गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

क्षण..

संध्याकाळची वेळ.  ऑफिस मधून निघाल्यावर ..लोकलमधल्या त्या घामाजल्या  गर्दीचे धक्के पचवत मी ठाण्यात उतरलो.  कुठल्याश्या जाणिवेने आणि व्याकुळतेने आज  मनाची स्थिरता तशी  ढळली होती. 
अस्वस्थता दाटून आली होती देहभर , मनभर संचार करून आणि म्हणूनच थेट घरी जाण्यास हि हे मन आज  मज्जाव करत होतं . त्यालाच  थोडी मोकळीक आणि आपुलकीची  थाप द्यावी  म्हणून मी मुद्दाम तलाव पाळीच्या दिशेनं एकटक 
चालत सुटलो. माणसाच्या स्वभावशैलीच्या रंगीत तालमीतून स्वतःच्या मनाची दखल स्वतः घेत , मी पोचलो त्या ठिकाणी. 
नजरेच्या एका  कोपऱ्यातून ,  मनाच्या एकांता करीत  योग्य   मोकळी  जागा हेरत,  मी एका ठिकाणी    आसनस्थ झालो .विचारांचं प्रहर पुन्हा  सुरु झालं . थांबलंच कुठे होतं म्हणा ते,  पण आता नव्या विचारांची ये जा सुरु झाली. त्यात पुरता गढून गेलो . स्वतःला उसवत,  हळुवार उलगडत गेलो . 
त्या विचारातून  स्वतःच शोध घेत असता....

'काका' अशी हळुवार हाक ऐकू आली. क्षणभर हसलो मी त्या शब्दांनी स्वतःशीच   ...आणि नजरेपुढे आलेल्या त्या कागदाकडे कुतूहलाने पाहत राहिलो . म्हटलं काय आहे हे?  मनाशी उलगडून पाहत होतो . तेव्हड्यात शब्द पुन्हा कानी आले. 
काका, उद्या नाटक आहे गडकरी ला ?  हे दाखवल्यावर तुम्हाला तिकिटावर सूट मिळेल .  
सुरवातीला वाटलं कसलीशी पावती  दाखवून हा  पॆसे वा वर्गणी  गोळा करत असणार , पण नाही 
 त्याने पुन्हा बोलायला सुरवात केली. 
हल्ली ना  सेक्स ह्या विषयाला धरून बरेच अढी तढी निर्माण झाल्यात समाजात  , गैरसमज आहेत. 
त्या विषयाला धरून हे नाटक आहे . जरूर पहा . 
मगासपासून मी त्याचा चेहऱ्याकडे लक्ष दिलं न्हवतं. हाती असलेल्या त्या कागदाकडे शून्य नजरेने एकटक पाहत होतो.  
मात्र त्याच्या ह्या सेक्स विषयी , असे  परखड दोन एक शब्द कानी पडल्यावर  आपसूक त्याकडे लक्ष गेलं.  मान उंचावली गेली. 
सहावी सातवीतला तो विद्यार्थी असावा,  हाफ पॅन्ट आणि इन केलेला शर्ट,  गोलाकार चेहरा आणि चेहऱयावर खिळलेले नितळ  हास्यभाव , सोबत इतर कुणी न्हवतं.
तरीही बेधकडं असं त्याच बोलणं आणि हे सांगणं हेच  मला   कमाल वाटली.  
उघडपणे सेक्स हा विषय तसा  कुणापुढे मांडणं बोलणं हेच खरतरं धाडसाचं , कारण आपल्या समाजमनात त्याविषयी काही बोलणं म्हणजे भलतं सलतं मनात येऊ घालतं. आणि ते काहीसं पापच असं  ठरतं.  
खरं तर ह्या गोष्टीच शिक्षण वेळेत देणं गरजेचं आहे ,  
बलात्काराच्या वाढलेल्या एकूण घटना , वाढत चाललेली स्त्री विषयक वासनांतक  भोग दृष्टी ...हि  मनाची विकृति आणि त्याला बळी ठरलेल्या निरपराध नाज़कू कोवळ्या  मुली, स्त्री... हे सगळं कुठेशी थांबायला हवं. रोखायला हवं . 
आणि त्यासाठी शिक्षण आणि कायद्याचा धाक, ह्या दोन्ही गोष्टींची  कडक अंमलबजावणी आपल्या समाजमनात लागू केली पाहिजे. 
स्त्रीचा आदर , मान सन्मान असेल तर  ह्या देशाची प्रगती आहे . भारत हि मातृभूमी जशी मानतो. तिच्यापुढे जसं आदराने पाहतो. नवरात्रीला देवीला जशी पुजतो . तसं  इथल्या स्त्री  मनाचा हि आदर झाला पाहिजे. नाही नाही ,  तो केलाच पाहिजे. समाज मनाला लागलेल्या ह्या वासनात्मक किडीचा मुळासकट नायनाट करून....

काही क्षण असाच  विचारधुन्द झालो होतो. चेहऱ्यापुढे गोडशी स्माईल देऊन तो मुलगा केंव्हाच निघून गेला होता . आणि मी पुन्हा आपल्या दुनियेत ..
- संकेत पाटेकर 


रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

'मैत्री'...

दंगात धुंद होऊन 'दवगंधीत' करणारी हि मैत्री...
हास्याचा 'गोफ' हृदयाशी हळुवार झुलवणारी हि मैत्री ...
सह्याद्रीच्या कातळकोरीव प्रमाणे कधी कठोर, कधी सुमधुर वाणी ठरणारी हि मैत्री ..!
मनाला 'चिरतरुण' करणारी, नवं हिरवशार पानातलं 'जीवनमान' होणारी हि मैत्री ...
सूर्याच्या 'तेजाला' हि 'आवाहन' देणारी हि मैत्री. 
अथांग सागराच्या 'विशालतेवढ़ी' प्रेमाचं 'जलस्रोत' होणारी हि मैत्री .
क्षितीजाच्या रंगाइतकी आयुष्य 'क्षितिजमान' करणारी हि मैत्री .
अन मना- मनाने , अन आपलेपणाच्या स्नेह गोडीत जोडली गेलेली , विसावलेली हि लाडिक मैत्री ...
अहो, ह्या 'मैत्रीला' आणि आणि ह्या 'प्रेमाला' वयोमानाची कसलीच अट नाही.
आयुष्याच्या आपल्या प्रवाही मार्गे ती आपल्याला भेटत जाते..नवं नव्या रूपात ..नवं नव्या रंगनिशी नवं नव्या अंतरंगी गोष्टी घेऊनच...
'मैत्री दिनाच्या' माझ्या मित्र मैत्रिणींना भरभरून शुभेच्छा ..
असेच सोबत राहा ..! मस्तीत राहा ...! मिसळत राहा !
तुमचा आपलाच ,
संकेत पाटेकर

गुरुवार, ६ जुलै, २०१७

नव्याने जुळलेल्या...अन क्षणातच मुरझलेल्या'

ह्या नात्यांची फार गंमत वाटते मला ....'नव्याने जुळलेल्या...अन क्षणातच मुरझलेल्या'
म्हणजे अनोळखी असतो तेंव्हा ओळखी साठी धडपडत राहतो आपण...
नवा चेहरा , नवं नाव...नवी ओळख ,नवं मन ..नवा स्वभाव , नवे बोल .... ,
सगळं..उत्साहपूर्ण.., मैत्रीपूर्ण अगदी....


एकमेकांना जाणून घेत घेत .. आपण एकमेकांच्या अधिकाधिक जवळ ओढले जातो काय .
रोज काही ना काही... नवं नवीन विषय घेऊन , त्यावर बोलणं होत काय..


अधून मधून थट्टा मस्करी , कधीतरी भेटणं....कुठशी एकत्रित क्षण घालवणं ...आठवणी गुंफत जाणं आणि अस करता करता ..
कालांतराने ..म्हणजे जास्त नाही काही ..महिन्यातच , किंव्हा वर्षभरातच ... बोलता बोलता . त्या उत्साहाला , आपण विरजण घालतो काय...सगळं अगदी सुफर फास्ट ..नॉन स्टॉप ?
तीन तसाच्या चित्रपटासारखं ..सुरवात आणि दि एन्ड हि...,


नातं जुळलं कधी आणि प्रवाहात वाहून गेलं कधी ह्याचा थांगपत्ताच लागत नाही .
सर्व घडामोडी कश्या पटकन घडून जातात. आणि एकाकी शिथिल होतं जातात.
अश्यावेळी स्वतःकडेच पाहून हसू येतं. मन पुटपुटतं काहीसं स्वतःशीच .. म्हणतं.


काही नाती हि अशीच असतात . 'नावीन्याला' हपापलेली. नावीन्य असेपर्यंत नात्यात 'जीव'.
ते संपलं कि नातं हि कोमजल्या फुलाप्रमाणे मान टाकून देत ...पुढे होतं .
- संकेत

गुरुवार, २२ जून, २०१७

ती.. मन व्याकूळ …

अगदी अनपेक्षित असा  एखाद सुखद धक्का बसावा ना,  तसा तो...नवा मोकळा श्वास घेऊन आला आज.  त्याचं हे  असं अचानक  येणं., माझ्यासाठी सर्वोच्च असा आनंदी क्षणच. 

वर्षोनुवर्षे  आपल्या प्रियकराची वाट पाहून  विरहात एकांडलेल्या मनाला  , नुसत्या त्याच्या चाहुलीने   जशी मनभर उभारी यावी नं , तसंच काहीसं झालंय..माझं आज ..!
प्रियकरचं ना तो ....
नुसत्या त्याच्या येण्याच्या  चाहूलीने ..अंग अंग मोहरून गेलंय. शहारलंय  ..उसळत्या अश्या धगधगीत श्वासानं.... ! 
काहीसा हलकेपणा ओघळू लागलाय  मनाशी..आता , 
पण ऐक ना  ?
आज तरी  नजर काळजातून  संवाद साधत,  तुझ्या ओसरत्या मनओघळ स्पर्शानं  ...घट्ट मिठीत ओढून  घेशील ना मला ?  
मनाची हि  धगधगती, पेटती  मशाल आज शांत करायची आहे मला, बोल ना...?

तुझ्याविना  मला अस्तित्व नाही रे , माझं असणं हे केवळ तुझ्यासाठीच, माझी ओळख पाळख , माझं नाव गाव ,  सारं सारं  केवळ तुझ्यासाठीच, तुला वाहिलेलं. 
तूच माझी ओळख, तूच सर्वस्व.......

मन अधीर झालंय रे   ...तुझ्यात सामावून जाण्यासाठी.  
अजून अधिक वेळ नको दवडुस...
माझ्या मनाचा हि विचार धर.  ?

तू आलास कि हा बंद श्वास (कित्येक दिवस तसाच खितपत पडलेला ) मोकळा होतो बघ...
तू आलास कि मनभर आनंद सरी बरसू लागतात....
मोगऱ्याच्या अस्तित्वानं दिशा दिशा गंधाळून जावी , तसं काहीसं होतं बघ, ह्या मनाचं , तुझ्या येण्यानं... 
तू आलास कि...लोकं मला स्वतःहून मोकळी करतात, तुझ्या स्वाधीन व्हायला....! 

हो.. हो ...तुझ्या स्वाधीन  व्हायला. कारण त्यांना हि ठाऊक आहे. 
तुझं माझं नातं , तुझ्या माझ्या नात्यातला ओघळता हळुवार टपोर स्पर्श, तुझ्या  माझ्या नात्यातली   हसरी गंमत, मोहरते क्षण .. आणि ...आणि अ..    

 बस्स , मला अजून अधीर करू नकोस.   सामावून घे तुझ्यात...

बघ , ऐकतेय मी .. जवळ आसपासच, उधाण आनंदाने तू मुक्त बरसतोयस. उधाणला आहेस. काळ्याभोर नभासह ...
तो बघ ....त्या तिथे.!   
आणि मी ...

मी ....
अजूनही ह्या बंद पाठपिशवीत , एकटक खिन्न पडून............व्याकुळती.  

ऐकतोयस ना…

तुझीच  मन व्याकूळ …

‘छत्री’  
एका छत्रीचं  मनोगत ...
- संकेत पाटेकर 
२२.०६.२०१७ 

शनिवार, १७ जून, २०१७

'आपलेपणचा हुंदका'

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे
'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...!

विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे
'हृदयाशी नातं '' जो तो जपून असतो रे... !  

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

भावनांची हि रंगते मैफिल, कल्लोळ जिव्हारी रे
'आसवांचाही'  'जीव' तेंव्हा हळूच तुटतो रे... !

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...
- संकेत  पाटेकर
१७.०६.२०१७ 

बुधवार, १४ जून, २०१७

काळ्या पाषाणाला दुधाळ अभिषेक ....!

काळ्या पाषाणाला दुधाळ अभिषेक ....!

ह्या निसर्गाची हि ना ना कलात्मक अंगे , ना ना विविध अशी रचना,  रंगरूपे  ,  किती विस्मयकारक असतात न्हाई...!    म्हणजे...कधी.. कुठे..कश्यात तो कोणता रंग भरेल आणि मनाशी कोणता भावरंग चढवेल ह्याचा काही नेम नाही. आणि नसतोच मुळी.

मनाची सुंदरता नजरेत जर उतरत असेल तर ते अनुभवंन हि  फार कठीण नाही. सहजासहजी ते नजरेत उतरेल  वा भरेल . मनभर  आनंदी मळा फुलवूंन ..

कोर्लई कडे ..एक एक पाऊलं सरत असताना...लहरी लाटांशी,  नजरेचा लपंडाव सुरु असताना , धडाडणाऱ्या  गाजेचा प्रतिध्वनी उमटत असताना ,
त्या वळणावर क्षणभर थांबलो मी ..  काळ्या पाषाणावर होणाऱ्या त्या दुधाळ अभिषेकाने ....

मनभर विचारांचाही  हि अभिषेक  सुरु झाला होता .

'दूर आणिक जवळीकता'' ह्यात  क्षणिक अंतर केवळ .....आपण किती लांबवून ठेवतो न्हाई ?
घरंगळत येणाऱ्या , त्या   शुभ फेसाळ लाटेसारखं,  आपलेपणाची ओढ अशी.. क्षणा क्षणाला उमटत असेल तर  ...तर ह्या  काळ्या पाषाणासारखं  दुधाळ अभिषेक होतंच राहील....अविरत !! आपल्या मनावरही ...

तो दुधाळ लाटांचा अभिषेक मला , एकटेपणात गढलेल्या आणि मनातून तुटलेल्या ..मनावरचा आपलेपणचा वर्षाव वाटला. आईच्या पदराखालीची मायेची उब तेंव्हा  कुठूनशी मनाला  अलगद स्पर्शून  गेली.  कष्टाने सुरकुतलेले ते  प्रेमळ हात ...केसावरुन अलगद फिरल्यासारखे झाले.
हलकेपणाचा शिडकावा त्यानं मनभर  पसरला  गेला.   मनाच्या  डोहातून नजरेच्या खळीत आसवांचा जमाव  सुरु होण्याआधीच...थांबलेली  वाट मी पुन्हा चालू लागलो....
- संकेत पाटेकर


शुक्रवार, ९ जून, २०१७

बस्स, एक तेवढी मोकळीक हवी...

तुला एक उदाहरण देतो. म्हणजे काय ते तुला कळून येईल ..

तू  रस्त्याने.कधी ...चालता फिरता  वा एखाद कुठल्या वाहनातून ,  प्रवास केला असशीलच नाही का ? नाही म्हणजे प्रवास करणं वा न करण्याचा प्रश्न नाही आहे  ,  पण प्रवास करताना 
, कधी समोरच्या वाहनाकडे नीट लक्ष  देऊन पहिले आहेस का   ?
 एखाद रिक्षा वैगरे ...ट्रक , टेम्पो .काहीही घे, 
त्यावर मागे बघ , लिहलेलं असतं. 'Keep safe Distance' म्हणून .... 'सुरक्षित अंतर ठेवा' . 
का असतं ते ? 
कारण अधिक पुढे पुढे होण्याच्या नादात ,  कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये म्हणून , प्रवास ज्याचा त्याचा सुखकर व्हावा म्हणून ,  इतकंच. 
नात्यात हि अगं हेच लागू होतं . सुरक्षित असं अंतर राखलं म्हणजे किंव्हा  एक स्पेस असली म्हणजे    नात्यात कोणताही  गैरसमज वा दुरावा निर्माण होतं नाही. 
पण ते  नसेल तर अपघात होण्याचे चान्सेस हे अधिक असतात. 
कळतंय ना मला काय सांगायचं ते ..?
नातं आपलेपणाने जोडलंय , जिव्हाळ्याचं आहे. ते राहील. बस्स,  एक तेवढी मोकळीक हवी. 

सहज लिहता लिहता.....
- संकेत पाटेकर 
०८.०६.२०१७ 


बुधवार, १७ मे, २०१७

आत्महत्या - एक गंभीर प्रश्न

आपलेपणचा 'एक हळवा कोपरा' वा 'आधार' नेहमीच आपल्या लोकांच्या सोबत असू द्या. 
कुठीलीही टोकाची परिस्थिती जरी ओढवली तरी त्यातून बाहेर पडण्याचं तेच एक मोठं मानसिक बळ असतं. तीच एक मोठी ताकद असते. 
जी उभी करते आपल्याला पुन्हा नव्याने , जगण्याचं नवं बळ , नवा श्वास  देऊन ....

दिवसेंदिवस ..ऐकू येणाऱ्या ह्या आत्महत्या. ...मनाशी रूतलेलं मानसिक दडपण.. 
हे कुठेशी आता थांबायला हवं. हो ना ?  

मग  एकमेकांना आधार द्या . मग तो मानसिक असेल. आर्थिक असेल.....
आपलेपणाचं पाठबळ सोबत असायला हवं. इतकंच . 
- संकेत    


सोमवार, ८ मे, २०१७

एक पाऊल स्वछतेकडॆ ...

तो आला, त्याने इकडं तिकडं हळूच वळून पाहिलं आणि नजरेनंच काय ती जागा हेरली. हाती असलेला कागदी तुकडा, त्यात असलेला कुठलासा स्वादिष्ट पदार्थ... स्वतः सोबत सांभाळत, मी होतो त्या ठिकाणी तो येऊन बसला.
मी खिडकीशी मंदावलेली हवा घेत होतो. शरीर घामानं आधीच डबडबलेलं. वैताग सुटलेला.
बस, अजून हि जागची जागीच होती. वेळ टळून जाता हि ...ती जागची काही हलत न्हवती.
.., चिडचिड वैताग..मन गर्मीत वाहत होतं.
प्रवासी संख्या.. संख्याने वाढत होती.
आधीच येऊन स्वार झालेले ( प्रवाशी ) निथळत्या घामानं हैराण होतं, कंडक्टर ला शिव्या घालत होते तर काही आपणहुन कंडक्टरची जबाबदारी स्वतःवर ओढावून घेत, गुर्मीत अगदी घंटेची ओढाताण करत होते. 
बस् मध्ये वाहक चालक कुणाचाच पत्ता न्हवता. प्रवाशांनी मात्र ती आता खचाखच्च भरली होती.
माझ्या बाजूला बसलेला सुटा बुटातला, वीस बावीस वर्षाचा तो तरुण मात्र , कागदाच्या पत्रावळ्यात आणलेला पदार्थ , खाण्यात अगदी मश्गुल झाला होता. कोण आपल्या कडे पाहतयं, पाहत नाही. ह्या कडं त्याचं अजिबात लक्ष न्हवतं.
बहुदा ,त्याला कडकडूनच भूख लागली असावी.
तो खाण्यात दंग झालेला. ओळखीचा तो खमंग मात्र दाट धुक्यावानी मनभर साचला जात होता. थरावर थर साचत होते, खंमंग पणाचे,..
बहुतेक ती दाबेलीच असावी. मी आपला एक कयास बांधला, खाताना असं कुणाकडे वळून बघू नये, ते आपल्याला शोभा देत नाही. 
असं मी स्वतःला स्वतःच बजावत होतो, ण अधून मधून डोकावतच होतो.
त्यास कारण हि होतं.
तो हाती असलेला कागदी तुकडा , त्यातला तो पदार्थ , खाऊन झाल्यावर नक्की तो त्याचं काय करणार, खिडकीबाहेर फेकणार, कि स्वतःकडे ठेवणार , योग्य त्या ठिकाणी टाकत.? ह्याकडे सारं लक्ष लागलं होतं. 
प्रवाचनासाठी म्हणा ,मी तसा तयारच होतो. स्वतःच पुढाकार घेतल्याशिवाय पाऊल पुढे काय पडणार नाही.हि ओळ मनाला उसावत होती. क्षणांचा काय तो हुकूम,
बस्स , त्याने तो कागदी बोळा बाहेर टाकला , किव्हा तो टाकण्याच्या आत,  आपलं आपण सुरु व्हायचं.
समजेल अश्या शब्दात स्वच्छतेचे धडे द्यायचे असं   मनाशी आज ठरलेलच.

लक्ष अधून मधून त्याकडे वळत होतं.
बस्स एव्हाना सुरु हि झालेली.
वाऱ्याच्या थोपावणाऱ्या गारव्यांनं मन सुखावलं जात होतं. हेलकावे देत , बस चा स्वर हि उंचावला जात होता. खडखडणारं ते रडगाणं सुरु झालेलं. 
अमुक ठिकान्याहून तमुक ठिकाण्या पर्यंतचा प्रवास सुरु झालेला ..
बहुतेक मंडळी हि मोबाईल मध्ये तोंड खुपसून आप आपला वेळ पुढे नेत होती.
काही आपल्याच विचारत नशाधुंद होऊन तोल सावरून उभी राहिलेली.
मी मात्र अजूनही त्या क्षणाच्या प्रतीक्षेत होतो.
पाहता पाहता ,तेवढ्यात त्याने शेवटचा घास एकदाचा तोंडी घेतलाच ....
आणि..आता , ? पुढे काय ? 
मी टकमकतेने पाहू लागलो.
त्याने एखाद टॉवेल जसा घडी घालून व्यवस्थित नीटनेटका ठेवावा , तसा तो कागद हि व्यवस्थित घडी घालूंन , आपल्या शर्टाच्या खिशात अलगद ठेऊन दिला. 
पाहून मी क्षणभर अवाक..
शिस्त लागलेलं कार्ट दिसतंय म्हणून मनभर आनंद संचारला.
म्हटलं चांगलं आहे, स्वतःला अशी शिस्त लावून आहे ते,
नाहीतर खायचं, प्यायचं ण , 'आपलं काय जातंय' ह्या अविर्भावात, कुठे हि हवं तसं, भिरकावून द्यायचं हे आपल्या लोकांच ठरलेलचं, मग ते करकरीत टापटीप पेहराव केलेले, शूट बुटातले उच्च शिक्षित , पदवी घेतलेले महाभाग असो, वा गल्ली बोलीतले..इतर कुणी..
तो अशातला न्हवता.....

रोज रस्त्यावरून जाता येता कागदी बोळे , बॉट्लस ,  इतरत्र फेकून देणाऱ्यांची अन कुठेहि पिचकारून थुकणाऱ्यांची खरंच कीव येते. 
घरात स्वछता जशी तुम्ही बाळगून असता तसे सार्वजनिक ठिकाण  वागायला काय हरकत आहे.
आपल्यालाच ते चांगलं नाही का  ?
पण नाही, आम्हाला घाण करायची सवयच लागले नाही का ? आम्ही सुधारण्यापैकी  नाही . 
सार्वजनिक ठिकाणी एखाद बस स्टॅण्डवर , रेल्वे प्लॅटफॉर्म वर,  तोंडातली घाण थुकंन , अन आपल्याकडचा केरकचरा कसाही कुठे हि लोटून देणं हे  चांगळूपणाचंच  लक्षण , नाही का ?

सुधरा..सुधरा....
तुम्ही सुधरा , जग सुधरेल ..
एक पाऊल स्वछतेकडॆ ...
- संकेत पाटेकर


शनिवार, २२ एप्रिल, २०१७

नवं नातं नवं प्रेम ..

प्रेमात पडणं वगैरे सोपं असतं ...रे ! 
एकमेकांना पाहिलं  आणि एकमेकांच्या विचार धारा काहीश्या जुळून आल्या कि आपण आपणहून असे,
एकमेकांच्या जवळ येतो. वा येत जातो. म्हणायला  मनातली हि ओढ आणि  नजर त्या व्यक्तीकडे आपल्याला नकळत ओढवून नेते. ते हि वारंवार  ..क्षणासेकंदाला अगदी,  हा देहभान सारा विसरून लावत.
आणि तुला सांगू इथेच खरं तर ‘प्रेमाज बीज’ आपल्या अंतरी हळूच ‘अंकुरलं’ जातं. 
दोघांच्या मनातला ‘मनमोकळा संवाद आणि सहवास’  हे सगळं घडवून आणतं. आपल्या  नकळत,
नवं कोवळं नातं हृदयाशी रूजवतं.  आनंदाच्या मोकळ्या आभाळी छायेत
स्वच्छंदी फिरक्या घेत. दौडत. पळत. स्वप्न पाहत .
इथपर्यंतचा हा एकूण प्रवास म्हणजे 'प्रेमात पडणं' असं मला म्हणायचंय. 
काय सांगायचं ते कळतंय ना तुला  ?
‘’प्रेमाची खरी कसोटी अगं.. ह्या पुढे सुरु होते.  नातं जुळल्यापासून ते फुलण्यापर्यंत आणि फुलण्यापासून आपलं अस्तित्व मागे ठेवून जाण्यापर्यंत . कळतंय ना ?’’

प्रेमात पडणं म्हणजे  प्रेम नाही. ती एक सुरवात असते. जस्ट एक सुरवात.
बीज मातीशी  नीटस रोवल्यानंतर,  त्याची जी पुढची पायपीट आहे ना ,आकाशी उंचच उंच झेप
घेण्याची...तो एकूण प्रवास आणि पुढचे अनंत काळ (मातीशी विलीन होई पर्यंत ) परिस्थितीशी स्वतःला झुंजावत ठेवून ,  आनंदाचे क्षण मोहरत नेण्यापर्यंतचा हा एकूण प्रवास  वा काळ म्हणजे 'प्रेम'
लक्षात येतंयं ना..?

माझं  तुला हेच सांगणं आहे. कि नुसतं ‘प्रेमात पडणं' नको. आणि फसणं  नको.
आपण सुरवात करतोय. ते शेवटच्या श्वासाअखेर सोबत राहील,  ह्या विश्वासानं ..अन हा विश्वास आणि त्यातला ‘आपलेपण’ कायम   राहावा , ह्यासाठी आपण दोघांनी तसं प्रयत्नशील राहायला  हवं. प्रत्येक पाऊलवाटेवर ...पाऊला पाऊलावर ...

दिलेल्या त्या  उदाहरणावरून मला हेच काय ते  सांगायचं आहे.
ते 'उंचावलेलं अन बहरलेलं झाड' म्हणजे आपलेपणाने बांधलं गेलेलं 'नातं' अन  त्या नात्यातल्या नितळ प्रेमाचं  प्रतीक ...
 
प्रेम अगं  हे .. असं  हसरं , मोकळं आणि  नितळ हवं. विश्वासानं बांधलेलं. सांभाळून घेतलेलं.   

आयुष्याची हि पायवाट,  आपण दोघांनी मिळून आता सुरु करणारच  आहोत तर ,
एकत्रित चालण्याची शपथ घेतल्यावर ,  कुठल्याहि  गोष्टीचा वा परिस्थितीचा  तोल बिघडल्यावर  .. आपण तिथे एकमेकांना एकमेकांसाठी  उपलब्ध व्हायला  हवं .  कुठलाही गैरसमजूतीचा धागा न ओढता न  ताणता.... आपलेपणानं... एकमेकांचं मन जिकून आणि प्रेमाचा ओलावा कायम राखत...

कळतंय ना ?
तशी तू समजूददारच आहेस म्हणा ....पण तरीही ...

असंच लिहता लिहता..
- संकेत पाटेकर
२२.०४.२०१७ 

sanketpatekar2009@gamil.com

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

क्षणाचे सांगाती..

कुठलेही भाव न दर्शवता, सतत दृष्टी समोर येणारी वा घडणारी एखाद गोष्ट, सातत्याने टाळत राहणं वा इग्नोर करत राहणं, ह्या साठी खूप मोठं असं मानसिक 'बळ' लागतं रे.., आणि ते तुझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे. हो  ना ?
किती सहजतेने अगदी जमवून घेतेस तू सगळं,
जे मला अद्याप हि जमलेलं नाही वा जमणार नाही. कसं जमतं तुला रे , हे सगळं ?सांग ना ?
ह्यालाच मी प्रेम म्हणू का ? तुझं माझ्यावरचं , निस्सीम नितळ ? कि प्रेमातली आहुती ? नातं हळुवार उमळताना,  त्यातलं जीव   काढून घेण्याचा वा स्वतःहून देण्याच्या  ह्या  अवस्थेला  नाहीतरी काय बोलावं,  बोल ना..?
तो भरभरून लिहत होता . कित्येक दिवस मनात उसळलेल्या आपल्या भावनांना कागदवर उलगद उमटवून देतं.  आज तिच्यापुढे  हे सगळं  मांडायचं होतं. पत्राद्वारे ...तो लिहत होता .

कुणावर प्रेम करणं हे  पाप  तर नाही ना  रे  ?
नकळत घडणारी सहज अशी हि क्रिया आहे.  आणि अश्या सह्जतेतूनच तुझं- माझं , आपलं नातं जोडलं गेलेलं , न्हाई का ? पण त्याला असं एकाकी वेगळं वळण लागेल.  हे ध्यानी मनी हि न्हवतं.

म्हणतात आयुष्यभर कोण सोबत राहील वा नाही ते आपलं स्वभाव ठरवतं असतं. म्हणायला काही अंशी ठीक आहे हे ,
पण सगळ्याच गोष्टी  आपल्या हाती नसतात रे , हे कळून चुकलंय आता . कर्ता करविता कुणी और असतो.  आपण केवळ क्षणाचे सांगाती.  फक्त चालायचे . मार्ग कोणता तो,  तो ठरवणार .
पण त्या अनामिक मार्गावर जुळलेल्या क्षणिक भेटी गाठी  अन ते  क्षण  आपण केवळ आपल्या स्मृतीत गुंडाळून ठेवू शकतो. इतकंच. 
आणि हाच एक पर्याय उरलाय मला वाटतं माझ्याकडे. अन त्यालाच धरून मला जगायचं आहे .

आयुष्यात एकदाच आणि पहिल्यांदाच कुणावर प्रेम केलं रे मी ,  स्वतःला झोकावून देतं. आणि त्याला असं वळण लागलं बघ ..
तुझं हे  टाळाटाळ करणं ,  ना बोलणं ,   दूर जाणं.,  सगळं समजतंय मला . पण सोसवत नाही . इतकंच .
त्या वेदना अपार आहेत. आणि काळच त्यावर औषध ठरेल. 
तुझाच ...
- मनातलं काही ..
सहज लिहता लिहता ..

 संकेत पाटेकर
११.०४.२०१७ 

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

मनाच्या भाव 'अवस्था'

ऐ , तू सिरीयस आहेस  का ?
मग थांब तिथे...आलो मी..
मला तुझ्या समोर हे ऐकायचं आहे.  प्रत्यक्ष ..
Then  .. Step away ..

घाटकोपर ला मेट्रोच्या रांगेत उभे असता.  माझ्याच मागे उभ्या असलेल्या,   साधारण  चाळीसच्या आसपास असलेल्या... त्या व्यक्तीच हे वाक्य  , कानी भरभर आदळू लागलं. 

‘मला हि त्रास होतोयं , समजलं  …’
सैरभैर  अवस्थेतील , रागारागाने फणफणत  , फोन वरून सुरु असलेलं,  त्यांचं हे असं  संभाषण..सरळ सरळ कानी येत होतं.
त्याने मनाच्या  विचारांची घडी एकाकी बिघडत गेली. मी आपल्याच विचारात असा मशगुल होतो गेलो.

‘एकमेकांच्या सहवासात इतकी वर्ष घालावल्यांनंतर  हि,   वयाच्या ह्या स्टेज ला  , नात्यात अशी दुंभगता  यावी ? नात्यातली विश्वनीय फळी तुटावी .  ह्यानेच मन  काहीसं प्रश्नार्थी होऊन गेलं . ‘
वाढत्या वयो- मानानुसार आणि मिळालेल्या अनुभवानुसार,  आपली बौद्धिक जाण व समज अधिकाधिक दृढ  होतं जाते. असं काहीसं मी आजवर मानत आलो होतो  ... पण आता ..

तितक्याच , मेट्रो आल्याची चाहूल  झाली .  त्या  तंद्रीतून मी बाहेर पडलो.  
घाटकोपर ते चकाला असा पुढचा  प्रवास सुरु  झाला. 
गर्दीने भरलेली मेट्रो आपल्या लयीत सुरु झाली.  आणि  नव्यानं , नवी काही वाक्य अलगद  कानी झेपावली  . ह्यावेळेस  लाडीगोडीनं  भरलेला असा  प्रेमळ संवाद खिदळून  हसत होता. 
त्याने मन हळूवार मोहरत गेलं.  किंचित आधी ऐकू आलेले ते बोल , तो नात्यातला राग... आता धूसर होत जाऊन , प्रेमाने बाजी मारली होती .
क्षणातच सगळं बदललेलं.  भाव बदलले. जागा बदलेली आणि ती व्यक्ती हि बदलेली . 
मी पुन्हा आपल्याच विचारात असा  गर्क झालो.

मनाच्या ह्या सगळ्या भाव 'अवस्था'  आहेत .
त्या त्या  क्षणा- नुसार  किंव्हा घटना-क्रमानुसार , आपल्यातल्या सुप्त जाणिवांना 
वास्तव्याचा स्पर्श देतं  . आपल्यातला 'माणूस' आणि 'माणूसपण' दाखवून देणारया 'अवस्था' 

- संकेत पाटेकर
०६.०४.२०१७



शुक्रवार, १७ मार्च, २०१७

'मोकळा श्वास...'

सर सर बरसणाऱ्या व्हाट्स अँप  वरील चॅट नोटिफिकेशन्सने  त्याच्या  मनातली तळमळ अधिक  वाढू लागली.  अन  अढळ आत्मीयतेने  एक एक प्रोफाइल पाहत , तो तिचा शोध घेऊ  लागला. 
तिचं नाव  त्यामध्ये कुठे दिसतंय का ? 
होळीच्या निमित्त  एखाद मेसेज तरी , तिच्याकडून   ? किंव्हा इतर काही,  तेवढंच ह्या मनाला आधार  वा दिलासा....
एवढी तरी माफक अपेक्षा धरून असतोच ना आपण , आपल्या म्हणून मानलेल्या वा सर्वस्व वाहिलेल्या आपल्या माणसांकडून , हे ना ?  त्याने स्वतःलाच स्वतःच्या प्रश्नावलीत  पुन्हा कैद केलं.
तीन दिवसानंतर कुठे आज  त्याने व्हाट्सअँप सुरु केलं होतं. म्हणावं तर रि- इन्स्टॉल केलं होतं.   अन ह्या तीन दिवसात होळी - धुळवड  च्या शुभेच्छांचा एव्हाना वर्षाव झाला होता.
त्यातून  त्याची नजर सर्वत्र भिरभिरत होती. अधीरतेने , आलेल्या त्या असंख्य शुभेच्छांच्या भाव वाटेतून , त्या ठरविक भावसंगीतच्या सुरावटीत....तो  हृदयी ठोका  शोधत ..त्याचा मागोवा घेत  …

शोध अजूनही सुरु आहे …
तुझ्या माझ्या त्या वाटेवरचा
तुझ्या हृदयातल्या होकाराचा
माझ्या स्वप्नातल्या जाणिवेचा

असं म्हणतात प्रेम हे माणसाला आंधळ करतं.
म्हणजे त्या व्यक्ती शिवाय आपल्याला दुसरं तिसरं काही दिसत नाही. सुचत नाही. 
सदा तो चेहरा, त्यावरचे हास्य मधाळ बोल ,  अश्या कितीतरी क्षणांचे भावगंधीत  लघुपट  नजरेसमोर उभं राहतं.  अगदी क्षणा क्षणाला…
मनातली  हि ओढ हि  वादळवाटेसारखी  सतत त्याच व्यक्तीच्या दिशेने फिरकू लागते. 
त्या व्यक्तीच्या काळजीत आपलं मन  वाहू लागतं.  तिच्याशी बोलण्यासाठी ,  भेटण्यासाठी ते सतत आतुरलं जातं.  हि ओढ, कधी न संपणारी असते. 
तो हि असाच भावव्याकुळ झाला होता. अधीर झाला होता.
आला असेल का तिचा एखाद मेसेज तरी ? असेल का शिल्लक …आपल्याविषयी अजूनही आपुलकी ? प्रेम ?ती  जाणीव  ?  
वर खाली नजर फ़िरवत , त्याने व्हाट्स अँप  वरील तिच्या प्रोफाइल वर क्लीक केलं . अन   क्षणभर त्यात डोकावून तो मिश्कीलपने  हसू लागला.  
नवं असं काही न्हवतंच.  एक ओळ हि नाही .
जुनंच जैसे थे सगळं , दिनांक २३ जानेवारी...
वादविवादाने मावळलेला तो क्षण,  तो  संवाद , ती शेवटची ओळ...
तो  पुन्हा ते सगळं भरभर वाचू लागला.   अन त्या एका वाक्यातील त्या शब्दावर  येऊन थांबला...
‘मोकळा श्वास...’
क्रमश :-
 - संकेत पाटेकर
१७.०३.२०१७