बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

तुझा देव मला माफ करणार नाही ...

तुझा देव मला माफ करणार नाही ...
'' हृदयाशी , इथे ठेवतोस ना सगळं '' 
काही दिवसापूर्वी एका सुखद क्षणा प्रसंगी , खेळकरपणाने पण अगदी मनाच्या तळा गळातून मला संबोधलेलं हे तिचे वाक्य , हृदयाशी अगदी घर करून आहे.
क्षण वाऱ्यानिशी बदलतात . तसा माणूस हि एकाकी बदलतो. 
परिस्थितीशी झुंजाता झुंजता ... 
पण तेंव्हा त्याच्या स्वभावात अन वागण्यात झालेला थोडाअधिक बदल हि आपल्या रुची पडत नाही. मस्तकात त्या गोष्टी जाताच नाही म्हणा ...झालेला बदल हा आपल्याला अनपेक्षित असतो .

आपल्याला हवी असलेली, अभिप्रेत असलेली व्यक्ती कालाओघात , परिस्थितीशी दोन हात करत अशी बदलेली असते. तेंव्हा त्या बदलेल्या मनाशी नव्याने जुळवून घेताना आपल्या मनाची सुरु असलेली वारेमाप धडपड समोरचं मनं हि हेरावून घेतं  .

पण हवा तसा प्रतिसाद देत नाही. का ? त्याचं कारण हि कळत नाही.
आपलं मनं मात्र अशावेळी पूर्वीच्या सोनेरी क्षणासोबत विरघळून जातं . आत्ताचे हे क्षण अन पूर्वीचे ते क्षण ह्यात तुलना   करत....
पण एखाद दिवशी कुठे कधी अवचित भेट घडते.
अन नकळत काही शब्द नव्याने मनावर छाप उमटवून जातात . अन झाले गेलेल्या गोष्टी नकळत मनातून पुसल्या जातात . मनातला रोष - रुसवा कुठल्या कुठे निघून जातं.
असेच काही शब्द , वाक्य मनावर कोरले गेले....
त्यादिवशी ..हळुवार हृदयाशी बिलगत .....'तुझा देव मला माफ करणार नाही'
'' हृदयाशी , इथे ठेवतोस ना सगळं''...
प्रेमाचा एक शब्द अन मायेचा एक स्पर्श हि पुरेसा असतो ...मनातला रोष - रुसवा घालवून देण्यासाठी ...
आनंद फुलविण्यासाठी...
' तुझा देव मला माफ करणार नाही ' ह्या तिच्या वाक्यावर माझं इतकंच म्हणन आहे.
माझा देव विशाल मनाचा आहे ...तो का नाही माफ करणार ... नाहीच माफ केल तर मी आहेच तडजोड करायला .
असंच लिहिता लिहिता..
नातं तुझं माझं ..
संकेत पाटेकर
१२.१०.२०१४

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

कुणीचं कुणाचं नसतं रे ...?

काल FB वर ह्या आशयाची एक पोस्ट वाचली.
तेंव्हा भूतकाळातल्या त्या गहिऱ्या संवादात मन पुन्हा हरखून गेलं.
कित्येक दिवस अन महिने ओलांडली असतील पण त्या संवादातला त्या व्यक्तीचं हे मनाला भिडलेलं हे वाक्य मनाच्या भावपटलावरून अजून काही उतरायचं नाव घेत नाही .
कारण माझ्या आयुष्यात त्या व्यक्तीला खूप महत्वाच स्थान आहे .
त्यामुळे ' कुणीचं कुणाचं नसतं रे' ह्या तिच्या व्यक्तिगत जीवनभूवनातून उमटलेले स्वर मात्र माझ्या मनाला घायाळ करून गेले.
अस काहीच नसतं ... ? अस त्यावेळेस मी म्हणालो होतो खरा,   पण त्या मनास कस पटवून द्यावं  हे त्यावेळेस मला जमल नाही. अजून हि नाही..
कधी कधी मनाच्या ह्या असंख्य भाव गर्दीत मला स्वता:हालाच हा प्रश्न पडतो.
खरचं कुणीचं कुणाचं नसत का रे ?
तेंव्हा स्वतःला सावरत सावरत माझंच मन मला उत्तर देत.
कुणीतरी आपल्यासाठी हि झुरत असतं रे ..! जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ....
मग कुणीच कुणाचं नसतं अस कस होईल ?
आपलं त्यांच्याकडे लक्ष नसतं इतकंच किंव्हा असूनही दुर्लक्ष करण्यासारखं आपण करत राहतो.
आपण एकटे असे नसतोच कधी , आपल्या विचारधारा नेहमीच आपल्या .. सोबत असतात .
मुळात जन्म अन मृत्यू ह्या मधला काळ म्हणजे जीवन .अन ह्या मधल्या काळात कितीतरी मना- मनाची नाती आपण जुळवत असतो. आपल्या कळत नकळत... तेंव्हा आपल्या प्रती हि कुणाच्या मनात आपुलकीची आपलेपणाची प्रेम भावना निर्माण झालेली असते. एक जिव्हाळा निर्माण झालेला असतो.
पण इतकं असूनही आपल्या मनाच्या तळाशी घर केलेली काही नाती अन त्यांच्यावरच व्यक्तिगत असलेलं  अतोनात निर्मळ प्रेम आपल्याला इतर मनाच्या आत डोकाविण्याची संधीच देत नाही.
मग अशा प्रश्नाला कधीतरी आपण वर उचलून घेतो. का ?
तर आपलं अस्तित्व अन त्याच कुणालाच काहीच न वाटण , ज्यांच्या प्रती आपल्या मनात भरभरून प्रेम आहे अन आपलेपणा आहे .
मुळात 'प्रेम'  हा भावनेशी संबंधित प्रश्न .....
जेंव्हा आपले निकटवर्तीय आपल्याला टाळू पाहतात ..ह्या त्या कारणास्तव तेंव्हा हा प्रश्न उद्भवतो.
आपण जस इतरांवर आपलेपणाने प्रेम करतो. तसंच काहीस प्रेम आपल्याला अभिप्रेत असतं समोरच्याकडून. हर एक परिस्थितीशी झुंजताना एक मोलाची साथ हवी असते त्यांची बस्स ... जेंव्हा ती मिळत नाही.
तेंव्हा  नक्कीच वाटतं खर .. ..कुणीचं कुणाचं नसतं..? जो तो स्वतःसाठी जगत असतो.
पण खरचं कुणीतरी आपल्यावर प्रेम करणारं अन साथ देणारं असतंच. 
बस्स आपण त्याना ओळखत नाही किंव्हा तितकस महत्व देत नाही . 
 जीवन हे मुळात एकटे जगण्यासाठी नाही आहे..............
आपल्याला हवे असलेले , आपले निकटवर्तीय , आपल्या कायम सोबत असतील तर मला वाटत नाही कि असा प्रश्न कधी उद्भवेल . 
पण मुळात दोन प्रकारची माणसं असतात. स्वार्थासाठी म्हणून जवळीक करणारे अन काही निस्वर्थाने प्रेम करणारे ..... हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग ....
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या ...
असंच लिहिता लिहिता ..
मनातले काही ..
संकेत पाटेकर ..
११.१०.२०१४

बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

भावनिक खेळ ..

खरंच किती गंमत आहे ...ह्या भावनिक खेळामध्ये ...
कुणी भरभरूनं कौतुक करतं. आपण केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल किंव्हा करत असलेल्या एखाद कुठल्या गोष्टीबद्दल ...तर कुणी चतकोर शब्द हि काढत नाही.
 उलट नाक मुरडून घेतात अन दुरूनच आपल्यावर नजर ठेऊन राहतात.
तर कुणी बोल लावून ' आपलंच (स्वतःच ) ते योग्य अस म्हणतं आपल्या मनावर आघात करत राहतात.

पण ह्या सर्वांतून ' आपलं मन' मात्र योग्य ते वळण घेत राहतं. पुढे जातं राहतं .

आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं आहे .
पण मला वाटत सर्वप्रथम आपण शिकतो ते आपल्याच माणसांकडून ....ह्या समाजाकडून ....
ज्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळते मग ती शब्दिक असो वा हळुवार पाठीवरल्या मायेच्या स्पर्शाची.. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत राहतं . पुढे जाण्यासाठी.....नाही कि त्यात हुरळून जाण्यासाठी .

लोकं आकार देण्याचं काम करतात . अन  त्यातून आपण स्व:तहा घडत जातो. 
आपल्याला हवं तसं. 

असंच लिहिता लिहिता ..
- संकेत पाटेकर
१६.०९.२०१४

बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

तिचा वाढदिवस...

त्या दिवशी बरेच दिवसाने करी रोड ला उतरलो. एका गोडश्या बहिणीकडे, तिच्या सासरी , 'निमित्त होतं ते गणराजाचं दर्शन. तिने तसं आवर्जूनच बोलावलं होतं म्हणा .
दूर दूर चे लोकं ना आमच्याकडे दर्शनाला येतात. रांगच लागलेली असते एक ... गणपती बाप्पाची इतकी सुरेख अन सुंदर मूर्ती आहे ना... तू बघतच राहशील ...तू ये तर खरा... अन येताना कॅमेरा हि घेऊन ये फोटो काढायला. आपलेपणातून उमटलेले हे प्रेमाचे तिचे गोड शब्द ......
खरं तर मला नशीबवानचं म्हणावं लागेल . ..कारण एकेक फारच गोड अन प्रेमळ बहिणी लाभाल्यात त्यातलीच हि एक गोड बहिण. 'सुवर्णा' दूर असूनही नात्यातला संवाद नावाचा धागा अन विश्वास अजूनही तुटलेला नाही. तोच खेळकरपणा तोच शब्दातला गोडवा. नातं हे अस अन असंच असायला हवं. कायम .. टवटवीत ...प्रसन्नता बहाल करणार ...
गणराजाचे दिवस ..,सात दिवसाचे गणपती आपल्या घरी परतायच्या मार्गी होते. आणि नेमकचं त्याच दिवशी तिचा वाढदिवस एकत्रित असा जुळून आला होता . खर तर आपण ज्यांना मनापासून आपलं मानतो त्यांचे वाढदिवस हि कायम लक्षात राहतो .
त्यामुळे तिचा वाढदिवस अर्थातच माझ्याही लक्षात होता. दरवर्षी प्रमाणे न चुकता न विसरता मी फोन करणार होतो. पण आदल्याच दिवशी तिचा फोन खणाणला .
संकेत , तू येतोयस ना ? केंव्हा येणार आहेस ? खरं तर गुरवारी मी कुठे बाहेर जात नाही. ऑफिस सोडून (कारण काय ते नंतर सांगेन कधीतरी ) म्हणून विचार करू लागलो. उद्या तर गुरवार, म्हणून शुक्रवार ठरवलं अन परवां येतो ...अस सांगून मी फोन ठेवून दिला .
पण पुन्हा आठवण झाली. अरे उद्या गुरवार अन हिचा वाढदिवस..मग काय हाच सुवर्ण क्षण साधून उद्याच जावू गणरायाच दर्शन घ्यायला. त्यानिमिताने वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा हि देता येतील . प्रत्यक्ष तिच्या उपस्थितीत . म्हणून पुन्हा तिला कॉल केला .
हेल्लो ,अगं ...उद्या ४ सप्टेंबर ना ?
हो....तुझ्या लक्षात आहे तर ? काही बोलण्याच्या आतच तिनेच सवाल केला ? हो तर ..अस कसं विसरेन. मी उद्याच येतो...तुझा वाढदिवस हि आहे नि बाप्पाचं दर्शन हि घेता येईल . ठीक आहे… ये मग, मी वाट पाहेन... असं बोलून फोन ठेवला .
दुसर्या दिवशी ऑफिसला निघालो. तिथून सुटल्यावरच ' करी रोड ' गाठणार होतो . ऑफिस मध्ये पोहोचलो. नेहमीप्रमाणे कामकाज सुरु झालं. अन त्यातचं दुपारचे साडेबाराचे टोले पडले. अन तिचा फोन खणाणला.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....'हैप्पी बर्थडे' ताई ,’काही बोलण्याच्या आतंच मी तिला बर्थडे विश केल .
''काय रे माझा वाढदिवस अन मीच फोन करतेय तुला ? तुला फोन करायला हवं ना ?''
हो गं.....पण मी म्हटलं मी येणारच आहे तिथे , मग फोन वरून शुभेच्छा कशाला ? त्याची मजा आताच, ह्या क्षणीच का घालवायची . घरी आल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करेन ना ? ठीक आहे. thanku thanku... पण एक काम कर ... घरी कुणालाच माहित नाही आहे. माझा वाढदिवस आहे ते . . तू मला सर्वांसमोर विश नको करू. कळू देत मला हि ..कोणा कोणाच्या लक्षात आहे ते माझा वाढदिवस . ह्यांच्या (नवऱ्याच्या ) पण लक्षात नाही आहे.
हाहाहा .. म्हटलं गंमतच आहे. सांगून टाक ना मग ...तुझा वाढदिवस आहे ते, ...त्यात काय लपवायचं . 'नाही रे मला बघू देत ' तू विश नको करू ..पण वेळेत ये, अस बोलून तिने फोन ठेवून दिला.
मनातल्या मनात मला हसूच फुटत होतं. अन चिंतन हि ..ह्या गोष्टीच. कि खरच आपल्या ह्या वाढदिवसाला आपण आपल्या लाडक्या व्यक्तीच्या किंव्हा आपल्या अगदीच जवळच्या व्यक्तीच्या शुभेच्छांसाठी आपण अगदीच आतुरलेलो असतो. कधी आपल्या लाडक्या व्यक्तींकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल, कधी भेटी गाठी होतील, ह्याचीच वाट पाहत असतो. काही वेळा त्याची पूर्तता होते . तर काही वेळा वाट पाहण्यातच दिवस ढळून जातो . तर असो... काही वेळाने पुन्हा तिचाच फोन आला...हे सांगायला कि, तू .सर्वांसमोरच मला विश कर..चालेल , त्यांच्या लक्षात तरी येईल माझा वाढदिवस आहे ते.
मी म्हटल बर..बर...ठीक आहे. येतो साडे सात वाजेपर्यंत.... पुढे काय झाले ते सांगायची गरज नाही. घरी जाईपर्यंत कुणाच्या लक्षात हि न्हवतं तिचा वाढदिवस आहे ते . पण सर्वांसमोर जेंव्हा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेंव्हा घरातला हर एक सदस्य अचंबा करायला लागला.
सासू म्हणाली ...काय ग ! सांगायचंस ना ... ह्म्म्म.. पण मला बघायचं होत ..कोणा कोणाच्या लक्षात आहे ते.... अश्या तर्हेने तिचा वाढदिवस उशिरा का होईना सर्वांच्या लक्षात आला. आणि ते लक्षात आणून देण्यासाठी मी मात्र निमित्त ठरलो . ह्याचा फार आनंद झाला. आनंदाच्या वलयात वाढदिवसाचा सुगंधित अत्तर सर्वत्र पसरला. आणि त्याने तिथला माहोलच बदलला .
जाता जाता तिचे गोड शब्द पुन्हा ....मनात ठसून गेले. जेवण चांगल झालं ना रे ? आवडलं ना ? मी केलेलं. मी म्हटलं..हो ग ताई...माझी आवडती भाजी जी होती. ..मेथी ची ...!
अन प्रेमाने वाढलेली कुठलीही गोष्ट ती गोडच असते न्हाई ...?
दोघांच्या हि चेहऱ्यावर एकच स्मित हास्य उमटलं अन पाउलं त्याच लयात घरच्या दिशेने निघू लागले. पुन्हा भेटू म्हणत .

नातं ...मग ते रक्ताचं असो वा नसो , त्यात आपलेपणा आला कि ते अधिक दृढ होत जातं . ते जन्मांच नातं बनतं ... मग कुणी कितीही कोसो दूर असो आपल्यापासून, त्याचं स्थान नेहमीच हृदयाशी असतं . नेहमीच धडधड करतं .
स्टेशन ला पोहचल्यावर तिला पुन्हा एकदा फोन केला . वाढ दिवसाच्या खूप सार्या प्रेमळ शुभेच्छा ताई ...पुन्हा एकदा अशीच हसत खेळत रहा नेहमी .....
दूर असूनही मनाशी घट्ट जुळलेल्या अश्या ह्या रेशीम गाठी ...
- संकेत य पाटेकर
१०.०९.२०१४

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

धागा - गैरसमजुतीचा - शब्दात विणलेला .

वाचनालयातल्या शांत नि गहनिय वातावरणात विश्वास पाटलांची ' पांगिरा' ह्या कादंबरी विषयक ' आपला मनोगत सांगणारा (पांगिरा कादंबरी कशी घडली , कशी लिहिली गेली ह्याविषयक ) ' लेख ' ' वाचण्यात अगदी गुंग झालो होतो.
हे लेखक वगैरे कसे लिहित असतील न्हाई , एवढ्या मोठ मोठ्या कादंबऱ्या , कथा वगैरे , त्यांचे अनुभव ..
ह्याचं एक प्रकार कुतूहल मनी असतं.
 अन ते पाहण्याची , ऐकण्याची , वाचण्याची उत्सुकता फार शिगेला पोचली असते.
अशातच काही लेख वगैरे हाती आलं तर ते अगदी झपाटून वाचून होतं हि . असाच हा लेख काही मिनिटातच वाचून पूर्ण झाला. अन तेवढ्यात फोन खणाणला .
ओळखीचाच , जवळचाच , जवळच्याच व्यक्तीचा , पण कित्येक दिवसाआड ने उगवलेला . नात्यात रुसवा म्हणतात ता ..तो रुसवा धरून बसलेल्याचा कॉल, क्षणभर हसू आलं.
 म्हटलं , कोण कधी काय गैरसमज करून घेईल सांगता येत नाही.
लिहायचं , बोलायचं एकाबद्दल अन वाटायचं दुसऱ्याला कि हा मलाच म्हणतोय असं...अन मग रुसून बसायचं , न बोलायचं , ना भेटायचं ...बस्स..
माणसं भेटून बोलून एकमेकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यापेक्षा , आपल्या तर्कानेच आपली शक्कल लढवून अधिक गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करतात अन अधिक अधिक त्यातच गुंतत जातात. अन मग सुरु होतो खेळ , मनातल्या भावनांचा ..गहिऱ्या शब्दसावल्यांचा
सर्वच गोष्टी तर्काने सुटत नाही . अन सर्वच गोष्टी आपण म्हणू तशा असत नाही. त्यामागच सत्य काही और हि असू शकत. पण हे सांगणार कुणाला ?
पण हे हि तितकंच खरे कि तर्काने मांडलेल्या सर्व गोष्टी ह्या चुकीच्याच असतातच असं हि नाही.
पण एकदा सत्य काय आहे ते डोळसपणे पाहायला काय हरकत आहे . उगाच नात्याची चिरफाड कशाला ? आणि का ?आणि का म्हणून ?
जे मनापासून नातं जपतात अन समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणून मानतात , त्यांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नसतं.
पण गैरसमजुतीचे हे धागे मनाला गुंतागुंतीच्या डोहात पार ढकलून देतात. अन गूढ वलयांमध्ये आपण आपलाच आवाज शोधू पाहतो.
मनातले प्रश्न , शंका -कुशंका , एकमेकांबद्दल असलेल्या भावनां जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला कळत नाही . किंव्हा सांगत नाही तोपर्यंत असलेला गैरसमजुतीचा धागा हा सुटा करता येत नाही.
उगाचच शंभर प्रश्नाचा ढिगारा मनात साठविन्यापेक्षा सरळ भेटून बोलून असलेल्या प्रश्नांची , शंकाची उकल केली तर ती गोष्ट वेळेत तर सुटतेच पण नात्याची ती रेशीम गाठ अन त्यातला ओलावा तसाच कायम राहतो.
ज्यांच्या मनात आपल्याबद्दल अन आपल्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमाचा अन आपुलकीचा  कायम आहे . किंव्हा असतो. 
तिथे गैरसमजुतीचा हा तिढा हि काही क्षणापुरताच असतो. 
 कारण एकाची बाजू खचली तरी दुसरा सावरायला लगेच तत्पर असतो.
अन तेच खर नातं . प्रेमाने जपलेलं.
- संकेत य पाटेकर
२८.०८.२०१४

बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४

धक्याची दादागिरी - बोले तो भाईगिरी ..

सकाळची वेळ , रम्य अन मनं मोकळ वातावरण...
नेहमीच्याच आपल्या रुटीन प्रमाणे ऑफिस साठी घर सोडलं .  पंधरा एक मिनिटाच्या पायपिटी नंतर स्टेशन परिसरात दाखल झालो.  अन नेहमीच्या त्याच गर्दीत त्याच असंख्य हसऱ्या दुखऱ्या चेहऱ्यात मिसळून गेलो.
क्षण त्याच गतीत काहीसे पुढे सरले .
अन आयुष्याचं जीवनसार कथन करणारी मुंबईची ' ती ' जीवन वाहिनी ' लोकल ट्रेन आपल्याच लयात अगदी संगीत तालानिशी फलाट क्रमांक १ वर दाखल झाली. अन लोकांची एकच झुंबड उडाली उतरनार्यांच्या आधीच चढणारे आप आपल्या सीट पडकून निवांत झाले.
सीट मिळण्याचा आनंद किती और असतो ते मुंबईतल्या लोकल मधून प्रवास करणाऱ्या लोकांकडून शिकावं .
मी हि त्याच गर्दीतला एक प्रवासी...
मलाही सीट मिळाली. अन काही मिनिटाच्या अवधी नंतर टिंग टिंग अश्या घंटानादाने गाडी धीम्या गतीने पुढे धावू लागली. ठाणे - घाटकोपर प्रवास आतासा सुरु झाला .
वीस मिनिटाचा रिकामा वेळ हाती होता . हाती असलेल्या मोबाईलची Battery पूर्णतः डाऊन दिशेने गेल्यामुळे त्यात लक्ष घालायला वावच न्हवता . त्यामुळे जवळ असलेलं पुस्तक चाळाव अस मनानं मनालाच सुचित केलं . अन मग अद्भुताच्या शोधात मन गढून गेलं .
उल्हास राणे लिखित 'अद्भुताच्या शोधात' हि एक सुंदर कादंबरी काही दिवसापूर्वी हाती आली होती. फुलपाखरांच्या अद्भुत जगात नेणारी हि कादंबरी आपणास अरुणाचल प्रदेश, नागालँड , मणिपूर अंदमानची संशोधनात्मक सैर करून आणते. शब्दांची गुंफण इतकी रसाळ केली आहे लेखकाने कि त्यात मन हरखून जातं. कृष्मयुरीचं (फुलपाखरूच ) तर ते लावण्यमय वर्णन हृदयास भिडून जातं.
गेले तीन एक दिवस वेळ मिळेल त्या प्रमाणे मी त्या 'अद्भुताच्या शोधात' स्वतःला वाहून घेत. आजही असंच मन त्या अद्भुत जगात गढून गेल होतं.
ट्रेन आपल्याच लयात पुढे सरकत होती. एक एक स्टेशन मागे टाकत. अशातच वायू वेगाने एक ' शिवी ' कानावर आदळली. अन मनाची ती तंद्रीच साफ बिघडली. सारं लक्ष त्या कानपटी दुषित करणाऱ्या शिव्याकडे वळल. अन ते दृश अन वायफळ शब्द मनाच्या साच्यात बंदिस्त होऊ लागली.
हल्ली शिव्यांच म्हणा एक fashion झालंय म्हणा . प्रत्येक वाक्यात , नाही नाही .. वाक्याभर एखाद कुठला ' सभ्य' शब्द सोडून शिव्यांचाच पुरां शब्द्कोष असतो.
 मग ते सार्वजनीक ठिकाण असो वा इतर कुठे हि. अभिमान बाळगावा अश्या तर्हेने जो तो आई - बहिणीवरून अगदी हसत हसत शिवीगाळ करतो. मग सोबत आई - बहिण असली तरी ..त्यांना काहीच नाही. ...कसली आली आहे मनाची लाज .....?
तर असो.
साऱ्यांच सार लक्ष माझ्यासकट अगदी त्यां शिव्यांच्या दिशेने .
हातघाई वर आलेल्या त्या दोघां इसमांकडे . धक्का बुक्कीच साधासच अन नेहमीचच कारण ते . 
बस्स त्यावरून त्या दोघा मनाची तीढी भरकटली होती... शिव्यांची लाखोली वाहत..एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतं.
पुढे ते प्रकरण इतकं चिघळलं कि त्या एकाने( हट्ट्या कट्ट्या व्यक्तीने , पुढे कळलं कि तो खाकीवर्दी वाला होता )समोरच्या कानफाडात मारायला सुरवात केली.  अन दोघात हि झुंबड उडली.
दोघेही कुणा ग्रुपचे नसल्याने बसलेल्यांपैकी कुणा एकाची बाजू घेण्याचा प्रश्नच न्हवता .
 जो  तो पाहत ...ऐकत.
 हेल्लो कंट्रोल रूम , एक आतंकवादी सापडलाय. ? आणतो पकडून . .साल्याला..
 पुढे शिव्या अन शिव्याच ..( भासवण्यापुरताच काय ते कंट्रोल रूम ,,,ते कळायला सार्याना वेळ लागला नाही . ) खाकी वर्दिवाला मोठ्या फुशार्कीत समोरच्याला हासडत होता.
कानाखाली एक एक लगावत .
 समोरचा मात्र तो पोलिस आहे कळून चुकल्या पासून नमतं घेत मार खाई .
हे बघा , माहिती आहे तुम्ही पोलिस आहे ते , माझे हि नातेवाईक पोलिस आहेत समजलं.
समोरचा अगदी रडकुंडीला येउन बोलत होता.
पण वर्दी वाल्याची मिजास वाढत चालली होती. हात उगारत त्यावर शिव्यांची बरसात चालूच होती.
हे पाहून डब्यातले सारे एकदम खवळले ..
अन एकच गोंगाट सुरु झाला . पकडा त्या पोलिसालाच ...हाणां त्याला ..हाणा ...
तेवढ्यात बरोबर लोकलचा पुढचा स्टोप आला . लोकल थांबली . अन ते दोघे हि कुठल्या कुठे पसार झाले . ते कळलंच नाही .
एक मात्र नक्की उपस्थित प्रवाशांना योग्य तो न्याय कुणाला द्यायचा ते अगदी बरोबर कळून आलं .
अजून काही वेळ असता तर नक्कीच त्या वर्दी वाल्याची सामूहाईक धुलाई झाली असती.
चुकी नक्की कुणाची हे कोणाला कळणारच न्हवतं. पण उगाच समोरच्याने नमतं घेतलं तरीहि सुरु असलेली त्या दुसऱ्याची मिजास मात्र वाढत चालली होती.  अन त्यासाठीच इथे पब्लिक न्याय झाला होता.
धक्याची दादागिरी - बोले तो भाईगिरी ..वर ..
एक मात्र आहे . अस काही घडत तेंव्हा माझी नजर माझ्याच शरीरयष्टीकडे वळते.
मनालाच समजावत , बाबू वापस Gym जोइन करले, असा प्रसंग तुझ्या बाबतीत हि कधी घडायचा .
- संकेत य पाटेकर
२७.०८.२०१४

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

बंधन प्रेमाचं ..

हे दीदी,
तू मला लाखी बांधणार ?
हो रे माझ्या सोन्या ...
मी पण बांधू तुला लाखी ?
अरे वेड्या , मुल कधी राखी बांधतात का ?
मग ?
बहिण राखी बांधते .......
हा आsssss....
मी तुझी बहिण ना , मग मी तुला राखी बांधणार...,
बहिण भावाचं हा प्रेमसंवाद . मला कल्पनेतल्या दुनियेत नकळत घेऊन गेला ........ वाटलं लहान व्हावं पुन्हा ...अन बहिण भावाच्या प्रेमभरल्या दंग्यात हरवून जावं ..........
ये दीदी तू ,ती छोटा भीम वाली लाखी बांधनाल ना ?
हो रे, ढिशुम धुशुम ...
मग मी तुला काय देनाल ? चोकलेट...
दीदी ..मला पण देशील ना, चोकलेट ?
चल , नाही देणार,
बघ , मग नको बांधू लाखी ....
मला पण हवाय चोकलेट ,
अच्छा बाबा , आपण दोघे खाऊ , ठीकाय ..
हम्म... माझी प्यारी दीदी
असंच लिहिता लिहिता...
- संकेत य पाटेकर

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

नकळत पिकलेला हशा ....


आपल्या रोजच्या ह्या जीवनात , कधी चालता बोलता , कधी, कुठे प्रवासा दरम्यान , कधी आपल्याच हातून काही गोष्टी नकळत घडतात.
ज्या गालातल्या गालात तर कधी खळखळून हशा फुलवतात.
आपल्या चेहऱ्यावर हि ...अन कधी उपस्थित असलेल्या आसपासच्या जनामनावर हि.....
कालचीच अशीच एक घटना , एक हास्य प्रसंग...
ऑफिसच्या रोजच्या वेळेनुसार ठीक ६ वाजता ऑफिस मधून बाहेर पडलो . अन मेट्रोने घाटकोपरला येण्यासाठी म्हणून अंधेरी चकाला मेट्रो स्थानकात दाखल झालो.
नेहमीप्रमाणे ' स्मार्ट कार्ड ' त्या ' पैसा कट' मशीन ला चिटकवून ..आत प्रवेश केला. . अन सरकत्या जिन्याने फलाटावर दाखल होत . पुढे धावत पळत , उभ्या असलेल्या मेट्रो मध्ये शिरकाव केलं.
मित्रासंगे इकडच्या तिकडच्या गप्पा रंगवल्या अन काही मिनिटातच घाटकोपर मेट्रो स्थानकात हि पोहचते झालो. मग पुन्हा स्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी म्हणून नव्या चेहर्यासंगे ' पैसा कट' मशीन च्या रांगेत उभा राहिलो.
काही क्षणांतच माझा नंबर हि आला.
शर्टाच्या खिशात ठेवलेलं ते कार्ड मी पटकन काढलं. अन मशीन ला दाखवलं .
पण मशीन काही ऐकेना . दार उघडेना , जाऊ देईना . पुन्हा एकवार तेच केलं .
पण तरी हि नाही.
काही दिवस अगोदरच तर कार्ड रिफील केलं होतं. त्यामुळे नेमका काय प्रोब्लेम आहे ते कळेना . त्यातच मागची रांग खोळंबली होती. त्यामुळे मी थोडा बाजूला झालो.
अन मागचा पुढे होवून चालता झाला . ते एक वाक्य म्हणून....
'' ऐसा वैसा कार्ड दिखावोगे तो मशीन तो चकरा हि जायेगी ना " त्या वाक्याचा अर्थ कळायला वेळ लागला नाही.
हाती असलेल्या कार्ड वर नजर गेली. तेंव्हा हसू आवरेना . .
गालातल्या गालात हसू साठू लागलं . कारण मेट्रो च्या स्मार्ट कार्ड ऐवजी.....

बँकेच ATM कार्ड हाती होतं .
संकेत य पाटेकर
२०.०८.२०१४

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

हेच का ते तुझं निस्वार्थ प्रेम...?

हेच का ते तुझं निस्वार्थ प्रेम...?
खूप म्हणायचासं ना...प्रेम हे निस्वार्थ असावं ? 
निर्मळ मनानं प्रेम करावं म्हणून ? 
कुठ गेलं ते सर्व आता ? कुठे गेले तुझे बोल ?
तुझे विचार ? सांग, बोल ना  हेच का रे तूझं निस्वार्थ मनं  ?
नुकतंच कुठे त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचा निर्मळ झरा खळखळू लागला आहे. अन त्यात तू असं चिखल माती- धोंड्यांनी तो   झरा  दुषित करू पाहतोयस  ?
अडवू पाहतोयस , का ? स्वतःच्या स्वार्थासाठी ?
मिळालेले ते क्षण पुरे नाहीत का ?
आनंदाचा एक क्षण हि 'सर्वांग' अगदी चैतन्याने भारून टाकतो.  तुझ्याकडे तर असे कित्येक आनंदी क्षण आहेत रे,  ते हि त्या व्यक्तीच्या सहवासातून मिळालेले ...लाभलेले... मग तरीही असं ?का ?
दुसऱ्याच्या  आनंदात  नेहमी स्वतःचा आनंद पाहणारा तू,
आज समोरच्या मनाचा साधा विचार हि करत नाहीस  ?  कमाल आहे,
त्यांच्या आनंदात मिसळून जाण्याऐवजी , त्या मनाचा आनंदच हिसकावून घेतोयसच
वेदानात्मक शब्दांच घाव घालुंन ? का ? का बर ?

कालच्या सर्व घडामोडी मी ऐकल्या आहेत.
मी नको म्हणत होतो , आवर स्वतःला, पण नाही ...
'आपल्याला चांगल्यापेक्षा वाईटच अधिक जवळच वाटत ना' .

तू हि तेच केलेस ? शब्दांच घाव देऊ केलेस , त्या नाजुकश्या  मनावर ...
किती वाईट वाटलं असेल रे,   तिला ? ह्या गोष्टीचा  कधी विचार केलास  ?
ती आता कोणत्या प्रसंगातून जात आहे, तिच्यावर कोणता प्रसंग ओढवला आहे ?
ती अशी का वागते ?
ह्याची शहनिशा न करता..  बस्स. बोलायचं  अन बोलायचं ...वाट्टेल तसं ...
काय अर्थ उरला रे ....
शब्दांची धार हि तलवारीपेक्षा अधिक खोलवर जखम करते . अन ती शक्यतो  भरून येत नाही हे   ठाऊक आहे ना तुला..... पण तरीही...
नातं....समजलास नाही रे  अजून ...

 मना - मनाचं अस स्वतःशीच  शीत युद्ध जुंपल होतं....समजवण्या हेतूने  ...

ना रंग.. ना रूपं...  ना ,  आकार ऊकार,  ना   गंध...  ,पण  तरीही हे मनं अस्वस्थ करून जातं कधी..
मानले तर मनाचे दोन प्रकार ..
एक चांगल ...एक वाईट..
एक नेहमीच सावरणारं, सकारात्मक विचारांकडे  नेणारं  अन दुसंर  दु:खाच्या डोहात हळूच बुडवणारं... नकारात्मक विचारंकडे वाहून नेणारं.
ह्यात  माणसाला चांगल्यापेक्षा वाईटच अधिक जवळच वाटतं .
किंव्हा नकळत आपण  ओढले जातो ...त्याकडे ..

रागा भरात निघालेले   , आपलेच शब्द आपल्याच  हृदयी घाव करून जातात.
अन  त्याचा  परिणाम   पुढे होणारा  तो होतोच .  स्वतःला हि अन समोरच्यालाही ..
तेंव्हा मग पश्चाताप शिवाय दुसरा मार्ग नसतो.

पहिल्या  मनाचं  सांर बोलण  निमुटपने   ऐकून घेणारं दुसरं मन आता  बोलू लागतं.
झालं बोलून...आता माझंही म्हणण ऐक ?

'' उगाच नाही रागा धरत, ना शब्दांचे घाव देऊन समोरील मनाचा रोष ओढवून घेत मी ..
त्यामागे कारण असतं.''  अन कारणाशिवाय उगाच कुणी अस बोलत नाही.

 कारण असतं हे मान्य रे.., पण त्यामागची व्यथा तू समजून घेतोस का ?
दुसऱ्या मनाचा हि विचार  करतोस का ?

हे बघ,  व्यथा वगैरे समजून घेण्याच्या भानगडीत मी पडत नाही.
जे दिसलं जे जाणलं त्यावर माझा जोर असतो.

इथेच चुकत रे तुझं , समजून घेण्याची मुळात वृत्तीच  तुझी नाही.
 माणसं प्रेमानं जोडायची कशी , नाती टिकवायची कशी ? फुलवायची कशी ? ते तुझ्या आवाक्यातच नाही.
बर बोललासं रे.....
हे सगळं  माझ्या आवाक्यात नाही. पण प्रेमानं अन विश्वासानं जोडलेली माणसं  एक दिवस आपल्या विश्वासालाच तडा देतात ,  त्याच काय ? 
आपल्या प्रती त्यांच्या मनात असलेल प्रेम , आपुलकी , आपलेपणाची भावना अचानक कुठे निघून जाते ?
आहे उत्तर ह्याचं ? 
ह्याच गोष्टी खूप जिव्हारी लागतात रे , ह्याच गोष्टीचा  खूप राग येतो.
अन त्या रागाभरात  नको ते धारदार  शब्द बाहेर  निघतात .

अरे पण तो, क्षणाचाच राग रे...
वादळा सारखा उफाळलेला.  सांर काही नासधूस करून देतं .
त्याच काय ?
विश्वासाला तडा जाऊ न  देता . जे नांत आपण जोडलंय ते निर्मळ मनानं ,   जपण, प्रेमानं गोंजारत राहण , हे आपलं इति कर्तव्य ...मित्रा . ;)
ठीक आहे रे ,कर्तव्य हे ते ,  बोलायला अगदी सोपं आहे.
पण वेदनेचे घाव झेलावे लागतात , त्याच काय ?
ते सहन कस करायचं ?
काही गोष्टी सहन कराव्या लागतात रे..
इतर मनाचा विचार करून .. नाती जोडतो ना आपण , मग त्यातला सुगंधीतपणा हि आपल्यालाच जपायला हवा  ना ? कुणा एकाला तरी  त्याग करावा लागतो रे..
शेवटी हे जीवन चंदनासारख असावं  रे...
स्व:ताहा झिजता ..झिजता ..सुगंध देणार . ..नाही का ?
संकेत पाटेकर
०९.०८.२०१४

शनिवार, २६ जुलै, २०१४

नात्यातलं मनं....

एखादा कागदाचा बोळा रस्त्यावरून जाता येता अगदी सहजतेने भिरकावून द्यावा.
त्याप्रमाणे हि नाती हि अगदी सहजतेने भिरकावून देता येतात का वो ?
सकाळच पांघरुणातून नाही डोळे उघडले तर असा प्रश्नांनी काहूर माजवलं मनामध्ये ....
खरचं इतक्या सहजतेने नाती तोडता येतात ?
जुळलेल मनं , असलेले प्रेम , आपुलकी इतक्या सहजतेने भिरकावून देता येते ? 
मग अश्या ह्या नात्याला नाव काय द्याव ? काय म्हणावं ?
प्रश्न नि प्रश्नच<<<<<<<<
गरजेपुरतं अन नावापुरतं नातं म्हणून घेणारी, जवळ करणारी लोकं,  आयुष्यात येतात अन मनावर अधिराज्य गाजवून मनापासूनच दूर निघून जातात.  त्यांना आपल्या मनाची ना फिकीर असते . ना कसली चिंता... आपला जीव मात्र त्यामध्ये घुटमळतो .
अन श्वास हि कोंडला जातो. ... कारण माणसं ओळखता येत नाही .
मुखवटा घालून फिरणारी माणसं आपला खरा चेहरा दाखवत नाही.
तो मुखवटा उतरवला जातो तेंव्हा कळत, त्यांच्या मनात आपल्याविषयी काहीच स्थान नाही . ना प्रेम ना आपुलकी .....
कळवळत मन अश्यावेळी ..पण तरीही मनं नावच हे अजब प्रकार , स्वतःचीच पाठ थोपाटतो.
अन म्हणत , जाऊ दे ना यार , तू खंर प्रेम केलेस ना , मग सोड ना..
प्रेम निस्वार्थ असावं, त्यांनी स्वार्थ साधला तू कशाला त्यांच्या वाटेला जातोयस .. .
आज ना उद्या त्यांना प्रेमाची अन व्यक्तीची किंम्मत कळेलच .
ते वेळेवर सोपवून दे ... अन निवांत रहा ...
आयुष्यात खरच प्रेमासारखी दुर्मिळ गोष्ट नाही . हो दुर्मिळच , मी दुर्मिळ म्हटलंय अशाकरिता कारण ' प्रेम '' अन त्यातला आनंद आपल्या जवळ असूनही ते कुणाला निस्वार्थ मनाने देता येत नाही. ज्यांना खरच मायेच्या प्रेमळ स्पर्शाची , आपलेपणाची ..नितांत गरज असते.
एखाद्यावर निस्वार्थपणे प्रेम करायला ,सयंमी मनाची अन सार काही सहन करण्याची कला मनी अवगत असावी लागते. किंव्हा ती भिनवावी लागते.
कारण इथे मायेच्या स्पर्शासाठी अन प्रेमासाठी क्षण क्षण धडपडणारे खूप जण आहेत.
त्यांना गरज आहे ती आपली , आपलेपणाची .....दोन गोड शब्दांची .... आपल्या सहवासाची ...
पैसा सर्व काही विकत घेऊ शकत नाही. प्रेम तर मुळीच नाही.
माझ्या मनाला मी घडवतोय ....आकार देतोय.
कारण रस्त्याने जाता येता , प्रवासात , किंव्हा आपल्याच माणसांत ते चित्र डोळ्यसमोर हमखास दिसतं . .... मला जगायचं ते अश्याच प्रेमासाठी......अश्याच लोकांसाठी.
संकेत य पाटेकर
मनातले काही ...
२६.०७.२०१४

बुधवार, २३ जुलै, २०१४

' आठवणीतला एक दिवस ...आपला वाढदिवस '

वर्षभरतला एकच असा दिवस असतो.
जिथे हृदयात घर केलेले , मनाने खूपच जवळ असलेले , पण जवळ असूनही अंतर राखून असलेले ,
वर्षभरात कधीही न भेटणारे , न बोलणारे , आपल्यावर नजर राखून चुपचाप राहणारे ,
मनात आठवण काढूनही संवाद न साधणारे , ओळखीचे , अनोळखीचे...नेहमीच सहवासात असणारे , सतत बोलणारे , दूर असूनही संवाद साधणारे ,मनाला ओढ लावणारे , प्रेमाने राहणारे...
आपली आवर्जून आठवण काढतात .  आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी.....शुभाशिर्वादांसाठी ...
एखाद SMS करून , किंव्हा फोनवर संवाद साधून किंव्हा प्रत्यक्ष भेटून ...बोलून..
तो शुभदिन म्हणजे आपला वाढदिवस .  खरंच अश्यावेळी मन भरून येतं. ...भरल्या आभाळागत ...!
किती हे प्रेम !
 सरत्या पावसाच्या सरींसारखं तन-मन अगदी भिजून जातं ह्या प्रेमाच्या वर्षावात .
नव्या आश्या , नव चेतना पल्लवित करतं. खरंच धन्यता वाटते मनाला ....एक दिलासा मिळतो एकप्रकारे .
तरीही त्यातल्या त्यात कुणी जिवाभावाचं राहीलच एखादं...तर मन खट्टू होतं. हे काही वेगळा सांगायला नको.
वाढदिवसाच्या आधीच पासूनच काहीएक दिवस एक चित्र डोळ्यसमोर उभं राहतं.
किंव्हा आपण ते रंगवलेले असत . अमुक अमुक अस असं होऊ शकतं .
किंव्हा व्हायला हवं. अन त्यानुसार आपण आनंदाच्या विविधरंगीत छटा आपल्या अंगा खांद्यावर खेळवत , इकडून तिकडे सैरवैर बागडत असतो.
वाढदिवसाच्या वेळी अश्या ह्या प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मन आनंदाच्या लहरी सुगंधामधे   स्व:तहा हरवून जातं .  कारण वर म्हटल्या प्रमाणे ........
कधीही न बोलणारे , न भेटणारे , आपलेच जीवाभावाचे, आपली वर्षभरातुन एकदा का होईना आपली आवर्जून आठवण काढतात . हीच बाबा मनाला स्पर्शून जाते .
आयुष्यात दुसरं तिसरं अजून काय हवं असंत. प्रेमाचा एक चतकोर हि आनंद फुलवण्यास पुरेसा असतो.
असा हा आनंदाचा दिवस ....वर्षभरातून एकदाच येतो ...आठवणीचा अन शुभेच्छांचा वर्षाव करत ...
आपल्या आई वडलांची हि एक मोठी देणगीच आहे. त्यांचेच सर्वप्रथम चरण स्पर्श करत.
असंच लिहिता लिहिता..
आपलाच ,
संकेत य पाटेकर
२३.०७.२०१४

शनिवार, १९ जुलै, २०१४

स्वच्छंदी मनं पाखरू ..

कसल्याश्या आवाजाने रात्रीची झोप पूर्ण झाली , डोळे सताड उघडले .
घराबाहेर एक नजर टाकली .
काळोख्याचा केंव्हाच अस्त झाला होता .
सुर्य नारायण हि उगवनिला आला होता . पण रिमझिमती पाउसाची सर , अन काळेदाट मेघ त्यास जणू क्षितिजाच्या पंखावरती झुळन्यास आज सक्त मनाई आहे हे सांगू पाहत होते.
हे सर्व पाहत असता तन- मन- अन पाउलं अंगावरल पांघरून तसंच एकीकडे लोटत, घराबाहेरील चौकटीत दाखल झालं.
येथून ते भरल्या पावसाचं मायेनं भरलं रूप नजरेच्या पटलावर हळुवार तरंगू लागलं.
पक्षी पाखरांची त्या रिमझिमत्या सरीनं मधून इकडून तिकडून सुरु असणारी नाच गाणी , मनात चैतन्याचा नवा स्वर उमटवू लागली.
त्यातच पाउसाचा वेग वाढू लागला. अन सर्वांचीच धांदल उडाली.
जो तो आडोसा शोधण्यासठी सैर वैर पळू लागला. कुणी पिंपळाच्या असंख्य गर्दी केलेल्या पानांफांदी मध्ये दडून बसलं.  तर कुणी कुठल्या छपराखाली आसरा घेतला.
आसमंत फक्त नि फक्त आता टपोर्या सरींनी अन काळ्या दाट मेघानीच तेवढ सजल होतं .
पक्षी पाखरांची रेल्चाल हि एव्हांना कमी झाली होती.
आकाशी झेप घेणाऱ्या इमारती पावसाच्या सरींनी न्हाऊन अगदी उठून दिसत होत्या . दाटी दाटीने उभे राहिलेल्या चाळी अन त्यावरील छप्पर आता चकाकू लागली होती. अगदी धुतल्या दळासारखी ..
चौकस नजर प्रत्येक क्षण अस टिपू पाहत होती.
मनाला नव चैतन्याचं , नवं विचारांचं पाठबळ बहाल करत . अशातच एका इवल्याश्या पक्षाचा थवा मुसळधार सरींमधून देखील अगदी मुक्तपणे विहार करताना दिसला . इकडून तिकडून त्याचं ठिकाणी तो चकरा मारत , घिरट्या घेत .
जोडीने पुन्हा त्याचं ठिकाणी येत . पुन्हा इकडून तिकडून फिरकत .
 जणू त्यांच्या जीवनातला तो सर्वोच्च क्षण असावा . किती मुक्तपणे ते आनंद घेत होते त्या क्षणाचा.
त्या मोकळ्या सरत्या नभात ...
इतर कोणते हि पक्षी ..त्या मुसळधार पाउसात पुढे येण्यास धजत न्हवते.
भीती असावी बहुदा ओलेचिंब होण्याची ... पण ह्यांना कसली तमा .
ते अगदी मुक्तपणे विहार करत होते. आनंद लुटत होते.. त्या क्षणाचा अन ते सर्व क्षण मी मनाच्या चौकटीतून अगदी तन्मयतेने न्ह्याहाळत होतो.
आयुष्यातील हर एक क्षण कुठली तमा न बाळगता असंच अगदी मुक्तपणे जगावं . नाही का ?
आपलाच
- संकेत य पाटेकर
१८.०७.२०१४

गुरुवार, १७ जुलै, २०१४

टप्परवेअर चा गोल डब्बा...

अहो, बघा तुमच्या दुकानातच असतील ? शोधा पाहू पुन्हा एकदा ?
घरभर सर्वत्र शोधलं. नाहीच कुठे , तुमच्या दुकानातच असलं पाहिजे ? 
 नेहमीचच आहे हे तुमचं , डब्बा दुकानातच विसरायचं . आठवण देऊनही , आठवण करून देऊनही अशी स्थिती ...आता काय म्हणू मी ह्या पुढे ?
वहिनीची आज जरा चीडचिड सुरु होती. ते स्वाभाविकच होतं म्हणा.
नेहमीची सकाळी उठल्यावर होणारी धावपळ , घाई , अन त्यात दोन दिवसापासून न सापडणारे हे टप्परवेअरचे डबे , त्यामुळे डब्याचा एक मोठा प्रश्नच निर्माण झाला होता ?
खास आम्हा दोघांसाठी म्हणजेच माझा भाऊ अन मी ' आमच्यासाठी वहिनीने खास टप्परवेअर चे महागडे डबे विकत घेतले होते . अन ते आता मिळत न्हवते.
 कुणीतरी कुठेतरी विसरले असणार हे नक्कीच , हे जाणून वहिनीने आपल्या हक्काच्या पतीवर म्हणजेच माझ्या भावावर शब्दांची तोफ डागली होती .
 मी मात्र त्यातून निसटलो होतो. वहिनी सहसा कधी मला बोलत नाही.  त्यामुळे जे काही बोल आहे ते माझ्या भावालाच ऐकावे लागे.
आज हि तसेच ते बोल ऐकून भाऊ म्हणला , 'अग नाही आहे , शोधलं सर्वत्र , नाही सापडत.

चिडूनच जरा...ह्या संक्या (संक्या म्हणजेच मी, घरी मला संक्या नावाने संबोधतात ) कडेच असतील.
भाऊची नजर अन बोल माझ्याकडे फिरले , तेंव्हा मी हि उत्तर दिले .
माझ्याकडे नाही आहे. मी त्याला ऑफिस ची Bag दाखवली , बघ नाही आहे .
तुझ्या ऑफिस मध्ये विसरला असणार , बघ गेल्यावर ...

काहीच न बोलता , हो ह्या अर्थी मान डोलावत मी ऑफिस ला निघू लागलो.
त्यांनतर असे कित्येक दिवस ओलांडले . डब्याचा कुठेच पत्ता नाही .
अचानक हे डबे गेले कुठे ? काही कळेना ? कळण्यास मार्ग नाही. कधी कधी एखादा कुणी घरी येई तेंव्हा तो विषय आपणहून निघे , तेंव्हा कुठे त्या डब्याची आठवण होई.
असंच एकदा नेहमीप्रमाणे ऑफिस ला होतो. निघायची वेळ झाली होती .
त्यामुळे पटपट ऑफिस मध्ये डेस्क वर मांडलेला सारा पसारा उरकून घेतला . अन बाहेर पडायला लागलो. तोच समोर ऑफिस प्यून येउन ठेपला .
अरे , तुझा डबा राहिला आहे का ? इथे केंव्हापासून एक डबा आहे , तुझा आहे का बघ ?
त्या बोलाने मी काही क्षण जरा भूतकाळातच गढून गेलो . घरात घडलेला तो सारा प्रसंग , वहिनीचे बोल कानी भिनू लागले.
डब्बा आपलाच असला म्हणजे?  मी त्या पाठो पाठ pantry मध्ये गेलो .
त्याने कित्येक दिवसाचा धूळ खात पडलेला , तो गोल डब्बा डोळ्यासमोर आणला.
 तेंव्हा आज घरी हशा पिकणार हे पक्क झालं.
कित्येक दिवस न सापडलेला टप्परवेअरचा तो गोल डब्बा.
माझ्याच ऑफिस मध्ये कित्येक दिवस धूळ खात पडला होता . अन मी निर्दोष आहे.
माझ्याकडे डबा नाही आहे ह्या भावनेने तेंव्हा त्यातून सुखरूप निसटलो होतो.
पण आता मात्र माझा अपराध मला स्वीकारावा लागणार होता . नकळत कित्येक दिवस धूळ खात पडला तो डबा ...आज घरी हशा पिकवणार हे अगदी नक्की होतं.
असेच आयुष्यात येणारे काही क्षण आपल्या जीवनात आनंद घेऊ येतात . मग त्या आनंदाला कोणतही निमित्त पुरेस असतं.
आज टप्परवेअर चा डब्बा हा त्या आनंदाचा एक निमित्त झाला.
वर लिहिलेल्या गोष्टी ह्या गमतीशीर आहेत , रागावलेले क्षण हे तेवढ्यापुरत आहे , त्यातही मधुरता आहे. रागात हि मधुरता आली म्हणजे नातं अधिक बहरतं .
- संकेत पाटेकर
असंच लिहिता लिहिता...
१७.०७.२०१४ हा फोटो आंतरजाळातून घेतला आहे.

शनिवार, १२ जुलै, २०१४

छत्री पेक्षा रेनकोट बरा ..

काल ऑफिस मध्ये असता फोन खणाणला.  घरातूनच होता , मोठ्या भावाचा ..
हेलो , मी रेनकोट घेतोय. सातशे ला आहे , तुझ्यासाठी हि घेऊ का , अजून एक ?
मी म्हटलं ? नको , तू घेतो आहेस ना तुझ्यासाठी ? तोच वापरेन ..
मला कुठे जास्त गरज आहे.
ट्रेकिंग ला जाताना लागेल तोच ...इतर वेळी छत्री आहेच .
भाऊ मात्र थोडा रागावूनच (असच गंमतीने हो ) म्हणाला .
' माझा रेनकोट मी देणार नाही, माझी कामे असतात अन मला बाहेर जाव लागतं रविवार हि , गाडी घेऊन (आमची दुचाकी), .. मी म्हटलं बर ..ठीक आहे . घे मग माझ्यासाठी हि एक ..
ऑफिस मधून सुटलो अन नेहमीच्या नित्य क्रमानुसार ग्रंथालयात जावून बसलो .
थोडं इकडचं तिकडच वाचन केलं अन भावाच्या दुकानासमोर (संगणक दुरुश्तीच आमचं छोटस दुकान आहे ) हजर झालो. मनात त्या घेतलेल्या गोष्टीबद्दल उत्सुकता तर होतीच .
कारण ज्या ज्या वेळी मी ह्याला काही विकत घ्यायला सांगतो माझ्यासाठी म्हणून तेंव्हा ती घेतलेली वस्तू मला मुळीच पसंद पडत नाही .
मात्र घेतलेल्या वस्तू चा दर्जा तो कापड वगैरे महागडं असतं. हे खर ...
' सस्ती चीजो का हम शौख नही रखते' ,हा दुनियादारी मधला डाईलॉग अशावेळी कधीतरी आठवून जातो.
तर असो , प्रत्येकवेळी अस घडत नाही , काही वस्तू नक्कीच पसंद पडतात . कारण त्या प्रत्येकामागे प्रेमभावना असते . ह्या वेळेस घेतलेल ते नवं कोर रेनकोट पसंदीत आलं.
बाहेर पाउसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे अंगात ते रेनकोट चढवलं .
अन टपोरया थेंबाचा आनंद लुटू लागलो. टप टप असा आवाज करत ' सरींचा' तो टपोरा स्पर्श अन त्यातून अंगभर संचारलेली रोमांचित वलय मला , नसलेल्या पण असायला हवी असलेल्या प्रेयशिचि आठवण करू देत होते.
त्यातच छत्री पेक्षा रेनकोटच बरा ..असा एक विचार त्यावेळेस मनावर उमटून गेला .
रिमझिमत्या पाउसात मनसोक्त भिजायची फार इच्छा असते. पण भिजता येत नाही . 
अशावेळी रेनकोट अंगात असला म्हणजे रिमझिमत्या त्या पाउसाचा स्पर्श अनुभवता येतो. 
तो टपोरा थेंब अंगा खांद्यावर अलगद झेलता येतो. मनभर नाचता येत बागडता येत. 
भिजून हि न भिजण्याचा एक वेगळा आनंद मिळत असतो त्यातून .. जो छत्री बाळगून मिळत नाही.
असंच लिहिता लिहिता ..
- संकेत पाटेकर
१२.०७.२०१४

गुरुवार, ३ जुलै, २०१४

खाऊ दे नाहीतर पैसे दे .

खाऊ दे नाहीतर पैसे दे ...
काल ट्रेक दरम्यान एका पायवाटेवरती ' त्या कोवळ्या चिमुरड्यांच हे वाक्य अजूनहि त्या स्वरानिशी कानाशी गुंजतंय ..आयुष्याच्या व्याख्या ची पुन्हा नव्याने उजळणी करत .
त्यावेळेस मनालाच ते वाक्य इतकं सरकन घासून गेलं कि खोल जखम व्हावी इतपत ...
त्यावेळेस हाती जे होतं ते देऊ केलं पण त्याने मन काही समाधानी झालं नाही .
 कुठेतरी ते चित्र अन ते वाक्य मनात सळ करून राहिलंय.
कळसुबाईची ती छोटी ताई असो .
पोटाच्या खळगीसाठी म्हणून भर उन्हा तान्हात झाडाचा आडोशा पकडून , 'दादाss दादाss ताक घ्याना ?
अस म्हणत मोठ्या आशेने बघणारी .
नको म्हणताच मागे मागे पळत येउन केविलवाण्या स्वराने ' दादा काही खायला द्याना ?
म्हणत काळजाच पाणी पाणी करणारी ..वा खाऊ दे नाहीतर पैसे दे ...म्हणणारी हि चिमुरडी .....
मनाला एक विचार देतात . 
अजूनही कुणाला कुणाची तरी गरज आहे . प्रेमाची गरज आहे. 
मायेच्या स्पर्शाची गरज आहे. मदतीची गरज आहे. आपलेपणाची गरज आहे.
- संकेत