Sunday, February 4, 2018

आठवणींचा झुला ...

भांडुप ला आलो कि मी भांडुपचाच होऊन जातो.
खूप साऱ्या आठवणी इथे दडल्यात, जगल्यात..
..त्या जाग्या होऊन पुन्हा नव्याने खेळू लागतात, जगू लागतात.
ती शाळा..., दिसतेय, हा तीच,।
एकमजली, भांडुप व्हिलेज शाळा नं 2. पूर्व,
जिथे पहिली ते सातवी शिक्षण झालं.
तोच शाळेजवळचा गोपाळ वडापाव, अद्यापहि सुरू आहे.
त्यावेळी दीड एक रुपया वडा पाव आणि एक रुपया चटनी पाव मिळायचा, तो शाळेच्या मधल्या सुट्टीत घेत असे.
तो दिना बामा पाटील मैदान , हा तोच ,
रेल्वे जवळचा..
जिथे लहानाचे मोठे झालो, मैदानी खेळ खेळून, सराव करून,
त्याच्या खुणा अद्यापही तश्याच आहेत जागत्या, जित्या,
नशीब त्यावेळेस मोबाईल वगैरे हा प्रकार अस्तित्वात न्हवता.
मात्र सुरवात झाली होती ,पेजर ह्या प्रकाराने..
असो,
खेळासोबत , मनोरंजनाचे हि विविध कार्यक्रम पाह्यला मिळत. दिना बामा पाटील हॉल च्या आवारात,मैदानात..
मग वस्त्रहरण सारखं नाटक असेल,, दिवाळीतले विविध कार्यक्रम असतील, नाचगाणी (नृत्य स्पर्धा ) वगैरे, पहाटे चार चार वाजेपर्यंत खेळला गेलेला गरबा असेल , शीमग्यात घेतलेले सोंग..आणि मैदानी जत्रा, जी आजही सुरु आहे.
ते पिंपळाचं झाड दिसतंय,
येस तेच, तिथे आसपास आम्ही राहत असू,
रेल्वे ट्रॅक च्या अगदी बाजूलाच खेटून,
छोट्याश्या अगदी , चार पाच माणसं झोपू शकतील इतक्या पत्राच्या भिंती असलेल्या आणि कोबा असलेल्या जमीनी जागेत,
तेंव्हा ते घर हि स्वर्गाहून मोठं वाटत. आपण ह्या श्या फाटक्या तुटक्या घरात राहतोय असं कधी जाणवलं हि नाही.
कारण त्यात आईच वात्सल्य रुपी प्रेम होतं.
आणि तिच्या कुशीतली जागा...
ते दिसतंय मंदिर, गावातलं, हनुमान आणि गणेश मंदिर, आज जिथे जत्रा भरली होती.
हा तेच ते,
तिथे आम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत वा सुट्टी असल्यावर खांब खांब खेळत असू..
मंदिरा भोवती घिरट्या घालत असू,
आज त्याच मंदिरा ला भेट देण्याचा योग पुन्हा आला. यथार्थ दर्शन झालं. त्या आठवणींना उजाळा देत.
ते बघ आता, ते
चिंचेचं झाडं, माझ्या जन्माच्या आधी पासून आहे ते, पूर्व पाश्चिम रेषा जोडणाऱ्या ब्रिज वर सावली घेऊन, कित्येक वर्ष उभं.
सातवी नंतर मी कस्तुरीत (कस्तुरी विद्यालयात) दाखल झालो. त्यावेळेस शाळेत जाता जाता वा येता येता त्याची पानं चघळायचो.
आता हि तेच वाटत होतं, त्याखालून जाता जाता, तोडावी काही पाने आणि पुन्हा चघळून बघावी, तीच चव आहे का ? त्यावेळी असलेली कि बदलली, माणसं बदलतात त्याप्रमाणे ..वा जगाच्या नियमाप्रमाणे,
असो,
तो ब्रिज उतरलो कि पहिलंच लागतं ते गावदेवी मंदिर,
परीक्षा असली कि न चुकता देवीच्या समोर उभं राहायचो, गार्हाणं घालत..
'' हे देवी माते, आजचा पेपर सोपा जाऊ दे..हं '' अभ्यास होवो अथवा ना होवो , परीक्षा असल्यावरच हे असं सुचायचं अन्यथा बाहेरूनच मनातून नमस्कार करत पुढे सरायचो..
असं असायचं एकूणचं सगळं..
तो रेशनिंगच दुकानं..
रॉकेल आणि अन्य गोष्टीं साठी, तासनतास रांगेत घालवलेले ते क्षण...
ती बेकरी
जिथे दिवाळीत आई नानकटाई बनवून घेत...
जिथून आम्ही पेलाभर दूत आणत असू, चहासाठी..
ती बेकरी अजून हि सुरु आहे.
तो ब्रिज खालचा वडापाव, ते दुकान,
बाबांसोबत बाहेर आलो कि हमखास तिथे वडापाव खायला मिळत, डाळ वडे मिळत, आणि सोबत मिर्ची भजी हि..न काही सांगता..
आज तिथेच आपण पेटीस ण समोसा खाल्ला न्हाई,
असो अश्या कित्येक आठवणी आहेत..
गल्ली बोलीतल्या..
तू जुरासिक पार्क पहिला असशीलचं ना,
पहिला वाहिला, अचंबित करणारा..तो चित्रपट.
मी तो सगळा चित्रपट एका घराच्या बाहेर उभं राहून, एकाग्र नजरेनं पहिला होता..
तीच ती गल्ली..
जिथून आज आपण चालत आलो..
भांडुप ला आलो कि हे असं होतं.
भटकतं मन...आठवणीच्या झुल्यात..
शेवटी जन्मस्थळ ते माझं.
बालपण गेलेलं.
- संकेत पाटेकर

Monday, January 22, 2018

समज- गैरसमज ...

गुड नाईट ..शुभ रात्री ..!
बोलयला आत्ता कुठे सुरवात केली असतानाच त्याने अचानक
 एक्झिट घेतली. आणि तो तिच्या व्हाट्सअप रिप्लाय ची वाट बघू लागला.
त्याला वाटलं , तिचं हि तेच रिप्लाय येईल . तसंच काहीस, केवळ शुभ रात्री म्हणून ...इतर काहीही न बोलता , पुढे संवाद न वाढू देता,
पण झालं ते उलटंच...
तिचे धडाधड मेसेज येऊ लागले.
''लगेच शुभ रात्री
रागावला आहेस का ?
कि असे काही बोलले , कि आवडत नाही. ?
क्षणभर ते वाचून बरं हि वाटलं ( म्हणजे तिला हि वाटतं तर आपल्याशी बोलावेस .ह्या हेतूने... ) आणि तितकंच लागलं देखील मनाला...(नाहक त्रास दिला म्हणून )
पण त्यावर काय रिप्लाय द्यावं ते सुचत नव्हतं . कळत हि नव्हतं
शेवटी.. 'असं काही नाही''
इतकंच तिच्या त्या प्रश्नाला अधोरेखित करत त्यानं उत्तर धाडलं.
आणि तिथून पुन्हा त्यावर प्रतिक्रिया येऊ लागली .
''ठीक आहे
सॉरी ,
यापुढे काही बोलणार नाही ....''
वेदनेची ठिणगी आता पुन्हा एकदा उडाली.
आपण उगाच तिला त्रास देत आहोत , ह्या भावनेने मन व्यथित होऊ लागलं.
 आणि ते कळवळतच पुन्हा हाका देऊ लागलं.
अगं..
नको काही गैर वगैरे मनात आणू ..
सॉरी..
रागावलीस ...?
बोल ना ....
मला चैन पडणार नाही ग .., रिप्लाय दे
सॉरी......
व्हाट्सअप मेसेज चा रिप्लाय येत न्हवता. मनात धडधड वाढू लागली होती. रात्रीचे साडे बारा वाजले होते . त्या शांत एकप्रहारी रात्री, मन अधीकच वेडावून गेलं होतं. अस्वस्थ अवस्थेत ..
कित्येक दिवस....कित्येक दिवस झाले होते, फोन वर बोलणं न्हवतं. हवा तसा मोकळा संवाद न्हवता . व्हाट्सअप वर अधूनमधूनच कधीतरी जुजबी बोलणं व्हायचं . इतकंच काय ते ..,
बाकी फुल स्टॉप. पूर्णविराम अगदी...
आपण आता पूर्णपणे दुर्लक्षिले जात आहोत...हि भावनाच कुठेतरी , मनास छळ करू लागली होती.
जिच्यावर आपलं मन जडलंय. जिच्यासाठी ते तळमळतंय ...ओढवतंय, तिच्याकडून असे दुलक्षिले जाणे...
ह्याचा फार मोठा परिणाम झाला होता मनावर आणि त्याचंच रूपांतर आज तिच्याशी असं तुटक बोलण्यात झालं होतं. आणि त्यातूनच
सुरवातीची , एखाद दोन वाक्य काय ती वाचून, पुढे काही बोलण्याआधीच , शुभ रात्री असा मसेज त्याने धाडला होता .
त्याचाच तिला राग आला होता. आणि तेच तिच्या मनाला अधिक लागलं होतं .
माणसाला काय हवं असतं बरं ह्या आयुष्याकडून ? आपल्या माणसाकडून ?
आपलेपणा असलेला प्रेम ओलावाच ना , है ना ? सतत नाही , पण मनाला बांधून ठेवणारा , जोडून धरणारा हा संवाद. आणि सहवासाचे एखाद दोन क्षण, इतकंच ना ?
दुर्भाग्यानं तेच मिळत नाही .
इतक्या उण्या पुऱ्या अपेक्षा हि पूर्ण होत नसल्या कि नातं डबघाईला येतं.
तुटतं ते आतून आणि कण्हत कण्हत दूर होत जातं हळुवार, आयुष्याच्या एकाकी वाटेकडे झुकत ...
त्याचंही तेच झालं होतं. मनाचं पोखरणं झुरू झालेलं...
आणि नकळत त्यातून , तिला हि ठेच पोचली होती. जे actually त्याला नको हवं होतं .
'' सॉरी ,
यापुढे काही बोलणार नाही ....''
तिच्या ह्या बोलण्यावर त्याने आपला मनाचा हळुवार काठ ठेवला.
अगं ...
नको काही असं गैर वगैरे मनात आणू .
रागावलीस ...?
बोल ना ....
मला चैन पडणार नाही अगं .., रिप्लाय दे
सॉरी......न ,
मागोमाग एक एक मेसेज तो धाडत गेला. बस्स , तिचं रिप्लाय येणं केवळ आता बाकी होतं . त्याचीच तो वाट बघत होता.
तेवढ्यात....
'' बोल,
रागावले नाही . ''
पण तू रागावला आहेस किंव्हा काय झाले ते माहित नाही .
मनात काही ठेवू नकोस. बिंदास बोल.
मला राग येणार नाही.
थोड्यावेळाने त्यावर तिची हि प्रतिक्रिया उमटली आणि वाहता मनमोकळा संवाद दोघात सुरु झाला.
जे मनात होतं ते उघड उघडपणे बोलणं होंऊ लागलं. संवादाची मनमोकळी देवाणघेवाण होऊ लागली.
स्वतःच्या प्रश्न संचासोबत ,
तिच्या आयुष्यातील घडामोडींची , परिस्थितीची , आणि तिच्या एकंदरीत झुलत्या अस्थिर मनाची हि जाण झाली.
ज्याची पुसटशीही कल्पना न्हवती.
'' मलाच आतल्या आत घुसमटायला होतंय रे , कुणाला ते सांगता हि येतं नाही नि बोलता हि येतं नाही , आणि मी ते माझ्या फेसवरून (चेहऱ्यावरून ) कधी जाणवू हि देत नाही .
अशी आनंदी दिसत असले नेहमी तरीही , मनात कुठेशी ती 'दुखरी कढ' असते . सळणारी , वेदनादायी , मला माझंच ते माहित आहे.
खूप काही घडत रे , आपल्या अवतीभोवती , आपल्या घरात ..घरा बाहेर , ज्याचा त्रास होतो. त्याने कुठे लक्ष लागेनासं होतं बस्स...
आज मी तुझ्यापुढे एवढी मोकळी झालेय.... जे आहे ते सगळं मांडलंय.
तू मनात असं काही वेडंवाकडं आणू नकोस.
मी आहे तिचं आहे. तुझी .... बस्स थोडं ....
मना आत कोंडून ठेवलेल्या त्या असंख्य भावनांना तिने आज मोकळीक देऊ केली. नि आपलं मन थोडं हलकं फुलकं करून घेतलं.
वर वर हास्यतेजानं पुलकित दिसलेल्या , ह्या चेहऱ्यामागची हि अज्ञात बाजू आज नेमकी कळून आली. उमगली
त्याने त्याचं मन हि थोडं स्थिरावलं. विचार ध्यान झालं .
आपण नेहमी एकपात्रीच विचार करत असतो . मनाची दुसरी बाजू मात्र काळोख्यात राहते. त्याचा विचार होतं नाही. विचार झाला तरीही तो तर्क वितर्कने केवळ ...त्याला सत्याचा आधार असा नसतो . प्रति संवादाची जोड अशी नसते. आणि म्हणून ते फसतं. आणि त्याचंच उलटवार होतो .
आपल्यावर ..आपल्या ह्या मनावर ..आणि आपल्या हसऱ्या गोजिऱ्या ह्या नात्यावरही ..
थँक्स, छान वाटलं बोलून ..
शुभ रात्री , बोलू उद्या ...
मनमोकळेपणाने बोलून झाल्यावर ....तिने शुभरात्रीची घडी मोडली.
त्यावर त्याने हि आपलं प्रतिउउतर दिल.
मला हि खूप हलकं वाटलं ...थँक्स,
शुभ रात्री ...
लॅब्यू ..xxxxxx
लॅब्यू ..टू...
हलक्या मोकळ्या स्माईल निशी रात्र पुढे , हळुवार सरत गेली.
- संकेत पाटेकर
२३.०१.२०१८

Saturday, January 20, 2018

'दिलखुलास' व्यक्तिमत्वं आणि संवाद ..

  साऱ्यांनाच प्रेमात पाडतं. आपलंसं करून घेतं ते.. लगेचच.
हॉस्पिटल मधल्या साफसफाई करण्याऱया त्या मावशी..
लगबगीने पुढे होत बोलू लागल्या.
" ती कालची  माणसं होती ना, तुमच्या बाबांच्या शेजारी, त्या पलीकडं , खूप चांगली होती हा...
त्यांचा तो मुलगा,
(त्यांच्याकडे  पाहत...मी  ) ...हं, ते बहीण भाऊ असलेलं दोघे ना, त्यांच्या वडिलांच्या शेजारी  बसलेले ते ....मी  त्यांना ईचारल.
व्हय..तेच,
हॉस्पिटलात आल्या आल्या ईचारायचे,
''काय मावशी, आलात का ?''
 ''या, या ...''
''गुड मोर्निंग, गुड मोर्निंग...''
''आज लवकर...आलात. ? ''
 ''चहा नाशता घेतलात ना  ? ''
माझी सुरवात ह्यांच्या ह्या अश्या गोडं  बोलण्याने व्हायची.

सकाळी सातला हॉस्पिटला रुजू झाले कि ह्यांचा आवाज..

 मावाशीsssss.. मावशीssssss ..
मावाशीssssss.. मावशीssssss...

कशी अगदी मोकळ्या मनाची होती.
रोज काय ना काय विषय निघायचा. बोलती असायची.
कालच डिसचार्ज मिळालं त्यांना, निघून गेली. पण मनात जागा करून...


मावशीच ते बोलणं ऐकत होतो.
जनरल वॉर्ड मधला आमचा एक पलंग आणि आमचं पेशंट (बाबा)  सोडल्यास,  इतर सगळी आता  .
आपल्या घरी योग्य तो ईलाज घेऊन परतली होती.
रिकाम्या, आठ 'रुग्ण' राहतील , इतक्या ह्या प्रशस्त खोलीत मात्र,
आता .. गत आठवणींचा एकांत तेवढा कुजबुज करून राहिला  होता.
आणि ह्या अश्या  एकांतातही...
आपणहून नि आपलेपणाने साधला गेलेला तो  स्वर' , ती वाक्य , ते हसू ते मोकळपण..  मावशी चौफेर नजरेनं  शोधत राही.

अवघ्या काही दिवसाची  ती ओळख , त्यांच्यासोबत असलेली.  ती दोघं बहीण भाऊ..
हॉस्पिटल मध्ये वडलांना उपचारासाठी म्हणून आणले असताना त्यांना सोबत म्हणून केवळ  इथं  राहिलेले .  ते हि जास्तीत जास्त किती ..तर आठवडा भर ...बस्स.
पण तरीही ... ह्या मावशीवर...
केवळ सफाई कामगार म्हणून,  रुजू असलेल्या ह्या इथल्या बाईवर...
काय जादू करून गेले कुणास ठाऊक , जीव अडकून राहिलाय  त्या दोघात.
नजर म्हणुनच भिरभिरतेयं...
नाहीतर इथं  कोण कुणाला इचारतंय.  कुणीबी नाही .
मावशीच्या चेहर्यावरून आणि बोलण्यावरून  त्यांचा मनातले भाव कळून येत होते.
कुणीतरी आपलं , आपल्यापासून  दूर निघून जावं . मनाला हुरहूर लावून , एकटं टाकून , असं  काहीसं त्यांना जाणवत असावं.
म्हणूनच आज त्यांचं मन कश्यात लागत न्हवतं.  
ओढवलं जातं होतं ते , केवळ त्याच त्याच आठवणींमध्ये..पुन्हा पुन्हा...
स्वतःला ( म्हणजे त्याना ) माझ्यापुढं असं बोलतं करून देत.

'संवादाची' हीच तर खरी ताकद आहे.
कुणाला हि..अगदी  कुणालाही ...मग तो कुणी, अनोळखा  हि का असेना , क्षणात पुढे असा उभा राहिलेला हि , त्याला आपलंस करून घेण्याची  आणि सामावून घेण्याची हि  ताकद ..  ह्या 'संवादाचीच', ह्या 'शब्दसख्यांची'..
मनाची ‘सात्त्विकता’ नि ‘आपलेपणाचा’ कोवळा हसरा अर्क ...तेवढा त्यात असला म्हणजे झालं.
मग कुठल्या हि नात्याला 'नाव - गाव' ची गरज भासत नाही. पूर्व ओळखीची गरज लागत नाही .
ते आपलेपणानं , स्नेहगोडीनं मनाशी जोडलं जातं. फुलपाखरावाणी क्षणभर आपल्याशी विसावलं जातं, मुग्ध आनंद देऊन..  
अजून काय लिहू..
नात्यातला   'दुवा' म्हणजेच हा  ‘संवाद  आपण तो योग्य पद्धीतीने  कसा साधतो , त्यावरच  नात्याची वीण हि जुळली जाते.
सांगायचंय काय ...
संवाद असू द्यावा...पण आत्मप्रेमळ .. :) सहज असा ...
 - संकेत पाटेकर

२०/०१/२०१८

Saturday, January 6, 2018

''संवाद ...''

अगदी म्हणावं तर घसा कोरडा होईपर्यंत मला केकटून  ओरडावं लागतं. प्रत्येकवेळी.. 
 ''अरे बाबा.., अगं बाई .''
आहेस का जिवंत ? कि गेलात ? हा ?
एक साधा कॉल नाही करू शकत , म्हणजे कमाल आहे यार  ? विसरलात ना ? 
तेंव्हा समोरून प्रतिउत्तर  येतं. 
जरा माफीच्या स्वरात....नमत्या अदबीनं ..
''सॉरी सॉरी ... ''
आहे रे , आहे इथेच आहे. 
नाही सोडून जाणार इतक्यात..,  थोडं..... 
मग नेहमीचच  त्यांचं 'कारणे द्या'' सत्र सुरु होतं. कधी तास भर , तर कधी काही मिनिटं ,गप्पांच्या   गुणगुणत्या ओघात  आणि ते मी सगळं  निमूटपणे ऐकून घेतो. (घ्यावं लागतंच म्हणा...पर्यात नसतो नं  )    ''पनीर चिली आणि भेटीच्या शर्थीवर ...  '' 
असो, तर सांगायचं काय आहे  , 
संवाद हा नात्यांचा 'मूळ' ..म्हणावा तर 'दुवा' 
मनं बांधून ठेवणारा. जोडणारा . 
तो असा 'जागता' ठेवावा लागतो. भलेही  ''जिवाभावाची'' स्नेहगोडीने , ममत्वेने जोडली गेलेली हि  कार्टी आप आपल्या संसारात , दुनियेत कितीही व्यस्त आणि धावपळत असली तरीही ... 
शेवटी 'आयुष्य' हे अश्या नात्यांच्या सहवासातच ( क्षणांच्या  विविध अंगाने ) झुलत असतं , न्हाई का ? 
म्हणूनच कधीतरी,  साधावा संवाद .  आपल्या ह्या  मनाला सांभाळून ..थोपवून आणि घ्याव्यात अवचित भेटी गाठी. नात्यांची  वीण पुन्हा घट्ट रोवत. 
जगण्यातला गोडवा वाढवत…
तुमचाच ..
- संकेत पाटेकर 
०६ /०१/२०१८ 
Monday, November 20, 2017

प्रेम हे ....

विसरलास कि विसरतोयस ?

कधी कधी सहवासाची इतकी सवय होंऊन जाते नाकि जिवाभावाची ती सावली क्षणभर  
जरी आपल्यापासून नजरेआड झाली वा दुरावली तरी मन आपलं अस्वस्थ  आणि कावरंबावरं
होऊन जातं.
अश्यावेळी काय करावं काय नाही ह्यांचादेखील विसर पडतो . कुठंच लक्ष लागेनासं 
होतं. जोपर्यंत ती व्यक्ती पुन्हा आपल्याशी संवादाने  जुडत नाही. बोलत नाही.

दोन एक दिवसापासून त्याची देखील अशीच काहीशी अवस्था झाली होती . मन एकटेपणात वेढलं गेलं होतं. एकांतात  विचाराधीन झालं होतं.

खरं तर
एखाद्या व्यक्तीशी,  जवळीक वाढली.  सहवास मिळत गेला. आणि मनमोकळा असा संवाद
ज्वर धरू लागला  कि प्रेमाचं  बीज तिथं अंकुरायला लागतं. 

त्या बाबतीत देखील  तेच 
झालं. प्रेमाचं बीज अंकुरलं जाऊन त्यांचं आता रोपटं झालं होतं. त्याच मूळ 
मनाच्या गर्भाशी घट्ट रोवलं गेलंलं.

रोजचं बोलणं,  शब्दांसंवेत हसणं अधून मधून भेटी गाठी होणंह्याने जीव ओढवला जात होता. 
क्षणाची उसंत मिळत न्हवती . ह्याचाच   परिणाम काय तो ,  
जराशी देखील चुकामुक झाली. इकडचा क्षण तिकडे झाला  कि त्याच्या मनाची अवस्था  वर खाली 
होई. जीव वेडावून जाईकासावीस होत ते ,

तिच्यविना आता  खरं तर,क्षण क्षण जगणं हि त्याला असह्य जात होतं,
तिने सतत आपल्या सहवासात रहावं . आपल्याशी मनमोकळं बोलावं बोलत राहावं .गुणगुणावंह्यासाठी मनाची एकूण धडपड सुरु राही.  हि धडपड ,  हि मनाची तळमळ तिने हि जाणली 
होती. पहिली होती. पाहत होती.

भेटीच्या  पहिल्या क्षणापासून ..
नात्यातली वाढत असलेली जवळीक वाढत असलेला 
स्नेहबंध . प्रेमभरला संवाद आणि एके दिवस.  भेटीगाठीचं ठरलेला तो  खास असा क्षण.
डोळ्यासमोर अजूनही त्याच्या जश्याच तसा उभा राहायचा.

वार बुधवार ,क्षितीजाच्या पंख-सावलीत मोहरले गेलेले क्षण.  
सहाची वेळ ,  ऑफिस मध्ये One Hour Early चा मेल टाकून धावत पळत निघालेला तो 
आणि घरातून  सहाच्या बरोबरपाच एक  मिनिट आधी त्या जागेशी येऊन पोचलेली ती ...

साधीच अशी,  पण पाहताच,  कुणाचं हि  ध्यान मन हरपून जाईल अशी  ...नाजुक गुलाब कळी
निळपंती रेखीव नजर मृदू हळुवार आवाज तजेलदार असा उजळकांती  चेहरा 
कमनीय देहबोली आणि मनमोकळं असं खेळतं बागडतं  मन....! 
सुदंरतेचा म्हणावा तर अति नाजूक आणि रत्नमोल दागिनाच जणू तो, ...!  ईश्वरी देणच दृष्ट लागू नये 
कुणाची..कधी ! 


आयुष्यात पहिल्यांदाच असं कुणा मुलीसोबत,  जिच्यावर आपलं मन ओढवलं आहे . 
जिच्यासाठी  आपण अक्षरशः  वेडावलो गेलो आहे. त्या अश्या खास  व्यक्तीसोबत एखाद कुठला चित्रपट पाहण्याचा योग जुळून येणं,  हा आनंदच  निराळा    , ह्याची व्याप्ती अशी शब्दातहि  मांडता   येणार नाही. 
जीवसृष्टीतल्या पाखर- जीवांनी वृक्ष सावल्यांनी जसं  वाऱ्या संगे  ताल धरावा आणि आंनदाच्या स्वर लहरीत धुंद-मान व्हावे . तशी मनाची अवस्था झाली होती. तन - मन भेटीच्या ओढीनं अधिरलं आणि शहारलं जात  होतं. अवघ्या क्षणांची ती काय आता उसंत होती . 

ऑफिस मध्ये दाखल होताच ,  ...लवकर निघण्याकरिता  मेल हि  केला गेला होता .  तिच्याशी बोलणं झालं होतं . 
दोन तिकीटं आधीच ऑनलाईन बुक करून झाली होती . बस्स आता पाचच्या टोळ्याची ती घडी वाट पाहत होती. लक्ष सगळं त्या येणाऱ्या क्षणांशी  वाहत होतं.  उत्कंठा प्राणपणानं जणू झपाटून गेली  होती . 
आदल्या दिवशीचा तो संवाद 
लडिवाळ शब्दसंख्यांची जादुई मोहर त्यात 
येऊन ठाकलेल्या चित्रपटा विषयक केलेली चर्चा आणि त्याच चित्रपटाच्या शो ला एकत्रित जाण्याचा दोघांचा  तो नेमका  कट,  हा निव्वळ  योग,  नियतीच्या संमतिनेच तर ठरला जात  होता . 
क्षणाचा हि  विलंब न घेता तिने हि होकार देऊन आनंदची  व्याप्ती वाढवली होती . 
सगळं कसं जुळून आलं होतं. स्वप्नवत पण सत्य ..

बस्स आता अजून एका निर्णयाशी ठाम व्हायचं  होतं .   मोठं धाडस करायचं होतं. त्यानेच  धाकधूक वाढली होती.   
क्रमश : 
संकेत पाटेकर