण ते कधी, कुठून कसे येतील ते मात्र सांगता येत नाही.
जीवन जगायचं तर आधार हा हवाच. अन तो प्रत्येकाला हवाच असतो, त्याशिवाय उभं राहता येत नाही.

प्रकाशाच्या दिशेने , अवकाशाकडे झेप घेत जाणाऱ्या वृक्ष-वेलींनाही हि जमिनीचा आधार हवा असतो . मग एखादं विजेच्या खांबावर हि झप-झप करत पुढे सरकणाऱ्या वेलेला हि , कसली आलेय तमा ? 
ती पुढे होत जाते प्रकाशाच्या दिशेने...
आधार असला कि जीवनही असंच नव्या आत्मविश्वासने, प्रेरणेने फुलत राहतं.
जिथे प्रेम तिथे जीवन .. 'प्रेम' अन मायेच्या स्पर्शाविना कोणीही वंचित राहू नये .
सगळ्याचं आयुष्यं हे प्रेमानं बहरून निघावं , उजळाव, अधिक अधिक ते उजळत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...!

आपलाच ,
संकेत पाटेकर उर्फ संकेत - ०२.०१.२०१५
HAPPY NEW YEAR TO ALL ..

मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

आत्ताच हाती आलेल्या सुचनेनुसार ..,

कधी कधी ह्या आपल्या नित्य नेहमी जीवन वाहिनीतून , रेल्वेतून प्रवास करतेवेळी, काळीज पिळवनारे प्रसंग जसे नजरेसमोर येतात तसेच हास्य कल्लोळलाने भरगच्च असे कित्येक क्षण देखील आपल्या चेहऱ्यावरील स्मित हास्य रेषा एखाद कळी सारखे हळूच उमलू देतात.
आजचीच घटना ,
सकाळी ८ वाजून ५० मिनिटाची ठाण्याकडून सीएसटी करिता, फलाट क्रमांक एक उभी असलेली लोकल ९ वाजून गेले तरी जागीची हलेना , वेळेत पोहोचण्यासाठी नेहमीच घाईत असलेले मुबई ठाण्याचे लोक अश्यावेळी वैतागतात ह्यात काही नवल नाही .सांगायची गरज नाही . काही जण मग मुकाट्याने दुसरी एक ट्रेन पकडतात. अन पुढे निघून जातात . तर काही जण तिथेच बसून आपल्या ट्रेन सुटण्याची वाट पाहत राहतात.
मी हि अश्यातलाच ...ट्रेन सुटण्याची वाट पाहत उभाच होतो . तेवढ्यात
दाराशी उभ्या असलेल्या एकाने हळूच म्हटले, ' बाबा हि ट्रेन आता रद्द होणार आहे बहुतेक .
मोटार मनच गाडी खाली गेला आहे ?
गाडी खाली म्हणजे ?
मला क्षणभर कळेनाच ? तेंव्हा त्याने त्याबद्दल खुलासा केला , ट्रेन सुरु होत नाही आहे, काही तरी बिघाड आहे ते पाहण्यासाठी , ट्रेन खाली काय तर करतोय तो ...
तेंव्हा मी हि डोकावून पाहिलं तर खरच काहीतरी काम चालू होत. सकाळची वेळ अन अशातच इतका वेळ गाडी उभी , कामावर जाईची लोकांची घाई , लोक ताटकळत ट्रेन सुटण्याची वाट पाहतायेत . तेवढ्यात भोंग्यातून Announcement ऐकू येते . Paltform no. एक वर उभी असलेली लोकल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे.
हे ऐकू येताच भरगच्च खचून भरलेली ती ट्रेन क्षणात रिकामी झाली .....
पाउलं पटा पटा एक एक करून बाहेर पडू लागली. पुढच्या फलाटा दिशेने ....पुढच्या ट्रेन साठी . मनातल्या मनात शिव्या हासडत ... इतका वेळ वाया गेला उगाच, अस गुणगुणत .
ते गुणगुणत असताच वाऱ्या वेगात पुन्हा एक Announcement ऐकू येते . Paltform No. एक वर उभी असलेली ट्रेन सीएसटी करता आता रवाना होत आहे. हे ऐकताच पुढे जाणार्या लोकाची पाउलं जागीच थांबली , पुन्हा रिवर्स घेत मागे वळली . पुन्हा पळापळ...धावपळ ..सीट मिळविण्यासाठी.
कुणाच्या तोंडी हसू तर कुणाच्या तोंडी शिव्या .. काय नुसतं इकडून तिकडून पळापळ ....
जीवन वाहिनीतिले असे विविध रंग आपल्या प्रवासा दरम्यान अनुभवता येतात.
नाही का ?
संकेत य पाटेकर
३०.१२.२०१४

सोमवार, १५ डिसेंबर, २०१४

आयुष्यं हे असंच असतं ...

एका ठराविक अंतरापर्यंत, एका क्षणापर्यंत , एका ठराविक मर्यादे पर्यंत आपण न बोलता...
न भेटता एखादयापासून दूर राहू शकतो . पण ती ठराविक रूपरेखा ओलांडली कि मनाचा विस्फोट झालाच समजा.
मन मग मागे पुढे पाहत नाही .आपण स्वतहून पुढे सरसावतो अन बोलू लागतो.
समोरील व्यक्तीशी...
काही वेळा प्रश्न सुटतो , पण काही वेळा प्रश्न इथूनच पुढे सुरु होतो.
आपलं 'मन' पुन्हा शोध घेऊ पाहतो हव्या त्या प्रश्नाच्या त्या उत्तराचं ...
उत्तर तर मिळत नाही . पण स्वतःशीच पाठ थोपावतं,   स्वतःलाच दोष देत मन शांत राहतं .
शांत राहण्याचा तसा पुन्हा प्रयत्न करतं .
कारण ..आयुष्यं हे असंच असत .
जगायचं असतं , जगू द्यायचं असतं
संयमानं 'क्षणाशी' झुंजायचं असतं
संकेत १५.०४.२०१४

गुरुवार, ११ डिसेंबर, २०१४

'जाणीवतेचा स्पर्श'

काही महिन्यापूर्वी चा एक प्रसंग ...ज्याने हृदयास छेद दिला होता , हृदयाची स्पंदनच जणू काही सेकंदासाठी आपलं 'धडधडण' बाजूला सारून बंद झाली होती. तो प्रसंग काल पुन्हा अनुभवास आला .म्हणून थोडं लिहावसं वाटलं.
स्पर्श- मग तो परकेपणाचा असो व आपलेपणाचा ..मनातल्या भावनांना तो अलगद उचंबळून घेतो. प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही. हे वपुंच वाक्य तसं फ़ेमसच आहे.
पण पण हर एक नात्यातला स्पर्श , त्या भावना वेगवेगळ्या असतात.
काही महिन्या पूर्वीची गोष्ट ,ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने ऐन गर्दीतून मार्ग काढत मी अन माझी मानस बहिण(मानस म्हटलं तरी सक्खीच बहिण म्हणा ) चालत बोलत रस्त्याने कडेकडे ने जात होतो. ठाणे हे तसं गजबजलेलं शहर असल्याने,नेहमी प्रमाणे रस्त्याला रहदारी हि होतीच. त्यामुळे तिला कुणाचा धक्का लागू नये (कारण वासनेने आचरटलेले लोक समाजात हर एक ठिकाणी वावरत असतात ) ह्याची काळजी मी घेत होतो . अर्थात आपली बहिण असो वा इतर कुणी स्त्री , काळजी घेण्याची जबाबदरी हि सर्वस्वा आपलीच असते त्यांसोबत असता . त्यामुळे काळजीघेण्या हेतूने , कुणाचा धक्का लागू नये म्हणून हाताला धरून मी तिला बाजूला सारत होतो तितकंच..
पण कुणास ठाऊक , त्या दिवशी स्वप्नात हि कधी विचार करावा लागला नसेल तो विचार करण्यास भाग पडलं .
ठाणे स्थानकातून आम्ही आपआपल्या मार्गी लागलो. तेंव्हा ती तिच्या घरा दिशेने निघू लागली ..अन मी माझ्या वाटेने ... काही वेळ निघून गेला. रस्ताने चालत होतो. तेवढ्यात मोबाईल बीप झाला. पाहिलं तर whatsapp वर मेसेज ची हि रीघ लागलेली . एका पाठोपाठ एक..
संकेत, अस रस्त्याने मला हात लावत जावू नकोस , माहित आहे तू काळजी घेतोयस , . बहिण ह्या नात्याने आहे...पण Sorry माझं लग्न ठरलंय आता , कुणी पाहिलं तर .. ?
मी क्षणभर भांबावलो . त्या मेसेज ने , रागाचा पार तर क्षणात वर चढला . काय बोलावं ते कळेना . मनात हि कधी असा विचार शिवला न्हवता . त्यामुळे भावनांचा एकदाच कल्लोळ माजला . अन शेवटी रागाने लालबुंद झालेले शब्द सर्कन पुढे निघून गेले.
जिला बहिण मानतो . तिच्याकडून असं ऐकायला मिळन. ह्यावर खरं तर विश्वासच बसत न्हवता . वासनेने अन स्पर्शाला हासूसलेला मी आहे का ? मी तिला तर बहिण मानतो. माझ्या मनात असा कधी विचार हि शिवला नाही. पण आज का हे असं ? मनातल्या मनात विचारांच्या भाव गर्दीत मी स्वतहाला लोटत होतो. घरी जाता जाता भेटलेला मित्र , माझ्या चेहऱ्यावरच्या ह्या अचानक बदललेल्या रूप रेखा पाहून तो हि विचारात पडला. आता तर हसत खेळत बोलण वगैरे चाललं होतं नि अचानक अस काय घडलं . ? त्याला हि काही सांगू शकलो नाही ..पण
जे घडलं होतं ते मात्र माझ्या मनावर विपरीत परिणाम करणार, त्यामुळे पुढे कित्येक दिवस तो परिणाम तसाच कायम होता. आजही आहे. त्यांनतर मात्र मी तिच्याशी संवाद साधून माफी मागितली होती.
तिचं हि कुठे चुकलं होतं म्हणा , नातं आमच्या दोघातच बहिण भावाचं.. तिच्या घरच्यांशी नि माझी नाही काही ओळख ना पाळख ? बर त्यात आता तिचं तर लग्न हि ठरलं होतं. त्यामुळे साहजिकच जे घडणार होत ते घडल होतं.
पण मी हि कुठे चुकलो होतो. माझी हि काय चूक होती. जे काय होत ते काळजी पोटी . बहिणीच्या रक्षणार्थ म्हणा /// पण कुणास ठाऊक तिथपासून जरा भीतीच वाटते. कुणाच्या अगदीच जवळ जायचं म्हणजे मग ती बहिण का असू दे. जरा दूर असलेलंच बर ...असं वाटतं .
तसं आईचा घरी दंडकच असायचा , मुलाने मुलातच राहावे , अन मुलींनी मुलींमध्ये , मग बहिण भाऊ असले तरी चालेल , बाजूला बसायचं हि नाही. ह्यावर मात्र मी चिडायचो. बहिणीच्या बाजूला बसायचं नाही. हे काय , काहीतरीच असं म्हणायचो ? आई नि माझं त्यावेळेसचा हा संवाद अचानक डोळ्यासमोर आला. अन डोळे पाणावले.
आज कित्येक दिवसा नंतर पुन्हा त्याच क्षणाची पुनरुत्ति झाली. ह्या वेळेसच बहिण न्हवती , होती ती ऑफिस मधलीच एक , सोबत एकत्र काम करणारे आम्ही दर वेळेस एकत्रच ऑफिस बाहेर पडतो. तस ह्यावेळेसही बाहेर पडलो . रस्त्यावरनं गप्पा मारत...
पुढे लाल बावट्याने वाहनांना रोखून धरलं होतं . म्हणून घाई गडबडीत रस्ता क्रॉस करायचा म्हणून आम्ही धावत पळत सुटलो. अर्धवट आलो नि तोच पुढे सिग्नल सुटला . अन नकळत पुन्हा तेच घडलं. काही अघटीत घडू नये म्हणून ...काळजी पोटी हात धरला गेला माझ्या नकळत ... अन तिच्या तोंडून पुढे शब्द बाहेर आले.
संकेत . मी Married आहे. लग्न झालंय माझं , रस्त्यावर असं हाथ पकडनं ................
शरमेने मान खाली गेली. Sorry म्हटलं . अन पुन्हा दीर्घ विचारात गढून गेलो.
हे क्षण देखील अजब असतात. पुन्हा घडतात . त्या त्या क्षणाची 'जाणीवतेची ' पुन्हा जान करून देत. पण जे घडतं ते नकळतच ...त्यात चुकी कुणाची नसते. चुकतात ते त्यावेळेसचे क्षण ...
टीप;- इथे कुणाच्याही भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नाही. मुख्यत्वेकरून ह्या संबंधित व्यक्तीचा..
मन कुणाचे दुखावलेच गेलं तर क्षमस्व :)
लिहिता लिहिता ...
मनातले काही ..
संकेत य पाटेकर
११.१२.२०१४

मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

रस्त्यावरला तो बाळ - फुगेवाला ..

घरातल्या बंदिस्त चौकटीतून एकदा का आपण बाहेर पडलो कि विस्तारलेल्या त्या नभाशी आपली थेट नजर भेट घडते. अन मग मनातले छुपे विचार हि त्या विस्ताराने प्रभावित होवून हळूहळू गतिमान होऊन फोफावू लागतात.
संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला डोंगर कड्याच्या कुशीत एव्हाना सार्यांच्या निरोप घेत निद्रिस्थ होऊ पाहत होता. पक्षांची हि 'काळोखी साम्राज्य' पसरण्याआत आपआपल्या घरट्याच्या दिशेने ये जा सुरु होती.
तसं सकाळपासून घरातल्या चार बंदिस्त भिंतीत बसून आलेला मनाचा क्षीण घालवायचा म्हणून मी हि सहजच घराबाहेर पडलो. अन रस्त्यावरल्या बिन मुखवट्या अन मुखवट्या परिधान केल्याल्या गर्दीशी एकरूप झालो.
कधी निखळ हास्य कधी तर कधी खोल विचारात डूबलेले भावगुंतीचे असंख्य चेहरे पाहत , मनाची अन पाउलांची गाडी तीनहाथ नाक्यापासून ते तलावपाळी अस करत पुन्हा घराच्या दिशेने पडू लागली. तेंव्हा येत येता सहज नजर रस्त्यावरल्या फुटपाथ्यावर गेली.
तत्क्षणी 'साहेब' हा आर्त भावनेने म्हटलेला खरा कि खोटा शब्द हि त्याच दिशेने चाल करून कानाशी येउन धडकला. रस्त्याच्या कडेला फुटपाथावर , दूरून कुठून खेडा पाड्यातून मुंबईत दाखल झालेलं , आई बाप अन छोटी मुलगी असा त्रिकुट असलेलं ते कुटंब , त्यातले ते दोघे आई -बाप , आपला बोजा बिस्तर सांभाळत येणा जाणऱ्या हर एकेकाकडे केविलवाण्या भावनेने दयेची भिख मागत तिथेचं पहुडलेलं , काही मिळेल का ह्या आशेने ..., मी हि तिथून जात असता त्यांनी एक कटाक्ष माझ्याकडे टाकला. अन 'साहेब' अशी आर्त हाक दिली.
मी मुद्धाम त्याकडे नजरआड केले अन तसाच पुढे निघून आलो. म्हटलं रोज अशी कित्येक मंडळी दिसतात. शरीराने धड धाकट असलेली... . कां बर्र हे भिख मागतात ?
त्यांना त्याच काहीच कसं वाटत नाही. ?
अन आपण का बर? त्याना भिख द्यावी?
मुळात भिख अन भिखारी हे शब्दच लाजिरवाणे आहेत.
असो , परिस्थिती हि कुणावर सांगून येत नाही , पण हल्ली हे जरा जास्तच झालंय म्हणायचं , घाम न गाळता , पैसे मिळविण्याची धडपड ...,,मन अश्याच विचार चक्रात गुंतले होते,चालत होते.
नि तोच पुढे , रस्त्यावरल्या एका दुकाना शेजारी, हास्य हरवलेला एक छोटा निरागस मुलगा , साधारण ९-१० वर्षाचा , हाती काठी घेऊन त्यावर टांगलेल्या , विविधरंगी फुग्याकडे एकवार पाहत रस्त्यावरल्या येणाऱ्या जाणार्या कडे अगदी आशेने ते घ्यावे म्हणून विनवणी करे, पण कुणीच घेईना म्हणून व्याकुळतेने तसंच पुढे चालत राहे .
त्याच ते अनवाणी चालत राहण अन चेहऱ्यावरचे निपचित व्याकुळतेने कळकळलेले भाव हृदयास भिडले खरे ... एवढ्याश्या वयात पोटा पाण्यासाठी सुरु असलेली त्याची वणवण , खटपट ते एकंदरीत दृश्य माझ्या अंतर करणाला 'काहीतरी कर रे' फुकट नाही पण त्याच्या कष्टासाठी' तरी ह्यासाठी विनवणी करू लागलं. भुकेने कासावीस झालेलं त्याच कोवळ मनं , अंतकरणाला जावून भिडत होतं. पण माझे हाथ थिटे पडत होते.
अजूनही हाथ थिटे पडतात
काही देण्याच्या हेतूने...
हि काही दिवसापूर्वीच लिहिलेल्या चारोळीतील दोन ओळी मनात वेगाने घुमू लागल्या . पाय त्यातच पुढे चाल करू लागले. एक विनाकाही कष्ट करता पोटा पाण्यासाठी हाताची झोळी करत आशेने बघणारे लोकं , अन कष्ट करून वणवण भटकून स्वकष्टाने आपली भूख भागवणारे लोकं अशी तुलनात्मक विचारांची घडी मनाच्या खोलीत फिरकी घेऊ लागली.
आपण त्या मुलाला काही तरी मदत करायलाच हवी ह्या निर्धानाने चालते पाय जागीच थांबले, शोधार्थ नजर इकडे तिकडे वळू लागली.
No one has ever become poor by giving ...हे कधीतरी कुठेतरी वाचलेलं वाक्य तितक्याच मनावर आरूढ हि झालं. अन त्या मुलाच्या दिशेने मन धावू लागल.
तो बाळ फुगेवाला एव्हाना बराच पुढे गेला होता . त्याच मागोवा घेत पाउलं एका ठिकाणी थांबली माणुसकीचा अनमोल साठा अजूनही आपल्या समाजात शिल्लक आहे तर , ह्याचा पुरावा आज पुन्हा मिळाला.
एक सुशिक्षित बाई आपुलकीने त्या बाळ फुगेवालाची चौकशी करत, काही हवाय का ? अशी विचारणा करत होती. ? त्याने हळूच मान डोलावली .
एक बिना बर्फाचा उसाच्या रसाने भरलेला एक ग्लास त्याच्या कोरड्या ओठावरती फेसाळ होवून गटा गटा गायब हि झाला. तहान भुकेने व्याकूळ झालेलं त्याच मन काहीस तृप्त झालं .
पण हाती काठी असलेल्या त्यावर विराजमान होवून डुलणार्या विविध रंगी फुग्यांचा प्रश्न अजून हि सुटलेला न्हवता. त्याच्या पोटा पाण्याचा खरा प्रश्न तो ........
म्हणून त्याकडील विविधरंगी फुगे , त्याची विचारपूस करत करतच ' एक एक विकत घेतली. अन त्यास अधिकचे काही पैसे देऊ केले. पण त्याच कोवळ पण सशक्त अन प्रामाणिक मन हि अस कि अधिकचे पैसे पुन्हा करावे म्हणून त्याने माझ्याकडे एक वेळ पाहिलं अन हात पुढे केले. तेंव्हा मन काहीसं गहीवरलं . हळूच पाठीवरती हात थोपवून मी राहू दे रे अस म्हटलं ..., अन आम्ही दोघे आप आपल्या वाटेने निघून गेलो.
पण विचारांची हि घंटा पुन्हा घन घन करू लागली. पोटा पाण्यासाठी फुगे विकून वणवण फिरणारा तो एवढासा मुलगा, अन काहीच न करता काही मिळेल ह्या आशेने पाहणार ते त्रिकटू कुटुंब , त्यातले ते दोघे आई बाप ...ह्यातील फरक करत ...
खरं तर अस कुणी दिसलं कि मन कासावीस होतं. त्यात कुणी लहानगा असेल तर काय बोलावं? एकीकडे अन्नासाठी म्हणून वणवण फिरणारे , अन एकीकडे अन्नाची नासाडी करणारे ...हे चित्र कधी पालटणार ?
असंच लिहता लिहिता ..
संकेत य पाटेकर
०२.१२.२०१४

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

तुझा देव मला माफ करणार नाही ...

तुझा देव मला माफ करणार नाही ...
'' हृदयाशी , इथे ठेवतोस ना सगळं '' 
काही दिवसापूर्वी एका सुखद क्षणा प्रसंगी , खेळकरपणाने पण अगदी मनाच्या तळा गळातून मला संबोधलेलं हे तिचे वाक्य , हृदयाशी अगदी घर करून आहे.
क्षण वाऱ्यानिशी बदलतात . तसा माणूस हि एकाकी बदलतो. 
परिस्थितीशी झुंजाता झुंजता ... 
पण तेंव्हा त्याच्या स्वभावात अन वागण्यात झालेला थोडाअधिक बदल हि आपल्या रुची पडत नाही. मस्तकात त्या गोष्टी जाताच नाही म्हणा ...झालेला बदल हा आपल्याला अनपेक्षित असतो .

आपल्याला हवी असलेली, अभिप्रेत असलेली व्यक्ती कालाओघात , परिस्थितीशी दोन हात करत अशी बदलेली असते. तेंव्हा त्या बदलेल्या मनाशी नव्याने जुळवून घेताना आपल्या मनाची सुरु असलेली वारेमाप धडपड समोरचं मनं हि हेरावून घेतं  .

पण हवा तसा प्रतिसाद देत नाही. का ? त्याचं कारण हि कळत नाही.
आपलं मनं मात्र अशावेळी पूर्वीच्या सोनेरी क्षणासोबत विरघळून जातं . आत्ताचे हे क्षण अन पूर्वीचे ते क्षण ह्यात तुलना   करत....
पण एखाद दिवशी कुठे कधी अवचित भेट घडते.
अन नकळत काही शब्द नव्याने मनावर छाप उमटवून जातात . अन झाले गेलेल्या गोष्टी नकळत मनातून पुसल्या जातात . मनातला रोष - रुसवा कुठल्या कुठे निघून जातं.
असेच काही शब्द , वाक्य मनावर कोरले गेले....
त्यादिवशी ..हळुवार हृदयाशी बिलगत .....'तुझा देव मला माफ करणार नाही'
'' हृदयाशी , इथे ठेवतोस ना सगळं''...
प्रेमाचा एक शब्द अन मायेचा एक स्पर्श हि पुरेसा असतो ...मनातला रोष - रुसवा घालवून देण्यासाठी ...
आनंद फुलविण्यासाठी...
' तुझा देव मला माफ करणार नाही ' ह्या तिच्या वाक्यावर माझं इतकंच म्हणन आहे.
माझा देव विशाल मनाचा आहे ...तो का नाही माफ करणार ... नाहीच माफ केल तर मी आहेच तडजोड करायला .
असंच लिहिता लिहिता..
नातं तुझं माझं ..
संकेत पाटेकर
१२.१०.२०१४

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

कुणीचं कुणाचं नसतं रे ...?

काल FB वर ह्या आशयाची एक पोस्ट वाचली.
तेंव्हा भूतकाळातल्या त्या गहिऱ्या संवादात मन पुन्हा हरखून गेलं.
कित्येक दिवस अन महिने ओलांडली असतील पण त्या संवादातला त्या व्यक्तीचं हे मनाला भिडलेलं हे वाक्य मनाच्या भावपटलावरून अजून काही उतरायचं नाव घेत नाही .
कारण माझ्या आयुष्यात त्या व्यक्तीला खूप महत्वाच स्थान आहे .
त्यामुळे ' कुणीचं कुणाचं नसतं रे' ह्या तिच्या व्यक्तिगत जीवनभूवनातून उमटलेले स्वर मात्र माझ्या मनाला घायाळ करून गेले.
अस काहीच नसतं ... ? अस त्यावेळेस मी म्हणालो होतो खरा,   पण त्या मनास कस पटवून द्यावं  हे त्यावेळेस मला जमल नाही. अजून हि नाही..
कधी कधी मनाच्या ह्या असंख्य भाव गर्दीत मला स्वता:हालाच हा प्रश्न पडतो.
खरचं कुणीचं कुणाचं नसत का रे ?
तेंव्हा स्वतःला सावरत सावरत माझंच मन मला उत्तर देत.
कुणीतरी आपल्यासाठी हि झुरत असतं रे ..! जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ....
मग कुणीच कुणाचं नसतं अस कस होईल ?
आपलं त्यांच्याकडे लक्ष नसतं इतकंच किंव्हा असूनही दुर्लक्ष करण्यासारखं आपण करत राहतो.
आपण एकटे असे नसतोच कधी , आपल्या विचारधारा नेहमीच आपल्या .. सोबत असतात .
मुळात जन्म अन मृत्यू ह्या मधला काळ म्हणजे जीवन .अन ह्या मधल्या काळात कितीतरी मना- मनाची नाती आपण जुळवत असतो. आपल्या कळत नकळत... तेंव्हा आपल्या प्रती हि कुणाच्या मनात आपुलकीची आपलेपणाची प्रेम भावना निर्माण झालेली असते. एक जिव्हाळा निर्माण झालेला असतो.
पण इतकं असूनही आपल्या मनाच्या तळाशी घर केलेली काही नाती अन त्यांच्यावरच व्यक्तिगत असलेलं  अतोनात निर्मळ प्रेम आपल्याला इतर मनाच्या आत डोकाविण्याची संधीच देत नाही.
मग अशा प्रश्नाला कधीतरी आपण वर उचलून घेतो. का ?
तर आपलं अस्तित्व अन त्याच कुणालाच काहीच न वाटण , ज्यांच्या प्रती आपल्या मनात भरभरून प्रेम आहे अन आपलेपणा आहे .
मुळात 'प्रेम'  हा भावनेशी संबंधित प्रश्न .....
जेंव्हा आपले निकटवर्तीय आपल्याला टाळू पाहतात ..ह्या त्या कारणास्तव तेंव्हा हा प्रश्न उद्भवतो.
आपण जस इतरांवर आपलेपणाने प्रेम करतो. तसंच काहीस प्रेम आपल्याला अभिप्रेत असतं समोरच्याकडून. हर एक परिस्थितीशी झुंजताना एक मोलाची साथ हवी असते त्यांची बस्स ... जेंव्हा ती मिळत नाही.
तेंव्हा  नक्कीच वाटतं खर .. ..कुणीचं कुणाचं नसतं..? जो तो स्वतःसाठी जगत असतो.
पण खरचं कुणीतरी आपल्यावर प्रेम करणारं अन साथ देणारं असतंच. 
बस्स आपण त्याना ओळखत नाही किंव्हा तितकस महत्व देत नाही . 
 जीवन हे मुळात एकटे जगण्यासाठी नाही आहे..............
आपल्याला हवे असलेले , आपले निकटवर्तीय , आपल्या कायम सोबत असतील तर मला वाटत नाही कि असा प्रश्न कधी उद्भवेल . 
पण मुळात दोन प्रकारची माणसं असतात. स्वार्थासाठी म्हणून जवळीक करणारे अन काही निस्वर्थाने प्रेम करणारे ..... हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग ....
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या ...
असंच लिहिता लिहिता ..
मनातले काही ..
संकेत पाटेकर ..
११.१०.२०१४

बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

भावनिक खेळ ..

खरंच किती गंमत आहे ...ह्या भावनिक खेळामध्ये ...
कुणी भरभरूनं कौतुक करतं. आपण केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल किंव्हा करत असलेल्या एखाद कुठल्या गोष्टीबद्दल ...तर कुणी चतकोर शब्द हि काढत नाही.
 उलट नाक मुरडून घेतात अन दुरूनच आपल्यावर नजर ठेऊन राहतात.
तर कुणी बोल लावून ' आपलंच (स्वतःच ) ते योग्य अस म्हणतं आपल्या मनावर आघात करत राहतात.

पण ह्या सर्वांतून ' आपलं मन' मात्र योग्य ते वळण घेत राहतं. पुढे जातं राहतं .

आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं आहे .
पण मला वाटत सर्वप्रथम आपण शिकतो ते आपल्याच माणसांकडून ....ह्या समाजाकडून ....
ज्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळते मग ती शब्दिक असो वा हळुवार पाठीवरल्या मायेच्या स्पर्शाची.. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत राहतं . पुढे जाण्यासाठी.....नाही कि त्यात हुरळून जाण्यासाठी .

लोकं आकार देण्याचं काम करतात . अन  त्यातून आपण स्व:तहा घडत जातो. 
आपल्याला हवं तसं. 

असंच लिहिता लिहिता ..
- संकेत पाटेकर
१६.०९.२०१४

बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

तिचा वाढदिवस...

त्या दिवशी बरेच दिवसाने करी रोड ला उतरलो. एका गोडश्या बहिणीकडे, तिच्या सासरी , 'निमित्त होतं ते गणराजाचं दर्शन. तिने तसं आवर्जूनच बोलावलं होतं म्हणा .
दूर दूर चे लोकं ना आमच्याकडे दर्शनाला येतात. रांगच लागलेली असते एक ... गणपती बाप्पाची इतकी सुरेख अन सुंदर मूर्ती आहे ना... तू बघतच राहशील ...तू ये तर खरा... अन येताना कॅमेरा हि घेऊन ये फोटो काढायला. आपलेपणातून उमटलेले हे प्रेमाचे तिचे गोड शब्द ......
खरं तर मला नशीबवानचं म्हणावं लागेल . ..कारण एकेक फारच गोड अन प्रेमळ बहिणी लाभाल्यात त्यातलीच हि एक गोड बहिण. 'सुवर्णा' दूर असूनही नात्यातला संवाद नावाचा धागा अन विश्वास अजूनही तुटलेला नाही. तोच खेळकरपणा तोच शब्दातला गोडवा. नातं हे अस अन असंच असायला हवं. कायम .. टवटवीत ...प्रसन्नता बहाल करणार ...
गणराजाचे दिवस ..,सात दिवसाचे गणपती आपल्या घरी परतायच्या मार्गी होते. आणि नेमकचं त्याच दिवशी तिचा वाढदिवस एकत्रित असा जुळून आला होता . खर तर आपण ज्यांना मनापासून आपलं मानतो त्यांचे वाढदिवस हि कायम लक्षात राहतो .
त्यामुळे तिचा वाढदिवस अर्थातच माझ्याही लक्षात होता. दरवर्षी प्रमाणे न चुकता न विसरता मी फोन करणार होतो. पण आदल्याच दिवशी तिचा फोन खणाणला .
संकेत , तू येतोयस ना ? केंव्हा येणार आहेस ? खरं तर गुरवारी मी कुठे बाहेर जात नाही. ऑफिस सोडून (कारण काय ते नंतर सांगेन कधीतरी ) म्हणून विचार करू लागलो. उद्या तर गुरवार, म्हणून शुक्रवार ठरवलं अन परवां येतो ...अस सांगून मी फोन ठेवून दिला .
पण पुन्हा आठवण झाली. अरे उद्या गुरवार अन हिचा वाढदिवस..मग काय हाच सुवर्ण क्षण साधून उद्याच जावू गणरायाच दर्शन घ्यायला. त्यानिमिताने वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा हि देता येतील . प्रत्यक्ष तिच्या उपस्थितीत . म्हणून पुन्हा तिला कॉल केला .
हेल्लो ,अगं ...उद्या ४ सप्टेंबर ना ?
हो....तुझ्या लक्षात आहे तर ? काही बोलण्याच्या आतच तिनेच सवाल केला ? हो तर ..अस कसं विसरेन. मी उद्याच येतो...तुझा वाढदिवस हि आहे नि बाप्पाचं दर्शन हि घेता येईल . ठीक आहे… ये मग, मी वाट पाहेन... असं बोलून फोन ठेवला .
दुसर्या दिवशी ऑफिसला निघालो. तिथून सुटल्यावरच ' करी रोड ' गाठणार होतो . ऑफिस मध्ये पोहोचलो. नेहमीप्रमाणे कामकाज सुरु झालं. अन त्यातचं दुपारचे साडेबाराचे टोले पडले. अन तिचा फोन खणाणला.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....'हैप्पी बर्थडे' ताई ,’काही बोलण्याच्या आतंच मी तिला बर्थडे विश केल .
''काय रे माझा वाढदिवस अन मीच फोन करतेय तुला ? तुला फोन करायला हवं ना ?''
हो गं.....पण मी म्हटलं मी येणारच आहे तिथे , मग फोन वरून शुभेच्छा कशाला ? त्याची मजा आताच, ह्या क्षणीच का घालवायची . घरी आल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करेन ना ? ठीक आहे. thanku thanku... पण एक काम कर ... घरी कुणालाच माहित नाही आहे. माझा वाढदिवस आहे ते . . तू मला सर्वांसमोर विश नको करू. कळू देत मला हि ..कोणा कोणाच्या लक्षात आहे ते माझा वाढदिवस . ह्यांच्या (नवऱ्याच्या ) पण लक्षात नाही आहे.
हाहाहा .. म्हटलं गंमतच आहे. सांगून टाक ना मग ...तुझा वाढदिवस आहे ते, ...त्यात काय लपवायचं . 'नाही रे मला बघू देत ' तू विश नको करू ..पण वेळेत ये, अस बोलून तिने फोन ठेवून दिला.
मनातल्या मनात मला हसूच फुटत होतं. अन चिंतन हि ..ह्या गोष्टीच. कि खरच आपल्या ह्या वाढदिवसाला आपण आपल्या लाडक्या व्यक्तीच्या किंव्हा आपल्या अगदीच जवळच्या व्यक्तीच्या शुभेच्छांसाठी आपण अगदीच आतुरलेलो असतो. कधी आपल्या लाडक्या व्यक्तींकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल, कधी भेटी गाठी होतील, ह्याचीच वाट पाहत असतो. काही वेळा त्याची पूर्तता होते . तर काही वेळा वाट पाहण्यातच दिवस ढळून जातो . तर असो... काही वेळाने पुन्हा तिचाच फोन आला...हे सांगायला कि, तू .सर्वांसमोरच मला विश कर..चालेल , त्यांच्या लक्षात तरी येईल माझा वाढदिवस आहे ते.
मी म्हटल बर..बर...ठीक आहे. येतो साडे सात वाजेपर्यंत.... पुढे काय झाले ते सांगायची गरज नाही. घरी जाईपर्यंत कुणाच्या लक्षात हि न्हवतं तिचा वाढदिवस आहे ते . पण सर्वांसमोर जेंव्हा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेंव्हा घरातला हर एक सदस्य अचंबा करायला लागला.
सासू म्हणाली ...काय ग ! सांगायचंस ना ... ह्म्म्म.. पण मला बघायचं होत ..कोणा कोणाच्या लक्षात आहे ते.... अश्या तर्हेने तिचा वाढदिवस उशिरा का होईना सर्वांच्या लक्षात आला. आणि ते लक्षात आणून देण्यासाठी मी मात्र निमित्त ठरलो . ह्याचा फार आनंद झाला. आनंदाच्या वलयात वाढदिवसाचा सुगंधित अत्तर सर्वत्र पसरला. आणि त्याने तिथला माहोलच बदलला .
जाता जाता तिचे गोड शब्द पुन्हा ....मनात ठसून गेले. जेवण चांगल झालं ना रे ? आवडलं ना ? मी केलेलं. मी म्हटलं..हो ग ताई...माझी आवडती भाजी जी होती. ..मेथी ची ...!
अन प्रेमाने वाढलेली कुठलीही गोष्ट ती गोडच असते न्हाई ...?
दोघांच्या हि चेहऱ्यावर एकच स्मित हास्य उमटलं अन पाउलं त्याच लयात घरच्या दिशेने निघू लागले. पुन्हा भेटू म्हणत .

नातं ...मग ते रक्ताचं असो वा नसो , त्यात आपलेपणा आला कि ते अधिक दृढ होत जातं . ते जन्मांच नातं बनतं ... मग कुणी कितीही कोसो दूर असो आपल्यापासून, त्याचं स्थान नेहमीच हृदयाशी असतं . नेहमीच धडधड करतं .
स्टेशन ला पोहचल्यावर तिला पुन्हा एकदा फोन केला . वाढ दिवसाच्या खूप सार्या प्रेमळ शुभेच्छा ताई ...पुन्हा एकदा अशीच हसत खेळत रहा नेहमी .....
दूर असूनही मनाशी घट्ट जुळलेल्या अश्या ह्या रेशीम गाठी ...
- संकेत य पाटेकर
१०.०९.२०१४