रविवार, १७ एप्रिल, २०१६

तुझ्यावरच्या चारोळ्या...

तुझ्यावरच्या चारोळ्या .....

आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो...नवी ओळख असते नवं नातं गुंफलेलं असतं..... 
अन अश्यात  काही शब्द काही ओळी नकळतओठाशी येतात ...

              सोनसळी आठवणी
              लागे बोलाया चालाया 
              दिन गुलाब गुलाब 
              प्रीत लागली फुलाया !   
              - संकेत


कधी चारोळी रुपात तर कधी ...कवितेच्या स्वर सागरातून ....
तिच्या हसऱ्या नजरेशी ...अन भावगंध चेहऱ्याशी अन मनाशी गोड संवाद साधत .....
अश्याच काही चारोळ्या .......प्रेमातल्या अन वियोगातल्या ....
प्रेम म्हणजे दोन श्वासातलं अंतर एक होणं. समरस होतं जाणं. दुधात साखर मिसळून
जावी तशी...पूर्णतः समर्पण ... 
 
                 काही नाती हि नकळत                            
                 जुळली जातात... 
                 प्रेमाच्या बंधनात अलगद 
                 जखडली जातात ...
                 - संकेत                   ~ ~ ~ ~ ~             सहज एखादी मैत्री जुळते 
                                                                            मैत्रीतून नवी ओळख घडते .......
                                                                                             -संकेत  
                   प्रेमात माझ्या, हृदयी स्नेह बंध
                  डोळ्यात तरळते, तुझेच प्रतिबिंब
                    - संकेत                 
~ ~ ~ ~ ~           प्रेम म्हणजे काय ?
                                                                            मी अन तू
                                                                            माझ्या  मनातली तू
                                                                            तुझ्या  मनातला मी  , हे ना ?                                                                                                          -संकेत
                  एकटक तुझ्या नजरेशी
                  छेडत असतो वारंवार
                  अन त्या नजरेतुनीच मिळवत
                  जातो , प्रेमाचे हे शब्दसार ...
                   - संकेत                    ~ ~ ~ ~ ~ 
 संवाद हा नात्यातला एक महत्वाचा दुवा ... तो असतो म्हणून तर नात्यात  गोडवा असतो.  आणि अश्या संवादातूनच असे नट खट प्रश्न पडतात . ...
               ती म्हणते अगदी लाडीने,
               का नाही तू राग व्यक्त करतं
               मी म्हणतो तितक्याच प्रेमओढीने
              का नाही तू प्रेम व्यक्त करतं...
                - संकेत                    ~ ~ ~ ~ ~ 
               तुझं माझ्यावर प्रेम किती ?
               हे शब्दात कसे मांडावे
               अमर्याद ह्या शब्दाला , सांग
               प्रेमाने कसे भागावे ?
                - संकेत              
                                                   ~ ~ ~ ~ ~ 
               आज तिनेही तिच्या देवाकडे 
               एक 'मागणे' मागितले असेल
                कर जोडूनी मनोभावे 'मला' च वरिले असेल.  
                हरतालका विशेष .. – संकेत                   
                                                   
               तिचं एक स्वप्नं आहे
               तिला 'तो' मिळावा , आयुष्यभरासाठी...
               त्याची हि एक इच्छा आहे
               तिनं एकदा 'भेटावं' ते स्वप्नं साकारन्यासाठी...
              - संकु                                                                       
माणूस प्रेमात पडला कि त्याला  स्वतःचे आत्मभान हि  उरत नाही.   भास आभास ..ह्यांनी त्याच मन त्या व्यक्तीच्या मनाभोवती सतत घिरट्या घेतं राहतं. 
 मग अश्या काही ओळी आपुसकच ओठी  येतात........     

                     तुझाच चेहरा 
                     तुझाच भास 
                     का रे हि सारखी आस?
                     तुझेच शब्द
                     तुझाच आवाज
                     का रे सारखी तुझी ही साद?
                    तुझेच प्रश्न
                     तुझेच उत्तर
                     का रे प्रश्नौत्तराचा हा तास?
                     सांग....?   - संकेत     
 ~ ~ ~ ~ ~     तुझ्या सारखी तूच सखे 
                                                                            तुझ्यविना ना कुणी दिसे
                                                                            तुझ्यावाचून काही सुचे
                                                                            तूच असे रे ध्यानी - मनी 
                                                                            तूच रे सखी साजनी... 
                                                                             -  संकेत                         
                  तिचा Whatsaap वरील डीपी                                                                                                                               मी रोज वेडावून पाहतो... 
                  अन नजरेतल्या 'स्वराला'
                  तिच्या, हृदय संगीत माझं देतो ...
                                       - संकेत                                                                                                                                                                                          
           मी आधीच वेडा होतो , तिने आणिक वेडे केले ....                                                                                                                                       प्रेमाच्या सुखद सरितं माझे 'मी' पण सारे गेले 
                                                                                                                              - संकेत
                  झालेला संवाद पुन्हा वाचताना 
                  मन पुन्हा त्या आठवणीत रमतं
                  हळूच गहिऱ्या हास्यखळी सोबत
                  ते पुन्हा त्या क्षणात मिसळतं
                 - संकेत                                      ~ ~ ~ ~ ~  
मी आत्मभान विसरे  तुला पाहताना …  
                                                                                      तू बोले मनातले  मला जाणताना …
                                                                                                                  - संकेत 

प्रेयसीचा नकटा  राग म्हणजे ... तिचा विजयच जणू ....प्रश्नोत्तराच्या ह्या तासापुढे , आपल्याला शरणागती हि पत्करावीच  लागते...... त्यातच आनंद असतो. 
     
             प्रश्न उत्तरांच्या खेळीमध्ये 
               तुझंच नेहमी जिंकनं असतं
              मी हारत जातो एकपरीनं...
               तुझं 'हसनं' तेवढं सुखावत राहतं...
              - संकेत                       ~ ~ ~ ~ ~                  तुझ्या रागावण्यात हि 
                                                                                                        एक नशा आहे...
                                                                                       अजूनही धुंद करते आहे..... 
                                                                                                         शब्दांची ती चाल
                                                                                                            अजूनही ताल धरते आहे......
                                                                                                                       - संकेत      
प्रेयसीचं ..  रुसणं  देखीलं  वेड लावून जातं  म्हणा  ..........

                              काय बोलू कसं बोलू 
                                     सखे अगं सांग मला ...
                                          तुझ रूसणं पुन्हा हसणं 
                                           वेड लावी रे ह्या मना ....
                                                                         - संकेत   ~ ~ ~ ~ ~    
                             
                                     मी आधीच वेडा होतो ... तिने आणिक वेडे केले ....
                                              प्रेमाच्या सुखद सरितं ...  माझे 'मी' पण सारे गेले ...                                                                                                                                                       - संकेत  

प्रेमाची सुरवात तर होते ...एकमेकांविषयी जिव्हाळा, काळजी असते मनामध्ये ....
पण एकमेकांविषयी असलेल प्रेम काही वेळा व्यक्त व्हायचंच राहून जातं. मग तेंव्हा अशा वेळी सुचतात.  
             दिरंगाई नको आता , 
             हो कि नाही सांगून टाक 
             मनी दडल्या स्वप्नांना 
             बेधुंद होवून रंगवून टाक . 
            - संकेत                                ~ ~ ~ ~ ~          
मला अजूनही प्रश्न पडलाय 
                                                                                  तिच्या होकार नकाराचा 
                                                                                  त्यानेच उठलाय वादळ
                                                                                  ह्या हृदयी स्पंदनांचा !
                                                                                   - संकेत

           प्रेमा शिवाय हासू नाही 
           प्रेमा शिवाय आसू नाही 
           प्रेमा शिवाय आपुलकीचा 
           भावगंध स्पर्श नाही 


प्रेम म्हटलं  कि  भावना आल्या ....हळव्या तवंग उसव्णाऱ्या अन तिथे रागापासून , अबोला धरेपर्यंत ....
सर्वच गोष्टी आल्या...अश्यात आपलं मन काहीस सैर वैर होतं. अन क्षणा क्षणा च्या त्या आठवणी मध्ये गुरफटून जातं. 

           तुझ्या आठवणीतच सखे 
           दिवस हा सरून जातो... 
           अन हा हा म्हणता म्हणता 
           माझा मीच विरून जातो...  
                             - संकेत           ~ ~ ~ ~ ~   त्या बसल्या जागेवर 
                                                                      तुझ्या आठवणींचा झुला अजूनही झुलतोय ... 
                                                                       जणू सार काही पुन्हा 
अगदी नव्यानेच जुळतंय ...
                                                                                                               - संकेत
         तुझ्या आठवणीतच 
         दिवस सारे सरती... 
         तुझ्या आठवणीतच 
         मन - संवाद घडती...
         - संकेत                                  ~ ~ ~ ~ ~  
क्षणो क्षणी 'त्या भेटीचे' 
                                                                                        नवे गंध उगळत राहतो 
                                                                         ऐक ! सखे, सजणे अगं
                                                                                         मी असाच वेडावून जातो. 
                                                                                                            - संकेत

            भावनांचा अधीर खेळ हा शब्दात कैसे मांडणे 
                                                                         तू अबोल राहता ऐसी सांग मी कैसे वागणे ?
                                                                                                                         - संकेत

                               आठवणीच्या सरींमध्ये  
                                पुरता मी भिजून जातो 
                                अन ' प्रेमाचा ताप '  

                                स्वतःच ओढावून घेतो.....
                                         - संकेत                           ~ ~ ~ ~ ~       
मनं आतुर आतुर 
                                                                                                      तुझ्या आठवात विसे 
                                                                                                      कोसो दूर हि असता 
                                                                                                       डोळ्यासमोर तू दिसे                                                                                                                                                       - संकेत



क्रमश :  पुढील चारोळ्या लवकरचं ......
धन्यवाद...!
संकेत पाटेकर









  


रविवार, २० मार्च, २०१६

अहंभावी मन ....

"अरे तू नाही तर ...तिने ..कुणीतरी म्हणा ना Sorry  , 
हवं तर कान पकडा  ..झाली  बाबा चूक, वा घडलं नकळत  म्हणून ... 
माफी  मागा , स्वतःहून  पुढाकार घ्या, संवाद साधा "
कुठे , काय बिघडणार आहे ? कि  स्वतःला काही कमीपणा येणार आहे  ? 

किंव्हा  दुसरं तिसर  , कुणी बघेल ह्याची  लाज , शंका ,  भीती  ? काय ...? काहीच  नाही  ना ..तरीही ?  
तरीही आपण इतके अविचारी, अहंकारी ....कसे काय होतो रे ? 
साधासा एक विचार आपल्या मनाला शिवत नाही.  आपल्या नात्याबद्दल  त्या व्यक्तीबद्दल , ,  
अन आपल्या जाणीवांबद्दल,   कमाल आहे न्हाई   ?
विचार करायला हवा . 

जितक्या सहजतेने आपण हि  नात्याची  दोर विणतो ना  , तितक्याच सहजतेने हे अविचारी स्वार्थी घाव आपल्या नात्याला  खीळखिळं  करून सोडतात. अन मग  अतूट विश्वासाने बांधली गेलेली  हि नाती सुद्धा क्षणभराच्या अश्या एकेक  शब्दाने घायाळ होवून एकाकी   कोसळतात .अन तुटतात .

अन मग  उरतो तो केवळ  श्वास ...करपटलेला , कोंदटलेला. त्याचाच त्रास होतो. 
अन असह्य होऊन जातं सगळ, . हे जगण सुद्धा ...
 बरोबर ना ? 

इथे क्षणो क्षण जगण्याला अन ह्या जीवनाला 'किंमत' असते रे... 
अन आपण व्यक्ती व्यक्तीला , आपल्या गरजेनुसार 'किमतीचे' लेबल लावून मोकळे होतो. 
मला हेच तर पटत नाही. 

''त्याला माझी काहीच किंमत नाही . तिला किंमत असती तर .............''
हे असे वाक्य बोलणं म्हणजे नात्याला व्यवहारात गुंडाळणे असे होय . म्हणजे काहीतरी द्यावं अन त्या मोबदल्यात काहीतरी घ्यावं असंच जणू ......  

मुळात हा आपला अहंभाव  आहे ना,  हाच  नडतो.  जाणिवांच्या हसऱ्या क्षणात  मुक्तपणे  बहारत  असता, एकाकी आपल्या  नात्याला  'मी' पणाचे अहंकारी लेप देऊन …. 
मीच का  ? त्याने का नाही ?  त्याला / तिला कळायला नको का ?

नेहमी मीच का म्हणून सुरवात करावी  ? गरज असेल तर  बोलेल, कॉल
 करेल   ? हे असे अहंभावी विचार नातं तोडायला अन तुटायला कारणीभूत ठरतात.
तुमचं हि हेच झालंय….. 

खरं  तर ,  समोरच्या मनात काय सुरु आहे .त्याच्या आपल्या बद्दल  काय भावना आहेत ?
त्याला त्याचा किती त्रास होतोय . ह्याची आपल्याला पुरेशी कल्पना नसते.
आपण एक तर्क लावून चालतो .

हा,  असाच आहे . ह्याला  काही फरक पडणार नाही. नेहमीचीच सवय त्याची / तिची वगैरे वगैरे ....,
हि जी गृहीत धरण्याची  आपली वृत्ती  आहे ना ... हीच मुळात वाईट... .  

आपण फक्त  आपल्या परीनेच  विचार करतो. . आपण आहोत त्याप्रमाणे . 
समोरचा आपल्याहून वेगळा आहे . वेगळ्या विचारधारेचा आहे.  ह्याचा आपल्याला विसर पडतो.
मुळात अरे हे ....नातं  हे दोन भिन्न विचारधारा असलेल्या मनानं विणल जातं .

तिथे सगळंच आपल्या  मना प्रमाण घडेल अस होत नाही…ह्याची जाणीव खरं  तर आपल्याला  असायला हवी . वेळो वेळी व्हायला हवी. पण ती होत  नाही . 
अन म्हणून नात्याची घडी दुभंगली जाते. 

खर म्हटलं तर नातं .. म्हणजे एकमेकांना एकमेकांच्या गुण दोशासाहित स्विकारण हे होय.
अर्थात  एकमेकांच वेगळेपण जाणून..जपून …..पण तसं  होत नाही.  

आपण बोलतो तेच योग्य अन बरोबर आहे हा ठेका धरून चालतो अन  स्वतःच मत दुसऱ्यावर लादतो . 
हीच तर आपली चूक ठरते. 
- संकेत पाटेकर 
 २०.०३.२०१६


रविवार, ६ मार्च, २०१६

''आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे , याला प्रेम म्हणतात''

दिवसातून किती वेळा, तिचा फोटो असा बघत असतोस ? झूम इन झूम आउट करत ? 
तिने एकाकी सवाल केला.
तिच्या अश्या ह्या अनपेक्षित उठलेल्या प्रश्नाला, काहीतर उत्तर द्यावं 
म्हणून त्याने , तिच्यावर एकवार नजर रोखली. अन क्षणाचा विलंब न घेत, पुन्हा 
आपल्या मोबाईल मधला तिचा फोटो न्याहाळत , धुंद स्वरात म्हटलं . 
‘’ बऱ्याचदा....

तसा बऱ्याचदा...मनात येईल तेंव्हा तिचा 'चेहरा' स्तंभित झाल्यासारखा ,एकसारखा 
निरखत असतो. . 
वेळेचं भान उरत नाही कि माझं मला कळत नाही . पण तो चेहरा , त्या चेहऱ्यावरील ते स्निग्ध भाव ,...
मला अजूनही तिच्या प्रेमात फ़रफड ओढवून नेतात.’’ 

भिरभिरनाऱ्या भुंग्याला , आपल्या सुवासिक रसानं अन सुंदरश्या रंगानं , फुलानं 
जस आकर्षित करून, आपलसं करून घ्यावं ना तसंच काहीस ...
ऐकता ऐकता , तिने त्याकड एकवार पाहिलं. आठवणीच्या भावगर्दीत धुंद होवून.. 
मनातील तळ तो उघड करत होता.

प्रेम हि भावनाच , अगं ! सौंदर्यपूर्ण अशी आहे... मनाच्या डोहीतून अलवार 
तरळणारी , हळुवार उमळणारी , अन दोन हृदयी मनाला , एकाच जाणीवेच्या स्पंदनिय धाग्यानं घट्ट रोवून ठेवणारी. 
मध्यंतरीच कुठेसी माझ्या एक वाचनात आलेलं . संद्दीप खरेची एक ओळ होती. .
''आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे , याला प्रेम म्हणतात''. 
किती , साध्या अन सहज सोप्या शब्दात त्याने मांडलं आहे बघ ..

आयुष्याच्या प्रत्येक प्रवाही वाटेवर ..मग ती वाट कितीही खडतरं अन आडवळनाची 
असो , ‘एकमेकांना हव्या त्या वेळी , हवं तेंव्हा उपलब्ध होणं म्हणेचच प्रेम ’ 
अस जेंव्हा घडेल तेंव्हा , नाती खऱ्या अर्थानं प्रेमाच्या गर्द सावलीत सुखाने नांदतील. पण हा तिथे मनाचा सामंज्यसपणा हि हवा. एकेमकांना समजून घेण्याची मूळ वृत्ती हवी.
हम्म ..
चल आता चहाचा घोट घे ...बोलतच सुटला आहेस, वेड्या सारखा .. 
चहा हि थंड झाला बघ .. ( त्याच्या चेहऱ्यावरील प्रेम आवेशात गढलेले ते भाव अन बोल ऐकून , अजून त्याच्या मनास उगाच सल नको म्हणून तिने मधेच अडवून म्हटले ) 
असू दे रे चालेल . थंड चहा पिण्यात हि काही और मजा असते. त्याने हि शब्द ओढले.
संध्याकाळच्या शांत लहरीमध्ये ... नेहमीच्याच त्या कट्ट्यावर...एका खास मैत्रिणीसोबत , विषय रंगत चालला होता. 
विषय अर्थात , 'प्रेम'..नकळत जीवनात आलेलं , जाणलेल अन अनुभवलेलं.

शेवटी ‘मित्र’ हेही आधारच, आपल्या जीवनाचा टेकू , म्हणून मनं हि आपुसक 
त्यांच्यापुढे मोकळं होत जातं . तो हि मोकळा होत होता ...हलका होत होता.

प्रेम ह्या विषयाची व्याप्तीच , खरं तर फार मोठी आहे. ती मापता तोलता येत नाही . ती अनुभवता येते .त्याची प्रचीती घेता येते . 
चहाचा दोन एक घोट घेत त्याने पुन्हा आपल्या कथाकथनला सुरवात केली.
वाऱ्याने जसं कुठूनसं अलगद यावं अन आपलं अंग अंग रोमांचित करून जावं. तसंच हे प्रेम. ..आनंद देतं, हर्षवून नेतं.
स्वप्नांचे नवे क्षितीज घेऊन ती हि अशीच माझ्या आयुष्यात आली. अन सुंदर क्षणाचा अनमोल ठेवा माझ्याकडे अलगद सुपूर्द करत, स्वप्न पुरे केल्याविनाच एकाकी माघारी निघून गेली. 

मला न समजताच, न जाणून घेता ..त्याचंच मला वाईट वाटतं अन त्रास होतो.
चुकलं कोण अडलं कोण हा प्रश्न गौण आहे. प्रेमात त्याला थारा नाही. पण हव्या त्या वेळी , हवं तेंव्हा आम्ही आम्हालाच असे उपलब्ध झालो नाही. वेळेच गणित जुळवता आले नाही. त्यामुळे एकाच वाटेवर चालण्याचे 
आमचे मार्ग हि वेग वेगळे झाले . 
तसं तिने खूप काही दिलं मला...त्या तेवढ्या वेळेत. तेच माझ्यासाठी खूप आहे, अनमोल आहे. 
म्हणून हा तिचा फोटो , त्यातील ते निरामय भाव एक सारखा असा निरखत राहतो . अन आठवणीत एकाकी हरवतो .

तुला सांगू , ह्या प्रेमात खूप ताकद आहे . ते ओढवून घेतं आपल्याला . अन विविधरंगी भावनांच दर्शन घडवतं. 
एखाद्यावर हक्काने रागावण्यापासुन ,हसवण्यापर्यंत , लहानग्या सारखं एखाद 
हट्ट करून , समजून देण्यापर्यंत, वा समजून घेण्या पर्यंत .... विविध ढंगी अस दर्शन..
तशी ह्या प्रेमाची गोडीच निराळी असते बघ ..
एकदा आपल्या अंतरंगात ती भिनली कि आपण आपलेच राहत नाही .उधळून जातो . मिसळून 
जातो.

मी ह्या प्रेमात सफल झालो नाही. पण मी 'प्रेम भावना' जगलो ...तेच पुष्कळ आहे .
- असंच काही सुचलेलं ....शब्दात वेचलेलं . 
- संकेत पाटेकर
०५.०३ ..२०१५





शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

हृदया - एक स्वप्न सखी ..

हृदया - एक स्वप्न सखी 

पत्र संवाद…

प्रिय सखे ,
सगळ असं Unexpected असेल न तुला ..
मला वाटलंच , माझं असं जगावेगळं वागणं ( तुझ्यासाठीच हा ) तुला कदापि 
रुचणार नाही, ना पटणार नाही. हे ना ? 
मुळात अगं ... अपेक्षानुसार वागणं हि अवघड अशी गोष्ट आहे. दरवेळी ते शक्य नाही . 
कधी - कुठेतरी.. .. घाव हा बसतोच , ह्या बदलत्या परिस्थितीचा...
अन मग भली मोठी जखम होते. तीच सहन होत नाही . अन आपल्या मनाचा विस्फोट होतो . 
अन एकमेकांपासून तुटले जातो.
पण तेंव्हा , हा एकाकी असा का वागला ? ह्याचा शोध घ्यावासा वाटत नाही 
आपल्याला …
इथेच तर फसगत होते.. नात्याची, नात्यातल्या विश्वासाची .... 
आपलं हि असच काहीस झालंय रे., हे ना ?

मुळात आपल्या भेटी गाठी , फारश्या अश्या झाल्याच कुठे आहे म्हणा ? 
एक भेट ती काय घडली. ती हि योगायोगानेच , बाकी हा सगळा मोकळा असा सुसंवादच.
त्यावरूनच नाही का , मी तुझ्या जवळ इतका ओढला गेलो. 
स्वप्नील दुनयेत निखळ प्रवाह सारखा एकाकी असा वाहत राहिलो. हे ना ? 

आता त्यानेच सगळ अवघड होवून बसलंय , स्वतःलाच सावरता येत नाही आहे कि तुला 
नजरेतून दुर सारता येत नाही . पूर्णतः उधळून गेलोय रे मी ....फांदीवरच्या तुटल्या पानासारखा ... .
एकाकी असा ... तुझ्या प्रेमात....!

ऐकतेस ना , ? बघ जरा नजरेला नजरे देऊन , अन सांग मला ..
काय असते रे हे प्रेम ? चालते बोलते , दोन जिवंत मन ? भावनांचे उथळ झरे ?
संवेदना जागण्या इतपत सुज्ञ अन संवेदनशील असलेले हे मन ?एवढंच... कि अजून 
काही.. 
खर सांगू हि तर माणसाची अंतरंग ...स्वभाव गुण , वा स्वभाव शैली.
प्रेमाची व्याख्या तशी करताच येत नाही. 

ह्या अथांग पसरलेल्या निळाईची व्याप्ती कुणाला मोजता येईल का ? सागराच्या 
खोलीची मोजदाद करता येईल का ? तसंच ह्या प्रेमाचं... जो तो आपल्या अनुभवानुसार 
अन त्या योग्यतेनुसार प्रेमाची व्याख्या रचतो. मी हि आजवरच्या अनुभवावरून शिकलोय . 

प्रेम म्हणजे दोन श्वासातलं अंतर एक होणं. समरस होतं जाणं. दुधात साखर मिसळून 
जावी तशी...पूर्णतः समर्पण ...

ते समर्पण कुठेश कमी पडलेलं दिसतंय. 
तसं तुझं हि माझ्यावर प्रेम होतंच ना (आत्ताही असेल) ? नाही असं नाही . फक्त 
तुला स्वतःलाच ते उमगलं नाही . 

तूच नाही का म्हणाली होतीस , मला माझंच कळत नाही आहे , मी प्रेमात आहे कि 
नाही ते ? हे ना ? 
खर तर तेंव्हाच मला सावरायला हवं होतं. पण नाही मी वाहत राहिलो . 
स्वप्नांना कवेत घेऊन ...प्रेमाच्या ह्या स्वच्छंदी प्रवाहात ... एकटाच..एकाकी ! 
तीच ठेच लागलेय ह्या जिव्हारी .. 
ह्या प्रवाहात वाहलो म्हणून नाही. तर ह्या प्रवाहात वाहत असताना ..तू एकाकी 
माघार घेतलीस ...ह्याची ठेच.

पण तू वाईट वाटून घेऊ नकोस... हा..
आपल्या नकळत अन नियतीच्या संकेतानुसार घडणाऱ्या ह्या साऱ्या गोष्टी 
आहेत . पण गम्मत अशी आहे बघ , कि हे सर्व माझ्या बाबतीत घडून आलं आहे. 
तुझाच, 
क्रमश :
संकेत पाटेकर



रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

कुणी शोधून देईल का ?

अगदी म्हण्याचचं तर लहानपणापासून तिची माझी गट्टी , गाढ मैत्रीची.. 

माझ्या शिवाय तिला काही अस्तित्व नाही अशी तिची काहीशी समजूत, म्हणून
मी जेथे जाईन तेथे तिची साथ असायचीच (हा अपवाद काही क्षणाचा असेल हि ) पण तिने माझी सोबत कधी सोडली नाही. अगदी शालेय जीवनापासून ते कॉलेज कट्ट्यापर्यंत ती माझी सखी सोबती राहिली .
इतकंच न्हवे तर कुणा पाहुण्यामंडळी कडे आम्ही जात असू तर ती हि माझ्या सोबत असे . 

मुळात तिचा स्वभावच अगदी शांत , म्हणजे कायम तो ठरलेलाच , त्यात फेरफार तिनं कधी केला नाही. अन करू शकत हि न्हवती. त्यामुळे घरातले हि ओळखून होते. त्यांनी हि कधी हा कि हु केली नाही . कधी काही बोलले नाहीत . उलट कौतुकच फार असायचं . पण एकदिवशी त्याला हि उकलती कळा लागली . अन तिच्याविना हे मन विरघळू लागलं
.
मुळात झालं काय तर ..
सह्याद्रीच्या वाऱ्याने तना मनात घेर केला . त्याची ओढ लागली. पाय फिरकी घेऊ लागले. सह्याद्रीतल्या कड्या कपाऱ्यातुनी निर्धास्त होवून मी भटकू लागलो. तीही तिथे असायचीच. नाही असं नाही .
पण हळूहळू ह्या सहय प्रवासात इतर मैत्रीचे धागे दोरे वाढू लागले. एक एक माणसं जोडू लागली, भेटू लागली . बोलू लागली. नात्यांची जीवमोळी अशी एक एक साखळी निर्माण झाली. आणि झालं इथेच खटकलं. 
त्यातलेच कोणीतरी उगाच डीवचलं.. थेट स्वभावावरच शब्द रोष ...आणि वार ...
मग काय , सारंच बिघडलं , त्या रोषाला अन उगाचच्या चटक्या बोलणीला, बळी पडून , सुर्याबिबा सारखं लालबुंद होऊन ती सटासटा निघून गेली . ती अद्यापही परतली नाही . 

तिचं अस्तित्व हे माझं अस्तिव आहे , ह्याची जाणीव मला झाली खरी... पण आता काय उपयोग . मी एकटा पडलो. वेड्या सारखा प्रत्येक क्षणाला हसत..उगाचच .
कितीश्या विनविण्या केल्या . मन जुळवणी करून पहिली . पण काही उपयोग नाही.
ती रुसली ती रुसलीच . पण अधूनमधून ती येते. बहुदा , कीव येत असावी माझी. दुसरं आणिक काय असणार ? पण येउन तशीच निघूनही जाते. अवघे काही क्षणाची साथ देऊन बस्स...

पण खरंच यार , मला तुझी गरज आहे . शांत राहायचं मला . शांत ठेवायचं स्वतःला. स्वतःचा शोध घ्यायचा आहे. स्वतःला सिद्ध करायचं आहे . घडवायचं आहे . तुझ्यविना ते शक्य नाही. कारण तू माझ्या स्वभावातली एकुलती एक गुणी अशी सखी आहेस. ......माझी मनशांती .
अरे कुणी तरी बोलवा रे तिला....मला हवेयं ती ....तिची साथ हवेय . कायमस्वरूपी
.
माझ्या मूळ स्वभावातला गुणधर्म हरवलायं . कुणी शोधून देईल का ? देईल ?
मन शातंता...
असंच काहीस लिहिता लिहता...
- संकेत पाटेकर
१०.०२.२०१६



सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

हसण्यासारखं काही नाही...

हसण्यासारखं काही नाही...
रविवार , संध्याकाळची वेळ , मित्रांना भेटायला
म्हणून घरातून बाहेर पडलो. पायी चालायची नित्य नेहमीचीच सवय , त्यामुळे चालतच रेल्वे स्टेशन गाठलं. अन तिकीट वगैरे घेऊन ठाणे- वाशी लोकल ट्रेन पकडली. हार्बर लाईन आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यामुळे फारशी अशी गर्दी न्हवती.

तुरळक असे प्रवाशी .. तर असो.
नियोजित वेळेप्रमाणे लोकलने होर्न देऊन प्रवाशांना Alert केल . अन धीम्या गतीनं ट्रेन गतीवान झाली. ऐरोली गेलं,
रबाळे आलं प्रवाशांचा आत - बाहेर सुरु झालं . मी आपला दाराशी उभा (लटकत न्हवे हा ..आतच )पुढच्या स्टेशनची वाट पाहू लागलो. त्यातही फारसा वेळ गेला नाही.
काही क्षणाच्या अवधीतच घणसोली स्टेशन आलं . इथेच मित्र भेटावयास येणार होता. म्हणून पायउतार झालो अन सांगितल्याप्रमाणे स्टेशनच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी वाट पाहत उभा राहिलो. तेवढ्यात मित्र हि हजर झाला.
वेळचं अन आम्हा मित्राचं 'गणित' तसं नेहमीच चुकतं , पण आज सगळ अचूक जुळून आलं होतं. 
भेट होताच नेहमीच्या आदराने त्याची खुशालकी विचारली अन गप्पांच्या ओघात आम्ही पुढे निघू लागलो. तोच...
एक सहा फुट उंचीचा ,साध्याश्या पेहरावातला, एक माणूस तिरक्या चालीने माझ्या रोघाने येऊ लागला. नजरेला नजर भिडली. त्याकडे पाहून , त्याने जराशी घेतलीच असावी, असा एक तर्क धरून मी मोकळा झालो. 
पण त्याचा रोख हा माझ्याकडेच , जणू त्याची अन माझी फार वर्षापासूनची ओळख असावी . ती हि सुडेच्या
भावनेने पेटलेली . म्हणून मी हि फुल तयारीत होतो . येत्या प्रसंगाला तोंड देण्यास..., 
मित्रही सोबतीला होताच .. तरीही , नक्की कोणता प्रसंग उद्भवणार आता, , ह्या विचारांनी मनात घेरा केला. 
आणि त्या विचारात असताच , तिरक्या चालीने तो माझ्यापुढे येऊन उभा राहिला. 
आणि अभिनयाच्या सुरात , रोघ नजरेनेच ,सरळ प्रश्न टाकला .
भाऊ, कोल्हापूर कोणत्या बाजूला आलं ? 
त्याच्या ह्या सहज अन काहीश्या अवघड अश्या प्रश्नाने , नकळत हास्याच्या बांध फुटला गेला. . 
आणि खो खो हसत हसत मी अन मित्र पुढे जावू लागलो. 
त्याचा प्रश्नाचं उत्तर काही मला देता आले नाही . थोड पुढे गेल्यावर मात्र पुन्हा मागे वळून पाहिलं . तर तो हि
त्याच लयात आमच्या कडे पाहून मिश्किलपणे हसू लागला होता. 
स्टेशन घणसोली ,आणि प्रश्न कोल्हापूर कोणत्या बाजूला आलं ? कस वाटतं ?
आयुष्याच्या प्रवासात एकेक अशी माणसं भेटत जातात . काही भावना चीथाळून देतात. 
काही नकळत एक संदेश देऊन जातात तर काही हास्यलेपाचा मुलामा, अलगद चेहऱ्यावर फासून जातात.
आयुष्याचा हा प्रवासच फार मजेशीर अन गहन अश्या अर्थाने भरलेला आहे. म्हणूनच हा प्रवास मला आवडतो. 

असंच उगाच काही ..लिहायचं म्हणून ..
- संकेत य पाटेकर
०८.०२.२०१६

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

Love marriage कि Arrange marriage हा एकच मोठा सवाल आहे...

Love marriage कि Arrange marriage हा एकच मोठा सवाल आहे... 
हे करुणाकरा ऐकतोयस ना ?
जिच्यासोबत भावी स्वप्नांचं चित्र चितारलं त्या माझ्या प्रिय सखेशी कि अजूनही माझ्या आयुष्यात पदार्पण न केलेल्या त्या अनोळखीशी , कोणाशी नक्की सुत जुळवनार आहेस रे ? हे एकदा ठामपणे सांगून टाक , आणि मोकळं कर रे मला , ह्या अविवाहा तांच्या जगण्यातून ..
अजून किती रे , हे असं असह्य जगणं मी जगायचं ? सांग तरी ? 
विरहाच्या अपार वेदनेने कष्टीलेल्या, ह्या माझ्याच मनाची ...हि ढासळलेली प्रतिमा मलाच पाहवत नाही रे , तुला तरी हे कसं पाहवतयं. ? हा ?
अरे , जिच्या ओढीने अद्यापही हे मन वेडावलं जातं. जिच्या नुसत्या नावाने , सर्वांग शहारून मन फुल पाखरावानी मोकळी झेप घेतं , जिच्या विचारातच दिवस रात्रीचा क्रम स्वप्नील कथेप्रमाणे बदलत जातं. अरे तिच्या मनात तरी प्रेमाचे कारंजे उमलू दे रे ... 
प्रेम गंधाने शहारलेलं अत्तर पुन्हा एकदा घमघमू दे रे ...
हे करुणाकरा …
 ऐकतोयस ना ..ऐकतोयस ना काळजाने तुटलेल्या ह्या मनाच्या वेद्नेंची हि लक्तरं.. 
अरे ...प्रेम मनाचं हा सेतू , कधी हि न तुटणाऱ्या विश्वासाच्या दोरीने जुळू दे रे एकदा...

मान्य आहे मी चुकलो. 
चुकलो मी त्या एका क्षणी, संयमीमनाचा हा बांध , मला योग्य त्या समयी रोखता आला नाही . म्हणून का त्या एका चुकीसाठी एवढी मोठी सजा , का रे ? माणूस आहे तो चुकणारच ना ?
हे विधात्या...
तू सर्व व्यापी अन जाणता आहेस , मग तरीही माझ्या बाबतीतच इतका कठोर का झालास ? 
घडून गेलेल्या गोष्टीचं प्रायच्छित करून देखील ,माझ्या ओंजळीत हेच का ? 
नकाराच्या स्वरसुराने छिद्र पडलेल्या ह्या हृदयी मनाची वेदना किती , हे तू जाणूनी आहेस नां? तरीदेखील हे असं ? 
विस्कटलेल्या ह्या मनाची घडी अद्यापही मी सावरतोय रे ..
पण तिच्यावाचून ते शक्य नाही ..अन हि वेळ हि न्याय देत नाही.
एकाबाजूस, कधीही कुणासाठी न थांबनारया , ह्या वेळेची दहशत तर एका बाजूस न उलगडलेल्या तिच्या मनाचे कोडे आणि सोबत हे अनोळखीचे दोरे , हे विधात्या शेवटी तूच काय करावं ते सांग ?
लग्न करावे कि नाही हा एकच सवाल आहे ?
कुणी लग्न जुळवून देत का रे , लग्न ? तिच्याशीच …
असंच काही ..डोक्यात घुमलेलं आणि लिहिलेलं 
- संकेत पाटेकर 
२९.०१.२०१६


गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

काही सांगायचं आहे तुला...

काही सांगायचं आहे तुला...
ऐकशील ..?
मला माहित आहे , माझ्यावरचा राग अजूनही तुझा ओसरला नाही. तो ओसरला नसेलच. पण तरीही ..सखे ...काही सांगायचं आहे मला.
ऐक ?रागावू नकोस रे ..
तसं मनातल्या मनात तू म्हणत असशीलच ? का हा असा, सारखा त्रास देतोय ?का असा छळतोय ?
मी एकदा नाही म्हटले ना , तरी हि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न ...का ? हो ना ?
वेडावून त्रस्त होत असशील तू .. नाही का ? तुझ्या शब्दात म्हणायचं तर डोक्याचा भुगा होतोय ? हे ना ?
पण काय करू सखे , माझ्या बाबतीत हि असचं आहे बघ , मला हि ह्या साऱ्यांचा खूप त्रास होतोय. पण तुला रे कसं कळणार ?
आणि कळलच तरी तू , तुझं मन ....माझ्यापुढे मोकळ करणार आहेस का ?
ह्या प्रश्नाच उत्तर तसं नाहीच मिळणार , हो ना ? मला हि ह्याबद्दल काही बोलायचं नाही आहे.
पण सखे , मला त्रास होतोय म्हणून मी तुला असा त्रास देत आहे . असा विचार मात्र तू मनी धरू नकोस.
तेवढा मी असभ्य अन वाईट वर्तनाचा मुळीच नाही हा ..
खर म्हणावं तर माणसाला गैरसमजूतिचे हे धागेच खूप अधिक त्रास देतात. गुंडाळून ठेवतात. अकारण ..शंका कुशांकाच्या अंधाऱ्या झोळीत ...
मला वाटतं आपल्या दुभंगलेल्या मनाचं अन तुटलेल्या ह्या नात्याचं हि हेच कारण आहे.
तो गुंता आपण काही सोडवला नाहीच. पण तो गुंता न सोडवताच , एकमेकांपासून मात्र असे दूर निघून गेलो.
म्हणावं तर अगदी जवळ आहोत आपण ..अगदी हाकेच्या अंतरावर ...पण तरीही मनातून मात्र दूर असे...
कधी आठवण येते का रे , तुला माझी ?
नाही आपलं सहजच म्हटल.
तसं मनात घर केलेली माणस , सहजा सहजी विसरता कुठे येतात रे ... न्हाई का ?
राहू दे ..नको सांगू ..
माझ्याकडे तुझ्या आठवणीची मात्र उजळनीच सुरु असते रोज..
किती सुखद अश्या आठवणी आहेत रे त्या , सुखद आहेत म्हणूनच निसटून गेल्याचा त्रास..
काय गम्मत आहे बघ ना,
ह्या क्षणांना पकडता येतं , बांधून ठेवता येतं , आठवणी स्वरुपात , पण व्यक्ती ....
त्यानां नाही धरून ठेवता येत रे ... त्या निघून जातात..आल्या वाटे , तू हि अशीच निघालीस , न्हाई ?
मला एकाकी करून ...जे घडायचंच ते घडलं . रंगवलेले सारे स्वप्न हि अपुरेच राहिले .
असो , मला माझ रडगाणं गायचं नाही आहे .
एक मात्र सांगायचं आहे सखे ,
एकेमांपासून दूर झाल्यावर , तुझं अस अबोल, एकाकी नि शांत राहण , मला स्वस्त बसू देत नाही रे,
तुला त्रास देण्याचा तसा काहीही हक्क नाही आहे मला ...
हे नातंच जेंव्हा आतून तुटलं. आतून म्हणजे काळजातून ..तेंव्हाच तो हक्क मी गमावून बसलो.
म्हणायला तसं आपल्या मैत्रीच्या नात्यातला अर्क अजूनही शाबूत आहे हा..
म्हणूनच त्या हक्काने ह्या शब्दांची हि केविलवाणी धडपड ...
सखे , अशी दूर नको ठेवू स्वतःला ? एकाकीपणात अशी नको रे बांधून घेऊ?
मनाचे सारे कवाड बंद करून , निशब्दाचे तुझे हे गहिरे बोल ...खूप खोलवर रुजतात रे ह्या काळीजास ..त्यानेच चर्र होतंय बघ ..
त्रास होतो रे ..तुला नाही कळायचं ते.
भावनांची ओढ हि अजूनही तशीच आहे अगदी.., भलेही आपल्यात संवाद होत नसेल. भेटी गाठी होत नसतील . पण प्रेमाचं हे चीटपाखरू पंख पसरून अजूनही भिरभिरतंय रे तुझ्याच अवतीभोवती..
तुझीच खूप काळजी वाटतेय ..तुझ्या ह्या अबोलपणाची , तुझ्या तब्येतीची ..
ठीक आहेस ना ?
एकाकी अशी का रे गुंतवून ठेवतेयेस स्वतःला ?
जरा बाहेर ये ह्यातून ..
तुझ्या चेहऱ्यावरती हास्य रेषेची ती सोनेरी खळ ...मला पुन्हा उजळलेली पहायची आहे .
माझ्यासाठी नाही रे , पण तुझ्या स्वतःसाठी..
हे एवढ करशील का रे ....
तुला हसताना सदैव पहायचं आहे . बाकी काही नाही .
म्हणूनच हा अट्टाहास ...सखे .. :) 
तुझाच ..
असच लिहिता लिहिता...
- संकेत य पाटेकर
१३.०१.२०१५

शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

निर्दयी मन...

 ‘’अरे बाबा , अंदर  खडे रेहने के लिये जगह नही है  ..’’
‘और तुम ये हे बच्चा  लेके ..., ‘ ना ना , पीछे और एक गाडी हे ..उससे आ जावं.’ 
कंडक्टर ने जरा हेकाटा देतंच म्हटले .
तरीही ती बाई काही ऐकेना...
चलेगा .. अस म्हणत ती शेवटी लगबगीने  आत शिरलीच.
कडेवर  दोन तीन वर्षाचं  तिचं पोर  अन मागोमाग  सत्तरीच्या पुढे असलेली ती म्हातारी (बहुदा आई असावी )दोघीही  एसटीत कसेबसे चढले. तसे  कंडक्टर ने एसटीच दार थाड करून  ओढून घेतले. अन एसटी पुन्हा मुंबई दिशेने धावू  लागली.

खेड  डेपोतून निघून आताशा एखाद तास  झाला होता.
पन्हाळे- मुंबई मार्गे असणारी हि एसटी रविवार असल्यामुळे जरा भरगच्चच भरली  होती.
आसनस्थ होण्यास हि  जागा उरली न्हवती. त्यात प्रत्येक एका व्यक्ती मागे त्याच्या ३ -४ पट असलेलं सामान. ते  सांभाळता सांभाळता त्यांनाच नाकी नऊ येत होते. 
आम्ही खेड वरूनच एसटी पकडली असल्याने बसण्यास तेवढी काय ती जागा मिळाली.
३ दिवसात ३ किल्ले  सर करून थकले भागलेले हे शरीर आता घरच्या  ओढीने,  बसल्या जागी निवांत पहुडल होतं.
दाराच्या उजवीकडच्या  बाजूलाच म्हणजे वाहन चालकाच्या रांगेत असलेली ,  पुढील एक सीट सोडून मागील दोन सीट वर आमचे तिघे मित्र ऐसपैस बसले होते.
कुणाचं आरक्षण नसल्यामुळे कसलीच चिंता न्हवती. पण चौथी सीट म्हणजे पाच नंबरची सीट तेवढी आरक्षित होती.
खेडच्याच असलेल्या गावाच्या एक काकू कितीतरी बोचकी सोबत घेऊन मुंबईला निघाले होते . कुणा नातेवाईकाकडे  त्यांची ती सीट...
तश्या त्या  एकट्याच होत्या पण त्याचं  सामान म्हणजे  दोन तीन जणांच बिऱ्हाड असेल एवढ.  .
ते सामान एसटीत पोहोचवण्यासाठी कुणी एक माणूस त्यांच्या  सोबत आलं  होतं. .  ते  सामान  त्यांनी एसटीत  तेवढ चढवून  दिलं . अन ते निघून गेले .
पण त्या सामानाची आवरा- आवर करता करता , व्यवस्थित जागी  ठेवता ठेवता , त्या काकूंची पार धांदल उडाली.
कंडक्टर हि नेमका त्याचवेळेस तिकिटासाठी उभा राहिल्याने , ऐनवेळी तिकीट हि मिळेना अशी त्यांची  अवस्था...
शेवटी इकडे तिकडे शोधा शोध करत  एकदाची काय ती तिकीट गवसली .
अन त्या काकू सामान आवरून ,  स्वतःला सावरून ,  चौथ्या सीटवर आपल्या जागी  निवांत बसल्या .
आमच्या मित्रांनीही त्यांना सामान आवरण्यास हवी   ती मदत केली.

मी मात्र ह्या सर्वांपासून जरा दूरच बसलो होतो. ते सगळ पाहत होतो.
पाच नंबरच्या त्या चौथ्या सीटवर त्या काकू आल्यामुळे मला दुसऱ्या एका  सीटवर बसण भाग होतं. मित्रांपासून  म्हणून जरा विलगलो गेलो होतो  .
कंडक्टरच्या रांगेत अगदी दुसरी  सीट सोडून तिसऱ्या सीट वर मला जागा मिळाली.

मी  तिथे निवांत पहुडलो.    आम्हा चौघा मित्रांच्या , तीन  दिवसाच्या ,सह्याद्रीतल्या  कॅमेरात टिपलेल्या त्या आठवणी पाहत...कधी सभोवताली हळूच डोकवतं.    

एसटी तले सर्वच तसे त्यांच्या त्यांच्या दुनियेत गाढ झाले होते. 
एसटी हि तिच्या गतीनं  वळण घेत धावत होती.

दुपारचं  उन्हं  पसरलं होतं.
दोनच्या आसपास खेडवरून निघालेली हि  पन्हाळे मार्गे मुंबई एसटी , वाशी ला पोहचेपर्यंत रात्रीचे चांगलेच  आठ ते साडे आठ वाजणारे होते . अन  खेड सोडून आताशा  फक्त  एक  तासाच  झाला होता . अजून  बराच  अवधी तसा बाकी  होता.
खेड ते मुंबई  ह्या धावत्या प्रवासात ,ह्या कोकण मुंबई प्रवासात  .. ना ना चेहऱ्यांची,  ना ना स्वभावाची माणसं  भेटत होती. 
अनोळख्यांची स्वभाव शैली दुरूनच ओळखून येत होती,  नवं नवीन शब्दावली कानावरून  अधोरेखित होत होती,  तसेच खिडकीच्या चौकटीतून  सृष्टी सौंदर्याच  विहिन्ग्मय दृश्य  हि नजरेस पडत होतं .

हे आयुष्य म्हणजेच हा एक प्रवास आहे .  जन्म अन  मृत्यु मधला संघर्षमय अन तितकाच रोमहर्षक असा प्रवास. ह्या प्रवासात आनंदी लहरी आहेत , शरीरमनाला उजळू देणारे , चैतन्य सुख देणारे  तसेच दुःखाचं भवसागर हि आहे  ..शरीर मनाला पार जखडून टाकणारं ...वेदना देणारे ..

मानवी भावनांचे कितीतरी पैलू इथे अनुभवयास मिळतात आपल्याला, सर्र्रास रोजच्या रोज अगदी ..
कधी हासू , कधी अश्रू , कधी राग कधी लोभ , कधी ओढ कधी विरह ...कधी एकांत कधी एकाकीपण.....
भावनांची किती हि उथळ खोली . त्याचं माप घेता येत का ?
क्षणा क्षणाचे हे नवं नवे अनुभव घेत , नव्या विचारांची सकारात्मक उजळणी करत, आल्यावाटे  मार्गीस्थ होत,  हे आयुष्याचं प्रवासी पुस्तक  आपल्याला रंगवायच असतं, रेखाटायचं असतं .
 ह्यातून आपण  जगण्याला अन ह्या  जीवनाला अनुरूप असे एक वळण  देत असतो.
एसटीतला  हा आमचा आजचा प्रवास देखील त्यातलाच एक भाग.

गाडी एका थांब्यावर थांबली .   तसा कंडक्टरचा आवाज कानी गुंजला .
‘’अरे बाबा , अंदर  खडे रेहने के लिये जगह नही है  ..’’
‘और तुम ये हे बच्चा  लेके ..., ‘ ना ना , पीछे और एक गाडी हे ..उससे आ जावं  ‘
त्या आवाजाने  माझी  नजर अन कान दोन्ही त्या दरवाजाकडे अन त्या बाईकडे एकवटले . 
ती बाई , त्या कंडक्टरच्या ओरडण्याला न  जुमानता बिगीबिगी आत शिरली.  
अन तिच्या मागोमाग सत्तरच्या आसपासची, वयोमानानुसार सुरकुत्या पसरलेली अन थरथरत्या अंगाची म्हातारी  हि ..

दोघेही जागा पाहू लागल्या.एसटी तशी भरगच्च होती.  बैसन्यास अशी जागा नव्हतीच. पण   
तितक्याच एक प्रवासी , माझ्या पुढच्या सीटवरला  जागेवरून उठला अन 
त्या सीटवर ,  त्या तरण्याकाठ्या   बाईस लगेचच  जागा मिळाली. 

हाती एकुलतं  एक पोर सांभाळत तिने महाड ची दोन तिकीट घेतली.  अन निवांतपाने ऐटीत बसली.
आपल्या सोबत कुणी एक म्हतारं माणूस देखील आहे . ह्याची तिला पर्वा नसावी .
हे  उघड उघड दिसत होतं. 
तिच्यासोबत असलेली ती म्हातारी  धावत्या ह्या एसटीत स्वतःच तोल सांभाळत कशीबशी उभी होती.
नजरेनेच  विनवत होती , ‘ अरे बाबा , कुणी ह्या म्हातारीला  बसायला जागा देत का रे ? जागा ? ‘
वय झालं रे बाबा , नाही उभ राहता येत . दया करा रे कुणी  , असच जणू सांगत होती. 
तिच्या एकुलता एक पोरीला देखील  तिची कीव येईना.  साधं ढुंकूनही  तिच्याकडे पाहण्याचे कष्ट ती घेत नव्हती .  इतकी निर्लज्ज ., इतकी कठोर ..इतकी निर्दयी ..

कशी कशी लोकं असतात एक एक ,  ज्या  पालकांनी  अपार कष्ट करून  लहानाचं  मोठ केलं ,  त्या पालकांवर अश्या अवस्थेत हि सजा . अरे कुठे फेडणार हे पाप सगळ, इथेच ना .., थोडी लाज अन  भय बाळगा .

त्या म्हातारीची  अवस्था पाहवत न्हवती. दूरचा पल्ला असल्याने कुणीही बसल्या जागेवरून उठायला तयार न्हवते.
शेवटी   राहवलं नाही .  मी जागेवरचा उठलो. म्हटलं , आजी निवांत होवून बसा अगदी…
त्यांना थोड आधार देत . त्यांचा  हात धरत , माझ्या जागी त्यांना बसवलं. अन त्या निवांत झाल्या.
त्यांना निवांत झालेलं पाहून मला हि बर वाटलं.   
जीवनात तसा प्रत्येकाला आधार हवा असतो .  ती आधार धारी व्यक्ती मग कोणतीही असो तिला वयाची अट नसते . असते ती प्रेम भरल्या मायेची अन  मानसिक आधाराची फक्त गरज . 
प्रसंगी कुणासाठी तो  आधार आपण हि कधी व्हावं. जगण्यासठी अन लढून जगण्यासाग्ठी हे बळ पुरेसं  असतं. विचारांचं चक्र अस वाहत होतं.
तिच्या मुलीवरचा राग मात्र अधिकतेने  वाढत होता. दोन तीन शब्दांचे डोस तिलाही द्यावेत   अस वाटू लागलं.
पण ते काही मी केलं नाही . पण मनात विचारांचे  चक्र तेजाने फिरू लागले.
अरे आपल्या आई बाबांची  काळजी घ्या रे...
आई बाबांचीच कशाला ..जे कुणी आपल्या आयुष्यात येत ..त्यांची काळजी घ्या . प्रेम द्या प्रेमाने रहा.
जितकं  प्रेम द्याल तितकं अर्थपूर्ण जीवन जगालं.
- संकेत य पाटेकर
०८.०१.२०१६