शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

पत्ररूपी संवाद ...

पत्ररूपी संवाद ...
प्रिय आई ...

साष्टांग  दंडवत ,
आज पुन्हा एकदा , बऱ्याच  दिवसाने ... तुला पत्र लिहावयास घेतोय . रागावू नको हं ..!
तशी तू रागावणार  नाहीस  हे मला माहित आहे.!
कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का ? नाही , नाही रागवत , राग असला तरी तो क्षणभराचाच , तो हि समजाविण्या अन घडविण्या  हेतूने... हो नां  ?
मी तर तुझाच बछडा ...  तुझ्याच ममत्वेने उंचावलेली...तुझीच घडीव मूर्ती  ..   
मी जे काही  आज आहे ते सर्वस्व तुझ्यामुळे...तुझ्या शिकवणीमुळे , तुझ्या संस्कारामुळे..आई !

पण आज एकट वाटतंय ... तुझी उणीव अधिकतेने जाणवतेय ,  गहिवरून येतंय ,
का ? ते विचारू नको ...मला सांगता येणार नाही...
सावली होवून तू  नित्य नेहमी,  तशी सोबतच असतेस म्हणा , …पण तरीही आज राहवलं नाही. म्हणून हि लेखणी हाती घेतली .  

आई ..
अगं..! वयाने कितीही मोठो झालो ना,  तरी आईसाठी तिचं  छोटंसं तान्हुलं बाळचं असतो आपण , न्हाई ?
अन म्हणूनच बघ ,   मोठे झालो तरी हि आईच्या  मायेभरल्या पंखाखाली,
तिच्या कुशीत,  क्षणभरासाठी का असेना  , कधी निवांततेत  अलगद पडून राहतो. वात्सल्याची सुख चैनी  उब घेत .

तेंव्हा ना कसली  चिंता असते,  ना कसले दु:ख .... ते सर्व्वोच क्षण असतात .
जीवनातल्या अथांग सागरातले ...स्थिर असे..., लुडबुड  न करणारे , हवेहवेसे ..हसरे , आनंदा पलीकडचे ..हो ना...?

पण ऐक ना आई ,  कित्येक दिवस झाले बघ .., ह्या क्षणापासून मी पोरका झालोय अगं..  .
तू अशी दूर .. 
''मी कुठे हि असली तरी  तुमच्यावर  नजर ठेवून असेन.''  अस म्हणून , रागावून  कुठे निघून गेलीस ती पुन्हा  परतून न येण्यासाठी…
पण कधीतरी तुला,  तुझ्या ह्या पिल्लांना कवेत घेउसं वाटत  असेलचं   ना ? डोळे भरभरून पहायचं असेलच ना ? 
सांग...येशील   परत....., तुझ्या पिल्लांसाठी ?
  
तुझ्या उबदार कुशीत शांतपणे  निजायच आहे अगं..!  
कष्टाने झिजलेल्या  तुझ्या  नाजूक कोमल हाताचा , मायेभरला स्पर्श
हळुवार केसांतून  भिरभिरताना    ..किती बर वाटायचं सांगू...

ते क्षण आठवले कि आजही  ममत्वेने  भरलेला तो तुझा हात ,  अलगद केसातून भिरभिरत  राहतो .
किती सौख्य आहे अगं , त्या स्पर्शात  . सुखाची व्याख्या ह्यावूनी वेगळी  करता  येईल का ?

'मायेचा स्पर्श' सगळे क्षण कसे हलके फुलके बनवितात , न्हाई  ? 
वेदना दुखांना  तिथे अजिबात  थारा नाही. एखादी भळभळती जखम सुद्धा 'आनंदाचे गायन' करत चिडीचूप होईल इतकं अफाट  सामर्थ्य  , इतकं प्रेम त्या  मायेभरल्या स्पर्शात असतं .

 ह्या 'प्रेमाची' उत्पत्ती' च मुळात 'आई' ह्या रुपानं’च झालेय,  असंच  जणू  .  अन आहेच . 
ती अवतरतली अन प्रेमाचं वारं सर्वत्र भिनभिनू  लागलं ..,  मग ती हि 'पृथ्वी' रुपी आई का असो ,  ती आई आहे . वात्सल्य मूर्ती आई...!

ह्या माय भूमीसाठी , ह्या राष्ट्र रक्षणासाठी , देशाच्या सीमारेषेवर, दिवस रात्र शत्रूशी झुंजणारी ,  त्यांना जागीच थोपवून देणारी हि शूरवीर लेकरं, ह्यांच्या रगा रगात , उरा उरात तेजोवलय प्रवाहित करणारी हि मातृभूमी. आईचंच रूप .   
तिच्याच प्रेम ओढीने , तिच्या रक्षणार्थ धावत आपल्या प्राणाची आहुती हसत हसत देणारी  तिची हि शूरवीर लेकरं.
माय लेकरांच,  किती हे अफाट प्रेम ना..! ह्याला तोड नाही.
आई हि आईच  !

माधव ज्युलिअन  ह्यांनी तर लिहूनच ठेवलंय .
'प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई''

फ. मुं. शिंदे हि म्हणतात .
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.

खरच गं !
आईचं  हे नातंच  अस आहे,  श्रेष्ठत्वाचं  . त्याला तोड नाही. त्याहुनी कुणी मोठं नाही.

बघ ,  अन  मी हे कुणाला सांगतोय .  एका गोडश्या , प्रेमळ अश्या माझ्या  'आई' शीच      
'आई' ची महती कथन करतोय .
वेडा खुळा  आहे ना मी ,..  तुझाच  तान्हुला  गं ..! समजून घे ..घेशीलच. 
अन ये पुन्हा ...तुझ्या ह्या लेकरूसाठी... मी वाट पाहतोय .

तुझ्या पोटी मी जन्म घेतला हे माझं  भाग्यं .., अन हे  भाग्यं मला प्रत्येक जन्मी मिळू दे.
लव्ह यु आई…! 
खूप खूप ....खूप सारं प्रेमं  ..!

एक चारोळी मुखी येतंय ..म्हणू...
म्हणतोच..!

तुझाचं तान्हुला अगं 
तुझ्याविना जगतोय ,
मायेच्या स्पर्शाविना
जरा पोरकपणं वाटतयं ! 

ये लवकर ...आई..! 
ये लवकर ….
तुझाच लाडका
-संकु 

- संकेत य पाटेकर
१४.०८.२०१५ 

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

'पाऊस मनातला पाऊस आठवणीतला' भाग -२

 (भाग -1) 
'पाऊस मनातला पाऊस आठवणीतला'  भाग -२

तसं ऑफिस मध्ये आज कामाचा फार काही ओझा न्ह्वातच , त्यामुळे निवांत होतं
सगळ... त्या निवांतपणातच पाचचा टोला वाजून गेला . आणि क्षणभरातच मित्राचा फोन खणाणला .
अरे , बाहेर मस्त पाऊस आहे, चल जाऊ कुठेतरी .. मी येतोय ठाण्यात , 
भिजूया मनसोक्त...मी म्हटल ठीक आहे. 
भेटू मग ठाण्यातच अस बोलून आमच संभाषण संपलं. अन सहाच्या सुमारास मी ऑफिक मधून बाहेर पडलो .
पावसाने आज तसं चांगलाच झोडपल होतं . कालपासूनच त्याची रिकरिक सुरुच होती.
आज सकाळपासून तो तर रागातच बरसात होता जणू .. . 
त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचून त्यास तळ्याच स्वरूप प्राप्त झालं होतं . रस्तोरस्ते ठिकठिकाणी ट्राफिक अन दुसरीकडे रेल्वेची नित्यानेह्मीची दिलगिरी व्यक्त करणारी घोषणा एकीकडे सुरु होती . 

लोकल ट्रेन हि तुडूंब गर्दीने खचाखच भरलेली ..त्यातच कसबस संध्याकाळी साडेसात दरम्यान त्या दिव्य गर्दीतून सुखरूप ठाणे गाठलं . मित्र येण्यास अजून तरी पुष्कळ वेळ होता .
त्याची नित्य नेहमीची सांगून भेटण्याची वेळ अन प्रत्यक्ष येण्याची वेळ ह्या  मध्ये नेहमीच तफावत असते.
 कधी कधी हो  हे जाणून मी तलावपाळी मस्त एकाग्र चिताने न्हाहाळत बसलो.

पावसाळी तीच रूप फारच मोहक अन तितकंच हुडहुडी आणणार होतं .एरवी रात्री उशिरापर्यंत प्रेमी युग्लांनी गजबजलेलं हे ठिकाण आज तुरळक काहीनीच शांत पहुडलं होतं . 
नियमित एकमेकांच्या हास्य खळीने , वा थट्टा मस्करीने , जीवनातील गोड कटू  अनुभवाने वा जीवनाविषयी विचाराने एकमेकांच्या हृदयाशी जोडणारे नाते संबंधित कट्टे आज तसे रिकामेच दिसत होते. 
कुठेशी झाडाच्या आडोश्याला मात्र काही प्रेमी युग्लांचा पावसाळी अधिवेशन भरलं होतं . ते अन त्यांचे चाळे (दुर्लक्ष करूनही) . नजरेस येत. अन मनात गुदगुल्या होत.
साला आपलं नशिबाच नाही यार....एक मुलगी पटत नाही अजून ... असा स्वर मनातल्या
मनात उठाव करी अन पुन्हा शांत होई . 
काही वेळा तर कल्पनाच्या दुनियेत ते हरखून जातं . ह्या पावसाचं अन प्रेमाचं मनोमन चित्र उभारून ... 
पाऊस ...
कुणाला आवडतो तर कुणाला आवडत नाही . कुणी त्यास शिव्या शाप देतो.
कुणी त्याच तोंडभरून कौतुक करत . पण त्याला त्याची कसलीच देव घेव नाही. .
तो आपला त्याच्याच धुंदीत त्याच्या स्वभावानुसार वावरत असतो.
कधी धो धो .. कधी रिमझिम बरसत , कधी पाठशिवणीचा खेळ करत तो आपल्या मनाशी प्रतीबिंबित होतो.
कधी कुणा काही न सांगता कुठेसा दूरवर निघून जातो....मनाची उत्कंठा वाढवत .
प्रेमी युगालांच्या मनाशी तर त्याची विशेष छाप, त्यांच्या तो जिव्हाळ्याचा विषय ..

गप्पांच्या ओघात नकळत , कुठूनसा चोर पावलाने हळूच बरसणारा हा पाऊस वेडावून सोडतो .
सुखद आठवणी देऊन ..!
स्पर्शाची एक वेगळीच जाणीव अन व्याख्या देऊन जातो हा पाऊस ..
आडोसा मिळावा म्हणून घेतलेली धाव अन त्या नकळत झालेला स्पर्श , त्या स्पर्शानं उसावलेला दीर्घ स्वास ...अन शहारून आलेलं अंग ग ..हि धुंदीच काही वेगळी ...मादक .. मदहोश करणारी ...! 
कित्येकांच्या मनात ह्या पहिल्या पावसाची सर अन त्या आठवणी नव्याने फुलत असतील ....
अन आपण अजूनही तिच्या शोधात मात्र हिंडत आहोत ...
कुठेशी ठेच लागली .
स्वप्नांच्या कल्पिक दुनियेतून बाहेर येत ..कधी गडकरीला येऊन स्थिरावलो ते
कळेलच नाही. मित्र अजूनही आला न्हवता .
पण ह्या पावसाने मात्र चांगलाच रंग भरला होता ...तो बरसतच होता धो धो... धो
धो...धो धो......
क्रमश :-
संकेत पाटेकर
०७.०७.२०१५


हा खळखळता 'प्रवाह' हि कुठेशी शांत होतोच ना ...

हा खळखळता 'प्रवाह' हि कुठेशी शांत होतोच ना !
त्याला हि त्याचं ते खळखळून बागडणं, खळखळून हसणं , खळखळून वाहणं , ह्या सर्वांपासून कुठेशी दूर , निवांत अन मोकळ्यापणानं पहुडावं वाटत असेलच ना??
म्हणूनच अशी वेडी वाकडी वळण घेत, तो हि कुठे दूर , समतल ठिकाणी , मुक्तअंगे स्वतःला झोकून , 
अगदी निच्छलं होवून जात असेल .. शांत अगदी ..न्हाई का ?

जिथे केवळ एकांत आहे. खळखलाट नाही .
जिथे वाऱ्याचा हलकासा शिडकावा आहे , वावटळ नाही . पण प्रसन्नता नक्कीच आहे .
जिथे हिरव्याशार सावलीने अंग अंग शिरशिरून जात आहे.
जिथे प्रवाह वाहता असला तरी त्यात निमुळतेपण आहे . निवांतपण आहे .
जिथे आत्मा आहे . स्वतःशीच कुजबुज करणारा ...
आपल्याला मनास देखील असंच काहीसं हवं असतं......नाही का ?
असंच काहीसं ..
मनातलं काही..
संकेत य पाटेकर
१७.०७.२०१५

वरळी सी-लिंक अन ती पावसाळी रात्र ...

रात्रीचे आठचे ठोके पडले.  तलाव पाळीला वळसा घेत संथ पाऊलानिशि मी आपला  गडकरी रंगायतन च्या प्रांगणात प्रवेश करता झालो. मित्र  अजूनही वेळेवर काही पोचला न्हवता .
नेहमीचीच त्याची सवय   , सांगून  कधी वेळेत पोहचलाय  म्हणून शप्पथ .....

आजही नेमकं असच, सांगितलेली वेळ टळून गेली होती . 
मी आपला उगाचं  ईकडनं - तिकडनं चौफेर नजर टाकत ताटकळत उभा होतो.  
पाउस,  गुणगुणनाऱ्या  वार्यासोबत ताल धरून अद्यापही  सूर लावून होता .
सकाळपासूनच त्याची जी रिपरिप  सुरु होती ती अद्याप हि सुरूच होती .
 कृष्ण मेघांनी हे आभाळ घेरलं होतं. विद्युलत्ता  हि अधून मधून आपलं अस्तित्व दाखवून जाई. 
तेंव्हा  मनात काहीशी धडकी भरी . पण क्षणभरासाठी ....

वातावरणात  हि मस्त हुडहुडी आणणारा गारवा पसरला होता .  
मनसोक्त पावसात न्हाऊन निघण्याची इच्छा आज पूर्णत्वाला जाणार होती .
 तनं -मनं  त्यासाठीच  तर  आतुरलं  होतं  .
माझ्या सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यांतून,  उनाड वार्यासंग चौफेर उधळणाऱ्या पावसाची सर, ' ह्या मुंबईतल्या पावसाला कुठे येणार , हे ठाऊक होतं.
तरी हि  भिजायचंच  होतं  बस्स.. ह्या एकाच  कारणांन  आज मित्रासोबत त्याच्या दुचाकीने कुठेशी जाण्याचं योजील होतं . 
पण त्याच्याच अजून ठावठिकाणा नव्हता. दिलेल्या वेळेपत्रिकेनुसार हा भाई  जरा दहा-पंधरा  मिनिटे उशिरानेच पोहचला .  तो हि पूर्णतः भिजलेला  .. कुडकुडलेला   ..दातखिळ्या  वाजवतच .

मी मात्र अजूनही कोरडा करकरीत  डोक्यावर छत्रीचं पातं धरून  उभा होतो.
तो येताच  रस्त्याकडेला खेटून असलेल्या , ' एका हॉटेलमध्ये वाफाळलेल्या चहाचा घोट घेत, आम्ही गप्पांचा  फड रंगवला  अन त्यातच गप्पांच्या  ओघात  बोलता बोलता मुंबईतलं  धावतं ठिकाण हि  ठरवलं .
ठाणे - वरळी सी लिंक -- मरीन ड्राईव्ह  अन तिथून पुन्हा घरी ...
मनसोक्त भिजायचं ...अन भिजायचं.  बस्स ...

साधारण साडेआठ वाजता , ठाणे  पूर्वद्रुतगती मार्गे , आमचा हा  दुचाकीप्रवास सरू  झाला.
वाऱ्यागतीनं  ..पावसाच्या  टपोर्या थेंबाचा मारा झेलत , कधी तो  चुकवण्याचा प्रयत्न करत,   वेगावर नियंत्रण ठेवत , आम्ही सुसाट निघालो.

माझा जन्म हा मुंबईचा . लहानाचा मोठा इथेच झालो. त्याचा सार्थ अभिमान आहेच.  पण तरीही मुंबई अजून काही पूर्णपणे फिरलो नाही. इथेले रस्तो रस्ते , गल्लो गल्ली चा अजूनही धुंडावा नाही .  
इथल्या प्रसिद्ध असलेल्या काही  देवस्थानाचं  दर्शन हि अजून दुर्लभच म्हणा  ...
मात्र आजच्या हा  दुग्धशर्करा योग  म्हणावा  लागेल.  
काळोख्या रात्रीची हि लखलखति  मुंबई , अन इथले रस्तो रस्ते पाहण्याचा योग आज जुळून आला होता . सोबत वरून राजाची  कृपा ..हि होतीच .

उधाणलेल्या सागराची धून  तर आताच कानी गुंजत  होती. त्यासाठी मनं धडाडत होतं.
 मुंबईतलं  मरीन ड्राईव्ह हे माझं सगळ्यात  आवडतं  ठिकाण.
भर गर्दीतही इथला एकांत मनाला स्पर्शून  जातो . म्हणून अधेमधे  एखाद फेरफटका हमखास
इथे  असतोच असतो....
तरीही  पावसातलं अन काळोख्या   रात्रीचं अनोखं रूप  , मी अद्याप अनुभवलं  न्हवतं  .  
ते आज  अनुभवयास मिळणार होतं .  त्यासाठीच निघालो होतो ....आनंदसरी झेलत..

ठाणे - भांडूप - विक्रीली - चेंबूर असा प्रवास  करत आता आम्ही पुढे सरसावलो. 
पावसाची संततधार अद्याप हि  सुरू  होती.
ठीक ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा नजरेस  येत होत्या . 
त्यांच्या त्या लाल पिवळ्या रंग छाटायीमुळे, मनाभोवती सुरेल रंग मिश्रित नक्षत्रांच वलय निर्माण झाल होतं. 

डांबरी  काळ्या रस्त्यांना  झळाळी  मिळाली  होती . पावसाच्या सरींमुळे ते हि आधीच स्वच्छ न्हाहून  निघाले होते. त्याचे प्रतिबिंब मनाशी उमटत होतं.   
तसेच ..काळोख्या रात्रीची हि  मुंबई  ,  तिचा झगमगाट ,  उंच आकाशाला गवसणी घालणाऱ्या   टोलेजंग इमारती , त्यांचा दिमाखीपणा  त्याची  रोषणाई मनाभोवती विलासात होती.

खर तर  रात्रीचा हा प्रवासच  सर्वार्थाने वेगळा असतो .  निरव शांततेचे  पडघम अलगदपणे  सुरु असते
अन अश्यावेळी नाना विचारांचं  बीज मनात आकर घेऊ लागतं . मग सृष्टीच्या नवलाईच्या दुनियेतुन  स्वतःचे प्रश्न हि सुटले जातात. काही प्रश्नासाहित ऊतर मिळू लागतात . 
म्हणून दिवसापेक्षा हि रात्रच अधिक तपस्वी वाटते मला  . शांत निच्छलं अगदी ...
तर असो

रात्रीचे साधारण दहा वाजले होते. . रस्त्याला फारशी रहदारी  न्हवती.
दादर प्रभादेवी  मार्गे येता येता सिद्धिविनायकाचं  मनोमनं  दर्शन घेत आम्ही  वरळी सी लिंकच्या किंचित पुढे येउन पोहचलो. 
तिथेच रस्त्या कडेला बाईक उभी केली. अन सागराचं  उधाणलेलं रूप न्हाहाळू लागलो. 
किती अथांग अन अफाट आहे हा  समुद्र .......शब्दांची गुंफण होऊ लागली. 
लाटांचा आवेग  कानाशी  हळूच झुलक्या  घेऊ  लागला .  भरून आलेल्या आभाळची आर्त हाक आता शब्दांची लय पकडू लागली. 

अरे ऐक रे मानवा 
किती वेदना रे पोटी 
घेउनि दुखाचे पारडे 
उधळतो हास्य मोती ! 

हा सागर विलास 
घेतो सामावूनी सारं 
त्याचं  मन रे मोठालं
त्याचं  मन रे विशालं  ! 

किती अथांग अन अफाट आहे हा समुद्र ?   कितीतरी अनाकलनीय गूढ , कितीतरी लक्षणीय घटना , कीत्येक वर्ष आपल्या पोटी एकवटून आहे हा.. 
वरवरून जरी हा  उधाणलेला ,खवळलेला  दिसत असला तरी त्याच अंतर्बाह्य मन एखाद्या तपस्वी साधू सारखच तेजस्वी अन शांत वाटतं. खरच आत्मसात करून घेण्यासारख्या कितीतरी मौलिक  गोष्टी आहेत ह्याकडे ..त्यासाठी तशी दृष्टी हवी .. एकांत साधणार मनं हवं. 
मी स्थिर मनानं ते न्याहाळत होतो.  

निरव शांततेचे पडघम अद्याप हि सुरु होते .रस्त्यावरच्या  मिणमिणता प्रकाशात सोडला तर कालोख्याने सर्वत्र अंधारलेलं. 
अधून मधून शिवशिवनारा अल्लड वारा अन सागरी तुषार अंगावरून शिड्कावून जातं  . त्याने अंग शहारून येई . 
आम्ही दोघेही तसे   पूर्णपणे भिजलो होतो . कुडकुडू लागलो होतो
तरीही क्षितिजाशी जड अंतकरणाने भरली रेखा नजरेआड होत न्हवती . वेळ मात्र  पुढे सरत होती . 

निघायची वेळ झाली. घरी जाईपर्यंत तरी आता बारा वाजणार होते. 

पण त्याचा प्रश्न न्हवता . मनसोक्त भिजलो होतो . आता फक्त कडकडीत वाफालेलेला चहा तेवढा  हवा होता........................

 संकेत य पाटेकर 
०७.०८.२०१५ 

बुधवार, २९ जुलै, २०१५

आपलं म्हणणारं आपलं..ही कुणी आहे...

आपलं म्हणणारं आपलही कुणी आहे . ह्यातच किती सौख्य आहे . .....
बळजबरीने कुणाला हि आपलंस करता येत नाही वा कुणाचं मन जिंकता येत नाही .
वाटतं तितकं सोपं नसतंच कधी ... कुणाला आपलंस करनं...., आपल्यात सामावून
घेणं... 
काही वेळा सहज जुळून येतं सगळ ... काही वेळा प्रयत्नांची पराकाष्टा करावी
लागते.
तरीही कसली शाश्वती नसते ............शेवटी उरतो तो नशिबाचा भाग .....

काही नाती जुळतात , काही नाही . काही नाती जुळल्या तरी त्यात प्रेमाचा अंश
टिकेलच अस नाही .
हि परिस्तिथी कोणता लंपडाव खेळेल ह्याचा ही नेम नाही .
खर सांगू ..प्रेमासारखी दुर्लभ गोष्ट नाही .
कणकण कुणी त्यासाठी तडफडतं ....कुणी त्यासाठी आपलं अनमोल जीवन कवटाळतं .
कुणास सहज मिळून जातं हो ...एखाद्याचं प्रेम ....
कुणी वाट पाहतं बसतं , कुणी वाटेला लागतं. कुणी व्याकूळतेने आतून ओक्साबोक्शी
रडत राहतं ...
क्षणभराचा सहवास हा .. कुणा एखाद्याचं जीवन आनंदाने फुलवू शकतो ...
आपलेपणाचा शब्द हि कुणा मनाला फार मोठा आधार होवू शकतो .
प्रेमाच्या स्पर्शाची जादूच न्यारी ......त्याबद्दल काय बोलावं.
नात्यानुसार त्या स्पर्शाची उब निराळी असते हो . . एखाद्याच जीवन त्यानं
सार्थकी लागू शकतं.
आपलं म्हणणारं आपलही कुणी आहे . ह्यातच किती सौख्य आहे .
जीवनात अनमोल एकच आहे ते म्हणजे प्रेम ....
कुणी त्यापासून वंचित असेल तर ते त्यास द्या ..........निर्मळ मनानं.. 
आनंद मिळेल ..त्यासही आपणासही....
मनातलं काही ..
संकेत य पाटेकर
२९.०७.२०१५


सरप्राईझ पार्टी ..

आयुष्यात चांगल्या मित्रांची साथ संगत लाभनं हे नशिबातच म्हणावं लागेल.
असे मित्र मला लाभलेत ह्यातच माझं अर्ध अधिकी जीवन सार्थकी झाल्याचं मी समजतो. 

हे मित्र लाभनं जस भग्यातलं समजावं तसं त्यांच्या शिवाय हे जीवनं जगण देखील
व्यर्थच म्हणावं लागेल.
नेहमीच कुठल्याही प्रसंगी तत्पर असणारे .
न बोलता , न सांगता, कधीही कुठे हि, कसेही , टपकणारे हे मित्र .
म्हणजे आपला एक परिवारच ....एक इवलंस पण मोठ्या मनाचं , मोठालं कुटुंब...
आपल्या सुख द्खाचा वाटा स्वताहून हिसकावून घेणारे ... हे मित्र ,
आपला मूड असो वा नसो ...पण नेहमीच आपली सोबत करणारे ..हे मित्र ,
कधी सगळ्यां समोर आपली टर्र उडवणारे , कधी हसवून खिदळवनारे , कधी योग्य तो
मार्ग दाखवून ,मार्गीस्थ लावणारे , छोट्या छोट्या गोष्टींवरूनही पार्टी
मागणारे... हे मित्र ,

खिशात दमडी नसतानाही , स्वताहून आपले पैसे भरणारे ....,राहू दे रे, ' घेईन
नंतर व्याजासकट अस मुद्दामहून म्हणनारे , पण दमडी हि न घेणारे.. हे मित्र ,
कधी चित्रपट पाहण्यास चल म्हणणारे, नाही म्हणताच ओढवून घेऊन जाणारे ,म्हस्का
मारणारे , अन CCD त कॉफ्फी पाजणारे हे मित्र ..

कधी टपरीवरचा चहाचा घोट घेता घेता तासनतास गप्पात रंगणारे ,
कधी मुंबईतल्याच सागरी किनारी सांजवेळी एकांतात हरवणारे हे मित्र ,

कधी सह्याद्रीच्या माथ्यावरून ओसंडलेल निसर्ग सौदंर्य न्याहाळत ,सृष्टीचं
गुणगान गाणारे हे मित्र ,
कधी प्रेमा सारख्या हळव्या विषयावरून ..बोलून टाक रे , आता तरी वेळ दवडू नकोस
, अस वेळेच गणित मांडून समजावून सांगणारे हे मित्र ,

बिनधास्तपणा राहणारे , बिनधास्तपणातच जगणारे अन जगण्यास शिकवणारे असे हे
टवाळ खोर (मुदाद्मुहून हा शब्द टाकतोय हा )मित्र ...

हे मित्र म्हणजे आपल्या जीवनातील सुखाची हर्षगुणी लाटच जणू .. ती लाट स्वतः
बरोबर, काही ना ना काही भरभरून घेऊनच येत असते . अन आपण त्यात थुई थुईनि
हर्षमुख होवून जीवनगाण गात असतो .

असेच काही माझे मित्र ..अन त्यांनी दिलेली हि सरप्राईझ पार्टी ..

रात्री साडे बारेचा ठोका , दरवाज्यावर ठकठकल्याचा आवाज आला .
इतक्या रात्री कोण असणार ? म्हणून मनात ना ना विचारांचा फडश्या पडला.
वाढदिवसाचा दिवस नुकताच टळून गेला होता.

रविवारची मध्यरात्र सुरु झालेली ..., रातकिड्यांची संगीतमय स्पर्धा सुरु झाली
होती. त्यांची किर्र किर्र सुरु होती. 
गावी असल्याने ..साहजिकच रात्री १० च्या आधीच सगळेच सामसूम असतं. (मी हि
होतो ) संपूर्ण गाव निद्रास्त असतं अश्यावेळी . अन अश्यावेळीच नेमकी ठक ठक ..ठक ठक
.....
सावध पाउलनिशिच हळूच दरवजा उघडला . बाहेर डोकावून पाहिलं .
अंधाराशिवाय काही दिसत न्हवतं .पण क्षणात 'हैप्पी बर्थ डे' चा नारा देत एका
पाठोपाठ एक मित्र हजर झाले. अन एकाकी आश्यर्यचा सुखद धक्का मिळाला.
रात्री साडे बारा ते एक दरम्यान 'बर्थ डे सेलेब्रेशन' सुरु झालं. फोटोशेशन चा
कार्यक्रम हि उरकला . अन त्यानंतर अडीच तीन पर्यंत गावाबाहेर ,काळोख्या
रस्त्यावरून ..भूता सारखे आम्ही भटकत राहिलो. भूत खोताच्याच गोष्टी करत ...
अशी हि मित्र मंडळी ...
दुसर्या दिवशी ...अथांग तळ्यात मनसोक्त पोहणं काय , नि शहरी पुन्हा येता
येता ...पवित्र भूमी उंबरखिंड चे दर्शन घेतो काय अन निसर्ग सौंदर्याची लयलुट
तृप्त भारल्या नजरेनेच लुटतो काय ...सारच न्यारं...मदहोश करणार ..
पण इतक असूनही एक ठिणगी मनाच्या तळ कोपर्यात तांडव करत होती. त्याने मनं
काहीसं ढासलेलं. एक जिवाभावाची जिवलग व्यक्ती आपला वाढदिवस, विसरतेच कशी?
ह्याचं शल्य मनास लागून होतं . अद्याप हि ..

भले हि आपण लहानच किती हि मोठे झालो तरी हे लहानपणातलं हट्टीपण काही मिटत नाही
हो . अन ते माझ्यात आताही आहेच .... ...त्यासाठी राग अनावर झालेला . 
पण तो आता हळूहळू ओसरतोय ....
कारण हक्काने भांडायला अशीच संधी लाभावी लागते . तीसोडायची नसते. अन ती मी घेतलेय .

मध्यंतरी (वाढ दिवसाच्या दिवशी ) मी काही वेळ मोबाईल बंद ठेवला होता .
त्यासाठी क्षमस्व ....

काहींचा फोन रिसीव्ह करता आला नाही . काही call करत होते पण तो लागला नाही .
काही मित्र नक्कीच रागावलेत . हे माहित आहे .

तुम्ही बिनधास्त भांडू शकता . हक्क आहे तो तुमचा ...
माझ्या सर्व मित्रांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ....वाढ दिवसाच्या
प्रेममयी शुभेच्छांसाठी ..असंच प्रेम बहरू द्या ...दरवळत राहू द्या .
आपलाच ,
संकेत उर्फ संकु ..
२८.०७.२०१५
फोटो - संदेश कोयंडे

मंगळवार, १४ जुलै, २०१५

असंच काहीस मनातलं...

हा अमर्याद असा , विस्तारलेला निळाभोर आकाश , अन त्यावर , ना- ना विविध चित्रमय आकाराने नटाटलेली हि शुभ्रधवल गालिचं (पांढुरके ढग ) पाहून मनोमनं वाटतं . 
कधी टुणूक टुणूक , आपणही इकडून तिकडून उड्या घेत सर्वत्र हिंदडावं तर कधी , ती शाल पांढीरकी हळूच अंगा खांद्याशी लपेटून घेत निवांत पहुडावं .  

कधी कल्पनेचे गरुडपंख लावून ह्या भूतलाचे विहिन्ग्मय दृश्य डोळ्यात साठवून घेत मनास तृप्त करावं तर कधी बरसणाऱ्या त्या पावसाच्या सरींमध्ये , त्या उनाड वेड्या वार्यासंगे मुक्तपणे विहार करावं.
कधी अवचित फुलणाऱ्या त्या इंद्रधनु सोबत आपणाहून रंगाची मुक्तहस्ते उधळण करावी . तर कुठे स्वर गायनाचे सुरेल गीत गात पक्षी पाखरांसंगे आपणही लयबद्ध सोबत करावी.

ह्या सह्याद्रीच्या कड्या कपर्यातुनी धो धो कोसळणारा जल प्रपातांचा तो अविष्कार अगदी जवळून न्याहाळावा तर त्या टपोऱ्या थेंबे थेंबाचा शिडकावा अंगा खांद्याशी शीरशिरून घ्यावा .
असंच काहीस मनातलं...
संकेत पाटेकर
फोटो क्रेडीट - अनुराग उर्फ अन्या
ठिकाण - Sankashi किल्ला



नाती ...

ना ना विविध मनाच्या ह्या नाती .
सांभाळण खुप अवघड जातं. ओढाताण होते मनाची काही वेळा , काही प्रसंगी ..
प्रत्येकाचा स्वभाव निराळा ..प्रत्येकाचं मन वेगळ ,प्रत्येकाची विचार करण्याची
पद्धत वेगळी,प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या .., 
कुणी सहज समजून घेतं , चेहऱ्यावर सहजतेच हास्य उमलत , कुणी समजण्यापलीकडे जातं, नाक मुरडतं  ..रागाचा पारा चढवत...!
कुणी हट्टच धरून बसतं , कुणी गृहीतच धरून राहतं.
ओढाताण होते मनाची अश्यावेळी ..., कुठे कुठे लक्ष द्यावं , कुणा कुणाला
सांभाळाव .पण संभाळण भाग असतं... नाती हवी असतात .


कारण आयुष्य खूप सुंदर आहे. अन ते आपल्या अवती भोवती असलेल्या , आपल्या मनाशी
जुळल्या नात्यातील , त्या त्या व्यक्ती अन त्यांच्या आपलेपणाने अधिक सहज
सुंदर होवून जातं.


पण राहून राहून कधी प्रश्न पडतो ..
समजणारे , समजून घेणारे , अन प्रसंगी अगदी प्रेमाने समजून सांगणारे सारेच असले
असते तर ...
पण ह्या 'जर'- तर' ला अर्थच कुठे असतो म्हणा ....
ह्यातूनच मर्यादेची एक रूपरेखा आखली जाते , आपल्या मनाशी ..
कुणाशी किती अंतर राखून राहायचं ..कुणाशी किती बोलायचं ..कुणाच्या किती जवळ
जायचं .
असंच लिहिता लिहिता...
मनातल काही ..
संकेत य पाटेकर
१४.०७.२०१५

बुधवार, ८ जुलै, २०१५

निसर्ग आणि प्रेमं ..

ह्या निसर्गाचं एक वेगळंचं रूप आहे. अनेक गोष्टींनी तो अगदी स्वयंपूर्ण आहे.
त्याकडे काहीही कमी नाही. आपण बारकाईने , अगदी समरस होवून गोड कौतुकाने
त्याकडे पाहिलं . त्याला ऐकलं ना तर तो बऱ्याच गोष्टी कथन करत जातो.
आता हेच बघा ना ..!
कधी कधी ह्या हिरव्याशार वृक्षराजींच्या सहवासात असता , नजर हळूच सळसळनाऱ्या
, ' त्या पानांकडे एकवटली जाते.
अन मनात विचारांचा फुलोरा हळूच आकार घेत जातो.
किती प्रेम अन जवळीक आहे ह्या दोघांत , अन तितकीच उत्कंठा हि ...आगमनाची !
हा उनाड , खट्याळ वारा..
त्याच्या नुसत्या चाहुलीनं हि पानं- फुलं अगदी शहारून येतात.
लाजून मोहून ती अगदी थरथरून जातात . स्पर्शाची मोहिनी त्यांच्यावर झेप घेते
जणू...
एखाद्या प्रियकरांनं आपल्या प्रेयशीचा हात हळूच हाती घ्यावा. अन तिने त्या
स्पर्शानं अगदी शहारून जावं, हूरहुरून जावं. तशीच काहीशी चेतना अंगभर संचारली
जाते त्यांच्या ..
कुणीतरी येतंय , आपलं हसू खुलवायला ..ह्यानेच ते अगदी बेभान होवून जातात .
आनंदाने नाचू बागडू लागतात.
आपलेपणाची नाळ रोवून हा उनाड वारा हि न चुकता त्यांचा आनंद त्यांना तो देऊ
जातो. स्वार्थ बाजूला ठेवून...
एकमेकांशी त्याचं इतकं घन्निष्ट नातं जुळलेलं असतं कि काही वेळा हि पानं-
फुलं त्याच्या निस्वार्थी प्रेमापायी स्वतःची आहुती हि द्याला तयार होतात .
अन मग हा उनाड वारा हि मोठ्या धीरानं अन कष्टी मनानं त्यांना आपल्यासोबत
सामावून घेतो. वाहून नेतो.
असच काहीसं स्फुरलेलं..
- संकेत पाटेकर (संकु )
०८.०७.२०१५


गुरुवार, २ जुलै, २०१५

! पाऊस मनातला ...पाऊस आठवणीतला !

सकाळपासूनच साऱ्या सृष्टीवर मनावर सरसरनारा हा धुंद पाऊस...
'मनसोक्त भिजून घे रे ' अस जणू काही वेडावूनच सांगत होता . पण मी आपला स्तब्ध ,  एकाच जागी . ..अधीर मनानं सृष्टीच्या ह्या नवंलाईचं रूप डोळ्यात साठवत होतो . त्याशिवाय पर्याय हि न्हवता म्हणा . म्हणावं तर हे तनं मनं तर केंव्हाच आतुरलं होतं . चिंब भिजावं , मनसोक्त बागडावं म्हणून ..पण ठरली ऑफिस वेळ, नाईलाज .... काय करणार ..!

खिडकीतून दिसणारा , झाडांच्या पाना फांदीतून ओघळनारा , टपटपनारा , मोत्यावाणी 
नितळ असा तो थेंबे थेंबे पाऊस मी नजरेनेच काय ते टिपत होतो .
नजरेनेच प्राशन करत होतो. पण तरीही हे मनं काही तृप्त होईना .
अन त्याह्यानेच दुपारच्या मधल्या सुट्टीत (लंच ब्रेक मध्ये ) पावसाच्या रिमझिमत्या टपोऱ्या 
थेंबाचा मारक स्पर्श , अगा खांद्याशी घेऊ लागलो . त्याने काहीसा सुखावलो... वेडावलो . अन निच्छलं मनानं एका  ठीकान्याहून सृष्टी सौंदर्याच हे वेड रूपं टकमकतेने न्यहाळू लागलो.

साऱ्या जीव सृष्टीशी सुत जुळवनारा हा बेंधुंद पाऊस, ' हलक्या सरीनिशी अजूनही तसाच बरसत होता ,वाऱ्याचे मंद झोके त्याला हळूच वळवणी देत होते. मृदल माती अजून मृदू झाली होती. न्हाहून निघालेल्या वृक्ष वेली, अन थरथरत्या पानसळीतून टपटपनारे थेंबाचे टपोरी रूप, एखाद्या मोत्यावाणीच लकलकुन दिसे.  
तर वृक्षराजींच्या पायथ्याशी , भूसभूसित मातीतुनी एक ढंगाने,  एका चालीने मार्ग काढत  , चालीलेली मुग्यांची  पोटापाण्याची लगभग मनास शिस्तीचे डोस देऊन जाई.
कोकीळाची मंजुळ कुहु अधून मधून कुठ्नशी कानी येत, तशी हृदयाची स्पंदन वेडावत ,त्या लयात ती धडधडत.
एखाद इवलसं फुलपाखरू कुठसं बागडता दिसे, तेंव्हा मन त्याकडे आकर्षिले जाई ,
अन मनोमनं म्हणून जाई , किती छानुलं आहे ना ते !
सौंदर्याची रूपरेखा आपल्या पाठीशी घेत ते कस निवांत बागडत आहे बघ ! 
आपल्या मनाशी ना ना विविध रंग भरत..!
सृष्टीचं हे असलं वेडावलं रूप मनास भोवत होतं.

ऑफिस बाहेरचा परिसर पावसाने असा उजळून निघाला होता.
एखादी नदी , दुथडी भरून वाहत जावी तशी रस्त्यावरून 'वाहत्या' पाण्याचा प्रवाह एकीकडे खळखळू लागलेला .
त्या खळखळून वाहणाऱ्या प्रवाहाकडे पाहून , एकाक्षणी वाटलं कि लहानपणी केली ती दंगा   मस्ती , मौज मजा , त्या गमती जमती,  तो आनंद, आपण पुन्हा का लुटू नये ?
का पुन्हा लहान होऊ नये  ? लहानपण प्रत्येकात दडलेलं असतंच ना …
 भले हि आपलं  वय वाढत राहो.

एखादी कागदाची होडी करून (मग ती नांगर होडी असो वा राजा राणीची) वाहत्या प्रवाहात ती सोडून त्या पाठोपाठ धावून , टाळ्या पिटून, ‘ त्या क्षणाचा आनंद’ जो आपण आपल्या लहानपणी लुटायचो, ‘ तो आता ह्या क्षणी हि का बर्र लुटू नये ?
तो आता ह्या क्षणी हि लुटून घ्यावा . ह्या गोष्टीवर मनाचं विचारविनिमय सुरु झालं .
अन मनाने एकदाचा काय तो निर्णय घेतलाच.  
त्यासाठी ते कागद धुंडाळू लागलं. नजर शोध घेऊ लागली.  अवती भोवती भिरभिरु लागली .
पण कागदाचा तुकडा कुठेच  मिळेना.  त्यात भर म्हणून कि काय , 'एक प्रश्न (अश्यावेळी टाळक्यात गजबजलेलाच असतो) मनाशी पुन्हा डोकावू लागला.
लोक काय म्हणतील ? उगा पाहून हसतील, राहू दे , जाऊ दे…!
मन काहीस खट्टू झालं .   देवाशी गार्हान गावू लागलं
लहान पण देगा देवा ... हे लहान पण दे!
तितक्यात नजर हि  घडल्याकडे स्थिरावली , त्यानं भानावर आलो .. लंच ब्रेक संपला होता . 
पटापट ऑफिस मध्ये धाव घेतली . अन पुन्हा कामास जुंपलो.
पण हा पाऊस अजूनही मनावर रुंजी घालत होता.
ये पुन्हा ये ..धाव घे…
संकेत य पाटेकर
१०.०७.२०१५

ई मेल – sanketpatekar2009@gmail.com

बुधवार, १ जुलै, २०१५

आधुनिक जगाच्या गुजगोष्टी ...

Whatsapp वर एखाद तरी अशी जिव्हाळ्याची व्यक्ती असतेच , जिथे आपण दिवसभरात 
कितीतरी वेळा तिच्या Profile मध्ये डोकावून पाहत असतो . 
मग त्या व्यक्तीचा मेसेज येवो अथवा ना येवो ...आपण तिथे डोकावणारच 
आणि डोकावतोच ..अधून मधून ..wink emoticon 
कधी उगाच स्टेटस पाहणार , कधी लास्ट सीन , कधी profile pic , कधी असच..
चैनच पडत नाही म्हणा , wink emoticon wink emoticon
त्या मध्ये काही वेळा गम्मत अशी होते , कि नकळत whatapp calling वर क्लिक
होतं अन call लागला जातो . tring tring .....
अन त्यामध्ये आपली पुन्हा झटपट ...तो call end करतना होतेच होते .
तुमची हि असेलच अशी जिव्हाळ्याची व्यक्ती wink emoticon
whatspaa_ जग
- संकेत उर्फ संकु

सोमवार, ११ मे, २०१५

प्रिय आई ...

प्रिय आई ...,

साष्टांग  दंडवत ,
आज पुन्हा एकदा  तुला पत्र लिहायला घेतोय . बऱ्याच  दिवसाने ...रागावू नकोस हा ..
तुझी आठवण सदाच असतेच  अगं  !   सावली होवून  तू नित्य नेहमी सोबतच असते म्हणा...
पण तुला ठाऊक आहे ?  आज एक खास दिवस आहे. फार महत्व आहे अग त्याला . त्या दिवसाला .
कोणता माहित आहे. ? 'मातृ दिन' . MOTHER'S DAY..!

जन्म दात्या 'आई' साठी तिच्या प्रेमापोटी , भक्तीभावाने वाहिलेला एक दिवस. 
जगभरात साजरी केला जातो अगं  ..!
कुणी आपल्या आईसाठी काही भेटी गाठी देऊन. कुणी प्रेमाचं प्रतीक असलेलं,  गुलाबचं एखाद  फुल देऊन .  कुणी तिला बाहेर कुठे फिरायला घेऊन जाऊन,   आपल्या आई बद्दल,  तिच्या प्रती असलेल प्रेमं व्यक्त करत असतं. तसं प्रेम व्यक्त करायला  एखाद  ठराविक दिवस असायलाच  हवा  अस काही नाही . 
पण तरीही ठीक आहे ना  , काय होतंय ...
असो, 
वयाने कितीही मोठो झालो तरी , आईसाठी आपण तीच  अगदी  छोटं तान्हुल बाळ असतो. 
अन म्हणूनच लहानाचं मोठे झालो असलो तरी हि एखाद वेळेस आपण मुद्दाम तिच्या कुशीत जाऊन अलगद पडून राहतो. मायेच्या पंखाखाली  वात्सल्याची उब घेत .
तेंव्हा कसलीच चिंता नसते . ना कसले दुख .... ते सर्व्वोच क्षण असतात .
जीवनातल्या अथांग सागरातले ...स्थिर असे....!
लुडबुड  न करणारे , हवेहवेसे ..हसरे , आनंदा पलीकडचे ..हो ना...

पण आई , ऐक ना ,  कित्येक दिवस झाले बघ ..,मी ह्या क्षणापासून पोरका झालोय अग  .
तू अशी दूर , नजर ठेवून आहेस. आम्हावरती ..
''मी कुठे हि असली तरी  तुमच्य्वार  नजर ठेवून असेन.''  अस म्हणून तू रागावून  कुठे गेलीस ती गेलीस . 
पुन्हा न परतण्यासाठी..
पण कधीतरी तुला,  तुझ्या पिल्लाना कवेत घेउस वाटत  असेलच   ना ..,
सांग...येशील ना  परत....., तुझ्या पिल्लांसाठी .

तुझ्या उबदार कुशीत शांतपणे  निजायच आहे अगं..! 
तुझा मायेभरला प्रेमळ स्पर्श. ...ते धीरदार (धीर देणारे ) , कष्टाने झिजलेले तुझे नाजूक कोमल हात  ,
हळुवार केसांतून  भिरभिरताना    ..किती बर वाटायचं सांगू...
ते क्षण आठवले कि आजही तुझा हात  अलगद केसातून फिरत  राहतो .
किती सौख्य आहे अग त्या स्पर्शात  . सुखाची व्याख्या ह्यावूनी वेगळी  करता  येईल का ?

'मायेचा स्पर्श' सगळे 'क्षण कसे हलके फुलके बनवितात . वेदना  दु:ख ह्याना तिथे थारा नाही. 
एखादी भळभळती जखम सुद्धा 'आनंदाचे गायन' करत चिडीचूप होईल .
इतक सामर्थ्य  , इतकं प्रेम त्या मायेच्या अलगद होणर्या स्पर्शात असतं .
'प्रेमाची' उत्पत्ती मुळात 'आई' ह्या रुपान च झालेय  जणू  .
ती अवतरतली अन प्रेमाचं वारं भिनभिनू  लागलं सर्वत्र...,  मग ती हि 'पृथ्वी' रुपी आई का असो .
ती आई आहे . वात्सल्य मूर्ती आई...

माधव ज्युलिअन  ह्यांनी त्यांच्या कवितेतून ..लिहूनच ठेवलंय. 
'प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई''

फ. मुं. शिंदे हि म्हणतात .
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.

खरच गं  ...
आईच हे नातंच  अस आहे . श्रेष्ठत्वाच ..,,त्याला तोड नाही. त्याहुनी कुणी मोठ नाही.
बघ ,  हे मी कुणाला सांगतोय .  एका गोडश्या , प्रेमळ अश्या माझ्या  'आई' लाच  'आई' ची महती सांगतोय.
वेडा आहे ना मी ,..  तुझाच  तान्हुला  गं ..! समजून घे ..घेशीलच. 
अन ये पुन्हा ...तुझ्या ह्या लेकरूसाठी...वाट पाहतोय .

हैप्पी मदर्स   डे…...मातृ दिनाच्या शुभेच्छा…!  

तुझ्या पोटी मी जन्म घेतला हे माझं भाग्य .., अन हे भाग्य मला प्रत्येक जन्मी मिळू दे.
लव्ह यु आई… ,
खूप खूप खूप सारं प्रेमं  ..!


तुझाच  तान्हुला  गं,
तुझ्याविना जगतोय ,
मायेच्या स्पर्शाविना
पोरकपणं  वाटतयं !

तुझाच लाडका,
............

नातं तुझं माझं 

असच लिहिता लिहिता...
- संकेत य पाटेकर 
१०.०५.२०१५